भागा वरखडे
- छत्तीसगड जिल्ह्यात हजारो टन धान्याला पाय फुटले. हे धान्यही उंदरांनी फस्त केले असे अधिकारी सांगतात.
- मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचा काही भाग खचला. त्याचे कारणही उंदीर देण्यात आले.
- सात वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटीचे खापर घुशी, उंदरांवर फोडण्याच्या चौकशीचे काय झाले?
उंदीर, घुशी, मुंगूस, साप बिळे करून राहतात. त्यासाठी ते माती उकरतात. उंदीर तर अन्नधान्य फस्त करतात; परंतु उंदरापेक्षाही भ्रष्टाचार ही मोठी कीड असून, ते हजारो कोटी रुपयांचे धान्य फस्त करतात आणि त्याचे खापर मात्र उंदरांवर फोडले जाते. छतीसगडमध्येही २६ हजार टन धान्यांत अधिकाऱ्यांनीच भ्रष्टाचार केला असून, उंदरांनी धान खाल्ल्याचा कांगावा सुरू केला आहे. त्याची चौकशी सुरू झाली असली, तरी सात वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटीचे खापर घुशी, उंदरांवर फोडण्याच्या चौकशीचे काय झाले, याची आठवण आता ताजी झाली.
- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दोन जुलै २०१९ रोजी फुटले. 2 तिवरे धरण फुटून 19 जणांचे प्राण गेले होते. तेव्हाही महाराष्ट्रात महायुतीचे फडणवीस यांचे सरकार होते. हे धरण का फुटले याचे जे कारण सरकारने दिले होते त्याची खूप चर्चा झाली होती. खेकड्यांनी तिवरे धरण फोडल्याचा तर्क तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी काढला होता.
- अगदी अलीकडेच मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचा काही भाग खचला. त्याचे कारणही उंदीर देण्यात आले. या महामार्गाच्या देखभाल व्यवस्थापकाने दावा केला की, राजस्थानातील दौसा भागात महामार्ग खचण्याला उंदिर जबाबदार आहेत. उंदरांनी रस्ता पोखरल्याने तो खचला आहे.
- छत्तीसगड जिल्ह्यात हजारो टन धान्याला पाय फुटले. हे धान्यही उंदरांनी फस्त केले असे अधिकारी सांगतात. येथील दोन सरकारी धान खरेदी केंद्रांमधून तब्बल 26,000 क्विंटल धान गायब झाले असून, त्याची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये आहे. 'धान उघड्यावर साठवले होते, त्यामुळे उंदीर आणि वाळवीने त्याचे नुकसान केले,' असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला.

या सर्व प्रकारामुळे उंदीर किती उपद्रवी आहेत, त्यांच्या दातात किती शक्ती आहे ते कसा विश्वविक्रम करतात, याची चर्चा सुरू झाली आहे. ‘उंदराने धरण खाल्ले’ म्हणजे उंदरांनी धरण कुरतडून किंवा नुकसान करून ते कमकुवत केले आहे. मोठ्या नुकसान करणाऱ्या लहान गोष्टींचे वर्णन करण्यासाठीदेखील अशा म्हणींचा वापर केला जातो. उंदरांवर दोषारोप करणे सोपे असते. राजकीय नेते, अधिकारी आपल्यावरचे बालंट टाळण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे खापर उंदरावर फोडून मोकळे होत आहेत. काही ठिकाणी सलाईन, मद्य उंदरांनी पिल्याचे आरोप झाले.
उंदरांनी रस्ता पोखरला, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग खचला
बिहारमध्ये तर राजकीय नेते, अधिकारी काहीही पचवतात. राजकीय नेते, अधिकाऱ्यांचे अनुकरण आता बिहारचे उंदीर ही करायला लागले आहेत. बिहारचे उंदीर खोडकर, मद्यपी आणि खादाड आहेत. ते इतके धोकादायक आहेत, की जे काही चूक होते, ते उंदरांचेच कृत्य आहे, असे गृहीत धरले जाते. लाखो लिटर जप्त केलेल्या मद्याच्या सेवनाचे प्रकरण असो किंवा धरण कोसळल्याचा आरोप; बिहारमधील धोकादायक उंदीर हे सर्व आरोप सोबत घेऊन फिरतात. सरकारी संरक्षणाखाली ते कालव्याच्या काठावर, कचराकुंड्यांवर आणि रेल्वे रुळांवर वाढतात. आता ते अधिकाऱ्यांना इतके मदत करत असल्याने त्यांची खुशामत अपरिहार्य आहे!
