- भागा वरखडे
धर्मांतर हा भारतीय राजकारणाचा सध्या कळीचा मुद्दा आहे. भारतात धर्मांतराबाबत मोठे आरोप केले जातात. मात्र ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ताज्या अहवालानुसार धर्मांतरामुळे इस्लाम धर्माची लोकसंख्येची वाढ तुलनेने कमी आहे, असे म्हटले आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात फक्त चार देशांमधील हिंदू धर्माची माहिती समाविष्ट आहे. त्यात भारत, बांगला देश, श्रीलंका आणि अमेरिकेचा समावेश आहे. भारत आणि बांगला देशमध्ये हिंदू म्हणून वाढलेले जवळजवळ सर्व लोक आजही हिंदू आहेत. याचा अर्थ हिदूंनी धर्मांतर केलेले नाही, असा होतो.
दुसऱ्या बाजूला ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ताज्या अहवालानुसार, पुढील 35 वर्षांत इस्लाम हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनेल. हा अंदाज इस्लामच्या लोकसंख्या वाढीला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटकांवर आधारित आहे. 2060 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या तीन अब्जांपेक्षा जास्त होईल. सध्या जगात एकूण मुस्लिम लोकसंख्या अंदाजे दोन अब्ज आहे. येणाऱ्या काळातील मुस्लिमांच्या संख्येत होणाऱ्या मोठ्या वाढीमागे उच्च लोकसंख्या दर, धर्मांतर दर आणि तरुण मुस्लिम लोकसंख्या ही मुख्य कारणे मानली जात आहेत. 
पुढील 35 वर्षंत इस्लाम हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म
अहवालात असे दिसून आले आहे, की इस्लाम केवळ जन्मदराच्या बाबतीतच वाढत नाही, तर त्याची ओळख टिकवून ठेवण्याचा दराबाबतदेखील खूप जास्त आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ताज्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की मुस्लिम कुटुंबात वाढलेले नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोक अजूनही स्वतःला मुस्लिम मानतात. फक्त अमेरिकेत ही संख्या सुमारे 74 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. धार्मिक ध्रुवीकरणाच्या या युगात धर्मांतर हा एक वादग्रस्त मुद्दा आहे; परंतु ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल त्यात स्पष्टता आणतो.
जगातील 13 देशांमध्ये धर्मांतराद्वारे इस्लाम धर्मात वाढ होण्याचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. इंडोनेशियासारख्या मुस्लिम बहुल देशांमध्ये, इस्लाम स्वीकारण्याचा किंवा सोडण्याचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तथापि, ख्रिश्चन, यहुदी आणि हिंदू धर्म यासारख्या इतर प्रमुख धर्मांच्या तुलनेत इस्लाम सोडणाऱ्या लोकांची संख्या सर्वात कमी आहे. इस्लाम धर्म सोडणारे बहुतेक लोक आता कोणताही धर्म स्वीकारत नाहीत किंवा स्वतःला ख्रिश्चन म्हणून ओळख लावत नाहीत. अमेरिका, केनिया, घाना सारख्या देशांमध्ये ख्रिश्चन धर्मातून इस्लाम धर्मात रूपांतर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
संबंधित लेख वाचा: 1) इस्लाम हा ईश्वरीय धर्म असताना संपूर्ण जग आज 'इस्लामोफोबिया' च्या भीतीने ग्रस्त का आहे…? |
भारतात इस्लामची काय स्थिती आहे?
भारतात धर्मांतराबाबत मोठे आरोप केले जातात; परंतु ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ताज्या अहवालात मात्र धर्मांतरामुळे इस्लाम धर्माची लोकसंख्येची वाढ तुलनेने कमी आहे, असे म्हटले आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात फक्त चार देशांमधील हिंदू धर्माची माहिती समाविष्ट आहे. त्यात भारत, बांगला देश, श्रीलंका आणि अमेरिकेचा समावेश आहे.
भारत आणि बांगला देशमध्ये हिंदू म्हणून वाढलेले जवळजवळ सर्व लोक आजही हिंदू आहेत. याचा अर्थ हिदूंनी धर्मांतर केलेले नाही, असा होतो. श्रीलंकेतील 10 पैकी नऊ हिंदूंनी त्यांची ओळख कायम ठेवली आहे. अमेरिकेत हिंदू धर्मात वाढलेले फक्त 82 टक्के लोक स्वतःला हिंदू मानतात. अमेरिकेतील 11 टक्के हिंदू आता नास्तिक, अज्ञेयवादी किंवा धर्माशी संबंधित नाहीत. श्रीलंकेतील अनेक हिंदूंनी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
भारत आणि बांगला देशामध्ये केलेल्या सर्वेक्षणांनुसार, येथे धार्मिक स्थिरता सर्वात जास्त आहे. येथे 99 टक्के हिंदू आणि मुस्लिम त्यांचा धर्म सोडत नाहीत. हे धार्मिक संस्कृती, कौटुंबिक मूल्ये आणि धार्मिक सामाजिक रचनेच्या ताकदीचे प्रतीक आहे. ज्या वेगाने मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे, त्याच वेगाने 2070 पर्यंत इस्लामच्या अनुयायांची संख्या जगात सर्वाधिक असेल आणि ती ख्रिश्चन धर्माला मागे टाकेल. 
2030 पर्यंत पाकिस्तान इंडोनेशियाला मागे टाकणार
‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालानुसार, 2060 पर्यंत संपूर्ण जगात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 2015 च्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढेल आणि सुमारे 3 अब्ज मुस्लिम असतील. 2015 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 1.8 अब्ज होती. 2010 मध्ये, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि भारत हे अनुक्रमे सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये होते. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालानुसार, 2030 पर्यंत पाकिस्तान इंडोनेशियाला मागे टाकून सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल. जर हीच गती अशीच राहिली, तर 2050 पर्यंत पाकिस्तानही मागे राहील आणि जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील. तथापि, तरीही भारतातील बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची असेल.
