Narendra Bandabe
सिनेसृष्टीला हादरवून टाकणारी एक घटना 17 फेब्रुवारी 2017 ला घडली होती. मल्याळम अभिनेत्री भावना मेनन कोचीत शुटींग संपवून हॉटेलवर जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्याचं शुटींग करण्यात आलं. विरोध करतेय म्हणून तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकण्यात आलं. यात पल्सर सुनी उर्फ एन एस सुनिल याच्यासहित सात जणांना आरोपी करण्यात आलं. मल्याळम सिनेमाचा आघाडीचा अभिनेता दिलीपच्या सांगण्यावरुन हे करण्यात आलं असा आरोप होता. दिलीप आरोपी क्रमांक आठ झाला. पण अवघ्या दोन महिन्यांत त्याला जामीन मिळाला. प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि एप्रिल 2017 मध्ये पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले.
आज 9 वर्षांनी या प्रकरणातून अभिनेता दिलीप निर्दोष मुक्त झालाय, तर या घटनेत मुख्य आरोपी पल्सर सुनी सहित इतर सहा जणांना दोषी ठरवण्यात आलंय. सुमारे 9 वर्षांनंतर केरळच्या एर्नाकुलम सत्र न्यायालयाने अभिनेता दिलीपला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. इतर सर्व आरोपींना लवकरच शिक्षा सुनावली जाईल. खरं तर लैंगिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये पिडीतेचं नाव घेतलं जात नाही. पण 2022 ला जेव्हा बहुतांश सर्व आरोपींना जामीन मिळाला तेव्हा भावना मेनननं स्वतःहून सोशल मीडियावर आपली पीडीता म्हणून ओळख जाहीर केली.
मल्याळम अभिनेत्री मंजू वारीयरसोबत दिलीपचा घटस्फोट झाला होता. त्याला कारणीभूत भावना होती असं त्याचं म्हणणं होतं. त्यातून दिलीपनं या अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा कट रचला. इतकंच नव्हे तर या घटनेचा व्हिडिओ ही बनवला असा आरोप होता. नंतर हा व्हिडिओ पल्सर सुनीने डिलीटही केला. त्याच्यावर अपहरण, लैंगिक छळ आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. या घटनेचा मास्टरमाईंड दिलीप होता. हे जगजाहीर होतं, पण तो निर्दोष सुटलाय. पल्सर सुनी हा दिलीपचा ड्रायव्हर होता. त्यानं राजकीय नेत्यांकडेही काम केलं होतं. 2013 पासून तो दिलीपसोबत होता. एक ड्रायव्हर स्वतःहून एका अभिनेत्रीवर असा हल्ला करेल, अशी शक्यता फारच कमी आहे. पण दिलीपच्या विरोधात ठोस पुरावे सापडले नाहीत. तो कायद्याच्या कचाट्यातून सुटला आहे.
सर्वात आधी भावनाची कहाणी… अपहरण, चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार
कोर्टात सादर केलेल्या भावनाच्या केसशी संबंधित कागदपत्रांमध्ये घटनेच्या संपूर्ण कटाबद्दल लिहिले आहे. त्यानुसार, 17 फेब्रुवारी 2017 रोजी संध्याकाळी 7 वाजता भावना त्रिशूरमधील घरातून कोचीनला जाण्यासाठी निघाली होती. तिला सेटवर पोहोचण्यासाठी प्रोडक्शन युनिटच्या लोकांनी गाडी पाठवली होती. ड्रायव्हरचे नाव मार्टिन अँटोनी होते. रात्री 9 वाजता भावनाची कार एका व्हॅनला धडकली. ड्रायव्हरने कार थांबवताच, व्हॅनमधून उतरलेले दोन लोक तिच्या कारमध्ये बसले. त्यांची नावे मणी आणि विजेश होती. ते देवकीच्या कारचा पाठलाग करणाऱ्या पाच लोकांपैकी होते. भावनाच्या कारचा ड्रायव्हर त्यांच्याशी मिळालेला होता आणि त्यानेच माहिती देऊन त्यांना बोलावले होते.
थोड्या अंतरावर गुंडांनी कार थांबवली आणि मणी ड्रायव्हिंग सीटवर बसला. येथे प्रदीप, सलीम आणि सुनील नावाचे आणखी तीन लोक कारमध्ये आले. सुनील मागच्या सीटवर भावनाच्या शेजारी बसला. गाडी लॉक केली. सुनीलने मास्क घातला होता, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसला नाही. मणीने कार चालवताना जेव्हा सुनीलचे नाव घेतले, तेव्हा भावनाने त्याला ओळखले. सुनीललाच एक महिन्यापूर्वी गोव्यात शूटिंगदरम्यान तिच्यासाठी नेमण्यात आले होते. सुनीलने चालत्या कारमध्ये भावनावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. ती स्वतःला वाचवण्याचा सतत प्रयत्न करत राहिली आणि सुनील म्हणत राहिला की त्याला 'कोटेशन'वर पाठवले आहे. मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सुपारी गुन्हेगारीला 'कोटेशन' म्हणतात. मात्र, त्याने कोणाचेही नाव सांगितले नाही.