संबंधित लेख वाचा:
25 हजार उंदीर मामांचे घर : राजस्थानातील करणी माता मंदिर
एक प्रकरण सिवानमधील आहे. तिथे उंदरांनी पुन्हा एकदा ‘साहेबांच्या निष्काळजीपणाचा’ दोष आपल्या माथी घेतला आहे. देखभालीअभावी नवादा गावातील कालव्याचा बांध फुटला. परिणामी, नवादा गावात पाणी शिरले आणि अनेक शेतकऱ्यांची शेकडो एकर भात पिके बुडाली. आम्ही धरण कुरतडले नाही किंवा ते आम्ही नव्हेच असे सांगायला उंदीर येणार नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे फावते. उंदरांची ही दानशूरता निष्काळजी अधिकाऱ्यांना सुखनैव पैसे कमवण्यास आणि आम्ही त्यातले नाही, हे सांगण्यास मदत करीत असते.
बापरे! उंदरांनी खाल्ले 8 कोटींचे तांदूळ?
सध्या छत्तीसगडमध्ये आधारभूत किमतीवर धान खरेदी सुरू आहे. सरकारच्या नियुक्त केलेल्या धान खरेदी कालावधीत, शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात धानाची तस्करी छत्तीसगडमध्ये केली जाते आणि धान खरेदी केंद्रांवर संगनमत करून ते विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले जातात. काही प्रकरणांमध्ये, धान तस्करांना यशही मिळते. वार्षिक कार्यक्रमादरम्यान कबीरधाम जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली.
चारभाठा आणि बघरा बाजार संकलन केंद्रांवर २६ हजार क्विंटल धान गायब झाल्याचे आढळले. हे धान २०२४-२५ मध्ये आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आले होते. त्याची अंदाजे किंमत अंदाजे आठ कोटी रुपये होती. प्रशासन उंदीर, वाळवी आणि कीटकांमुळे धान कमी झाल्याचे सांगते. 
प्रशासनाच्या या युक्तिवादावरून असे सूचित होते, की अधिकाऱ्यांनी असे गृहीत धरले असावे, की उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. गणेश लंबोदर असल्याने उंदराचे पोटही हजारो क्विंटल धान खाण्याइतके मोठे असले पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या धानाचा आणि उंदरांना दररोज लागणाऱ्या अन्नाचा हिशेब केला, तर गणित बिघडते. उंदरांना दररोज १५ ते वीस ग्राम खाद्य लागते.
२६ हजार क्विंटलचा हिशेब आणि वर्षभर उंदीर धान सोडून काहीच खात नाहीत, असा हिशेब केला, तर या धान्याच्या गोदामात दररोज साडेतीन लाख उंदीर असले पाहिजेत. हे उंदीर धान कुरताडायला आले, तरी गोदामात तेवढी जागा आहे का, हा खरा प्रश्न आहे. अधिकारी किती बिनडोकपणे आपल्या गैरव्यवहाराचे समर्थन करण्यासाठी उंदरांचा आधार घेतात, हे यावरून स्पष्ट होते.
सरकारने हे संपूर्ण प्रकरण खूप गांभीर्याने घेतले पाहिजे. साठवणूक केंद्राच्या प्रमुखांना निलंबित करण्यापुरतीच कारवाई करू नये, तर असा हास्यास्पद युक्तिवाद आणि कारणे देणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांवरही चौकशी आणि कारवाई केली पाहिजे. व्यवस्थेतील उंदरांनी फक्त गोदामांमध्येच नाहीत, तर फायलींमध्येही घुसखोरी केली आहे. जेव्हा जेव्हा एखादा मोठा घोटाळा उघडकीस येतो, तेव्हा उंदीर कधीकधी दारू पितात आणि वाळवी कधीकधी सरकारी फायली खातात.
