(ज्योती यादव)
तीन वर्षांपूर्वी 14 मे रोजी, बिहारच्या जमुई इथली खुशबू पांडे दिल्लीतील कनॉट प्लेस इथं बाजारासाठी आली. तेव्हा तिनं ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका वॉक्स-पॉप प्रोग्रामरचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. ती जवळपास नऊ मिनीटं यावर बोलली आणि रातोरात स्टार झाली. युपीएससीची तयारी करणाऱ्या खुशबूनं लवकरच एका कट्टर, धर्मांध टीव्ही पॅनेलिस्टची भूमिका स्विकारली.
आपल्या वयाच्या मानानं तेव्हा ती आत्मविश्वासानं बोलू शकत नव्हती. तिन नेहमीचेच वादग्रस्त ‘उजवे’ प्रश्न विचारले आणि म्हटलं की, भारताचा इतिहास बाबरच्या वंशजांना लक्षात ठेवतो पण महाराणा प्रतापांच्या वडिलांची आठवण का ठेवत नाही. तिनं विचारलं की, भारतात हिंदू सहिष्णू नाहीत तर दीड टक्के मुस्लिम लोक 35 कोटींवर कसे पोहोचले. अर्थातच कोणी तिला सांगितलं नाही की 2023 मध्ये भारतात जवळपास 19.7 कोटी मुस्लिम लोकसंख्या होती. ती बोलत असताना बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतरांना तिनं धुडकावून लावलं.
खुशबू पांडे झाली हिंदू शेरनी…
हा व्हिडीयो पुढे- ज्ञानवापी मशिदीवर ओरडणाऱ्या ओवैसीला धुळ चाटणारी मुलगी – या थंबनेलसहीत व्हायरल झाला. उजव्या लोकांच्या पाकिस्तान, ईद, मुस्लिम, इस्लाम, ओवैसी, औरंगजेब, बाबरी मशिद या नेहमीच्या मुद्द्यांवर तिनं आपले मुद्दे मांडले. यावरच्या कॉमेंट्स सेक्शनमध्ये अनेकांनी तिला ‘हिंदू शेरनी’ म्हणून नाव दिलं. आज ‘खुशबू पांडे-हिंदू शेरनी’ या नावाचं तिचं इन्स्टाग्राम पेज आहे ज्यावर १६ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. मागील डिसेंबर मध्ये तिनं ‘वीर जगदंब सेना’ ही आपली संघटना सुरू केली, ज्याची टॅगलाईन आहे- ‘आवाज नहीं, तलवार उठाओ!’
खुशबू आजची नवी हिंदूत्त्ववादी नायिका आहे- तरुण, शिकलेली, आधुनिक आणि द्वेष पसरवण्यात तरबेज. काजल हिंदुस्थानी, सुमन पांडे आणि डॉली शर्मा यांसारख्या बायकाही हिंदूत्त्वाचा विखार पसरवण्याचं काम करत आहेत. सोशल मीडियावर त्यांना वीरांगना, शेरनी म्हटलं जातं. यातल्या काही वाघीणी रस्त्यावर उतरून द्वेष पसरवत आहेत. एप्रिल 2023 मध्ये ‘काजल हिंदूस्थानी’ला गुजरातमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यातून दंगली उसळल्या. त्यानंतर खुशबू पांडेनं आपल्या वक्तव्यानं जमुईत एका दंगलीला जन्म दिला. तिचीही तुरुंगात पाठवणी झाली.
जमुईतील मल्लेहपूर गावातील आपल्या घरात खुशबूनं सांगितलं, “मला नेहमी असं काहीतरी करायचं होतं ज्याची माझ्या सरकारी शाळेत कोणी कल्पनाही केली नसेल. माझ्या वडिलांनी सांगितलं की, आयएएस हे सर्वोच्च प्रशासकीय पद आहे. पण लवकरच मला समजलं की शासन (राजकीय नेतृत्त्व) हे प्रशासनावर (नोकरशाही) नियंत्रण ठेवत असते.”
संबंधित लेख वाचा: 1) राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? |
तुरुंगवासानंतर ‘हिंदू शेरनी’ पुन्हा सक्रीय… “तैयार रहना, पलट के वार होगा.”
