‘’जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत तर बुलढाण्यातील भेंडवळच्या भाकितावाणीवर कलम नसल्याने त्यावर कारवाई करणं अशक्य आहे, परंतू आता लोकांनीच हे समजून घेतलं पाहिजे की, जर अशा पद्धतीच्या भाकितावरून भविष्यातील घटना कळत असत्या तर भारतावर पहलगामसारखे मोठे दहशतवादी हल्ले झालेच नसते. या ज्योतिषांना अगोदर का हे कळत नाही जेणेकरून लोकांचे जीव वाचू शकतील…’’
बुलाढणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळमध्ये सुमारे 350 वर्षांपूर्वीपासून पीकपाणी आणि देशावरची नैसर्गिक संकटे याबाबत अंदाज वर्तवण्याच्या परंपरेवरच आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हल्ला चढवला आहे. या संदर्भात डॉ. हमीद दाभोलकर म्हणतात की, गेल्या पाच वर्षातली भेंडवळची भविष्यवाणी तपासली तर त्याच त्याच गोष्टी फिरवून परत परत सांगितल्या जातात. सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये. भविष्याला कोणताही शास्त्रीय आणि वैज्ञानिक आधार नसल्याने भेंडवळसारख्या थोतांडावर विश्वास ठेवू नये.’’
निसर्गाच्या असमतोलामुळे आज देशातील अनेक राज्यं दुष्काळाने होरपळत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या हवामान खात्याच्या अहवालाला अनेक वेळा पाऊस हुलकावणी देतो. बऱ्याचवेळा दमदार पाऊस, अतिवृष्टीचा अंदाज सांगणाऱ्या हवामान तज्ज्ञांना हा पाऊस अक्षरश: कधीकधी तोंडघशी पाडत थेंबभरही बरसत नाही.
डिजीटल युगात ही परिस्थिती आहे. पण, बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सुमारे 350 वर्षांपूर्वीपासून पीक, पाणी, राजकीय आणि आर्थिक भाकितं वर्तवण्याची परंपरा आहे. तेव्हाच्या चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. 
‘’शेजारी राष्ट्रासोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे’’
बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी, नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घट मांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत आज गुरुवारी, १ मे रोजी जाहीर करण्यात आले. चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधार महाराज व पुंजाजी महाराज यांनी आज घटमांडणी स्थळाचे व घट, त्यातील पदार्थ, धान्याची स्थिती लक्षात घेऊन हे भाकीत जाहीर केले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव खान्देश व सीमावर्ती मध्यप्रदेश मधील शेतकरी मोठया संख्येने हजर होते. यावेळी साधारण पीक पाण्याचे भाकीत वर्तविण्यात आले.
देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील, यामुळे व युद्धजन्य स्थितीमुळे ‘राजा ‘ वर (पंतप्रधाना) वर प्रचंड ताण तणाव राहील असे भाकीत यावेळी सांगण्यात आले. देशात परकीयांचा त्रास वाढणार, प्रलयाची भीती, मंदीचे सावट राहील असे महाराजांनी सांगितले. शेजारी राष्ट्रा सोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे, पण युद्ध झालेच तर तिसऱ्या महायुद्धासारखे होईल असे इशारावजा भाकीत सारंगधर महाराजांनी वर्तविले.
संबंधित लेख वाचा: 1) पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा |
शेतकऱ्यांसाठी यंदा काय भाकित केले?
पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी पाऊस, नंतरच्या तीन महिन्यात पाऊस चांगला राहील. तसेच भरपूर अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या महिन्यात पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला यावेळी देण्यात आली. काल ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भेंडवळ गावातील वाघ यांच्या शेतात घट मांडणी करण्यात आली होती.
आज गृरुवारी, 1 मे रोजी भाकीत वर्तवण्यात आले . त्यानुसार या वर्षी पावसाळा सर्वसाधारण राहणार असून, पावसाळ्याचा पहिल्या महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या महिन्यात त्यापेक्षा थोडं जास्त पावसाची शक्यता आहे, तिसऱ्या महिन्यात भरपूर पाऊस तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस असेल असे भाकित पावसासबंधी वर्तवण्यात आले आहे.
दरम्यान यंदा अवकाळी पवासाची शक्यता देखील अधिक असल्याचे म्हटले आहे. यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून, पिकाच्या नासा़डीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे.पिका बाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे सांगण्यात आली आहे. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदा वर्तवण्यात आल आहे.
राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेला आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार आहे. मात्र परकीयांचे आक्रमण आणि देशाची आर्थिक स्थिती कमजोर होणार असल्याने राजावर प्रचंड ताण येणार आहे. याशिवाय सध्या देशांमध्ये पाकिस्तानसोबत सुरू असलेले सध्याची शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र युद्ध झाल्यास तर या वेळेस महायुद्ध होईल.
आमच्या भविष्यवाणीला नैसर्गिक आधार - सारंगधर महाराज
भेंडवळच्या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही अशी टीका होते. भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल सारंगधर महाराज सांगतात, "आम्ही सांगत असलेलं भाकीत 70 ते 75 टक्के खरं ठरतं. गेल्या 20 ते 25 वर्षांपासूनचा तसा रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्या भविष्यवाणीला वैज्ञानिक आधार नसेलही पण नैसर्गिक आधार आहे. कारण निसर्गातल्या घडामोडींवरूनच आम्ही भाकीत सांगतो. हवामान खातं जसं हवामानाचा अंदाज व्यक्त करतं तसंच आम्हीही अंदाजच व्यक्त करतो. याबाबत कुणीच एकदम अचूक असू शकत नाही."
घट मांडणी म्हणजे निव्वळ थोतांड
गेल्या काही वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने भेंडवळच्या या भविष्यवाणीविरुद्ध दंड थोपटले आहेत. ही घट मांडणी म्हणजे निव्वळ थोतांड असून अतार्किक आणि अवैज्ञानिक आहे. परिणामी शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणते. हे भाकीत केवळ एक थोतांड आहे.
संभाव्यतेच्या नियमावर बाकी कोणीही चुकला किंवा न शिकलेला व्यक्तीदेखील परिस्थितीजन्य तार्किक विचार करून एकंदरीत पर्जन्यमानाचा, हवामानाचा, पर्यावरणाचा, शासकीय कार्यालयात वर्तवलेल्या अंदाजाचा अभ्यास करून असे भाकित वर्तवले जाऊ शकतो.
भेंडवळच्या भविष्यवाणीला कुठलाही तार्किक आधार नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या वस्तूला कशाचंही प्रतीक कसं काय मानू शकता? शेतामध्ये उघड्यावर काही पदार्थ घट घालून मांडणे व दुसऱ्या दिवशी त्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या झालेल्या बदलाचा आधार घेऊन देशाचं भविष्य वर्तवणं ही पद्धत अयोग्य आहे.
संदिग्धता ठेवणं ही भविष्यवाल्यांची खरी खासियत असते. ते कधीच अमक्या एका जिल्ह्यात इतका इतका पाऊस पडेल असं सांगत नाहीत. त्यांच्या भविष्यवाणीत कधीच नेमकेपणा नसतो. भविष्यवाणी करताना ही मंडळी अतिशय मोघमपणे संपूर्ण देशातल्या पावसाबद्दल सांगतात. म्हणजे आपण म्हटलं, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पाऊस नाही पडला, तर तुमच्याकडे नसेल पडला पण देशात इतर ठिकाणी तर पडला ना, असं म्हणायला हे मोकळे असतात. .
आजही हजारो शेतकऱ्यांची निष्ठा
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा काठावर आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले भेंडवळ हे छोटेसे गाव. असे म्हटले जाते की, गावातील व्रतस्थ चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. जंगलात तपश्चर्या करून त्यांनी नीलावती विद्या प्राप्त केली. त्या माध्यमातून ते पशूपक्ष्यांशी संवाद साधायचे. महाराजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गावाच्या पारावर आणि अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या शेतात घटमांडणी करून पीक-पाण्याविषयी अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली..
या अंदाजावरूनच पंचक्रोशीतील शेतकरी खरीप आणि रबी पिकांचे नियोजन करतात. चंद्रभान महाराजांचा हा वसा आज त्यांची तेरावी पिढी सांभाळत आहे. रामदास महाराज यांनी हा वारसा अनेक वर्षे चालविला. गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनात पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर पाटील यांनी घटमांडणीचे अंदाज मांडले होते. रामदास महाराजांचे निधन झाले. यंदा ही मुख्य जबाबदारी पुंजाजी महाराजांवर आली होती. या मांडणीसाठी पुंजाजी महाराजांचे एक महिना पूर्वीपासून व्रतस्थ जीवन सुरू झाले. या काळात त्यांचा जंगलात अज्ञातस्थळी वास असतो.
