- प्रशांत पवार
बिहारची कोणतीही निवडणूक ‘लौंडा नाच’ शिवाय पूर्ण होऊ शकत नाही हा इतिहास आहे आणि यंदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरलेली नाही. लौंडा नाच आणि बिहार यांचं एक अतुट समीकरण आहे. आणीबाणीनंतर बिहारमध्ये लौंडा नृत्याला राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत स्थान मिळालं. लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान आणि नितीश कुमार यांसारख्या नवीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात जे स्थान मिळालं त्यात या लौंडा नृत्याचा मोठा हात आहे. याचं कारण म्हणजे हे सर्व मातब्बर नेते समाजाच्या ज्या घटकांसाठी राजकारण किंवा समाजकारण करायचे तो बहुजन समाज लौंडा नृत्याचा कट्टर चाहता होता.
लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान लौंडा नृत्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. बिहारमध्ये, आणि विशेषतः पूर्व बिहारमध्ये, जिथे लालू स्वतः राहतात, तिथे लौंडा नृत्य हे मनोरंजनाचं प्राथमिक माध्यम होतं. अलीकडेच या लौंडा नाचवरून बिहारमध्ये राजकीय शेरेबाजी झाली होती. गेल्या जुलैमध्ये विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी 2005 च्या पूर्वीच्या काळाचा उल्लेख करत म्हटले होते की, "15 वर्षे बिहारमध्ये कोणतेही काम झालं नाही; फक्त गाणं आणि नाच आणि लौंडा नाच चालू राहिलं. लालूंच्या राज्यात विकासाची कोणतीही चर्चा झाली नाही." त्यावर, लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले, "जेव्हा माझे वडील 'लौंडा' नृत्य आयोजित करायचे, तेव्हा तुम्ही तिथे बसून टाळ्या वाजवायचे. 'लौंडा' नृत्य ही आपली संस्कृती आहे; ते त्याची खिल्ली उडवत आहेत."
काय आहे हा लौंडा नाच…? कोण सादर करतात हे लौंडा नृत्य…? या नृत्याच्या नावातच अश्लीलता असल्याचा आरोप का केला जातो…? लौंडा नाच आणि त्याचे राजकीय संबंध नेमके काय आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध ‘बाईमाणूस’च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय जातिव्यवस्थेने सांस्कृतिक क्षेत्राला दिलेल्या वळणांकडे पाहिले, असता कला क्षेत्रातले जातवास्तव अधिक ठळकपणे दिसते. भारतातल्या उच्च समजल्या जाणाऱ्या जातींनी ज्या दुय्यम दर्जाच्या कला आहेत, त्या समाजातल्या खालच्या जातींमध्ये वाटून आपल्या सांस्कृतिक आचरणात जातवर्चस्वाची झूल शाबूत राहील, याची सतत दक्षता घेतली आहे. भारतात कुठेही गेलो तरी लोककला प्रवाहित करणारे कलावंत, हे खालच्या जातीतलेच दिसतात. पण, लोककला जर आजच्या आधुनिक कलांच्या उद्गात्या असतील, तर भारतीय लोककलांची सतत उपेक्षा का होत राहिली?
बिहारचा "लौंडा नाच' याच सांस्कृतिक राजकारणात जखडला गेलाय. "मुन्नी बदनाम हुई' या गाण्यानंतर उत्तरेकडे "लौंडा बदनाम हुआ, नसिबन तेरे लिए' या ताराबानो फैजाबादीच्या भोजपुरी गाण्याने लोकप्रियतेचा कळस गाठला. गाण्याचे हेच शब्द नेमके "लौंडा नाच'ला तंतोतंत लागू पडतात. "लौंडा' या शब्दाचा सरळसरळ अर्थ म्हणजे मुलगा. बिहारमध्ये जी मुलं बायकांप्रमाणे वेशभूषा करून नाच-गाणी करतात, त्यांना "लौंडा' म्हणूनच ओळखलं जातं, आणि त्या नृत्याच्या प्रकाराला "लौंडा नाच' म्हणून. आता एकदा का "लौंडा' म्हटलं की, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार हे निश्चितच आणि झालंही नेमकं तसंच.मात्र इतका मोठा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळूनही, असं नेमकं काय झालं, की लोककलावंत म्हणून सुरूवात करणाऱ्या या कलाकारांचा प्रवास "लौंडा' या अश्लील आणि बदनामीकारक शब्दापर्यंत येऊन थांबला.
