पर्यावरणाच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे… दोन दिवसांपूर्वी एक अशी दुर्दैवी घटना घडली की सबंध देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या पोखरणचा रहिवासी असलेला राधेश्याम बिश्नोई घरी असताना त्याला एक फोन आला. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेल्या भदरिया माता ओरण या देवराईमध्ये शिकारी आले आहेत असा निरोप त्याला मिळाला आणि राधेश्याम लगेचच निघाला. रात्र खुप झाली होती.
राधेश्यामने सोबतीला तीन वनविभाग अधिकारी घेतले होते. धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीमध्ये काळविटांचा समावेश होतो. त्यामुळे काळविटांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडून शिक्षा करण्यासाठी राधेश्याम आणि इतर वन्य अधिकाऱ्यांची गाडी जैसलमेरच्या रस्त्यांवरून सुसाट निघाली होती आणि एका वळणावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. राधेश्याम आणि त्याच्यासबत असलेले तीन वनविभाग अधिकारी देखील या अपघातात मरण पावले.
राधेश्याम बिश्नोईच्या अपघाती मृत्यूमुळे पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणारा प्रत्येकालाच धक्का बसला आहे. याचे कारण अवघ्या 28 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत राधेश्यामने करून ठेवलेलं काम… पोखरणचा रहिवासी असलेला राधेश्याम उत्तम वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गवादी होता. सोबतच गोडावन म्हणजेच माळढोक आणि चिंकारा म्हणजे काळवीट तसंच अन्य पशुपक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी तो प्रचंड काम करायचा.
तो त्याचा ध्यास होता. जे त्याच्या संपर्कात येत त्यांना गरज लागली तर आपल्याकडचं ज्ञान आणि छायाचित्रं अगदी सढळ हस्ते त्याने देऊ केली आहेत. ढोलिया गावी आपली पत्नी, दोन चिमुकली मुलं आणि आईसोबत राहणारे राधेश्याम केवळ 28व्या वयात गेला. त्यांचं जाणं एक मोठी पोकळी मागे ठेवून गेलं आहे. त्यांची कमी भरून निघणार नाही हे निश्चित.
राधेश्याम बिश्नोईच्या अपघाती मृत्यूमुळे पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी
राधेश्याम हा बिश्नोई समाजाचा. मुळातच हा समाज शुष्क वाळवंटासाठी प्रसिद्ध राजस्थानात वन्यप्राण्यांसाठी, झाडंवेलींसाठी काम करतो. वन्यजीवांची काळजी आणि झाडांचं रक्षण करणं हे या समाजाचं एक तत्व आहे. अभिनेता सलमान खानला काळविटांच्या शिकार प्रकरणी याच बिश्नोई समाजाने अडचणीत आणलं होतं. राधेश्यामने तर आपलं सबंध आयुष्य वन्यप्राण्यांसाठी वाहून घेतलं होतं. माळढोक (ग्रेट इंडियन बस्टार्ड) पक्ष्यांचं जतन-संवर्धन हे राधेश्यामचं मुख्य कार्य…
महाराष्ट्रातून माळढोक जवळजवळ नामशेष झाल्यानंतर राजस्थानमधील माळढोकही वेगानं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असं राधेश्यामचं म्हणणं होतं. जगभरात केवळ 150 माळढोक शिल्लक राहिले असावेत. थरच्या वाळवंटात 100 माळढोक पक्षी शिल्लक आहेत. मात्र गवताळ प्रदेश कमी होणं, शिकारी प्राण्यांकडून भक्ष्यस्थानी पडणं, मानवी हस्तक्षेप या कारणांबरोबरच वीजेच्या तारांचाही मोठा धोका माळढोकाला असतो. राजस्थानमधील माळढोक विजेच्या उच्चप्रवाही तारांमुळे धोक्यात आल्याचा निष्कर्ष राधेश्यामने काढला होता.
‘’निसर्गात ‘सामान्यपणे’ आढळणाऱ्या अनेक वन्यजीव प्रजाती हळूहळू दिसेनाशा होतात. त्या दुर्मिळ प्रजाती म्हणून गणल्या जातात. सामान्य प्रजातींचे असे ‘असामान्य’ बनणे हे कोणत्याही प्रगतिशील समाजासाठी निश्चितच धोक्याचे आहे; पण केवळ मानव प्रजातीस धोका निर्माण झाल्याशिवाय खडबडून जागे व्हायचेच नाही, असे आपण ठरवल्याने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होते आणि मग या प्रजाती कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर जाऊन पोहोचतात. यातीलच एक प्रजाती म्हणजे माळढोक’’ असं राधेश्याम सांगायचा.
