(वीरा राठोड)
थोडेसे मागे वळून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अवघे जगच भटके राहिलेले आहे. ती माणसांची मूळ प्रवृत्तीही आहे. यातूनच संपूर्ण जगाचा शोध लागलेला आहे आणि जग जवळ येऊन विश्व समाजाची एक इंद्रधनुष्यी वीणच विणली गेली आहे. हे नानाविध रंग जगभरातल्या अनेक संस्कृतींची देणगी आहे.
यातूनच जन्माला आलेले ‘धरतीला माय आणि आकाशाला बाप’ मानून चालणारे, जिप्सी, बंजारे (Nomads), झोर्बन आदी निसर्गानुरूप ज्यांना जिथे जसे पर्यावरण भेटले, तिथे त्यांनी तसे रूप अंगीकारले.
त्यातूनच त्यांची संस्कृती, तत्त्वज्ञान आकारास आले. अपवाद वगळता त्यांना इतिहासात कुणाशी कुठल्याच वैरभावातून युद्ध करावे लागले नाही. वा त्यांनी स्वत:ला कुठल्याच ठरावीक चौकटीत बांधून घेतले नाही. म्हणून ही त्यांची ‘कलरफूल’ संस्कृती जन्मास आली. अन्यथा कुणी काळा, पांढरा, निळा, भगवा, हिरवा, लाल अशा रंगात अडकून आपलं अस्तित्व संपवून बसले असते.
बंजारांनी कोणत्याही विशिष्ट भूप्रदेशात स्वत:ला अडकवून घेतले नाही
भारतात लमाण, लमाणी, बंजारा, गोर, गोरमाटी, लम्बाडा, चारण वनजारा, सुगाली, सार्थवाह, गवारीचा, ग्वार, बाजीगर आदी नावाने परिचित असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तानचे कबीलेवाले (आदिवासी) बंजारे यांपासून जगभर पसरलेल्या रोमा जिप्सीपर्यंत त्यांची ओळख सांगता येईल.
या संपूर्ण वाटचालीत आदिम काळापासून लमाण-बंजारांनी स्वत:ला कुठल्याच धर्मात बांधून घेतले नाही वा त्यांना तसे बांधताही येणार नाही. मानवता हीच त्यांची जात आणि हाच त्यांचा धर्म. किती विलक्षण स्वरूपाची गोष्ट आहे ही. या लोकसमूहाबद्दल मानववंशशास्त्राचे तथा आदिवासींचे ऑस्ट्रेलियाचे अभ्यासक वॉन फ्युटर हेमिंड्राफ म्हणतात, ‘दुसऱ्या आदिवासी जमातींच्या तुलनेत बंजारांनी कोणत्याही विशिष्ट भूप्रदेशात स्वत:ला अडकवून घेतले नाही.
ते जिथे गेले, त्या भूमीलाच त्यांनी आपले मूळ स्थान मानले.’ कदाचित यामुळेच लमाण बंजारांची संस्कृती सर्वधर्मसमभावाची तयार होऊ शकली, असे म्हणावे लागेल. मुस्लिम राष्ट्रात मुस्लिम बंजारा, हिंदू राष्ट्रात हिंदू आदिवासी, पश्चिमी राष्ट्रात ख्रिश्चन जिप्सी, बुद्ध काळात बुद्ध विचारांचे आणि नानकांच्या काळात त्यांच्या विचारांचे ते प्रसारक झाले.
यातूनही त्यांनी आपली आदिम प्राकृतिक विचारधारा जोपासत, मानवी विचारांना सत्य मानून आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान निर्माण केले. त्याचेच अंश आजही या लोकसमूहाच्या विचार परंपरेत सापडतात. उदा. ‘शरण आलेल्याला मरण द्यायचे नाही.’ ‘मुयेन मटी जिवतेन बाटी’, ‘जात खोट रीत मोट’, इत्यादी सांगता येतील.
कदाचित या लोकांना जगभराच्या भटकंतीतून ही गोष्ट कळून चुकली असेल की, धर्म हा आदर्श जीवन प्राप्तीचे साधन आहे, अंतिम साध्य नाही. ती आदर्शवत आणि आनंदमय जीवन जगण्याकरिता बनलेली एक सांस्कृतिक संकल्पना आहे. अंतिम उद्दिष्ट मानवी जीवनाचे अस्तित्व अबाधित ठेवणे हे आहे. जे बंजारे आदिम काळापासून गात आले आहेत.
‘धरती तोपर अंबर रकाड जिवणों’ अर्थातच, धरतीवर जीवनाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, माणसांचे कूळ तारण्यासाठी ते आजवर एक गोष्ट सांगत आलेत. ‘चोको पुरादं जग मोतीयारो, कुळेतारण’ म्हणजे, मानवी कूळ तारण्यासाठी चाक फिरतं राहू दे.
