- सुमित्रा वसावे / भावेश ब्राम्हणकर
जगभरात पर्यावरणीय समस्या ऐरणीवर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदांमध्ये त्याबाबत विचारमंथन होऊ लागले. याचाच एक भाग म्हणून त्या त्या देशांनी त्यांच्या जैविक विविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ठोस कायदा करण्याचा ठराव केला. भारतानेही 2002 मध्ये जैवविविधता कायदा करुन आपणही मागे नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या कायद्याविषयी बहुसंख्य अनभिज्ञ आहेत. गेल्या 23 वर्षात त्याबाबत फारसा प्रचार आणि प्रसारही झालेला नाही.
मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील एकूण पाच-सात गावांनी मात्र या कायद्यातील काही तरतुदींचा आधार घेत एक चमत्कारच घडविला आहे. अनेकांना जे जमले नाही ते या गावाने करुन दाखविले आहे. पर्यावरण आणि जैविक विविधता ही आपली आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी आपणच पाऊले उचलायला हवीत. असे सांगत या गावाने जैवविविधता केंद्रच स्थापन केले आहे. अनोख्या स्वरुपाचे हे केंद्र संपूर्ण देशालाच प्रेरणा देणारे आहे.
पर्यावरणाचे संरक्षण करायचे तर सरकारने अमुक करायला हवे, तमुक करायला नको, असे शेकडो सल्ले दिले जातात. पण पर्यावरण हे काही दुसऱ्या-तिसऱ्याचे नाही तर आपण राहतो त्या घरापरिसरातील म्हणजे आपलेच आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. असा विचार करुन आदिवासी ग्रामस्थांनी निर्धार केला.
पूर्णत: आदिवासी असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला, पळासखोब्रा, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी, हरणखुरी, चोंदवडे या गावातील जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी एकत्र येत जैवविवधता जतन, संवर्धन, प्रदर्शन व प्रशिक्षण केंद्र या अनोख्या संकल्पनेला जन्म दिला. स्थानिक एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ, नंदुरबारचे कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक ग्रामसेवक, पुपुण्यातील योजक या संस्थेचे नंदूरबार येथील कृषीतज्ज्ञ डॉ. गजानन डांगे या साऱ्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आकारास आली आहे.
माध्यम विस्फोटात सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासींची निसर्गपूजा झाकोळली गेली आहे, असेच म्हणावे लागेल. वायनाडसारखी भूस्खलनाची दुर्घटना घडल्यानंतर पर्यावरण आणि निसर्गस्नेही कार्याची चर्चा विपुल प्रमाणात झडते. त्यात आदिवासी आणि त्यांचे प्रयत्न कुठेही चर्चेत नसतात. अशा वेळी गेल्या दोन दशकांपासून सातपुड्यातल्या या आदिवासींनी पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आमूलाग्र कार्य सुरू केले आहे. अल्पशिक्षित पण खऱ्या अर्थान कुशाग्र असलेले हे आदिवासी बांधव देशभरातच आदर्शवत ठरले आहेत.
पशु, पक्षी, प्राणी, झाडे, कीटक, वेली यांचा घेतला शोध
आपल्या घर-गाव परिसरातील पशु, पक्षी, प्राणी, झाडे, कीटक, वेली या साऱ्यांची माहिती आपल्यास हवी. यातील कुठले जैविक घटक आपल्या गाव परिसरात आढळतात? त्यातले दुर्मीळ घटक कुठले? गाव परिसरात आढळणारे जैविक घटक कोणते? याचा शोध या गावांनी प्रथम घेतला. शेतात लागवड होणाऱ्या बहुविध स्थानिक आणि जुन्या बियाण्यांपासून फुले, पक्षी, रानभाज्या, प्राण्यांपर्यंत साऱ्याचाच धांडोळा घेण्यात आला. जैवविविधता कायद्यांतर्गत गावाच्या प्रस्तावानुसार अभ्यास आणि संशोधनासाठी सरकारने निधीही दिला. गावाने कंद, बियाणे, वनस्पतींपासून साऱ्यांचीच माहिती संकलित केली. पातळीवरील त्याच्या नावापासून शास्त्रीय नावापर्यंत सर्व माहिती. माहिती संकलनानंतर पुढचा टप्पा होता, तो संपूर्ण गावाला त्याची ओळख करून देण्याचा.