संबंधित लेख वाचा: 1) वन्यजीवांचे मृत्यू टाळण्यासाठी हाच ‘महामार्ग’ आहे…! |
माळढोकला वीजेच्या तारांपासून वाचवण्यासाठी…
राजस्थानातील जैसलमर जिल्ह्यातील थारच्या वाळवंटातील डेझर्ट राष्ट्रीय उद्यान आणि पोखरण येथे बऱ्यापैकी माळढोक पाहायला मिळतात. म्हणजेच राजस्थान हे माळढोक पक्ष्याचे अखेरचे आश्रयस्थान आहे. असे असताना याच भागात मागील काही वर्षांमध्ये उभारल्या गेलेल्या भव्य वीज वाहिन्यांना धडकून दरवर्षी दोन ते तीन पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. कोळसा जाळून बनणाऱ्या ऊर्जेला संपूर्ण जगाने नाकारले असून भारतानेही त्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. अर्थात हे करण्यासाठी पवन व सौरऊर्जा हे पर्याय हरित ऊर्जेच्या रूपाने समोर आले आहे.
सर्वाधिक सौरऊर्जा असणाऱ्या राजस्थानमध्ये त्यासाठी मोठमोठे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. खरे तर ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे; परंतु या अचानक उभ्या झालेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या वीजवाहिन्यांना धडकून नष्टप्राय होऊ पाहणारे माळढोक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. मुळातच माळढोकची दूरची दृष्टी चांगली; तर जवळची दृष्टी कमजोर असते. त्यामुळे ते या तारांवर आदळतात. यासोबतच गिधाड, क्रौंच, गरुड यांसारखे असंख्य आकाराने मोठे असणारे पक्षी या वीजवाहिन्यांना धडकून मृत्युमुखी पडत आहे.
राधेश्यामने हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचवले. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. या प्रजातींची ही अखेरची संख्या असल्यानेराजस्थानात ते टिकावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या पक्ष्यांच्या अधिवासातून जाणाऱ्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे आदेश दिलेत; परंतु अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यास नकार दिला.
त्यांच्या मते ते खूपच खर्चिक काम आहे. मग या कंपन्यांनी माळढोकसारख्या पक्ष्यांना उडताना या वीजवाहिन्या दिसाव्यात, यासाठी वीज वाहिन्यांना प्लास्टिकच्या रेडियमच्या चकत्या लावण्याचे कबूल केले. त्यांच्या मते त्यामुळे माळढोक पक्ष्यांना या वीजवाहिन्या दिसतील व त्यांचे मृत्यू टाळता येतील.
असा होता राधेश्यामचा दिनक्रम…
राधेश्याम बिश्नोईचा दिनक्रम ठरलेला असायचा. गळ्यात कॅमेरा लटकावून तो सकाळीच निघायचा. ‘’मरण पावलेला माळढोक पक्षी लुप्तप्राय प्रजातींमध्ये समाविष्ट आहे. गेल्या फक्त पाच महिन्यात हा दुसरा पक्षी या तारांना धडकून मरण पावलाय. “2017 पासून [जेव्हापासून तो या पक्ष्यांवर लक्ष ठेवून आहे] नऊ पक्षी मेले आहेत,” राधेश्याम सांगायचा. जैसलमेरच्या संकरा तालुक्यातलं ढोलिया हे त्याचं गाव इथून जवळच आहे. तो तिथेच शेती करायचा. राधेश्याम हाडाचा निसर्गरक्षक होताआणि या पक्ष्यांचा फार बारकाईने अभ्यास करायचा.
“16 सप्टेंबर 2020 रोजी देगराय माता मंदिराजवळ एक गोडावण (माळढोक) मादी उच्च दाबाच्या वीजेच्या तारांना धडकून मरण पावली. तिच्या स्मृतीत आम्ही हा पुतळा उभारत आहोत.’’
असा फलक राजस्थान जैसलमेरच्या रासला गावातील देगराय माता मंदिरात लावला आहे.या मंदिरात प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेला खऱ्या आकाराचा माळढोक पक्ष्याचा एक हुबेहूब पुतळा दिसतो. अगदी हायवेवरूनही दोऱ्यांनी बंदिस्त केलेल्या जागेत एका चौथऱ्यावर हा पुतळा आपल्याला दिसू शकतो. राधेश्यामने स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने आपला निषेध व्यक्त करण्यासाठी माळढोकचा तो पुतळा उभारला आहे.
“विकासाच्या नावाखाली किती तरी गोष्टी आपल्या हातून निसटत चालल्या आहेत’’
राधेश्याम म्हणायचा, “विकासाच्या नावाखाली किती तरी गोष्टी आपल्या हातून निसटत चालल्या आहेत. आणि हा सगळा विकास नक्की आहे तरी कुणासाठी? इथून १०० मीटर अंतरावर सोलर फार्म आहे. वरून उच्च दाबाच्या तारा जातायत. पण गावात मात्र विजेचा लपंडाव थांबलेला नाही.
