स्थळ: मुलतान, पाकिस्तान
पहाटेचा गारठा पडलेला होता. तिने चटकन गॅस पेटवला आणि त्यावर कढई तापत ठेवली. भल्या मोठ्या पातेल्यात तिने जवळ-जवळ 10-12 किलो बेसनाचे पीठ कालवायला घेतलं. एक डोळा साथ देत नसला तरीही ती तिच्या कामाला लागली होती, कारण तेच तिच्या उपजीविकेचं साधन होतं. कढईतल्या तापलेल्या तेलात तिने अलगद बेसनाच्या “फुलक्या” सोडल्या आणि त्या तळलेल्या खुसखुशीत फुलक्या म्हणजेच बेसनाचे वडे तिने पाण्यात भिजविले. उकळत्या पाण्यात चिंच,गूळ आणि खजूराचं मिश्रण असलेली आंबट-गोड चटणी तयार होत होती. सकाळचे 8 उजाडले आणि आता तिचा हा माल तयार झालेला होता. तिने तो सगळा माल एका हातगाडीवर चढवला आणि ती तिच्या नेहमीच्या ठिकाणी “पानी की फुलकीया” विकायला गेली.
हा नित्यक्रम कदाचित प्रत्येक व्यावसायिक महिलेचा असू शकतो मग यात इतकं खास काय आहे? परंतु ही व्यावसायिक महिला जरा वेगळी आहे. तिचं वेगळं पण म्हणजे एका बुरसटलेल्या आणि अत्यंत जुनाट विचारसरणी असलेल्या पाकिस्तानसारख्या पितृसत्ताक देशात तिने अनेक सामाजिक मापदंडांना भेदून, अनेक टिप्पण्या आणि टोमण्यांना दुर्लक्षित करून स्वतःचा एकव्यवसाय सुरु केला. आणि तिचं आणखी एक वेगळपणं म्हणजे ही महिला पारलिंगी (transgender) आहे. या महिलेचं नाव आहे रिमा… सबंध पाकिस्तानमध्ये ‘रिमा फुलकेवाली’ या नावाने प्रसिद्ध. सध्या सोशल मीडियावर रिमा फुलकेवालीचे व्हिडीओज व्हायरल होत चालले आहेत. ज्यात लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळेच रिमाच्या हातची फुलकिया मोठ्या चवीने खाताना दिसतात.
पाकिस्तान सारख्या रूढीवादी देशात ट्रान्सजेंडर समुदायावर अनेकदा लिंग-आधारित हिंसाचार, लैंगिक शोषण ते खूनापर्यंतचे गंभीर गुन्हे घडल्याची आकेडवारी आहे. पाकिस्तानी आरोग्य मंत्रालयानुसार, पाकिस्तानच्या एकूण 250 दशलक्ष लोकसंख्येपैकी ट्रान्स समुदायाची संख्या अंदाजे दीड लाखांच्या आसपास आहे. यापैकी अनेक ट्रान्स महिलांचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत म्हणजे लग्नसमारंभांमध्ये नाचणे किंवा सिग्नल चौकांवर भिक मागणे. समाजातील पूर्वग्रहांमुळे हा ट्रान्स समुदाय आजही शिक्षणासारख्या अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. रोजीरोटी कमावण्याच्या संघर्षात या समुदायातील व्यक्तींना अनेक अपमान सहन करत दिवस काढावे लागतात; अनेकांनी तर आता “सुखद” दिवसांची आशाही सोडून दिली आहे.
भारतातही रिमा फुलकेवालीचे काही व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर ‘बाईमाणूस’ने रिमाची कहाणी जाणून घ्यायचं ठरवलं आणि थेट पाकिस्तानच्या मुलतानमध्ये रिमाशी संपर्क साधला आणि त्यातून समोर आला पाकिस्तानसारख्या रूढीवादी देशात एका पारलिंगी महिलेने स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी केलेला अनोखा संघर्ष…
‘बाईमाणूस’ने ‘रिमा फुलकेवाली’शी थेट पाकिस्तानमध्ये संपर्क साधला
‘बाईमाणूस’शी बोलताना रिमा सांगते की, मुलतान शहराच्या सदर कॅन्ट भागात तिचे बालपण गेले. माझं पारलिंगी असणं हे माझ्या कुटुंबानी पूर्णपणे स्वीकारलंय. आठ भाऊ–बहिणींमध्ये मी घरातील सर्वात मोठी होती. अठराविश्व दारिद्र्य असलेल्या आमच्या घरात दोन वेळचं अन्न मिळवणं कठीण होते. शेजाऱ्यांचे उरलेले, टाकून देण्यासारखे अन्न खाण्याखेरीज माझ्या कुटुंबाकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या परिस्थितीतही माझ्या आईची इच्छा होती की मी शिक्षण घ्यावं आणि आपलं नाव कमवावं. मात्र परिस्थितीसमोर आईची इच्छा हारली, केवळ आठ वर्षांच्या वयापासून आईला आणि भावंडांना सांभाळण्यासाठी मी कमाईत हातभार लावायला सुरुवात केली.