हरणखुरी गावातील सुनीता पाडवी सांगतात की, "आधी जंगल म्हणजे फक्त लाकूड, गवत किंवा शिकार असं आम्हाला वाटायचं. पण आता आम्ही समजून घेतलंय की जंगल म्हणजे आपलं जीवन आहे. इथली प्रत्येक झाड, प्रत्येक वनस्पती आमच्यासाठी काहीतरी सांगून जाते — औषध, अन्न, किंवा आपली संस्कृती. जेव्हा आम्ही जैवविविधता केंद्र सुरू केलं, तेव्हा पहिल्यांदाच आम्ही आमच्याच गावाच्या आजूबाजूला इतकं काही असतं हे अनुभवलं. हे केवळ पर्यावरणाचं काम नाही, हे आमच्या अस्तित्वाचं जतन आहे."
संबंधित लेख वाचा: 1) जालनाच्या आदिवासी आश्रमशाळेत ‘त्या’ रात्री असं काय घडलं की एका चिमुकल्याने दुसऱ्याचा जीवच घेतला…? |
गावांनी सुरू केलं जैवविविधता केंद्र…
एखादी बडी कंपनी एखाद्या गावाच्या परिसरातील विशिष्ट वनस्पती खरेदी करून त्याचा वापर औषधनिर्मितीसाठी करते. या औषधाची विक्री करून ती कंपनी बक्कळ नफा कमावते. मात्र जैवविविधता कायद्यानुसार त्या औषधापासून होणाऱ्या नफ्यातील काही वाटा कंपनीने त्या गावाला द्यायचा आहे. ही तरतूद म्हणजे त्या गावाचा हक्कच आहे आणि तेच आजवर कुणाला माहीत नव्हते. तसेच अन्यही अनेक उद्योग आहेत; जे आदिवासी भागांतील उत्पादनांवर चालतात.
आता या गावांनी त्यांच्या परिसरातील जैविक विविधतेची यादीच तयार केली. त्यामुळे आता सर्वच ग्रामस्थांना माहिती आहे की त्यांच्याकडे कुठली जैविक विविधता आहे आणि कुणी ती व्यावसायिक वापरासाठी घेऊन जात असेल तर त्याकडे आता त्यांचे लक्ष असते. तसेच या वनोत्पादनांचा स्वतः वापर करतानाही ग्रामस्थ सजग राहतात.
ही गावे केवळ एवढ्यावरच थांबली नाहीत. तर त्यांनी कंजाला येथे जैवविविधता केंद्रच सुरू केले. कंजाला परीसारातील रानभाज्या, बियाणे, कंद, वनस्पती यांची शास्त्रीय नावे देऊन अत्यंत सुंदर मांडणी या केंद्रात करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या परंपरागत वस्तूंचेही सादरीकरण तेथे करण्यात आले आहे. याच गावाच्या ठिकाणी जलवर्धिनी या पुण्यातील संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाने पाण्याचे कुंड बांधण्यात आले आहे. काही गावांनी मिळून असे वेगळे केंद्र स्थापन केल्याची वार्ता काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे धडगाव व अन्य परिसरातील गावातील आदिवासी बांधव हे केंद्र पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. या केंद्राचे फायदे त्यांना कळून चुकले आहेत. त्यामुळे असे केंद्र आपल्या गाव परिसरात स्थापन करण्याचा निश्चय होऊ लागला आहे.
या केंद्रात वन्य भाजीपाल्याचे 55 वाण, कंदांचे 12 प्रकार, 18 प्रकारची फळे, 28 प्रकारची वनफळे, 37 प्रकारच्या औषधी, पक्ष्यांच्या 35 प्रजाती, प्राण्यांच्या 15 प्रजाती आणि इतर 49 प्रकारच्या गोष्टींचे जतन केले जाते.
वेलखेडी गावाचे वीरसिंग वसावे सांगतात की, "शासनाने आरक्षित क्षेत्र जाहीर केलं, पण प्रत्यक्षात तिथं झाडाचं नावमात्रही नव्हतं. मग आम्हीच ठरवलं की आपणच राखणदारी करायची. सुरुवातीला लोक हसले, म्हणाले ‘हे काय नवीन उपद्व्याप?’ पण आम्ही सातत्य ठेवलं. आता 10 वर्षांनी पाहिलं, तर जिथं मोकळं माळरान होतं, तिथं आता पक्ष्यांचं कूजन ऐकायला येतं, हरणं दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आमच्या मुलांना सांगता येतं की ही पुनर्रचना आमच्यामुळे झाली आहे."