ज्येष्ठ नाटककार आणि लोककला अभ्यासक हसन इमाम या संदर्भात म्हणतात, की "लौंडा नाच' असा कुठलाही फॉर्म लोककलेमध्ये कधीच नव्हता. इतिहासातही तसे दाखले मिळत नाहीत. १९व्या शतकांपासून आजही भारताच्या गावांगावांमध्ये जी नाटके होतात, रामलीला, रामायण, महाभारताचे प्रसंग नाच-गाण्यातून सादर केले जातात, त्यात अनेक तरुणांनी स्त्रीपात्र रंगवले आहे, त्या सगळ्यांना आपण "लौंडा' म्हणतो का? मनोहर श्याम जोशी, बालगंधर्व इतकेच नव्हे तर हबीब तनवीर, रतन थिय्याम यांच्या नाटकातही पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्या आहेत... बिरजू महाराज किंवा इतर अनेक दिग्गज कथ्थक नर्तक जे महिला नर्तकींप्रमाणे नृत्य सादर करतात त्यांनाही आपण "लौंडा' म्हणणार का?
पूर्वी राजदरबारात नर्तकी नाचायच्या. पण, राजे-महाराजांचे युग संपले आणि तवायफ, कोठेवाली, बायजींचे युग सुरू झाले. सामंती वर्चस्ववादी पुरुषी मानसिकतेने पैशाच्या-बळाच्या जोरावर त्यांना आपल्या ताब्यात ठेवले. इतर समाजातील महिलांना तर धर्मशास्त्राने नाच-गाणं सादर करण्याची परवानगीच नाकारली होती. त्यामुळे एक खूप मोठा उपेक्षित, शोषित वर्ग नृत्यासारख्या मनोरंजनापासून वंचित राहिला होता. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी एका वेगळ्या शैलीचा जन्म झाला... पुरुषांनीच स्त्रिया बनून नाच-गाणं करण्याचा. अल्पावधीतच कलेचा हा फॉर्म इतका लोकप्रिय झाला, की त्यातून अनेक नाच-गाण्याची पथके तयार झाली, नाच-गाण्यांचा आनंद लुटण्याची मक्तेदारी ज्या सावकार-जमिनदारांकडे होती त्याला फक्त या कलेने आव्हानच नाही दिले, तर स्वत:चे नायक जन्माला घातले. संस्कृतीच्या ठेकेदाऱ्यांना, सांस्कृतिक पर्यावरणरक्षकांना अर्थातच हे मान्य होणारं नव्हतं आणि मग या कलेला सामाजिक मान्यता मिळू नये म्हणून सुरू झालं सांस्कृतिक राजकारण. या कलेला हिणवण्यासाठी, त्यावर अश्लिलतेचा शिक्का मारण्यासाठी "लौंडा नाच' हा शब्द खास तयार करण्यात आला. आजही, लौंडा नृत्य सादर करणारे बहुतेक लोक अनुसूचित जातीच्या नट समुदायाचे आहेत. बिहारच्या जात सर्वेक्षणाच्या अनधिकृत अहवालानुसार, येथील 1.5 लाख लोकसंख्या नट समुदायाची आहे, ज्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती कोणापासूनही लपलेली नाही.
तथाकथित उच्च जातींमध्ये लौंडा नृत्याला कमी आदर होता आणि त्याऐवजी, ते "बाईजींचे नृत्य" पाहत आणि ऐकत होते. "बाईजी का नाच" हा एक नृत्य कार्यक्रम होता ज्यामध्ये गणिका होत्या. बाईजीच्या मंडळांमध्ये देशभरातील कलाकार होते. हे महागडे होते आणि फक्त श्रीमंत आणि जमीनदारांनाच ते परवडत होते. बाईजींचे नृत्य कार्यक्रम फक्त उच्च जातींचे लोक आयोजित करत असत आणि इतर सर्व जातींना त्यात सहभागी होण्याची परवानगी नव्हती किंवा त्यांच्याशी भेदभाव केला जात असे. समाजातील इतर घटक मनोरंजन शोधत असताना, सर्वत्र नृत्य मंडळे उदयास आली. हळूहळू, हे नृत्य शोषितांसाठी मनोरंजनाचे साधन बनले आणि नृत्य कार्यक्रमांमध्ये सामाजिक दुष्कृत्यांवर चर्चा होऊ लागली. म्हणून, या कार्यक्रमांची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी, त्यांना "लौंडा नाच" असे लेबल लावण्यात आले.
