टीम बाईमाणूस
- सिया गोयल प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच तेलंगणात पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला.
- पहिल्यांदा टेरेसवरून ढकलूनही पती वाचला. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना सलाईनमधून टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध दिल्याचा आरोप आहे.
- या प्रकरणात नर्स पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एका साथीदाराला अटक केलीये. संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.
सिया गोयल प्रकरणाची चर्चा अद्याप देशभर सुरू असतानाच आता तेलंगणातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेल्या पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीचा काटा काढल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पहिल्या प्रयत्नात टेरेसवरून ढकलूनही पती बचावला, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला सलाईनमधून टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध देऊन ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत हा काही काळ आखाती देशात नोकरी करत होता. कामानिमित्त परदेशात राहिल्यानंतर तो नुकताच भारतात परतला होता. घरी आल्यानंतर पत्नी संध्याचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या वादातूनच संध्या आणि तिचा प्रियकर अनिल यांनी प्रशांतचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम प्रशांतला अपघाती मृत्यू झाल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 29 जून रोजी अनिल आणि त्याच्या साथीदाराने प्रशांतला मद्यपान करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्याला एका इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संध्याच्या सूचनेनुसार प्रशांतला टेरेसवरून खाली ढकलण्यात आले. मात्र गंभीर दुखापत होऊनही तो या घटनेतून बचावला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आरोपींनी दुसरा कट रचल्याचा आरोप आहे. प्रशांत रुग्णालयात उपचार घेत असताना त्याची पत्नी संध्या ही नर्स असल्यामुळे वैद्यकीय प्रक्रियेची माहिती असल्याचा फायदा घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, उपचार सुरू असताना संध्याने कथितरित्या कॅन्युलाच्या माध्यमातून सलाईनमध्ये टॉयलेट क्लिनर तसेच भूल देणारे औषध मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर प्रशांतची प्रकृती अचानक खालावली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी घटनाक्रम, वैद्यकीय अहवाल, आरोपींच्या हालचाली आणि मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी केली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक धक्कादायक तपशील समोर आले. चौकशीदरम्यान आरोपींच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
मोबाईल रेकॉर्ड ते वैद्यकीय पुरावे; तपासातून उलगडत गेले रहस्य
पोलिसांनी पत्नी संध्या, तिचा प्रियकर अनिल आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यंकट साई यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान व्यंकट साईने पहिल्या हत्येच्या प्रयत्नात आपली भूमिका असल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच इतर आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. मात्र, या कबुलीजबाबाची आणि इतर पुराव्यांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत तपासली जाईल.
तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. विशेषतः शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय नोंदींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. तसेच रुग्णालयातील उपचार प्रक्रियेत आणखी कोणाची भूमिका होती का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वैवाहिक नातेसंबंध, विवाहबाह्य संबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये.