2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 17.22 कोटी मुस्लिम होते. ते देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 14.2 टक्के होते. अलीकडेच, सरकारने म्हटले होते, की 2023 च्या अखेरीस देशातील मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 20 कोटींपर्यंत पोहोचली असावी. भारत अशा देशांमध्ये समाविष्ट आहे, जिथे मुस्लिम लोकसंख्या सर्वात वेगाने वाढत आहे. देशातील बहुसंख्य हिंदू लोकसंख्येच्या तुलनेत हा दर जास्त आहे. 2030 पर्यंत अमेरिकेत मुस्लिम लोकसंख्या 62 दशलक्ष असेल, तर 2010 मध्ये ती 2.6 दशलक्ष असेल.
‘प्यू रिसर्च’चा अंदाज आहे, की 2030 पर्यंत अमेरिकेतील एकूण मुस्लिम लोकसंख्या तेथील एकूण लोकसंख्येच्या 1.7 टक्के असेल, तर 2050 पर्यंत अमेरिकेतील प्रत्येक 50 लोकांपैकी एक मुस्लिम असेल. कॅनडामध्ये 2010 च्या तुलनेत 2030 मध्ये मुस्लिम लोकसंख्या तीन पट जास्त असेल. 2010 मध्ये कॅनडामध्ये एकूण 9.4 लाख मुस्लिम होते. असा अंदाज आहे, की 2030 मध्ये त्यांची संख्या सुमारे 27 लाखांपर्यंत पोहोचेल.
मुस्लिम लोकसंख्या नेमकी कशामुळे वाढत आहे?
‘पॉप्युलेशन रेफरन्स ब्यूरो’ (पीआरबी) च्या अहवालानुसार, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मुस्लिम लोकसंख्येमागे अनेक घटक आहेत. अलिकडच्या काळात मुस्लिम महिलांच्या प्रजनन दरात घट झाली असली, तरी मुस्लिम बहुल देशांमधील महिला अजूनही बिगर मुस्लिम देशांपेक्षा जास्त मुलांना जन्म देत आहेत. दुसरे म्हणजे, मुस्लिम महिलांचा प्रजनन दर पूर्वी खूप जास्त असल्याने, त्या वेळी जन्मलेली बहुतेक मुले आता तरुण आहेत आणि लग्नाच्या किंवा पालक होण्याच्या मार्गावर आहेत. मुस्लिम देशांमध्ये, बिगर-मुस्लिम देशांच्या तुलनेत लोकसंख्या नियंत्रणासारखे कायदे खूपच शिथिल आहेत.
आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुस्लिम महिला बाळंतपण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा तुलनेने कमी वापर करतात. गैर-मुस्लिम देशांमधील 63 टक्के महिला बाल जन्म नियंत्रणाशी संबंधित उपाययोजनांचा अवलंब करतात, तर मुस्लिम देशांमधील केवळ 48 टक्के महिला अशा उपाययोजनांवर अवलंबून असतात.
‘पीआरबी’च्या मते, मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती. अलिकडच्या काळात मुस्लिमांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारली आहे. शिक्षणातही सुधारणा झाली आहे. अशा परिस्थितीत बालमृत्यू दर कमी झाला आहे.
फक्त 1400 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला इस्लाम सध्या जगातील सर्वात वेगाने पसरणारा धर्म आहे. सध्या इस्लाम हा ख्रिश्चन धर्मानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. सध्या ख्रिश्चन धर्माचे अनुयायी दोन अब्जाहून अधिक आहेत. एका अहवालानुसार, 2020 पर्यंत जगात 2.38 अब्ज लोक म्हणजेच सुमारे 238 कोटी लोक ख्रिश्चन धर्माचे पालन करत होते. इस्लाम धर्माचे अनुयायी 191 कोटी होते. त्याच वेळी, 116 कोटी लोक हिंदू धर्माचे अनुयायी होते. दुसऱ्या धर्मात धर्मांतर करणाऱ्यांची संख्या मोजणे कठीण आहे. कारण काही देशांमध्ये, जेव्हा राष्ट्रीय जनगणना केली जाते, तेव्हा लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले जात नाही. काही देशांमध्ये, कायदेशीर आणि सामाजिक परिणामांमुळे धार्मिक धर्मांतर कठीण होते.
काही मुस्लिम देशांप्रमाणे, इस्लाम सोडल्यास मृत्युदंडाची शिक्षा आहे, म्हणूनच इस्लाममधून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केलेल्यांची आकडेवारी मिळवणे कठीण आहे; परंतु उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते, की धार्मिक धर्मांतरामुळे जागतिक मुस्लिम लोकसंख्येवर कोणताही फरक पडत नाही. कारण जितके लोक इस्लाम स्वीकारतात, तितकेच लोक इस्लाम सोडतात. त्यामुळे हा आकडा जवळजवळ समान राहतो. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालानुसार, एका अभ्यासातून असे दिसून आले आहे, की 2010 ते 2050 दरम्यान, धर्मांतराद्वारे इस्लामच्या अनुयायांच्या संख्येत सुमारे 32 लाख अधिक लोक सामील होण्याची शक्यता आहे. तथापि, ही वाढ फारशी नाही. त्यामुळे बळजबरीने हिंदूंचे धर्मांतर केलेल्यांच्या टीकेला आधार मिळत नाही.