लालूप्रसाद ज्या यादव समुदायाचे होते त्यांच्यासाठी लौंडा नृत्य पाहणं सर्वात सहज होतं.
1995ची घटना आजही बिहारच्या राजकारणात चर्चिली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री लालू यादव बिहारमधील गोपालगंज येथे निवडणूक रॅली घेणार होते. त्यांनी पाटण्याहून गोपालगंजला संदेश पाठवला. हा संदेश रामचंद्र मांझी यांच्यासाठी होता. 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले रामचंद्र मांझी तेव्हा पूर्व बिहारमधील एक सेलिब्रिटी होते आणि भिखारी ठाकूर यांच्या प्रसिद्ध नृत्य मंडळात "लौंडा नर्तक" होते. संदेशात लिहिलं होतं, "रामचंद्र मांझी, कृपया ठरलेल्या तारखेला साडी घालून या आणि स्टेजजवळ राहा. लालूजींनी हा संदेश पाठवला आहे."
रामचंद्र मांझी कार्यक्रमस्थळी पोहोचले होते, पण शांतपणे दुसऱ्या बाजूला जाऊन बसले, जिथे महिला बसल्या होत्या. लालू यादव आले, स्टेजवर चढले आणि त्यांनी इतक्या गर्दीतून रामचंद्र मांझींना ओळखलं. त्यांच्याकडे बोट दाखवत ते म्हणाले, तुम्ही तिथे कुठे बसले आहात? स्टेजवर या आणि इथे खुर्चीवर बसा. तुम्ही एक कलाकार आहात आणि तुम्हाला वेगळा आदर मिळायला हवा."
लालूप्रसाद हे बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बिहारमधील इतर भोजपुरी भाषिक जिल्ह्यांसह हा परिसर लौंडा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. लालूंनी त्यांच्या राजकीय सभा आणि कार्यक्रमांमध्ये गर्दी आकर्षित करण्यासाठी लौंडा नृत्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. लालू लौंडा नृत्य गुरूंच्या डायरी उधार घेत असत आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या तारखा नोंदवत असत. नियोजित तारखांना, गुरू त्यांना नृत्यादरम्यान बोलण्यासाठी काही मिनिटे देत असत.
जैनेंद्रकुमार दोस्त हा बिहारचाच तरुण जेएनयुमध्ये "लौंडा नाच' वर पीएचडी करतोय. तो सांगतो की, "लालूजींइतके लौंडा नाच इतर कोणत्याही नेत्याने पाहिले नसतील. आमचे गुरू आम्हाला सांगायचे की लालूजी निवडणुकीच्या वेळी तीन गट सोबत घेऊन जायचे. त्या काळात मायक्रोफोन नव्हते, तरीही गर्दी जमायची. मी स्वतः लालूजींच्या घरी दहापेक्षा जास्त वेळा सादरीकरण केले आहे. त्यांच्या वाढदिवशी किंवा होळी-दिवाळीला ते आम्हाला संदेश पाठवत असत आणि आमंत्रित करत असत. एकदा त्यांनी फोन करून सांगितले की तुमच्या गटातील सर्व लोकांची नावे द्या, ते त्यांच्यासाठी घरे बांधून देतील. लालूजींनी तर सर्वांसाठी घरे बांधून दिली."
(रामचंद्र मांझी)
लालूप्रसाद ज्या लौंडा नर्तक रामचंद्र मांझी यांच्या कलेचे चाहते होते त्या रामचंद्र यांची कहाणी विलक्षण आहे. अगदी दोनेक वर्षांपूर्वी वयाच्या 93 व्या वर्षी या महान कलाकाराचे निधन झालं.