या प्रकरणानंतर मल्याळम इंडस्ट्रीत सुरू झाली #MeToo चळवळ
या प्रकरणानं जगभरात सुरु असलेल्या #MeToo प्रकरणाला केरळात हवा दिली. यानंतर मल्याळम इंडस्ट्रीतल्या महिला एकत्र आल्या. वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) या संघटनेची स्थापना झाली. त्यांनी मल्याळम इंडस्ट्रीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज़ उठवला. यामुळं सरकारवर दबाव आला. जस्टीस हेमा कमिटीची स्थापना झाली. या जस्टीस हेमा कमिटीनं तब्बल चार वर्षे सखोल अभ्यास करुन आपला अहवाल दिला. तो विधानसभेत मांडण्यावरुनही घोळ झाला. अखेर दबाव वाढल्यानं 2024 ला हा अहवाल खुला करण्यात आला. यात अनेक मोठी नावं पुढे आली. त्याच्यावर कारवाई पण झाली.
फक्त लैंगिक अत्याचार हा जस्टिस हेमा कमिटीच्या अभ्यासाचा भाग नव्हता. तर फ़िल्म इंडस्ट्रीतली महिलांची स्थिती आणि परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा निघावा अशी जोरदार मागणी वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC)नं केली होती. हेमा कमिटीसमोर ज्या महिलांनी आपल्या साक्षी नोंदवल्या त्यातून भयानक सत्य बाहेर आलंय..
जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालातून बाहेर आलं भयानक सत्य
जस्टीस के हेमा यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन झाली होती. निवृत्त प्रशासकीय अधिकारी के बी वलसारा कुमारी आणि अभिनेत्री शारदा हे देखील या त्री-सदस्यीय कमिटीत होत्या. तीन वर्षाच्या कालावधीत कमिटीनं केरळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री, साइड एक्ट्रेस, मॉब आर्टीस्ट, महिला टेक्निशियन अशा बऱ्याच जणींच्या इन कॅमेरा मुलाखती घेतल्या. अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणावर जास्त फोकस होता. या कमिटीच्या रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. जवळपास 300 पानांच्या रिपोर्टमध्ये अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख आलाय. शिवाय महिलांना शुटींग स्थळी वेगळं चेंजिंग रूम आणि बाथरुमची व्यवस्था या सारख्या अनेक शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं.
हेमा कमिटी रिपोर्ट बाहेर आल्यानंतर अनेकांच्या सुपरस्टार पदाला सुरुंग लागला. त्यात काही दुय्यम अभिनेते, रणजीत सारखे मोठे दिग्दर्शक यांची नावं पुढे आली. आता त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. मोठे मासे गळाला लागलेच नाहीत.
भावना मेनन अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण हे केरळात सर्वाधिक कालावधीसाठी चाललेलं हायप्रोफाईल प्रकरण आहे. पहिल्यांदा एका मोठ्या अभिनेत्याला आरोपी करण्यात आलं. त्यानंतर तो जामीनावर सुटला हा भाग दुसरा पण प्रत्यक्षात महिलांना कशाचा सामना करावा लागतों हे या निमित्ताने पुढे आलं.
भावना मेननची सोशल मीडियावरची पोस्ट…
दिलीपला जामीन मिळाल्यानंतर भावना मेनननं इस्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती ती आपल्या इन्स्टापोस्टमध्ये लिहिते 'माझ्यावर झालेल्या अत्याचारात माझं नाव, माझं जगणं दबलं होतं. मी गुन्हा केलेला नसताना मी अपमानित झाले, शांत झाले आणि स्वत:ला विलग केलं. पण मी नंतर आवाज उठवला, पण आता अनेक जणी पुढे येतायत. मला माहितेय अन्यायाविरोधातल्या या लढाईत मी एकटी नाही. गुन्हा करणाऱ्याविरोधात मी उभी राहिल या प्रक्रियेत माझ्यासोबत राहणाऱ्या प्रत्येकाचे आभार.” ही पोस्ट जानेवारी 2022ची होती.