‘'जे क्षेत्र राखायचं होतं, त्या ठिकाणी झाडाचा लवलेशही नव्हता’’
हरनपुरी हे धडगाव तालुक्यातील एक असे गाव ज्याने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे.या गावचे सरपंच अर्जुन पावरा सांगतात, गावाला 52 हेक्टर अधिक 10 हेक्टर इतकं ६२ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्राचं सर्वप्रथम सरंक्षण करणं गरजेचं होतं. पण, हे क्षेत्र राखण्याचा जेव्हा विचार आला तेव्हा अनेक आव्हाने समोर होती.
यातील महत्वाचं आव्हान होतं गावातील लोकांना जंगल राखण्यासाठी तयार करणं, हे आव्हान यासाठी होतं कारण काहींना वाटत होतं जंगलाचं संरक्षण होणं गरजेचं आहे, काहींना प्रश्न पडायचा जंगल संरक्षण केलं तर गुरु-ढोरं चरणार कुठे? जर जंगल राखून ठेवलं तर ते वनविभागाच्या अंतर्गत जाईल, वनविभागवाले आपल्यावर कारवाई करतील, ही भीती ग्रामस्थांच्या मनात होती. या लोकांना जंगल का वाचवावं? राखून का ठेवावं? याचा फायदा आपल्यालाच कश्याप्रकारे होईल? याबद्दल त्यांना पटवून देणं गरजेचं होतं.
दुसरं आव्हान होतं सीमांकनाचं. हरनपुरी गावची सीमा किती? कारण आमच्या गावाच्या शेजारीच महसूल विभागाच्या जमिनी होत्या. त्यामुळे गावातील प्रौढ व्यक्तींची मदत घेऊन ढोबळमनाने सीमांकन केलं. त्यानंतरच आव्हान होतं, प्रशासकीय प्रक्रिया. यासाठी बाएफ ( भारतीय कृषी औद्योगिक संस्था) ने आम्हाला मदत केली. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया पार पाडताना जास्त अडचणींचा सामना करावा नाही लागला."
अर्जुन पावरा सांगतात , 'जंगल राखण्यासाठी गावकरी तर तयार झाले, पण राखायचं नेमकं काय? हा प्रश्न समोर होता. कारण, या क्षेत्रात झाडाचा लवलेशही नव्हता होतं फक्त दगड आणि माती. याठिकाणी वृक्षारोपण करायचं ठरवलं पण ते वृक्षारोपण कसं? तर श्रमदानातून. सुरवातीला गावकऱ्यांनी 72,500 सागवनाची झाडे वृक्षारोपण योजनेअंतर्गत लावली. जे श्रमदान करणारे मजूर होते ते वनमजूर म्हणून आता कार्यरत आहेत. हरनपुरी गावाला सहा गावांच्या सीमा आहेत.
त्या-त्या गावातील पोलीस पाटलांशी पत्रव्यवहार करून मोकाट जनावरांसाठी या 52 हेक्टर मधील चार नेण्यास आणि मोकाट जनावरांना फिरण्यास बंदी घातली. अनेकदा भांडण झाले, पोलीस तक्रारी झाल्या पण वनविभागाच्यता सहकार्यामुळे आणि गावातील लोकांच्या पुढाकारामुळे आज संपूर्ण 52 हेक्टर च क्षेत्र राखलेलं असून या क्षेत्रात कुऱ्हाडबंदी आहे, चारबंदी आहे, मोकाट जनावरांना फिरण्यास बंदी आहे, आणि या क्षेत्रात कोणत्याच पशु पक्ष्याची हत्या केली जात नाही. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पशु-पक्ष्यांची संख्या दिसून येते. विशेष म्हणजे मोरांची संख्या हजारोंच्या घरात आहे.' 
जैवविविधता रजिस्टर
केंद्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील जैवविविधता संवर्धनासाठी जैवविविधता नोंदीपुस्तिका तयार केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात हे कामकाज पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 595 ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे जैवविविधता नोंदीपुस्तिका सादर केली आहे. जमीन, झाली. माती, पाणी, हवामान, आधारित पिके व नक्षत्र, वन्यजीव, पाळीव प्राणी, पक्षी, फुले आर्दीची माहिती संकलित करून ती या नोंदीपुस्तिकामध्ये नोंदण्यात आली आहे. यामुळे कालबाह्य जैविक घटकांच्या संवर्धनास चालना मिळणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अन्नधान्य आणि पाळीव पक्षी, प्राण्यांच्या प्रजातींचे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहितीसंकलन झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात वनस्पती, पिके यांच्या विविधतेची माहितीही संकलित केली जात आहे.