मुशाफिरी करणारे समूह…
जगात अनेक मानवी समूह आहेत जे जात, धर्म, पंथ, प्रदेश या सर्व मर्यादांच्या पलीकडे आणि माणूस म्हणून मानवी जगण्याच्या अधिक जवळ जाण्याचा सातत्याने कसोशीचे प्रयत्न करीत राहिले आहेत. परंतु वंशवर्चस्वाच्या नि जात, धर्म श्रेष्ठत्वाच्या अघोरी महत्त्वाकांक्षांनी भेदाभेदाची अन्यायात्मक तीक्ष्ण टोकं पुन:पुन्हा तीव्र होत राहिल्याने जगभरातील मानवहिताचे गाणेच बेसूर करून टाकले आहे.
या साऱ्यांचा पहिले बळी ठरलेत, जगभरातील भटके, जिप्सी आणि बंजारे. हे मुशाफिरी करणारे समूह. खरं तर ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे धरतीला माता आणि आकाशाला पिता मानून अवघ्या जगात विश्वबंधुत्वाचे नाते जोपासू पाहणाऱ्या या मुसाफिरांनी ज्या देशात, ज्या पर्यावरणात प्रवेश केला, तिथला परिवेष नि:संकोचपणे धारण करून जगण्याला हसतमुखाने सामोरे गेले. त्यांनी कुठलाच धर्म, पंथ, देश, प्रदेश, पेशा नि भाषा वर्ज्य मानली नाही.
कारण मुळातच ते धर्मविरहित निधर्मी, वर्णबाह्य अवर्ण होते. तरीही भारतात हिंदू आदिवासी, भटके बंजारे, अरब-मुस्लिम देशात मुस्लिम बंजारे आणि पश्चिमी देशात ख्रिश्चन जिप्सी आदी धार्मिक आस्थांमध्ये रममाण झाले. पण त्यांचा धर्मप्रवाहांनी इतिहासापासून आजतागायत पूर्णत्वाने स्वीकार न केल्यामुळे सततच्या भटकंतीतून मिश्रभाषी, संमिश्र पद्धतीची संस्कृती जगभरात जन्माला आली. जी भारत आणि आशियात बंजारे भटके म्हणून, तर जगात जिप्सी म्हणून नावारूपास आलेली आहे.
जगभरातील 55 देशांमध्ये बंजारा समाजाचे वास्तव्य
जिप्सी, बंजारा, भटके, नोमॅडस् या तशा प्रवृत्तीवाचक संकल्पना, पण त्यांचे परावर्तन आपण जाती आणि जमातीत करून टाकले आहे. हेच समूह भारतातून राजस्थान, सिंध, पंजाब आदी भूभागातून हिंदूकुश पर्वतामार्गे, कॅप्सिअन समुद्रामार्गे इराण, तुर्की, मगदुनिया, ग्रीस, रोमानियापासून स्पेन, अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचले, जे भारतीय बंजारे, डोम, डोंबारी, सिकलगार, लोहार, गुर्जर, सांसी आदी जमातींचे लोक होत.
बंजारांसारखे प्राचीन व्यापारी, कलेवर उपजीविका असणाऱ्या कलावंत जमाती, कारागीर, हस्तशिल्पी, लढाऊ जमाती या इसपूर्वीपासून 14व्या शतकापर्यंत भारतातून वेगवेगळ्या कालखंडात, अनेकविध कारणांनी बाहेर जात राहिल्या. बुद्धपूर्व काळापासून व्यापारानिमित्त गेलेले बंजारे लोक, इसपूर्व 323 मध्ये अलेक्झांडरने अनेकांना आपल्यासोबत नेले. महंमद गझनीने अनेकांना गुलाम बनवून नेले. अरब, तुर्क, मंगोल आदींच्या वाढत्या आक्रमणामुळे नि सम्राट अकबराच्या सैन्याने 30 हजार बंजारांना ठार मारल्यामुळेही, हे सर्व लोक पुन्हा मायदेशी परतले नाहीत. पुढे ते जगभर पसरत गेले.
या घटकेला मध्यपूर्व आशियापासून युरोप, रशिया, स्वीडन, स्पेन, ब्रिटन, इटली, तुर्की, फ्रान्स, ग्रीस, रोमानिया, हंगेरी आदी 50-55 देशांत त्यांचे वास्तव्य आढळते. यात एकूण 13 प्रकारचे जिप्सींचे भिन्न भिन्न गट आहेत. जिगेनर, साईगेस, मानुस, तातार, गिटानी, यासीमागाल, शिंगन, रोमा, रोमानी, लोमानी, डोमारीन, लोमवरेन आदी नावांनी त्यांना ओळखले जाते. परंतु भारतीय बंजारांप्रमाणे ते आपली ओळख रोमा वा जिप्सी अशीच करून देतात.