एप्रिल 2024 ला तिने पुन्हा सोशल मिडियाचा आधार घेतला आपल्या प्रायव्हसीचं काय? असा सवाल केला होता. न्यायालयात इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले नाहीत. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचं व्हिडिओ शूटींग करण्यात आलं होतं. ते डिलीट झालं होते. सरकारी पक्षाला पुराव्याअभावी लढताना तिनं पाहिलं. एक एक गोष्ट हातातून निघून जातेय असं तिला वाटायला लागलं होतं. त्यातून ही पोस्ट आली. ऑगस्ट 2024 ला पुन्हा सोशल मीडियाचा आधार घेतला. यावेळी मुख्य आरोपी पल्सर सनीला जामीन मिळाला होता. तिनं क्युबातला क्रांतिकारी चे गुवेराचं वाक्य कोट केलं होतं “सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जगात कुठेही कोणावरही होणारा अन्याय तुम्हाला नेहमी खोलवर जाणवण्याची क्षमता असू द्या. या पोस्टकडे तिने इंडस्ट्रीकडे आपल्या प्रकऱणाची गंभीर दखल घेण्याची आर्त हाक दिली होती. “
निकालानंतर दिलीप म्हणाला, 9 वर्षांपासून सुरू असलेला कट उघड झाला
निकालानंतर अभिनेता दिलीप म्हणाला- 9 वर्षांपासून सुरू असलेला कट उघड झाला. या प्रकरणात अभिनेता दिलीपला आरोपी क्रमांक 8 बनवण्यात आले होते. त्याला जुलै 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. आता निकाल आल्यानंतर अभिनेता दिलीपने सांगितले की, त्यांच्या विरोधात 9 वर्षांपासून रचलेला कट अखेर उघड झाला आहे. त्याने आरोप केला की, हा कट तेव्हा सुरू झाला जेव्हा त्यांची माजी पत्नी मंजू वॉरियरने 'गुन्हेगारी कट' (क्रिमिनल कॉन्सपिरेसी) ची गोष्ट मांडली. दिलीपच्या मते, यानंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आणि त्यांच्या टीमने तुरुंगात आरोपींना एकत्र करून एक खोटी कहाणी रचली आणि ती मीडियाद्वारे पसरवली. पोलिसांची ही कहाणी कोर्टात टिकू शकली नाही आणि त्यांचा उद्देश अभिनेत्याची प्रतिमा खराब करणे हा होता.
भावनाच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत भयंकर आहे. हे प्रकरण बाहेर आलं म्हणून लोकांना सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींची खरी स्थिती समजली. जगभरात सिनेमा क्षेत्रात महिलांना दुय्यम स्थानच मिळत आलंय. अगदी हॉलीवुडमध्ये ही. तिथं तर मानधनावरुन मोठा वाद झाला होता. काही कागदपत्रं समोर आली. त्यातून अभिनेत्रींना हिरोच्या तुलनेत फारच कमी मानधन मिळतं हे समोर आलं. यावरुन वाद ही झाले.
#MeToo ने अनेकांचे चेहरे फाडले. जे समोर आलंय हिमनगाचं टोक आहे. आत अजूनही खदखद आहे. महिलांवर अन्याय होतोय यात शंका नाही. पण यासाठी त्यांनीच पुढे यावं आणि आपबिती सांगावी अशी अपेक्षा आहे. सिनेमा इंडस्ट्रीत बाईकडे भोगवस्तू म्हणून पाहिलं गेलंय. अगदी आधीपासून सेक्स स्मिबल म्हणून बाईचा वापर करण्यात आला. साऊथच्या सिनेमांमध्ये ते जरा जास्तच आहे. काम मिळण्यासाठी अनेकांना क्रॉम्प्रोमाईज करावं लागतं हे सत्य आहे. त्या होतात ही. पण त्यानंतर एकाकडून दुसऱ्याकडे असं जेव्हा मर्जीविरोधात व्हायला लागतं तेव्हा हे प्रकरण संघठीत गुन्हेगारीकडे जायला लागतं.
सिनेमा क्षेत्रात ही असे माफिया आहेत. ज्यात बाईची किंमत फक्त काडीमात्रं आहे. मल्याळम इंडस्ट्रीत स्त्रीप्रधान सिनेमाचा बोलबाला आहे. अशी खमकी बाई पडद्यावर सादर करताना ती पडद्यापाठी तिला कुठल्या दिव्यातून जावं लागतं याचा सखोल रिपोर्ट हेमा कमिटीनं सादर केला. जो भयंकर आहे. तिची व्यवसायिक कोंडी केली जाते. तिला वारंवार मर्जी विरोधात अनेक गोष्टी करायला सांगितलं जातं. हे सर्व रिपोर्टमध्ये आलंय. हेमा कमिटीचा रिपोर्ट हा एका राज्यातल्या महिलांसंदर्भातला आहे. प्रत्येक राज्यात असंच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मानवी प्रवत्ती बदलत नाही. ती बदलण्यासाठी सर्वच समाजाचं नवनिर्माण व्हावं किंवा करावं लागेल.
(लेखक सिने अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)






