(भागा वरखडे)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही देशांमधील अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अफगाणिस्तानने जोरदार नकार दिल्याचे भारताने स्वागत केले. भारताच्या ‘एअर स्ट्राईक’च्या वेळी भारताने अफगाणिस्तानवर हल्ला केल्याचा आरोप करून पाकिस्ताने मुस्लिम राष्ट्रांचे भारताविषयी मत प्रतिकूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे सांगून परस्पर उत्तर दिले. जयशंकर यांच्या चर्चेला ही पार्श्वभूमी होती.
तालिबानशी जवळीक वाढवून भारत पाकिस्तानला शह देण्याचा प्रयत्न करत आहे का?
या पहिल्या फोन संभाषणात, जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुत्ताकी यांनी केलेल्या निषेधाचे खूप कौतुक केले. जयशंकर म्हणाले, की खोट्या आणि निराधार अहवालांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या अलिकडच्या प्रयत्नांना त्यांनी दिलेल्या जोरदार नकाराचे मी स्वागत करतो. ते पाकिस्तानी माध्यमांच्या एका विभागातील वृत्तांचा संदर्भ देत होते ज्यात दावा करण्यात आला होता, की भारताने पहलगाममध्ये खोट्या ध्वज ऑपरेशनसाठी तालिबानला भाड्याने घेतले आहे. जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील लोकांशी असलेली पारंपारिक मैत्री आणि त्यांच्या विकासाच्या गरजांसाठी सतत पाठिंबा यावर भर दिला. दोन्ही नेत्यांत सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. परराष्ट्र मंत्र्यांनी या संभाषणाचे वर्णन फलदायी असे केले. 
भारताने अद्याप तालिबान राजवटीला मान्यता दिलेली नाही आणि काबूलमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापनेचा पुरस्कार करत आहे. दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये. अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये, असा आग्रह भारत धरत आहे.
दोन्ही देशांनी काय म्हटलं?
जयशंकर-मुत्ताकी चर्चेबाबत अफगाणिस्तानने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध तसेच व्यापार आणि राजनैतिक भागीदारी वाढविण्यावर विचारांची देवाणघेवाण केली. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये राजकीय पातळीवर चर्चा झाली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान एकेकाळी एकाच साम्राज्याचा भाग होते, त्यांचे संबंध कधी चांगले तर कधी तणावपूर्ण राहिले आहेत. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण हा या संबंधांना सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंधात कधी दुरावा तर कधी गोडवा निर्माण झाला आहे. शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, या नात्याने आता भारत आणि अफगाणिस्तान एकत्र येत आहेत. पाकिस्तान आणि बांगला देशाबरोबर तणावाचे संबंध असताना भारताचे अफगाणिस्तानशी संबंध चांगले होणे हे सामरिकदृष्टया महत्त्वाचे आहे.
संबंधित लेख वाचा: 1) चीन, रशिया यांच्या मध्यस्थीची मागणी करून ‘पाक कोणती नापाक चाल’ रचत आहे? |
अपगाणिस्तानचा इतिहास आणि भारत
अफगाणिस्तान महाभारत काळापासून भारतासाठी अडचणीचे कारण राहिले आहे. या भारतीय महाकाव्यात, जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झाले, तेव्हा त्याचे एक प्रमुख कारण गांधारचा एक धूर्त राजकुमार शकुनी होता, जो जुगारात निपुण होता. एकेकाळी भारताचा भाग मानला जाणारा गांधार आज कंदहार म्हणून ओळखला जातो. अफगाणिस्तानच्या दक्षिणेस, अर्घंडाब नदीजवळ वसलेले हे शहर असल्याचे मानले जाते. अर्घंडाब नदी ही हेलमंड (किंवा वैदिक हरकवती) ची उपनदी आहे आणि ती वैदिक सरस्वती नदी असावी. ‘इंडो-आर्यन’ स्थलांतर सिद्धांतानुसार गांधार हे एक संक्रमण बिंदू होते. भाषातज्ज्ञांचा असा दावा आहे, की काबुल (संस्कृतमध्ये कुभ) आणि बाल्क (संस्कृतमध्ये बालिका) यासारख्या नावांची मुळे संस्कृत आहेत, जी या सामायिक इतिहासाकडे लक्ष वेधतात.
मौर्य काळापासून अनेक शतके अफगाणिस्तानचा एक मोठा भाग भारतीय साम्राज्याचा भाग होता. 18व्या शतकात दुर्राणी साम्राज्याच्या काळात घडला. त्यानंतर ब्रिटिशांनी 'ग्रेट गेम'मध्ये अफगाणिस्तानला रशियाविरुद्ध बफर स्टेट बनवले. 1973 मध्ये जेव्हा अफगाणिस्तान प्रजासत्ताक बनले, तेव्हा भारताने मित्र म्हणून त्याला लगेच मान्यता दिली. ही मैत्री 1996 पर्यंत टिकली. तालिबान उदयास आले आणि अफगाणिस्तान शत्रू बनला. तालिबान ही एक कट्टरपंथी दहशतवादी संघटना आहे आणि तिची मुळे पाकिस्तानमध्ये आहेत. 1996 मध्ये अफगाणिस्तानातील यादवी युद्ध जिंकल्यानंतर ते सत्तेवर आले.