या महिन्याच्या सुरूवातीला खुशबूची जामीनावर सुटका झाली. तिनं ४८ दिवस तुरुंगात घालवले. जामीन कठोर अटींवर मिळाला आहे ज्यात द्वेष पसरवणारी भाषणं न करणं, दर पंधरा दिवसांनी स्थानिक पोलिस स्टेशनला हजेरी देणं आणि सर्व न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहणं सामिल आहे. पण तिला यानं फरक पडलेला नाही. आपल्या अटकेच्या आधी तिनं एका व्हिडीयोत हसत धमकावणाऱ्या भाषेत म्हटलं- “तैयार रहना, पलट के वार होगा.” जमुईत वकील म्हणून काम करणारा तिचा भाऊ आकाश पांडे तिची पाठराखण करतो आहे.
तिचे वडील अशोक पंडित एक कंत्राटदार आहे, ते सांगतात, “ती योग्य मुद्द्यांसाठी भांडत आहे. आम्ही चूप बसणार नाही.” ते स्वतः दोनदा जमिनीच्या वादात तुरुंगात गेले होते. तिची आई पूनम पांडेलाही आपल्या मुलीच्या अटकेमुळे कुटुंबाला नवी ओळख आणि अभिमान मिळाल्याचं वाटतं. 
2022 मध्ये प्रसिद्धी मिळालेल्या खुशबूनं तीन वर्ष वाराणसी, ऋषिकेश, देहराडून अशा शहरांमध्ये यात्रा केली, युवा धर्म संसदेत भाग घेतला. हिंदू पॉप संस्कृतीच्या वाढत्या बाजारात तिला स्वतःसाठी वेगळं व्यासपीठ हवं होतं ज्याची ती सीईओ असेल. यासाठी तिनं वीर जगदंब सेना ही हिंदू संघटना सुरू केली. त्यासाठी तिनं तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर लोकांना मदतीचं आवाहनही केलं आहे.
तिच्या नावाचे अनेक फॅन पेजही इन्स्टाग्रामवर उगवत आहेत. गुगलने जेव्हा तिची ओळख, ‘हिंदू धर्माची कट्टर समर्थक जी मुसलमानांचा अपमान करण्यासाठी प्रसिद्ध आहे,’ अशी केली तो क्षण तिच्यासाठी गर्वाचा क्षण होता असं ती आपल्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सना सांगते. तिच्या घरच्यांनाही यावर गर्व वाटतो. तिच्या आईसाठीही ही सन्मानाची गोष्ट आहे.
शाळेत खुशबू अभ्यासात हुशार नव्हती. दहावी व बारावीत तिला 50 टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. भाषणं देण्यात मात्र ती पुढे असते. राष्ट्रीय स्तरावरील कराटे विजेता असल्याचाही तिचा दावा आहे. मल्लेहपूरची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 12,232 होती. त्याला दीर्घ राजकीय इतिहास आहे. चंद्रशेखर सिंह, सुशील कुमार सिंह असे नेते तिथलेच आहेत. आता खुशबू तिथली सेलिब्रिटी बनली आहे. मीडियाला तिची माहिती 2022 मध्ये मिळाली पण ती 15 वर्षांची असतानाच गावातील भागवत कथा समारंभात कलावा, टिका यांच्यावर भाषण देऊन लोकांना प्रभावित करायची. तिचं सामाजिक अस्तित्त्व लहान होतं.
शाळा-कॉलेजात तिला फारसे मित्र बनवता आले नाहीत. कारण त्यांच्या आवडीनिवडी जुळत नव्हत्या. ती म्हणते, “ते एकत्र येऊन जोधा-अकबर विषयी बोलत रहायचे जे मला सहन व्हायचं नाही.” सुरूवातीला वेगळं दिसण्याच्या तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ती सांगते की ती अभ्यासात चांगली नव्हती पण शालाबाह्य कार्यक्रमांत चांगली होती. मात्र अशा कार्यक्रमात तिचं नाव असलं की बाकीच्या मुली शेवटच्या क्षणाला काहीतरी करून ते नाव रद्द करायचे.
