शंतनू खुजे
- १६ जुलै रोजी जाहीर झालेला 'नीट यूजी २०२६' परीक्षेचा निकाल आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही विद्यार्थ्यांनी उत्तरसूचीनुसार अपेक्षित गुण आणि गुणपत्रिकेवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केलाय.
- यापूर्वी ५ मे रोजी घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेत देशभरात उघडकीस आलेले पेपरफुटीचे रॅकेट यामुळे आधीच मोठा गदारोळ माजला होता. याच वादानंतर २१ जून रोजी विद्यार्थ्यांसाठी ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती.
- आधीच एका मानसिक धक्क्यातून सावरून विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिली होती. मात्र, आता या नव्या निकालातील प्रचंड तफावतीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संपूर्ण परीक्षा पद्धतीवर आणि त्यांच्या पारदर्शकतेवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशात एकीकडे नीट (NEET) पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र तरीही नीट-यूजी परीक्षेभोवतीचे वादळ काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. आधी पेपरफुटी, त्यानंतर पुनर्परीक्षा आणि आता थेट गुणांवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. १६ जुलै रोजी जाहीर झालेला 'नीट यूजी २०२६' परीक्षेचा निकाल आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही विद्यार्थ्यांनी उत्तरसूचीनुसार अपेक्षित गुण आणि गुणपत्रिकेवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केलाय.
यापूर्वी ५ मे रोजी घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेत देशभरात उघडकीस आलेले पेपरफुटीचे रॅकेट यामुळे आधीच मोठा गदारोळ माजला होता. याच वादानंतर २१ जून रोजी विद्यार्थ्यांसाठी ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. आधीच एका मानसिक धक्क्यातून सावरून विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिली होती. मात्र, आता या नव्या निकालातील प्रचंड तफावतीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संपूर्ण परीक्षा पद्धतीवर आणि त्यांच्या पारदर्शकतेवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरसूचीनुसार ५२२ गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे ९५ गुण आले आहेत. असाच काहसा प्रकार वडवणी येथील ज्ञानेश्वरी पवार हिच्यासोबत घडलाय.
उत्तरसूची बघितल्यानंतर आपल्याला ७०२ गुण मिळतील अशी अपेक्षा ज्ञानेश्वरीला होती, पण प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तिला अवघे ८७ गुण मिळाल्याने तिला धक्काच बसला. ह्या अश्या अनपेक्षित निकालांमुळे विद्यार्थ्यांनी आता या निकालावर आक्षेप घेतलाय.
सोहम गवते
सोहम आणि कुटुंबियांसाठी हा निकाल अनपेक्षित
१८ वर्षीय सोहम सांगतो, मी २१ जूनला पुन्हा नीटचा पेपर दिला. मी पेपरवरून जेव्हा स्कोर काढला तेव्हा माझा स्कोर ५२२ बनत होता आणि ज्यावेळी एनटीएने १३ जुलै ते १५ जुलैपर्यंत ओएमआर शीटसाठी पोर्टल ओपन केलं होतं, त्या पोर्टलनुसार माझा स्कोर ५२२ येत आहे.
त्यानंतर एनटीएने १६ जुलैला जवळजवळ साडेआठच्या दरम्यान रात्री अंतिम उत्तरसूचीनुसार जाहीर केली त्यानुसारही माझा स्कोर ५२२ येत आहे. पण जेव्हा एनटीएने निकाल जाहीर केला, त्या वेळी गुणपत्रिकेत मला फक्त ९५ गुण दाखवत होते.
सोहमच्या आईच्या मते, त्यांच्यासाठी हा निकाल अनपेक्षित आहे. सोहमने एवढी मेहनत घेहूनही त्याला इतके कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्या म्हणतात की,
"असा निकाल हाती येणं आम्हाला तर अपेक्षित नव्हतं. कारण की सोहमने एवढी मेहनत केली होती की तो रात्रंदिवस म्हणजे अभ्यासच करत होता. कधीच असा तो पूर्ण फॅमिलीत इन्व्हॉल्व्ह झाला नाही, कधी नातेवाईकांशी, कुठलाच कॉन्टॅक्ट हे सगळं त्याचं बंद होतं.
18-18 तास अभ्यास पण मिळाले फक्त 87 गुण…
अशीच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यातील वडवणी येथील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनी सोबत घडलाय. परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातील सुमारे १८ तास सातत्याने अभ्यास करणाऱ्या ज्ञानेश्वरीला, फेरपरीक्षेनंतर जाहीर झालेल्या अधिकृत उत्तरसूचीनुसार ७२० पैकी ७०२ गुणांची अपेक्षा होती. या संभाव्य गुणांच्या आधारे तिचे दिल्लीतील एम्समध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न होते.
मात्र, प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर स्कोअर कार्डवर तिला केवळ ८७ गुण दिल्याचे समोर आले आहे. या प्रचंड तफावतीबाबत तिच्या कुटुंबाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
याबाबत बोलताना तिच्या आई मीरा पवार यांनी सांगितले की,
"ज्ञानेश्वरीच्या निकालासोबत मुळात चुकीची ओएमआर शीट जोडण्यात आली आहे. तिच्यावर अन्याय झाला आहे, असे आमचे पुराव्यानिशी म्हणणे आहे. 'एनटीए'ने आम्हा सर्व पालकांना प्रत्यक्ष ओएमआर शीट लाईव्ह दाखवावी." या प्रकरणी पुराव्यांच्या आधारे चौकशीची मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
एनटीएकडून झालेल्या या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. आता या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एनटीएकडून न्याय मिळाला अशी मागणी केली आहे.
नितीन गवते
सोहमचे वडील नितीन गवते म्हणाले की, सरकारकडे आणि एनटीएकडे आमची एवढीच मागणी आहे की जी ओरिजिनल ओएमआर शीट आहे आणि त्यांची आन्सर की या दोन्ही चेक कराव्यात आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे."
एनटीएकडून ट्विट करत माहिती
"विद्यार्थी आणि पालकांनी छाननीसाठी केवळ मूळ ओएमआर शीटच सादर करावी, असा सल्ला दिला जात आहे. कोणतीही बनावट किंवा एआयने तयार केलेली ओएमआर शीट आढळल्यास तक्रारदारावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते," असे 'एनटीए'ने म्हटले आहे. तसेच, "सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांची सखोल छाननी केली जात आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून बनावट किंवा एआयने तयार केलेल्या ओएमआर शीट्ससह एकूण तक्रारींची सविस्तर माहिती "येत्या एक-दोन दिवसांत" सामायिक केली जाण्याची शक्यता आहे, असेही या अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
अधिकृत उत्तरसूचीनुसार आणि प्रत्यक्ष गुणपत्रिकेवरील गुणांमध्ये असलेली शेकडो अंकांची तफावत पाहता, हा केवळ एखादा तांत्रिक घोळ आहे की दुसरं काही…? असा संतप्त सवाल आता देशभरातून विचारला जात आहे.
बीडमधील ही तर दोन प्रकरणे केवळ काही उदाहरणं आहेत, त्यामुळे एनटीएच्या या निकालगोंधळात संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील आणखी किती विद्यार्थ्यांचे भवितव्य अशाच प्रकारे पणाला लागले असेल, अशी भीती आता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे आगामी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असताना, निकालातील या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस एक करून उच्च गुणांची अपेक्षा ठेवली होती, त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो न्याय न मिळाल्यास, या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या प्रवेश प्रक्रियेतून सक्तीने बाहेर राहावे लागू शकते.