रिमा काही इयत्ताच शाळा शिकली. त्यानंतर तिला शाळेला रामराम ठोकावा लागला. पैसे कमवण्यासाठी तिने हातात येईल तशी कामे केली, फाटलेली गोधडी शिवणे, झोपण्याची खाट बनवणे, लग्नसमारंभात साफसफाईची कामे करणे, हॉटेलपासून ते लोकांच्या घरात जाऊन घरगुती कामे करणे इत्यादी.
पाकिस्तानातील पारलिंगी महिलांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत, सिग्नलवर भीक मागणे हाच असतो. रस्त्यावर पारलिंगी महिलांचे अनुभव अत्यंत वाईट असतात, त्यांना लिंग आधारित हिंसेचा अधिकाधिक धोका असतो. पाकिस्तानात ट्रान्स व्यक्तींसाठी सुसज्ज कायदा नसल्याने नराधमांसाठी ट्रान्स व्यक्तींचे शोषण ही एक चालून आलेली “संधी” असते. या सगळ्याचा भाग न बनण्याचा निश्चयच रिमाला व्यवसायाचा मार्ग दाखवत होता
ट्रान्सजेंडर रिमा म्हणते, ‘दही भल्ल्याच्या स्टॉलमुळे परिसरात प्रतिष्ठा वाढली’
रिमाने आधी शेळी आणि मेंढपालनाचा व्यवसाय सुरू केलेला, परंतु दुसऱ्या व्यावसायिकांना तो रुचण्यासारखा नव्हता, एक पारलिंगी स्वतःच्या पायावर उभी राहून कशी व्यवसाय करू शकते या भावनेतून अनेकदा रिमाच्या शेळ्या-मेंढ्या चोरण्यात आल्या. ह्या गोष्टीचा तिच्यावर गंभीर परिणाम झाला, लोकांची चाकरी आणि पडेल ते काम करताना तिला अनेक टिपण्या, टोमण्यांचा सामना करावा लागला, ह्यातून मार्ग म्हणून जेव्हा तिने स्वतःचाच व्यवसाय सुरू केला होता तेंव्हा समाजाने तो धुळीस मिळवला. शेवटी ह्या जगात “जगू तर जगू कशी” अशा भावनेतून रिमा नैराश्यात खोलवर बुडत होती. परंतु त्याच वेळी रिमाच्या आईने तिला दही भल्ले विकण्याचा सल्ला दिला आणि त्याला होकार देत हळूहळू रिमाने व्यवसायावर पकड मिळवली.
रिमाने पानी की फुलकीया म्हणजेच दही भल्ल्याची गाडी लावायला सुरुवात केली आणि लोकांनाही तिच्या हातचे दही भल्ले आवडू लागले. लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंतची गर्दी तिच्या गाडीभोवती जमू लागली. एक पारलिंगी महिला रस्त्यांवर भिक न मागता सन्मानाने व्यवसाय करत आहे या भावनेने रिमाच्या शेजाऱ्यांना तिचा गर्व वाटायला लागला. येणाऱ्या पैश्यातून रिमा आपल्या घराचं भाडं आणि कुटुंबाचा संभाळ करू लागली.
रिमा म्हणते, ‘’या व्यवसायामुळे परिसरात माझी प्रतिष्ठा वाढली, शेजाऱ्यांनी मला आपलसं केलं. अगदी प्रत्येक समारंभात मला आग्रहाचं निमंत्रण असतं आणि अशाच छोट्या छोट्या पुढाकाराने पारलिंगी व्यक्तींविषयीचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक पद्धतीने बदलतो.’’
काही समाजकंटकांना हे छोटसं यशदेखील पचत नाही. पारलिंगी समाजाच्याच काही समाजकंटकांना रिमाचं हे नवीन जगणं आवडलेलं नव्हतं. ते तिच्या मागे लागले. काही पारलिंगी महिलांनी जळफळाटातून रिमाला मारण्यासाठी माणसं पाठवली. एका रात्री घरी जात असतांना त्या माणसांनी रीमाला बेदम मारहाण केली.