कवर्धा जिल्ह्यात समोर आलेला धान घोटाळा केवळ धक्कादायकच नाही, तर सरकारी दाव्यांच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो. जिल्हा मार्केटिंग अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी कवर्धा येथील परिस्थिती इतर जिल्ह्यांपेक्षा चांगली आहे, असे सांगितले आहे. असे असेल, तर अन्य जिल्ह्यातील घोटाळा किती मोठा आहे, हे लक्षात येईल. उंदीर आणि वाळवी यांनी धान खाल्ले असल्याच्या दाव्यांदरम्यान, आणखी एक गंभीर तथ्य समोर आले आहे.
बाजार चारभाठा साठवण केंद्राच्या प्रभारीवर फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे. इतर केंद्रांवर अधिकाऱ्यांनी बनावट बिले तयार केल्याचा आरोप आहे. खराब झालेल्या धानाच्या खरेदीसाठी बनावट बिले तयार करून खोट्या आवक-जावकेच्या पावत्या दाखवणे, कामगारांची उपस्थिती खोटी करणे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये छेडछाड करणे यांचा समावेश आहे. उंदरांनी आणि वाळवीने धान फस्त केले असेल, तर हा उपद्वव्याप कशासाठी करण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.
तानाजी सावंत म्हणतात त्याप्रमाणे खेकड्यांमुळे धरण फुटू शकतं का?
महाराष्ट्रात तिवरे धरणासारखी किंवा तिवरेपेक्षाही मोठी असलेली मातीची चार हजार धरणे आहेत. इतर धरणे उंदर, घुशीमुळे कधीच फुटली नाहीत; परंतु चिपळूणजवळचे तिवरे धरण मात्र फुटले. उंदीर, घुशीमुळे धरण कुरतडले असा जावईशोध तत्कालीन जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी लावला होता.
स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषद आणि कृषी खात्याने बांधलेल्या मातीच्या बांधांची संख्याही ४० हजारांपेक्षा जास्त आहे. हे सगळे बांध फुटत नाहीत आणि तिवरे धरणच कसे काय फुटू शकते, असे सरकारमधील कुणालाही वाटले नाही. खेकड्यांची बिळे फारशी खोलवर जात नाहीत. सात-आठ फुटांच्या पलीकडे ती गेलेली नसतात. असे असताना धरणाच्या पायथ्यापर्यंत खेकडे कसे पोचले, हे सावंत आणि त्यांना ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यालाच माहीत! 
तिवरे धरण फुटण्याला एक तांत्रिक कारण आहे. मातीची धरणे बांधत असताना त्याचा ‘हर्टिंग झोन’ म्हणजेच गाभा हा काळ्या मातीने भरायचा असतो. कारण काळी माती ही चिकट असते. तिची पकड मजबूत असते; परंतु कोकणात काळी माती मिळतच नाही. धरणाच्या बांधकाम खर्चात काळ्या मातीचा खर्च गृहीत धरलेला असतो. कोकणात जरी काळी माती नसली, तरी सह्याद्रीच्या पूर्वेकडून आणून ती वापरायला हवी; परंतु खर्च वाचवून जादा नफेखोरी करणारे ठेकेदार, त्यांना पाठिशी अधिकारी आणि मंत्री लोकांच्या जीवापेक्षा पैशाला महत्त्व देतात आणि तिवरेसारखी एखादी घटना घडली, की उंदीर, खेकडे, घुशीला जबाबदार धरून नामानिराळे होतात.
तिवरे धरण फुटलेली दृश्ये पाहिली, तर गाभा आणि बाह्य भाग एकाच प्रकारच्या तांबड्या मातीने बनल्याचे दिसत आहे. कुठेही ‘हर्टिंग झोन’ वेगळा दिसत नाही. त्यामुळे खूप मोठं "टेक्निकल व्हॉयलेशन" झालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही घटना घडली. त्यासाठी खेकड्यांना दोष देणे बरोबर नाही. धरण फुटण्याच्या घटनेची चौकशी ‘एसआयटी’तर्फे झाली. त्यात कोणावर ठपका ठेवला हे स्पष्ट झाले नाही. तसेच आताही उंदराने धान फस्त केल्याप्रकरणाचा कांगावा करणाऱ्यांबाबत होऊ नये, ही अपेक्षा वावगी नाही.