आईये, आईये... अब आप के सामने आ रही है अपने जमाने के
शिरीदेवी
ना ना
तो, अमिताभ बच्चन
अरे ना रे माधे
वो तो अपने रामचंदर मांझी है रे…
प्रचंड टाळ्या आणि शिट्यांच्या कडकडाटात घागरा-चोळी, कानात झुमके, गळ्यात नेकलेस, माथ्यावर बिंदी आणि ओठांना लालभडक लिपस्टिक अशा पेहरावात स्टेजवर ‘लौंडा' रामचंदर मांझी यांची एन्ट्री व्हायची. आपल्या खास भोजपुरी शैलीत रामचंदर गाऊ लागायचे, ढोलकच्या ठेक्यावर कमरेला लटके देत नृत्य करायचे. गाण्याचे बोल असायचे…
घर में रहे दूध पांच सेर, केहू जोरन दिहल एक धार.
का पंचाईत होखत बा, घीव साफे भईल हमार…
याचा अर्थ, माझ्या घरी जर पाच शेर दूध असेल आणि जर का कुणी त्यात विरजण घातले, तर यात पंचायतीचा काय संबंध? त्यातून तयार होणारे तूप हे सरळ सरळ माझेच असणार आहे.
जिचा नवरा कामाचे निमित्त सांगून घरदार सोडून पळून गेलाय, तिथे जाऊन त्याने दुसरे संधान बांधले आहे आणि अशा परिस्थितीत त्याची पत्नी इतर कोणाकडून गरोदर राहिली तर... इतकाच कुतूहल चाळवणारा या गाण्याचा अर्थ नाहीये, तर मी कुणाशी संबंध ठेवावेत हा फक्त माझा प्रश्न असून माझ्या गर्भावर पूर्णपणे माझाच हक्क आहे, त्यात पंचायतीला नाक खुपसायचं काहीएक कारण नाहीये, असा थेट सवाल एका स्त्रीने व्यवस्थेला विचारला आहे! आणि हा सवाल केव्हा विचारलाय, तर जेव्हा ‘द सेकंड सेक्स' (1949) हे सिमोन द बोव्हारचं क्रांतिकारक मानलं जाणारं पुस्तकही प्रकाशित झालेलं नव्हतं अशा काळात.
स्त्रीचा वेष धारण करून रामचंदर मांझी हे जे गाणं सादर करायचे ते गाणं लिहिलेलं आहे, त्यांचे गुरु भिखारी ठाकूर यांनी आणि मांझी ज्या पद्धतीने हे गाणं आणि नृत्य सादर करायचे त्या सादरीकरणाला संबंध बिहारमध्ये ओळखलं जातं "नाच' या नावाने. "नाच' म्हणजे, केवळ नृत्य नव्हे, तर स्त्रियांसारखी वेशभूषा करून गाणं, नृत्य आणि पौराणिक कथांचे सादरीकरण अशा एकत्रित लोककलेच्या फॉर्मला "नाच' म्हटलं जातं. वयाच्या 12 व्या वर्षापासून ते वयाच्या 93 व्या वर्षपर्यंत तोंडाला पावडर आणि लिपस्टिक लावून "नाच' करणाऱ्या रामचंदर मांझी यांची अनेक वर्षापासूनची तपश्चर्या फळाला आली, जेव्हा त्यांना प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता... हा सन्मान फक्त रामचंदर मांझीचा नव्हता तर हा सन्मान ज्यांनी "नाच' जन्माला घातला, ते त्यांचे गुरू ज्यांना ‘बिहारचे शेक्सपिअर’ म्हणून ओळखले जाते, त्या भिखारी ठाकूर यांचाही होता! अश्लील, बिभत्स अशी निर्भत्सना करत दलितांच्या, उपेक्षितांच्या, शोषितांच्या या "नाच' नावाच्या लोककलेला "लौंडा नाच' असे हिणवत ज्या व्यवस्थेने सांस्कृतिक परिघाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही त्या "लौंडा नाच'चा हा सन्मान होता…
दलित समाजाचे रामचंदर मांझी वयाच्या अकराव्या वर्षी भिखारी ठाकूर यांच्या पथकात सहभागी झाले होते. "माझं सगळं आयुष्य मी भिखारी ठाकूर आणि "नाच'ला समर्पित केलं होतं. इतकं की माझ्या लग्नाच्या दिवशीही मी कार्यक्रम सादर करून आलो होतो आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही "नाच' करायला गेलो होतो. सुरैय्या, मधुबाला, साधना या जुन्या नट्यांसोबत मी "नाच' केलाय. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, जयप्रकाश नारायण, जगजीवन राम, नितीश कुमार, शरद यादव, रामविलास पासवान यांच्यासमोर माझे कार्यक्रम झाले असले तरी, राजकीय नेत्यांमध्ये लालुप्रसाद यादव यांनी मात्र माझ्यावर खूप प्रेम केलं. जेव्हाही लालुप्रसाद मला भेटत, तेव्हा ते नेहमी हेच म्हणायचे की, रामचंदरजी आप जबतक जियें, भिखारी ठाकूरको जिंदा रखें. मात्र इतकं करूनही माझ्या कुटुंबाने मात्र आजपर्यंत माझा कार्यक्रम पाहिलेला नाही. याच कारण आमच्या या कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन…' असे रामचंद्र मांझी म्हणायचे.