भेंडवळमधील वाघ परिवार वंशपरंपरेने हा वारसा अव्याहतपणो चालवत असून याच आधारावर शेतकरी मानसिक आधार शोधत आपापल्या पिकांचे नियोजन करीत असतात. ही मांडणी होणार म्हणून कुठेही जाहिरात होत नाही, कोणी आमंत्रण देत नाही किंवा मांडणीचे निष्कर्ष सांगण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचे शुल्क उकळले जात नाही. हे सर्व खरे असले तरी मांडणीतून बाहेर आलेले निष्कर्ष हे हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र वा ज्योतिषशास्त्राच्या आधारावर काढले जात नाहीत. पण आजही हजारो शेतकरी निष्ठेने आणि मोठ्या विश्वासाने भेंडवळची घटमांडणी ऐकण्यासाठी केवळ जातच नाहीत, तर त्यावर अंमलबजावणीही करतात.
गेल्या काही वर्षांपासून भाकितं चुकीची ठरताहेत…!
गेल्या वीस-पंचवीस वर्षातील भाकिते पूर्णपणे खरे ठरल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षाची भाकित तपासले असता असं म्हटलं होतं की, कपाशीचे पीक उत्तम येईल परंतु कपाशीचे पिक नाममात्र आले, हरभरा पीक साधारण सांगितले होते, परंतु सर्वत्र हरभरा पीक उत्कृष्ट आले. उडीद मुगाचे पीक साधारण राहील, परंतु उडीद मुगाचे पीक त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य होते. घटमांडणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवतात परंतु कपाशी नंतर सोयाबीनचा पेरा असतो तशी घटमांडणीमंध्ये सोयाबीनला थारा नाही. कारण सोयाबीनचे पीक हे या भागांमध्ये अलीकडे म्हणजे जवळ जवळ 30 वर्षापासून जास्त प्रमाणात घेतला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या गटामध्ये कुरडई ,करंजी ,पुरी या सारख्या पदार्थांचा वापर करतात आणि यासारखे पदार्थ तिथे या साहित्य मध्ये मांडतात.
(हमीद दाभोलकर)
वास्तविक हे पदार्थ तर महिलाच बनवतात परंतु याही घटमांडणी जेव्हा चालते त्या परंपरेमध्ये त्या कुठेही महिला समाविष्ट झालेली दिसून येत नाही. वास्तविक त्यांना तिथे प्रवेश दिला जात नाही. हे घटमांडणी गावाबाहेर शेतामध्ये केल्या जाते.आणि आतापर्यंत तिथे कुठेच महिला उपस्थित दिसत नाही, म्हणजे तिथे स्री पुरुष असमानता आहे.अशा भाकितं वर विश्वास ठेवून जर बळीराजा आपल्या निर्णय घेत असेल तर “जग चालले पूर्वेकडे आणि आम्ही चाललो पश्चिमेकडे”अशी आपली दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे.
अशी केली जाते घटमांडणी?
अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भेंडवळबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटाची आखणी करण्यात येते. सुमारे सात फुट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात येतो. यात घागर, मातीची चार ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेला करवा, पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी यासह 18 प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतीकात्मक मांडणी करण्यात येते. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात येतात. ही ठेवण्यात आलेली चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक मानण्यात येतात. त्यावर पाण्याने भरलेला करवा अर्थात मातीचे भांडे ठेवण्यात येते.
करव्यावर वडा, भजा, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी आदी मांडतात. घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत मानले जाते तर मसूर शत्रूचे प्रतीक, करडी संरक्षण व्यवस्था; सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी- कुरडई चारा-पाण्याचे, करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे यात झालेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून वाघ कुटुंबातील सदस्य येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकित वर्तवितात.
असे असले तरी वऱ्हाडासोबत खान्देश, मध्य प्रदेशातील अनेक गावांतील शेतकरी अंदाज जाणून घेण्यासाठी आदल्या दिवशीच भेंडवळमध्ये पोहचतात. हजारो शेतकरी येत असल्याने ‘बिझनेस’च्या कायम संधी शोधणाऱ्या बी-बियाणे कंपन्यांची गेल्या काही वर्षांत चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. विविध वाणांची जाहिरात करण्यासाठी पहाटेच प्रचार साहित्य घेऊन कंपन्यांचे प्रतिनिधी भेंडवळमध्ये ठाण मांडतात.






