बालविवाह हा अजूनही आपल्या देशाची गंभीर सामाजिक प्रश्न आहे. कायदे, योजना, जनजागृती मोहिमा असूनही अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह घडताना दिसतात. मात्र, या अंधश्रद्धा आणि रूढींविरोधात काही शिक्षकांनी सुरू केलेल्या अनोख्या मोहिमा आशेचा नवा किरण ठरत आहेत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील अशाच प्रयत्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील 'माजपूर सरकारी प्राथमिक शाळे'चे मुख्याध्यापक देवाशिष मुखोपाध्याय हे त्यापैकीच एक. वयाच्या 55 व्या वर्षीही त्यांनी समाजप्रबोधनाची आगळीवेगळी वाट निवडली आहे. देवाशिष मुखोपाध्याय हे लांब केसांचा विग, कपाळावर टिकली, अंगावर रंगीबेरंगी घागरा आणि पायांत घुंगरू बांधतात. त्यांना ‘गुलाब सुंदरी’ या नावाने ओळखले जातात. गेल्या नऊ वर्षांपासून शाळेची वेळ संपल्यानंतर ते याच रूपात गावोगाव फिरत असून बालविवाहाविरुद्ध लोकांना जागरूक करत आहेत.
कोण आहेत हे ‘गुलाब सुंदरी’ मुख्याधापक?
देवाशिष सांगतात, 'मी गेली 22 वर्षे बालविवाहाविरुद्ध जनजागृती करत होतो. भाषणे, सभा घेतल्या, पण फारसा परिणाम दिसला नाही. एकदा बहुरूपी कलाकार पाहिला. लोक त्याच्याभोवती गोळा होत होते. तेव्हा ही कल्पना सुचली.'
सुरुवातीला देवाशिष यांच्या पत्नीला थोडा संकोच वाटला, मात्र नंतर पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर ‘गुलाब सुंदरी’ या रूपात देवाशिष रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या मोहिमेला वेगळीच ओळख मिळाली. ‘गुलाब सुंदरी’च्या मोहिमेचा परिणाम आता दिसू लागला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारीही त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. “एखादा शिक्षक बहुरूपी बनून अशी जनजागृती करताना मी कधीच पाहिला नव्हता. त्यांच्या प्रयत्नांमुळे लोक नक्कीच विचार करू लागले आहेत,” असे आरामबागचे एसडीपीओ सुप्रभात चक्रवर्ती यांनी सांगितले.
पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्रातही काही शिक्षक आणि शाळा बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शाळांमधून पालकांशी संवाद, विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर व सामाजिक जाणीव निर्माण करणे, ग्रामसभा आणि गावकऱ्यांसोबत चर्चा असे उपक्रम राबवले जात आहेत. हे प्रयत्न छोटे वाटले तरी समाजात मोठा बदल घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे.
बालविवाहाविरुद्धची लढाई ही फक्त कायद्याची नाही, तर मानसिकतेची आहे. देवाशिष मुखोपाध्यायसारख्या शिक्षकांनी दाखवलेला मार्ग सांगतो की, जिद्द आणि कल्पकता असेल तर समाजप्रबोधनासाठी कोणतीही भूमिका लहान किंवा मोठी नसते. पायांत घुंगरू बांधून, समाजाच्या मनात प्रश्नांची घंटा वाजवणारा ‘गुलाब सुंदरी’ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
आज ‘गुलाब सुंदरी’ ही केवळ एक व्यक्ती किंवा वेष राहिलेला नाही, तर तो बालविवाहाविरुद्धच्या लढ्याचा प्रभावी प्रतीक बनला आहे. कायदे हातात असले तरी समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय खरा बदल शक्य नाही, हे देवाशिष मुखोपाध्याय यांच्या कार्यातून अधोरेखित होते.