रिमा म्हणते, “आता सहन करण्यापलीकडे काहीच मार्ग नाही. खरंतर मला या सगळ्यांची सवय झालेली आहे. माझ्यासोबत घडलेली ही पहिलीच घटना नव्हती. पोलीस असो वा समाज कोणीच यात मदत करू इच्छित नाही. बऱ्याचदा तेच ह्याचा भाग असतात.. त्यामुळे मी आता स्वतःच हे सगळं सहन करण्यास शिकली आहे”
सोशल मीडियावर ‘रिमा फुलकेवाली’ झाली व्हायरल
धंद्यात जम बसल्यानंतर हळूहळू काही यूट्यूबर्स, रील्स मेकर्स आणि पत्रकारांची गर्दी रिमाच्या स्टॉलपाशी जमू लागली, त्यांनी केलेले रिमाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यूट्यूबर्स, पत्रकार येऊ लागले, आणि व्हिडीओ करायला लागले. परंतु त्याचे कोणीही रिमाला चार पैसै देत नव्हते. तिच्या कहाणीतून हे कॉन्टेंट क्रिएटर्स चांगलाच पैसा कमवायचे पण रिमाला मात्र त्यातून काहीच मोबदला मिळत नव्हता. मुलाखतीत केवळ तिचा वेळ वाया जायचा. बऱ्याचदा या यूट्यूबर्सचे आपापसात भांडणं व्हायची ज्यामुळे फुलकीया खायला आलेली लोकं गोंधळ पाहून निघून जायची, बऱ्याचदा त्यांच्या व्हिडीओमध्ये फुलकीया खात असलेल्या लहान मुलींचे फुटेज असायचे, ज्यावर त्यांच्या पालकांना आक्षेप असायचा. त्यामुळे महिला ग्राहकांची संख्या ही कमी व्हायला लागली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर बरेच लोकं सकारात्मक लिहायचे पण त्याचबरोबर ट्रोलिंगही सुरू झालं, असे सांगताना रिमा म्हणाली की, या ट्रोलिंगचा परिणाम माझ्या मानसिक आरोग्यावर झाला, प्रत्यक्षात आयुष्यात अनेक समस्या आणि अपमानातून सामोरे गेलेल्या रिमाला व्हर्चुअल जगातही अशाच नकारात्मक बाबींचा सामना करावा लागला. त्यामुळे नैराश्य तिच्या डोक्यावर थैमान मांडत होतं. आता रिमा स्वतःच्या मानसिक आरोग्यला सांभाळत त्याकडे दुर्लक्ष करते.
पाकिस्तानातील पारलिंगी महिलांची परिस्थिती
पारलिंगी समुदाय हा पाकिस्तानातील अत्यंत उपेक्षित घटक आहे. समाजाच्या पुर्वाग्रहामुळे बऱ्याचदा लोकं त्यांना मनुष्य समजायलाही कचरतात, त्यामुळे खांद्याला-खांदा लाऊन ट्रान्स व्यक्तींने आपल्यासोबत नोकरी करावी हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. पाकिस्तान सरकारकडून काही कंत्राटी नोकऱ्या पारलिंगी महिलांना मिळाल्या आहे ज्यात कर वसुलीच्याच्या नोकऱ्या प्रामुख्याने आहेत. ज्या व्यक्तींने कर दिलेला नसेल त्यांच्याकडून तो वसूल करून घेण्याचं काम पाकिस्तानच्या पारलिंगी महिला करतात. पण त्याची संख्याही फार कमी आहे. त्यामुळे तरुण ट्रान्स महिलांचे पैसा कमावण्याचे मुख्य साधन वेश्या व्यवसाय आहे.
”रियल स्टोरीज”च्या एका डॉक्युमेंट्रीनुसार ट्रान्स महिला तरुण असेपर्यंतच वेश्या व्यवसाय करतात, त्यानंतर त्यांना ग्राहक मिळत नाही तसेच त्यांचं शरीरही साथ देत नाही. तेव्हा सिग्नलवर भीक मागणे आणि आणि लग्ना समारंभात नाचण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. सरकार पारलिंगींच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने सरकार आपल्यासाठी काही करेल ही आशा ही समुहाने सोडलीये. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ट्रान्स व्यक्तींनी आपल्या कला सादरीकरणावर जोर दिलाय. आपल्या नृत्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या शहरातून त्यांना सादरीकरणासाठी बोलावण्यात येतं. त्याचं मानधनही चांगलं मिळतं, शिवाय प्रसिद्धीही मिळते. त्यामुळे हा देखील उत्पन्नाचा एक मार्ग पाकिस्तानातील ट्रान्स महिलांसमोर उपलब्ध झालायं.