आपल्या सबंध आयुष्याचा विस्तारपट उलगडून सांगताना रामचंदर मांझी यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरू भिखारी ठाकूरबद्दल प्रचंड आदर व्यक्त होत असायचा. आणि का नाही, ज्या भिखारी ठाकूरला भोजपुरीचे शेक्सपिअर आणि तुलसीदास म्हणून संबोधिले जाते, ज्या महापंडित राहुल सांकृत्यायनने त्यांचा "अनगढ हिरा' म्हणून गौरव केला आहे त्या लोककवी भिखारी ठाकूरमुळेच तर आज भोजपुरीचे सांस्कृतिक स्थान उभे राहिलेे आहे. प्रख्यात कवी केदारनाथ सिंह म्हणतात... ‘ठनकता था गेंहुअन, तो नाच के किसी अंधेरे कोने से, धीरे धीरे उठती थी, एक लंबी और अकेली भिखारी ठाकूर की आवाज.’
बिहारच्या छपरा येथे नाभिक समाजात जन्मलेले भिखारी ठाकूर रोजगाराच्या शोधात इतर बिहारी-युपी तरुणांप्रमाणेच कोलकाताला आणि त्यानंतर पुरी येथे स्थलांतरित होतो काय... तिथली लोक संस्कृती, तिथल्या लोककला पाहून भारावून जातो काय, बिहारमधल्या सांस्कृतिक दारिद्र्याबद्दल आसवं गाळतो काय, आणि पुन्हा बिहारला परतून पुरुषांनीच स्त्रियांच्या भूमिका साकारणारे स्वत:चे एक सांस्कृतिक विश्व जन्माला घालतो काय... दलितांचं, वंचितांचं जीणं एका वेगळ्याच कलेच्या माध्यमातून समाजासमोर प्रस्तुत करतो काय, सारंचं थक्क करणारं. ‘बिदेसिया' (परमुलुखात गेलेल्या कर्त्या पुरुषाची आळवणी करताना स्त्री मनाचं दु:ख, वेदना हुरहूर आदी भावनांचं दर्शन घडवणारा कलाप्रकार) ही भिकारी ठाकूर यांची नृत्य-नाट्य असलेली एक अजरामर 1917 मध्ये सादर केेलेली कलाकृती. उत्तरेकडे असा एकही कलावंत नसेल, ज्याने रंगमंचावर "बिदेसिया' केलं नसेल... "बिदेसिया'च्या आजवर किती आवृत्त्या निघाल्या हेदेखील कोणी ठामपणे सांगू शकत नाही.
भिखारी ठाकूर यांच्या प्रखर सामाजिक भाष्य करणाऱ्या कलाकृती असतानाही त्यांच्या कलेला कधीही अभिजात दर्जा दिला गेला नाही. भिखारी ठाकूर यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या रामचंदर मांझी यांच्यासारख्या अनेक कलाकारांना कायम दुर्लक्षित केले गेले. एकेकाळी जवळपास दीडशे ते दोनशे "नाच पथक' एका मोठ्या वर्ग समूहाचे मनोरंजन करत असताना, त्यांच्या सामाजिक जाणिवांना जागृत करत असतानाही ही कला कायम बहिष्कृतच राहिली.
