संजना खंडारे
- ‘मथुरा’ प्रकरणामुळे देशातील बलात्कारविरोधी कायद्यांमध्ये ऐतिहासिक बदल घडले, पण त्या पीडितेला स्वतःच्या आयुष्यात दीर्घकाळ दुर्लक्ष आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
- ७२ व्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मथुराच्या पुनर्वसनासाठी आता प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून मदतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनकडून ५ लाख रुपये आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याने तिच्या सन्मानाने जगण्याच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या आणि देशातील बलात्कारविषयक कायद्यात मोठे बदल घडवून आणणाऱ्या ‘मथुरा’ प्रकरणातील पीडितेला तब्बल पन्नास वर्षांनंतर मदतीचा आधार मिळालाय. तिच्या पुनर्वसनासाठी आता प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून मदत केली जातेय. ७२ व्या वर्षी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या पीडितेच्या मदतीसाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने (एलआयएफ) ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मथुरा आणि तिच्या कुटुंबाला एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हेंनी केला होता पाठपुरावा
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील मथुराच्या पुनर्वसन प्रकरणाचा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतल्यावर प्रशासनाकडून कामांची समाधानकारक प्रगती होत असल्याचं दिसून आलं. ११ डिसेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार घरकुल योजनेअंतर्गत मथुराच्या घराचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून प्लास्टरचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेतून नियमित रेशन मिळत आहे.
(photo credit: times of india)
तसेच कुटुंबातील एका सदस्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीवर नोकरी देण्यात आली आहे. घराचे उर्वरित बांधकाम लवकर पूर्ण करून सर्वसमावेशक पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवून प्रगती अहवाल नियमितपणे सादर करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मथुराच्या कुटुंबाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळालीये.
‘परत कधी येशील?’ - मथुराच्या प्रश्नाने नीलम गोऱ्हे भावूक
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मथुरा प्रकरणाच्या संदर्भात ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितलं की,
"मथुरा ही केवळ एक व्यक्ती नसून कस्टोडियल अत्याचाराविरोधातील लढ्याचं प्रतीक बनली होती. पोलीस कोठडीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जेव्हा संबंधित पोलिसांना निर्दोष ठरवण्यात आलं, तेव्हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर मोठं आंदोलन उभं राहिलं. मी स्वतः विद्यार्थीदशेत असताना या चळवळीत सहभागी झाले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९७५ नंतर कस्टोडियल जस्टिस संदर्भातील कायद्यात बदल करण्यात आले.
यानंतर मथुरा नागपूर आणि विदर्भातील विविध महिला कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या, पण नंतर त्यांचा संपर्क तुटला. कारण त्या गडचिरोलीहून चंद्रपूरला स्थलांतरित झाल्या आणि त्यांनी आपली खरी ओळख जाणीवपूर्वक लपवून ठेवली. त्यांच्या पतीने त्यांचं नाव बदललं होतं, जेणेकरून भूतकाळातील घटनांमुळे त्यांना पुन्हा त्रास सहन करावा लागू नये. त्यामुळे स्थानिक लोकांनाही त्या “मथुरा” आहेत हे माहित नव्हतं. नंतर ‘बाईमाणूस’मध्ये बातमी आल्यानंतर मला त्यांच्याबद्दल समजलं आणि मी त्यांना भेटायला गेले. भेटीनंतर त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या अनेक अडचणी होत्या. गरीबी, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्या, पतीचे निधन आणि मुलांची अस्थिर नोकरी. त्या स्वतः आता मजुरी करू शकत नाहीत कारण त्यांची तब्येत ठीक नाही."
डॉ. नीलम गोऱ्हेंनी त्यांच्यासाठी आरोग्य सेवांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. संबंधित पदाधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सांगून त्यांचा तपास करून घेण्यात आला. तसेच त्यांच्या राहण्यासाठी नवीन घर बांधण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
(‘परत कधी येशील?’ – मथुराच्या प्रश्नाने भावूक झालेल्या डॉ. नीलम गोऱ्हे)
या भेटीदरम्यान एक भावनिक क्षणही आला. त्याबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे सांगतात,
"मथुराने मला विचारलं, 'परत कधी येशील?' या प्रश्नामुळे मी भावूक झाले.असं वाटलं की मथुरा अनेक वर्षांपासून एका संवेदनशील कार्यकर्त्याची वाट पाहत होत्या. स्त्रियांच्या चळवळीचं जे ऋण माझ्यावर आहे, त्याचा एक भाग म्हणून त्या मथुराला मी भेटायला गेले. मी काही मोठं काम केलं नाही, पण अशा अज्ञात आणि दुर्लक्षित स्त्रियांशी नातं जोडणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे आहे असं मला वाटतं."