आरंभी कलावंत, कलोपासक, नृत्य, गीत-संगीतात रमणारे, शिल्पकार, शस्त्र बनवणारे, आज्ञाधारक सैनिक म्हणून त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत गेली, परंतु काही शतकांपासून जगात सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढाईमुळे त्यांना प्रचंड जीवघेण्या संघर्षातून वाटचाल करावी लागत आहे.
हजारो वर्षांपासून हे लोक गुलाम, मजूर म्हणूनच जीवन कंठत आले आहेत. त्यांना तिसऱ्या दर्जाचा माणूस म्हणून, चोरटे, अस्पृश्य म्हणून अपमानजनक वागणूक दिली जात आहे. वंशभेदाच्या रोषाचे ते बळी ठरत आहेत. अनेक देश त्यांना नागरिक मानायला तयार नाहीत. घर, नोकरी, काम देत नाहीत. अनाथ जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी फौजेने लाखो जिप्सींना मारले होते. अन्याय, अत्याचार सहन करूनही आपल्या ओळखीसह आपले विलक्षण वेगळेपण अबाधित ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीला, संघर्षाला सॅल्यूूटच करणे भाग आहे.
बंजारा आणि जिप्सी यांच्यात किती साम्य आहे?
जिप्सी हे भारतातून जगभरात जाऊन पोहोचले, हे भारतीय तसेच रोमानी जिप्सी लेखक, अभ्यासक, संशोधकांनी अनेकवार सिद्ध केले आहे. ज्यामध्ये डॉ. कोस्नोव्हस्की, डॉ. इयान हेनकॉक ‘The Gypsies forgotten children of Indian’, ‘On Romani Origins and Identity.’ डॉ. रोनाल्ड ली ‘The Grammar of Lamani’ शिवाय डॉ. एस. एस. शशी, डॉ. राजेंद्र ऋषी, केतकर, डॉ. गणेश देवी आदींची याबाबतची निरीक्षणे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.
अभ्यासकांच्या मते, अधिकांश जिप्सींचे आचरण, भाषा, लोकसाहित्य, रहनसहन, नृत्य संगीत, पोशाख, दागदागिने, खानपान आदी बाबतीत भारतीय बंजारांशी विलक्षण स्वरूपाचे साम्य आहे. रोमा, रोमानी, लोमानी, लोवारीन या संख्येने सर्वाधिक असलेल्या जिप्सींच्या भाषिक वापरात आजही शेकडो शब्द, वाक्यरचना अर्थासह लमाण बंजारांसारखीच आहे.
समूहाने फिरते राहणारे रोमा जिप्सी बंजारांप्रमाणेच आपले रंगीबेरंगी कपडे स्वत:च्या हाताने शिवतात. कवड्या जोडलेले, रंगीत मण्यांचे, पैशाचे हार गळ्यात घालतात. बंजारांच्या उमनी(बैलगाडी)प्रमाणे घोडागाडीत (बग्गी) प्रवास करतात. मसालेदार मांसाहार हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
जिप्सींचा आरंभापासूनचा इतिहास फारसा सापडत नाही. यावरून एक गोष्ट प्रतीत होते ती म्हणजे, वंचितांचा इतिहास हा काही केवळ भारतातच अव्हेरला, दुर्लक्षिला जातो, असे नाही; तर अवघ्या जगाचेच हे चित्र आहे. पण वंचितांचा इतिहास हा त्यांच्या मनामनांवर, ओठांतील शब्दाशब्दांवर कोरला गेलेला आहे. तो काही केल्या पुसता येत नाही.
तो पुन्हा नव्याने पाब्लोपिकासो, चार्ली चॅप्लीन, डॉ. आगस्त क्रोघ (विज्ञान नोबेल), रॉक अॅन्ड रोल सम्राट एल्विस प्रिस्ले, टायसन फुरी (विश्वविजेता बॉक्सर), यूल ब्रायनर, मायकेल केन, रिटा हायवर्थ (अभिनेते), इली नतासे (टेनिस), जोन्स बिहारी (वायोलीन), ग्लेकेरिया कोत्सुला, रेश्मा (गायक) फ्लामेंको, आमाया (नर्तक) आदी हजारो जगप्रसिद्ध प्रतिभावंतांच्या रूपाने जिप्सींच्या जगण्याला झळाळी मिळाली आहे.
अलीकडच्या काळात भारत सरकारच्या पुढाकाराने ‘बिछडे हुये भाई’ म्हणून रोमा जिप्सींचे संमेलन भरवण्यात येत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. परंतु, भारतातल्या तत्सम भटक्यांचीही त्याच दृष्टीने चिंता केली, तर खरोखरीच न्यायनीतीला अनुसरून असेल. असो. पण देश, काळ, स्थितीच्या कचाट्यातून वाचतवाचत जिद्द आणि संघर्षाने केलेल्या वाटचालीला ‘जिप्सी’ हे नाव दिले, तर फारसे वावगे ठरणार नाही.