बॉय-कट, पुरुषी अवतार आणि बुलेट…
त्यानंतर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिनं बॉय-कट केला, पुरुषी अवतार धारण केला आणि भावाच्या मित्राकडून बुलेट घेऊन चालवू लागली. स्पोर्ट्स शू घालणं, कडं घालणं सुरू केलं. सोबतच हिंदूत्त्वाचा विचार मांडायला सुरूवात केली. ती सांगते की हिंदू संघटना आता तिला गर्दी जमवण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमात बोलवू लागले होते. तिचं कुटुंब भाजप समर्थक असले तरीही ते औपचारिकपणे भाजपशी संबंधित नाहीत. याच काळात तिच्या अटकेनं तिचा हिंदूत्त्ववादी प्रवास खंडीत झाला. आपल्या अटकेसाठी ती अनेक राजकीय व सामाजिक राजकारण तसेच स्थानिक भाजप नेत्यांच्या ‘कट’ जबाबदार असल्याचं सांगते. यात जमुईची विद्यमान आमदार आणि चँपियन शूटर श्रेयसी सिंह हीचाही समावेश आहे.
खुशबू दावा करते, “मी कॉलेजात असताना श्रेयसीनं मला तिच्या 2020 च्या निवडणूकीत मदतीसाठी बोलावलं होतं. तिच्या निवडणूकीसाठी मी माझ्या दोन परीक्षा सोडून दिल्या. माझ्या भावानं प्राचार्यांना विनवण्या केल्यावरच त्यांनी मला पास केलं. श्रेयसीला आता मी तिची प्रतिस्पर्धी वाटते. तिला आमची अंगिका भाषाही बोलता येत नाही.” खुशबू सांगते की यात जातीचाही मुद्दा आहे.
तिचा दावा आहे की मल्लेहपूरचं राजकारण तिच्या सुरूवातीच्या महाराणा प्रताप यांच्या वडिलांविषयी तिनं दिलेल्या व्हायरल बाईटच्या वेळी जो उत्साह दाखवण्यात आला होता त्याच्या विरोधात सुरू आहे. ती म्हणते, “त्यांची इच्छा आहे की ब्राह्मण परशुरामाप्रमाणे नाहीतर सुदामाप्रमाणे व्हावेत.” गावातील राजपूत आपल्याला विरोध करतात याचं तिला दुःख आहे. ओबीसी समुदायही आपल्या विरोधात गेला आहे हे ती सांगते. जमुई नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि हिंदू स्वाभिमान समूहाचे जिल्हा प्रमुख नीतिश साहने तिला बदनाम करण्याचा कट रचला होता असाही तिचा आरोप आहे. 
साहने तिला बलियाडीह गावातील एका धार्मिक कार्यक्रमात 16 फेब्रुवारीला हनुमान चालीसा वाचण्यासाठी बोलावलं होतं. गावात आधीच स्थानिक शाळेत सरस्वती पूजन केल्यामुळे तणाव होता. या कार्यक्रमाच्या वेळी जमावानं एका मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचायला सुरूवात केली. तेव्हा मशिदीच्या बाजूनं काही लोकांनी दगडं फेकायला सुरूवात केली आणि वातावरण बिघडलं. तीन लोक जखमी झाले ज्यात साह देखील होता.
खुशबूच्या विरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या. खुशबूचा दावा आहे की साह हा तेली समुदायातील असल्यानं मला वाटतं की मी जातिवादात अडकले आहे. त्यांना ब्राह्मण सहन होत नाहीत. नीतिश साह मात्र या गोष्टी नाकारतो. त्यानं सांगितलं, “मी तिला मागील सात वर्षांपासून ओळखतो. कार्यक्रमाचं निमंत्रण समूहाच्या सदस्यांकडून पाठवण्यात आलं होतं. तिला जर हिंदूत्त्वाचं राजकारण करायचं असेल तर राजपूत आणि तेली सहीत सर्व जातीच्या लोकांशी प्रेमानं वागावं लागेल. मी हॉस्पिटलमध्ये आठवडाभर होतो. पण ती मला भेटायला आली नाही की फोनवर कधी बोलली नाही.”
खुशबू पांडेला अटक का झाली होती?