BaiManus Impact : ‘लॉयड्स’कडून ५ लाख रुपयांची मदत
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेली ५ लाख रुपयांची ही मदत मथुरा यांच्यासाठी सुरक्षित घर बांधण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाणार आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी खेद व्यक्त केला की,
"समाजावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला स्वतःच्या जीवनात मात्र व्यवस्थेची पुरेशी सहानुभूती मिळाली नाही. इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीला सन्मानासाठी आजही संघर्ष करावा लागणे हे क्लेशदायक असून, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले."

हे ही वाचा :
काय आहे १९७२ चं मथुरा प्रकरण?
‘मथुरा’ एक गोंड समाजाची आदिवासी अल्पवयीन शेतमजूर होती. साधी अक्षर ओळखही नसलेली ही मुलगी आपल्यावर पोलीस कोठडीत झालेल्या बलात्काराच्या विरोधात न्याय मागायला रस्त्यावर उतरली. भारतातल्या विसाव्या शतकातल्या बलात्कारविरोधी चळवळीची सुरुवात याच मथुरा बलात्कार प्रकरणाने झाली. या देशातील बलात्कारविरोधी लढ्याच्या इतिहासाचं पहिलं पान जिनं लिहिलं ती हीच मथुरा होती.
(याच देसाईगंज पोलिस ठाण्यात मथुरावर बलात्कार झाला. आता त्या ठिकाणी पडकी इमारत आहे. - Photo Credit - जयेश पठाडे)
घटना होती 1972 ची आणि तारीख होती 26 मार्च...गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज गावात राहणाऱ्या अवघ्या 15 वर्षांच्या मथुरावर दोन पोलिसांनी पोलीस ठाण्यातच बलात्कार केला. आपल्यावरील अन्यायाविरोधात महाराष्ट्रातील मथुराने लढा दिला, कोणाचंही पाठबळ नसताना ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. परंतू ‘तिने विरोध केला नाही, म्हणजे तिची संमती होती” असा निर्वाळा देऊन सर्वोच्च न्यायालयाने दोषी आरोपींना निर्दोषत्व बहाल केलं. न्यायालयाच्या या निर्णयावर मथुरा काहीच बोलली नाही, पण त्यानंतर हजारो महिला मथुराचा आवाज बनून रस्त्यावर उतरल्या... देशात संतापाची लाट उसळली...अन् अखेर भारतीय दंड विधानात (IPC) कलम 376 मध्ये सुधारणा करण्यात आली...
महाराष्ट्राची ही संघर्ष नायिका मथुरा जिवंत आहे, हे जेव्हा ‘बाईमाणूस’च्या टीमला समजले तेव्हा ‘बाईमाणूस’ने तिचा शोध घेण्याचे ठरवले. गेल्या कैक वर्षांपासून ती कुठे आहे, काय करते, कशी राहते, त्या खटल्यानंतर मथुराचं पुढे काय झालं… या सगळ्या गोष्टी एक गुढ बनून राहिल्या होत्या. याचं कारण म्हणजे तिनेच स्वत:हून लोकांपासून, समाजापासून फारकत घेतली आहे. ती कुणालाच भेटत नाही, कुणाशीच बोलत नाही.
…आणि ‘बाईमाणूस’ने मथुराला शोधलं
दहा महिन्यांपूर्वी मथुराच्या शोधात ‘बाईमाणूस’च्या टीमने गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज इथल्या तिच्या राहत्या घराला भेट दिली. हे तेच घरं होतं जेव्हा 53 वर्षांपूर्वी पोलीस तिला उचलून घेऊन गेले होते… आता त्या ठिकाणी इतर कुणीतरी राहतं. त्या गावातली शांत असलेली गल्ली बघितली ज्यात मथुरा राहत होती... ज्या पोलीस चौकीत तिच्यावर अन्याय झाला ती पोलीस चौकीही बघितली…मथुरा आम्हाला कुठेच दिसली नाही आणि तिच्या खाणाखुणाही…! मथुराच्या शेजारी राहणाऱ्या 75 वर्षाच्या शांताबाई मेश्राम यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितलं होतं की, मथुराला आता कुणाशीच बोलायचं नाहीये. ती कुठे राहते हे कुणालाच सांगायचे नाही अशी मथुराने आम्हाला विनंती केली आहे. 53 वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेची पुन्हा आठवण देखील नको असं मथुराचं म्हणणं होतं.