सध्या तालिबान आणि भारताचे संबंध कसे आहेत?
भारताकडे या संघटनेपासून दूर राहण्याची अनेक कारणे होती, त्यात पाकिस्तानकडून मिळणारा पाठिंबा, तालिबानची कट्टरपंथी विचारसरणी आणि मानवी हक्कांचे उल्लंघन. या कारणांमुळे भारताने तालिबान सरकारला कधीही मान्यता दिली नाही. डिसेंबर 1999 मध्ये काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या एका भारतीय विमानाचे अपहरण करण्यात आले. हे विमान पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केले होते आणि शेवटी ते कंधारला नेण्यात आले. त्या वेळी, तालिबानच्या उपस्थितीच्या भीतीमुळे आणि त्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे भारताने कोणतीही थेट कारवाई केली नाही.
त्याऐवजी, प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणता यावे म्हणून भारताला तीन धोकादायक दहशतवाद्यांना सोडावे लागले. त्या वेळी भारत-अफगाणिस्तान संबंध इतिहासातील सर्वात खालच्या टप्प्यावर पोहोचले होते. 2021मध्ये जेव्हा अमेरिका घाईघाईने अफगाणिस्तानातून निघून गेली, तेव्हा तालिबान पुन्हा एकदा काबूलमध्ये सत्तेवर आले. भारताने यावर कोणताही तात्काळ निर्णय घेतला नाही; परंतु वाट पाहा आणि वाट पाहा अशी नीती स्वीकारली. या काळात, भारताने संबंध मानवतावादी मदत आणि सांस्कृतिक संबंधांपुरते मर्यादित ठेवले. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि अफगाणिस्तानमध्ये बैठका आणि चर्चेच्या अफवा पसरत होत्या. भारताने नेहमीच त्या नाकारल्या आहेत.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 8 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. आता एस. जयशंकर यांनी तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही बोलणे केले आहे. याचा अर्थ काबूलकडे जाणाऱ्या या वळणदार मार्गात एक नवीन वळण आले आहे. अफगाणिस्तानच्या इतिहासावर नजर टाकली, तर हे स्पष्ट होते, की ते फार काळ कोणासोबतही राहत नाही. एकेकाळी अमेरिका त्याचा मित्र होता, जेव्हा तो सोव्हिएत युनियनशी लढत होता; पण नंतर तोच अमेरिका त्याचा शत्रू बनला. आता हाच धडा पाकिस्तानही घेत आहे. तो एकेकाळी तालिबानचा सर्वात मोठा समर्थक होता. आज त्याच्या कारस्थानांमुळे तो स्वतःच त्रस्त आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव का वाढला?
एकेकाळी तालिबानचा सूत्रधार आणि अफगाण जिहादमागील खरा चेहरा मानला जाणारा माणूस आज त्याच अफगाणिस्तानमधून चार आघाड्यांवर लढत आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) चे हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानचे म्हणणे आहे, की हे लढाऊ अफगाणिस्तानच्या भूमीतून काम करतात आणि 'छापा टाका आणि माघार घ्या' म्हणजेच हल्ला करा आणि नंतर पळून जाण्याचे धोरण स्वीकारतात. दोन डिसेंबरमध्ये ‘टीटीपी’ हल्ल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतावर हवाई हल्ला केला.
पाकिस्तानने म्हटले, की त्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला; परंतु अफगाणिस्तानने ते नाकारले आणि म्हटले की यामध्ये सामान्य लोक मारले गेले. जेव्हा पाकिस्तान सीमेवर कुंपण घालून ड्युरंड रेषा लागू करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अफगाणिस्तानशी भांडणे आणि संघर्ष होतात. 2023 मध्ये, पाकिस्तानने हजारो अफगाण निर्वासितांना देशातून हाकलून लावले आणि म्हटले, की ते सुरक्षेसाठी धोका आहेत आणि सीमेवर समस्या निर्माण करत आहेत. यामुळे अफगाण जनता आणखी संतप्त झाली.
2021 मध्ये जेव्हा तालिबान अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्तेत आले, तेव्हा पाकिस्तानने आनंद व्यक्त केला. त्यांचा लाडका मुलगा इम्रान खान, ज्याला तालिबान खान असेही म्हटले जायचे आणि इतर नेत्यांना वाटले, की आता ते दोन्ही बाजूंनी भारताला घेरतील; पण तालिबान आता पाकिस्तानला त्यांनी स्वतः तयार केलेल्या दहशतवादी सूत्राची चव चाखवत आहे.
आज जेव्हा पाकिस्तानचे अफगाणिस्तानचे स्वप्न भंग होत आहे, तेव्हा लोक हसत आहेत आणि म्हणत आहेत, आता ते फॅक-ॲप झाले आहे. ड्युरंड रेषेवरील वादामुळे भारत आणि अफगाणिस्तानमधील बर्फ वितळला आहे. आता नात्यात काही प्रमाणात उबदारपणा आहे आणि भविष्यात ते धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित होऊ शकते. तेच घडायला हवे. कारण राजनयात कोणीही नेहमीच मित्र किंवा शत्रू नसतो.