हा प्रसंग घडला तेव्हा खुशबू आपल्या भावाचं लग्न जुळवण्यासाठी घरच्यांसोबत आपल्या गावात गेली होती. तिला 18 फेब्रुवारीला तिच्या काकाच्या घरी अटक करण्यात आली. खुशबू सांगते, “पोलिसांनी मला धोका देत असा विश्वास दिला की जिल्हा मॅजिस्ट्रेट अभिलाषा शर्मा यांना मला भेटायचं आहे. मी अभिमानानं गाडीत बसले कारण पोलिस स्वतः मला नेण्यासाठी आले होते असं मला वाटलं.” पण तिला अटक करण्यात आली होती. तिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 190 (अवैध जमाव), 191 (दंगा करणे), 126-2 (जीवन संकटात टाकणं), 115-2 (जखमी करणं), 196 (शत्रूत्त्व वाढवणं), तसेच 299 (धार्मिक भावनांना जाणीवपूर्वक दुखावण्याच्या इच्छेनं जाणूनबुजून व दुष्ट हेतूनं काम करणं) अनुसार खटला दाखल करण्यात आला. खुशबू म्हणते की त्या दिवशी मीच खरी बळी होते आणि स्वतःला वाचवण्यासाठी एका कारमध्ये तिला लपावं लागलं होतं. ती म्हणते, “जमावाला माझं रक्त हवं होतं आणि मी कशी वाचले ते मलाच माहिती आहे.”
तिला दीड महिना तुरुंगात रहावं लागलं जे तिच्या सरकारी अधिकारी होण्याच्या मूळ स्वप्नापासून फारच वेगळं होतं. नोव्हेंबर 2021 मध्ये तिनं दिल्लीला जाऊन स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. पण आपण यासाठी तयार नाही हे लक्षात आल्यावर तिनं परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. ती म्हणते की एम. लक्ष्मीकांत यांच्या आधुनिक भारताला आकार देण्यातील नेहरूंच्या भूमिकेविषयी त्यांनी जे लिहिलं होतं त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती.
तिच्यादृष्टीनं यात योग्य टीका केली नव्हती. माझ्या भावानं किंवा वडिलांनी मला जे शिकवलं ते हे नव्हतं असं ती सांगते. तिनं मग रजनीकांत पुराणिकचं ‘नेहरू फाईल्सः नेहरू की 127 ऐतिहासिक गलतीयाँ’ अशी पुस्तकं वाचायला सुरूवात केली. ज्यामुळे ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवू शकेल ज्या ऐकून ती मोठी झाली होती.
‘’मैं, जेल और हनुमान चालीसा’’ या पुस्तकाचे लेखन करतेय खुशबू
ती म्हण, आपल्या देशात जे युद्ध होत आहेत त्याला नेहरूंचे तेव्हाचे निर्णय जबाबदार आहेत. आपले सैनिक त्यांच्या कामामुळेच मरत आहेत. ती पुढे म्हणते की युपीएससी स्पर्धा परीक्षा साहित्यात अनेक ‘त्रूटी’ आहेत ज्यामुळे ती निराश आहे. तीन वर्ष तिनं युपीएससीची परीक्षा दिली नाही. पण यावर्षी तिनं यासाठी अर्ज भरला आहे. पण यासाठी तिला न्यायालयाची परवानगी मिळणं गरजेचं आहे. ती सध्या, ‘मैं, जेल और हनुमान चालीसा’ हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या मागे आहे. तिचा भाऊ म्हणतो की लाईन तर बदलणार नाही.
त्यानं पोलिसांवर आरोप लावला की पोलिस खुशबूला वर्षभर तरी तुरुंगात अडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे, जोवर 2025 च्या बिहार निवडणूका पूर्ण होत नाहीत. पोलिसांनी यासाठी 2017 व 2021 च्या दोन जुन्या केस उकरून काढल्याचा त्याचा दावा आहे. दोन्ही दंगलींशी सबंधित आहेत. तो म्हणतो, “पण वरीष्ठ वकील आमच्या सोबत एकत्र झाली. त्यांनी हे निश्चित केलं की फायली वेळेवर न्यायालयात पोहोचणार नाही आणि तिला जामीन मिळण्यात अडचण होणार नाही.”
तुरुगांतील खुशबूचा अनुभव मात्र चांगला होता. ती म्हणते, “माझी तपासनी करणारे डॉक्टर, बाकी कैदी आणि तुरुंग अधिकारीही मला ओळखत होते आणि त्यांनी मला चांगली वागणूक दिली.”