या इतक्या प्रदीर्घ कालावधीत "लौंडा नाच'चे अनेक दिग्गज कलावंत काळाच्या उदरात गडप होऊन गेले. त्यातलाच एक होता रसूल... इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात रसूलदेखील सहभागी झाला होता, परंतु तो "नाच' मधून समाजप्रबोधन करायचा... हजारोंच्या गर्दीला रसूलच्या "नाच'मधून प्रेरणा मिळायची. नथूराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केल्यानंतर रसूलने गाणं लिहिलं होतं... ‘के मारल हो, हमरा गांधी के तीन गो गोली, धकाधक…!’ कोण ओळखतं या रसूलला आणि या रसूलला आपण फक्त "लौंडा' म्हणून खड्यासारखं बाजूला फेकून देणार.
(भिखारी ठाकूर)
चाई ओझा हा असाच एक लोकप्रिय कलाकार, परंतु फक्त फरक इतकाच चाई ओझा हा दलित समाजापैकी नसून ब्राम्हण जातीचा होता. वयाच्या १२व्या वर्षापासूनच चाई ओझाला या "नाच' कलेबद्दल आकर्षण वाटू लागलं. पुढे पुढे तर त्याने त्याकाळी दलित वस्तीत जाऊन आणि दलित कलावंतांना सोबत घेऊन स्वत:चे नाच पथक तयार केलं. चाई ओझाचे राज्याराज्यात कार्यक्रम होऊ लागले, मात्र इतकी लोकप्रियता असतानाही, चाई ओझाला समाजातून, गावातून बहिष्कृत करण्यात आलं. शेवटपर्यंत त्याला समाजाने स्वीकारलं नाही. आजही त्या भागात त्याचं नाव घेतलं की कौन वो "लौंडा चाई ओझा' असं म्हणूनच हिणवलं जातं.
काळ बदलला… एकेकाळी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी, ही कला आता खरोखरच अश्लील संवाद, अचकट-विचकट हावभाव अशा स्वरुपात सादर केली जाते. पूर्णपणे ऑर्केस्ट्राकरण झालेल्या या जमान्यात पारंपरिक कलावंत भरडले जात आहेत. आणि म्हणूनच पारंपरिक नाच करणाऱ्या अनेक कलावंतांनी त्याकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. 2000 नंतर इथली अनेक नाच पथके बंद पडली. आता आसाम, बांगलादेश, नेपाळमधून मुली येतात.
मात्र काहीही झाले तरी भिखारी ठाकूर यांची परंपरा जिवंत ठेवायचीच, या निष्ठेने जैनेंद्रकुमार दोस्तसारखे तरूण आजही प्रयत्नशील आहेत. जैनेंद्र हा बिहारचाच तरुण जेएनयुमध्ये "लौंडा नाच' आणि "बिदेशिया'वर पीएचडी करतोय. त्यासाठी त्याने भिखारी ठाकूर रेपेट्री (Repertory) प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केलंय. भिखारी ठाकूरसोबत काम केलेल्या पाच कलावंतांवर जैनेद्रने "नाच भिखारी नाच' ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
"लौंडा नाच'अशी सतत हेटाळणी होत असल्यामुळे आपल्या अखेरच्या काळात भिखारी ठाकूर म्हणतात…
अबहीं नाम भईल बा थोरा, जब यह छूट जाई तन मोरा
तेकरा बाद पचास बरिसा, तेकरा बाद बीस दस तीसा
तेकरा बाद नाम हो जईहन, पंडित कवि सज्जन जस गईहन’
आता कुठे जरासं नाव झालं आहे... जेव्हा हे शरीर मोकळं होईल, तेव्हा कदाचित पन्नास वर्षांनंतर किंवा दहा-वीस वर्षांनंतर नामांकित झालेलो असेन... पंडित, कवी आणि सज्जन मंडळी माझ्या यशाचे गोडवे गात असतील...
असं खरंच होतंय का?