हरणखुरी गावातील जैवविविधता केंद्रातील स्वयंसेविका भारती वळवी यांनी सांगितलं की, "या केंद्रामध्ये आम्ही पारंपरिक औषधी वनस्पतींची माहिती ठेवतो. आजूबाजूच्या गावांतील लोक आपल्या आजी-आजोबांकडून जे काही शिकले, ते इथे लिहून ठेवलंय. आता ही माहिती फक्त वाचण्यापुरती नाही, तर आम्ही प्रयोगही करतो. एखाद्या झाडाच्या सालीपासून औषध बनवतो, एखादी पाने चहा म्हणून वापरतो. ही फक्त शाळा नाहीये, ही आमची लघुविज्ञान प्रयोगशाळा आहे."
रानभाज्या महोत्सव
आदिवासी बांधवांनी रानभाज्या महोत्सवाला सुरुवात केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचा उत्साह दुणावला आहे. या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी अनोखे कार्यक्रम आयोजित करण्याचेही काम सुरू आहे. याच निमित्ताने जैवविविधता केंद्राच्या कामकाजाचाही प्रचार व प्रसार होत आहे. आपले पर्यावरण आणि त्यातील जैविक घटक यांचे संरक्षण आपणही करू शकतो, असा विश्वास या केंद्राच्या माध्यमातून हे सारे आदिवासी बांधव देऊ पाहत आहेत. कायद्यातील एक-दोन तरतुदर्दीच्या आधारे एवढे मोठे काम आदिवासींनी उभे केले. आणखी काही तरतुदींच्या माध्यमातून बहुमूल्य अशा जैविक विविधतेचे संगोपन आपण प्रभावीपणे करू शकतो, असे डॉ. गजानन डांगे सांगतात. डॉ. डांगे हे पर्यावरणतज्ज्ञ आहेत.
रोजगारनिर्मिती, नैसर्गिक संसाधनांच्या विविधतेचा अभ्यास, महत्त्व, व्यवस्थापन आदींवर आदिवासी बांधव उत्कृष्टरीत्या काम करीत आहेत. निसर्गतः मिळालेल्या अनेक धड्यांमधून ते निसर्गपूजक बनले आहेत. आपल्या परिसरातील जैविक विविधता टिकून ठेवण्यासाठी ते अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत आहेत. यातूनच गावपरिसरात समृद्धी चालून येत आहे. ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधतेच्या समित्या स्थापन झाल्या की आपोआप त्याच्या संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य सुरू होते, असे डॉ. गजानन डांगे अनुभवाने सांगतात. वन्यप्राणी, पशुपक्ष्यांच्या अधिवासासाठी सातपुडा परिसर सर्वोत्कृष्ट आहे. येथील जैवविविधता जपून ठेवली जात आहे.
याहामोगी माता बियाणे संवर्धन समिती
धडगाव तालुक्यात 'बीएफ' संस्थेमार्फत 2010 पासून हरणखुरी येथे सुरू असलेल्या 'स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या 'याहामोगी माता बियाणे संवर्धन समिती मार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. लोकसहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन, उत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मका, ज्वारी, भरड धान्यपिके, कडधान्यांच्या शंभराहून अधिक बाणांचे संवर्धन, अभ्यास आणि लागवड केली जाते. धडगाव, अकलकुवा तालुक्यातील पंधरा गावांमध्ये मका, ज्वारी, कडधान्ये, तेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या 108 स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरी, चोंदवडे या गावांत दोन सामूहिक बियाणे बँकामार्फत मका, ज्वारी आदी पिकांचे 25 टन बियाणे उत्पादन आणि 170 टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे.
तसेच ज्वारीच्या जवळ जवळ 19 जाती शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुद्धीकरणाचे काम केले असून यांपैकी पाच जाती 'पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरण', 'शेतकरी कल्याण मंत्रालय' भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करून घेण्यात आल्या आहेत. 'याहामोगी माता बियाणे संवर्धन समिती'ला 'राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कारा ने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती हरणखुरी या गावचे सरपंच अर्जुन पावरा देतात. 