नागनहल्ली शाळेकडून मुलींच्या लग्नासाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत
देशात बालविवाहाविरोधात कायदे असले तरी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांत ही प्रथा अजूनही पूर्णपणे थांबलेली नाही. विशेषतः गरिबी, स्थलांतर आणि शिक्षणाअभावी अनेक मुलींचे लग्न लवकर लावले जाते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नागनहल्ली येथील आश्रम शाळा या प्रवाहाला ठामपणे विरोध करत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
नागनहल्ली आश्रम शाळा दरवर्षी चार मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही मदत केवळ सज्ञान झाल्यानंतर लग्न करणाऱ्या मुलींनाच दिली जाते. शाळेतील बहुतांश मुली मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील किंवा अत्यंत गरीब पार्श्वभूमीतील आहेत. त्यामुळे अनेक पालक दहावी किंवा बारावी नंतर मुलींचे लग्न लवकर लावण्याचा विचार करतात. अशा वेळी शाळाच पालकांसाठी आधार ठरते.
शाळेचे संस्थापक आपक जावेद पटेल सांगतात की, “आई नजमुन्निसा इमामोद्दीन पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही योजना दहा वर्षांपूर्वी सुरू केली. आजपर्यंत 40 सज्ञान मुलींची लग्ने या योजनेतून लावून दिली आहेत. मुली शिकल्या पाहिजेत आणि सज्ञान झाल्यावरच विवाह व्हावा, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
या योजनेसोबतच शाळेतील शिक्षकांनी समुपदेशनालाही विशेष महत्त्व दिले आहे. बालविवाहाची माहिती मिळताच शिक्षक थेट पालकांची भेट घेतात. त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, कायद्यातील शिक्षेची तरतूद आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतात. तसेच, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर लग्न केल्यास 25 हजार रुपयांची मदत मिळेल, असे आश्वासन दिले जाते. या विश्वासामुळे अनेक पालकांनी बालविवाहाचा निर्णय मागे घेतला आहे.
शाळेच्या शिक्षकांनी 40 बालविवाह थांबवले
या प्रयत्नांचा परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहे. शाळेच्या शिक्षकांनी आतापर्यंत 40 अल्पवयीन मुलींना वधू बनण्यापासून वाचवले आहे. आज शाळेतील कोणत्याही मुलीचा विवाह 18 वर्षांपूर्वी होत नाही, हे या उपक्रमाचे मोठे यश मानले जाते. या बदलाची साक्ष देताना बोरगाव देशमुख येथील राजश्री कटके सांगतात, “शाळेमुळे मी बालविवाहापासून वाचले. माझे लग्न बारावी पूर्ण केल्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षी झाले. शाळेने माझ्या लग्नातही मदत केली. आज मला स्वाभिमानाने जगता येत आहे.”
शाळेच्या वर्गखोलीत ज्ञान देणारा शिक्षक, रस्त्यावर उतरून घुंगरांच्या तालावर समाजाला आरसा दाखवतो, तेव्हा परिवर्तनाची सुरुवात होते. पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत सुरू असलेल्या अशा अनोख्या प्रयत्नांमुळे बालविवाहासारख्या गंभीर प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. जर प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत अशाच संवेदनशील आणि धाडसी प्रयत्नांना चालना मिळाली, तर येणाऱ्या काळात बालविवाह केवळ आकडेवारीतच उरेल, वास्तवात नाही. समाजाच्या मनात जागरूकतेची ज्योत पेटवणारे हे प्रयत्नच उद्याच्या सुरक्षित आणि समतावादी पिढीचा पाया ठरतील.
महाराष्ट्रातील बालविवाहाची आकडेवारी -
ठरवून थांबवलेले बालविवाह (एप्रिल ते नोव्हेंबर 2025) - 945
ठरवलेले बालविवाह (एप्रिल 2024–जानेवारी 2025) - 1,246
जिल्हा स्तरावर नोंदलेले प्रकरणे (रायगड) - 21 (2025)
संपूर्ण ‘किती बालविवाह झाले’ - अधीकृत सार्वजनिक आकडा उपलब्ध नाही
एसआरएस स्टॅटिस्टिकल रिपोर्टनुसार आकडेवारी पाहिली तर परिस्थितीची गंभीरता अधिक ठळकपणे समोर येते. याच वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, देशात सर्वाधिक बालविवाह पश्चिम बंगालमध्ये होतात. येथे 6.3 टक्के मुलींचे विवाह 18 वर्षांपूर्वीच होतात. तर 18 ते 20 वयोगटातील तब्बल 44.9 टक्के मुलींचे विवाह झालेले आहेत. या दोन्ही बाबतीत झारखंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.