तिला राजकारणात प्रवेश करायचा आहे. राज्यातील यादव-वर्चस्वाच्या राजकारणाला तिला संपवायचं आहे. मला लालू आणि तेजस्वी यादवचा राजकीय शेवट बघायचा आहे असं ती सांगते. इन्स्ट्राग्रामवर खुशबूनं आपली एक बोल्ड इमेज तयार केली आहे ज्यात ती पिस्तूल किंवा तलवार फिरवताना दिसते आणि खाली भडकवणारे कॅप्शन्स असतात. चिराग पासवान, ज्योतिरादित्य सिंधीया, मनोज तिवारी, मनीष कष्यप अशा नेत्यांसोबतचे तिचे फोटोही यावर आहेत.
जेव्हा ती टीका, रुद्राक्ष, भगवे कपडे घालत नसते तेव्हा एका स्टायलीश शहरी मुलीच्या भूमिकेत दिसते. न्यायालयाच्या अटींनुसार आपलं वागणं लो-प्रोफाईल ठेवणं तिला जमत नाही आहे. ती म्हणते, “मी माझ्या आईच्या नावानं दुसरं अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी माझा फोटो टाकला की एक्स किंवा इतर प्लॅटफॉर्म्स ते बंद करून टाकतात.” सध्या आर्थिकदृष्ट्या ती आपल्या भाऊ आणि वडिलांवर अवलंबून आहे. “मी अजून युट्यूबवरून पैसे कमावण सुरू केलं नाही कारण कॅमेरावर थेट बोलणं मला जमत नाही. मला बोलण्यासाठी एखादं व्यासपीठ हवं असतं.”
इतकं असलं तरीही ती अजूनही ऑनलाईन सक्रीय असते. पहलगाम हल्ल्यानंतर तिनं आपली भाषा बदलत, तिरकस विनोदाचा आधार घेत पोस्ट्स केल्या आहेत. ‘त्या पर्यटकांना काश्मिरात का जावं लागलं? ते गेले नसते तर देशाची परिस्थिती अशी बिघडली नसती.’ याला 14 हजार लाईक्स व 1200 कॉमेंट्स आहेत. तिचं बोलणं आणि व्हिडीयो हिंदू स्त्रियांच्या पारंपरिक भावना आणि इच्छांवर परिणाम करणारे असतात. एका व्हिडीयोत ती अनेक पोषाख करताना दिसते आणि म्हणतेः “मी सनातनी नारी आहे. जर मी तलवार उचलते तर मी क्षत्राणी आहे. मी युद्धाचा बिगूल वाजवते तर मी सिखनी आहे. मी सोळा ऋंगार करते तर महारानी आहे. जर मी माझी खरी शक्ती ओळखते तर मी स्वतःच आदी शक्ती भवानी आहे.”
याशिवाय उत्तर प्रदेशच्या बागपत इथल्या डॉली शर्मासारख्या नव्या हिंदुत्त्ववादी पोरींना ती मार्गदर्शन करत असते. पहलगाम नंतर तिनं एक व्हिडीयो पोस्ट करत म्हटलं की अतिरेकी त्यांच्या धर्मामुळे ‘बहन-बेटी’चा सन्मान करत नाही. शर्मा म्हणते की तिची वक्तृत्त्व कला ही दैवी देणगी आहे आणि तिला यासाठी औपचारिक प्रशिक्षणाची गरज नाही.
खुशबूला आपल्या या शिष्येवर गर्व आहे. ती म्हणते, “ती तिला 2023 मध्ये भेटली होती. आम्ही आधी सोशल मीडियावर संपर्कात होतो. मग भाजप मुख्यालयातील कार्यक्रमांत एकत्र येत गेलो. ती हिंदूत्त्वाची प्रखर समर्थक आहे आणि तरुण स्त्री म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. ती आधी धर्मनिरपेक्ष होती पण आता माझ्या प्रशिक्षणात ती कट्टर हिंदू झाली आहे.” खुशबूनं दावा केलाय की डॉली आता दिल्लीतील आपल्या कार्यक्रमांच्या मध्ये कनॉट प्लेसच्या गल्लीत फिरत असते आणि तिलाही एक निर्णायक क्षणाची वाट आहे- एक व्हायरल ब्रेकआऊट ज्यामुळे ती चर्चेत येऊ शकेल.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