दोन दशकांचे अथक प्रयत्न
गेल्या दोन दशकांपासून आदिवासी बांधव पर्यावरण- रक्षणाच्या कार्याला प्राधान्य देत आहेत. याच संदर्भात 2013 पासून जैवविविधता नोंदीपुस्तिका तयार करण्यास प्रारंभ झाला. 2014 पासून 'रानभाज्या महोत्सव' साजरा केला जात आहे. 'अक्कलकुवा मोलगी परिसर उत्पादक कंपनी चे 480 शेतकरी सदस्य आहेत. या कंपनीद्वारे सेंद्रीय शेतीला चालना दिली जात आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात 'रानभाज्या महोत्सव', तर नोव्हेंबर महिन्यात 'गाव बियाणे यात्रा' आयोजित केली जाते. या यात्रेमध्ये स्थानिक बाण आणि बियाण्यांची जनजागृती तसेच त्याला प्राधान्य दिले जाते. यात शेतकरी त्यांची विविध कणसे किंवा बियाणे घेऊन येतात. आपले अनुभव, शेतीत किती उत्पन्न, उत्पादन आले हे सारे इतरांना सांगतात. याद्वारे या बियाण्यांचे आदानप्रदानही होते. आतापर्यंत 107 प्रकारच्या पारंपरिक वाणाच्या बियाण्यांची नोंद करण्यात आली आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यात 'सातपुडा जीवन प्रदर्शन भरवले जाते. या परिसरातील भिद्ध आणि पावरा समाजाच्या संस्कृती, भाषा, साहित्य, विचार, प्रथा, परंपरा आदीची माहिती देणारा हा छोटेखानी महोत्सवच असतो, त्याला उत्तम प्रतिसाद लाभतो, गेल्या दोन वर्षांपासून या पाचही गावांनी 'लाहा प्रकृती यात्रा' सुरू केली आहे. यात गावातील कुटुंबे एकमेकांची कामे सामूहिक पद्धतीने करतात. यासाठी गावच कामांचे निर्णय घेते, जसे की, बांध बांधणे, रस्ता तयार करणे आदी. श्रमदानातून सामूहिक विकासाचा हा मार्ग आदिवासी बांधवांना भावला आहे. या पाचही गावांची एकूण लोकसंख्या साडेतीन हजार एवढी आहे. या सर्वांची एकजूट या भागात आमूलाग्र बदल घडवत आहे.
हरणखुरीचे सामाजिक कार्यकर्त्ये आणि जैवविविधता समितीचे सदस्य जहांगीर वळवी यांनी सांगितलं की, "आम्हाला वाटायचं की शिक्षण म्हणजे फक्त शहरांमध्ये मिळतं. पण इथल्या केंद्रामुळं आम्ही समजून घेतलं की आमचं जंगल, आमचं वातावरण हेच आमचं विद्यापीठ आहे. इथं आम्ही शिकतोय — झाडं ओळखतोय, त्यांचं महत्त्व समजतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवतोय. ही प्रक्रिया आम्हाला आत्मविश्वास देते."
आता पुढील उद्दिष्ट
रानभाज्यांची रोपवाटिका तयार करणे; भाज्या आणि फळांच्या कंदमुळांचे कॅलेंडर तयार करणे, निसर्गशेतीला अधिकाधिक प्राधान्य देणे, कृषी प्रक्रिया उद्योग उभारणे आणि अन्न हेच औषध मानून वाटचाल करणे हे उद्दिष्ट या आदिवासी गावांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने डॉ. डांगे आणि रामसिंग बळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जहांगीर वळवी, दिलीप वळवी, राजेंद्र वळवी, बटसिंग वळवी, अमरसिंग वळवी, पांगला वळवी, बाजा वळवी, सीताराम वळवी, नवा वळवी, विनायक बळवी, साईसिंग वळवी, वीरसिंग वसावे, कालुसिंग पाडवी, जैसिंग वळवी, सिपा पाडवी आदी कठोर मेहनत घेत आहेत. दरम्यान पाच गावांनी घेतलेला हा पुढाकार खूपच प्रभावी ठरला आहे. म्हणूनच आसपासच्या तब्बल तीस गावांमध्ये ही चळवळ जाऊन पोहोचली आहे. तेथेही अशाच प्रकारे छोट्या छोट्या स्वरूपात कामे सुरू झाली आहेत. नजीकच्या काळात ही चळवळ राज्याच्या विविध भागांत पाहायला मिळाली तर नवल नसेल.
(संदर्भ - समतावादी मुक्त छंद)
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