दर वर्षी आर्क्टिकहून मध्य युरोप आणि आशिया खंड पार करून हिंदी महासागरापर्यंत स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा ठरलेला मार्ग आहे. त्याला सेंट्रल एशियन फ्लायवे म्हणतात. आणि जैसलमेर याच मार्गामध्ये आहे. पाण्यामध्ये राहणाऱ्या किमान 182 प्रकारच्या पक्ष्य़ांचे 279 थवे या मार्गाने उडत येत असल्याचं स्थलांतर करणारे पक्षी आणि वन्यजीव संवर्धन जाहीरनाम्यामध्ये म्हटलं आहे. यातले काही पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
यामध्ये पांढऱ्या पाठीचं गिधाड, लांब चोचीचे गिधाड, व्हाइट ब्रोड बुशचॅट, हिरवी मुनिया आणि हौबारा बस्टर्ड या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. डेझर्ट नॅशलन पार्कच्या 4,200 चौकिमी क्षेत्रात विजेच्या तारांमुळे फक्त माळढोकच नाही तर दर वर्षी अंदाजे 84,000 पक्षी मरण पावत असल्याचं वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा 2018 साली करण्यात आलेला एक अभ्यास सांगतो. “कुठल्याही प्रजातीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे मृत्यू धोक्याची घंटा आहेत. ती प्रजात नष्ट होण्याची ही नांदीच म्हणता येईल, अशी माहिता राधेश्याम द्यायचा.
धोका फक्त आभाळात नाहीये. जमिनीवर देखील आहे. सामूहिक मालकीचे गवताळ पट्टे आणि ओरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरायांच्या क्षेत्रात आता जिथे तिथे 200 मीटर उंच पवनचक्क्या उभारल्या गेल्या आहेत. दोन पवनचक्क्यांमध्ये 500 मीटरचं अंतर आहे. अनेक हेक्टर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत आणि जागा कुंपण बांधून बंदिस्त केलेल्या आहेत.
सगळेच समूह सांगतात की या देवरायांमध्ये पूर्वी एक फांदीसुद्धा तोडायला बंदी होती. पण आता मात्र नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांनी या जागा गिळंकृत केल्या आहेत. गुरं-जनावरं चारणं म्हणजे आता सापशिडीचा खेळ झालाय. सरळ वाटा राहिल्याच नाहीयेत. कुंपणांच्या कडेने, पवनचक्क्या आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या मायक्रोग्रिड तारा टाळून चारणी करावी लागत आहे.
थोडसं माळढोकबद्दल…
माळढोक पक्ष्याची शान खरंच पाहण्यासारखी आहे. एक मीटर उंच असलेल्या या पक्ष्याचं वजन 5 ते 10 किलो भरतं. वर्षभरात माळढोक पक्षीण एकच अंडं घालते तेही उघड्यावर. जमिनीवर राहणाऱ्या या पक्ष्याला उडण्यापेक्षा चालणं जास्त आवडतं. पण जेव्हा तो आकाशात झेप घेतो ते दृश्य पाहण्यासारखंच असतं – वाळवंटावरच्या निरभ्र आकाशात पंख पसरून जेव्हा हा वजनदार पक्षी उडतो तेव्हा त्याच्या पंखांची लांबी जवळपास 4.5 फूट इतकी भरते.
माळढोक पक्ष्याचे डोळे समोर नाही तर दोन बाजूला असतात त्यामुळे समोर संकट आलं तरी त्याला लगेत दिसत नाही. त्यामुळे तो थेट विजेच्या तारांवर जाऊन आदळतो किंवा अगदी शेवटच्या क्षणी आपली दिशा बदलतो. पण मोठे ट्रॉलर ट्रक जसे अचानक वळण घेऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे माळढोक अचानक दिशा बदलू शकत नाहीत. कधी कधी वेळ निघून गेलेली असते. कधी कधी त्यांचे पंख किंवा डोकंच 30 मीटर उंचीवरच्या तारांना आपटतं.
आपल्याच देशात आढळणाऱ्या या पक्ष्याचं या पृथ्वीतलावरचं हे एकच घर आहे. आणि तिथेच हा पक्षी सुरक्षित नाहीये. आणि आपण मात्र परक्या भूमीवरच्या परक्या प्रजातीला, आफ्रिकन चित्त्याला आपल्याकडे वसवण्यासाठी पुढच्या पाच वर्षात 224 कोटी खर्च करणार आहोत.






