दादर स्टेशनसमोर असलेल्या एका रस्त्यावर 68 वर्षीय मंजू परमार यांनी मुठभर बाजरीचे दाणे टाकले आणि क्षणातच डझनभर कबूतरं त्यांच्या भोवती जमा झाली, त्यांनी चोचीतून दाणे टिपायला सुरुवात केली. परमार या दृश्याकडे शांतपणे पाहत होत्या. हा त्यांचा रोजचा नियम आहे. फक्त मंजू परमारच नव्हे तर मुंबईच्या हजारो लोकांचा हा दिनक्रम आहे, जे कबूतरांना दाणे टाकतात. परमार म्हणतात, “कबूतरांना खाऊ घालणं ही साधी दयाळूपणाची कृती आहे.
जर आपल्याला जगण्यासाठी अन्न लागतं, तर कबूतरांना का नको? जी लोकं आरोग्याच्या धोक्याची चर्चा करत आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचाय की, कॅन्सर, हार्ट अटॅक अशा कितीतरी आपल्या आरोग्याच्या समस्या आहेत. आपल्याला जे नशिबात आहे, तेच होणार.”
पण मुंबईच्या अनेकांसाठी ही कबूतरं गंभीर आरोग्य धोक्याचे कारण ठरत आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. मुंबईत कबूतरांची पैदास प्रचंड वाढलीये. इमारतींच्या छतांवर, वीजतारांवर, फुटपाथांवर आणि शहरातील 51 कबूतर खान्यांमध्ये कबूतरं मोठ्या संख्येने जमतात. या कबूतरांचा कायमस्वरूपी बिमोड करावा अशा तक्रारी सदद वाढल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शहरातील 51 कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेची मोहीम आणि कबूतरप्रेमींचा विरोध
शासनाच्या या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लगेचच कारवाईला सुरुवात केली खरी, परंतू ज्यांच्यासाठी कबूतरांना दाणे टाकणं ही वर्षानुवर्षांची सवय आहे, त्यांचा या बंदीला तीव्र विरोध आहे. गेल्या आठवड्यापासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कबूतरांना दाणे टाकणाऱ्यांवर दंड लावायला सुरुवात केली आहे, मात्र असे असूनही मुंबईत ना कबूतरांची गर्दी कमी होत आहे, ना त्यांना दाणे टाकणारे थांबत आहेत.
इतर पक्ष्यांच्या तुलनेत कबुतरांची संख्या वाढण्याचा वेग अधिक आहे. कबुतरांनी मानवी वस्त्यांमधील इमारतींच्या कानाकोपऱ्यात घरटी बनवून राहणे पसंत केले आहे. याचबरोबर नागरिकांकडून पुरेसे खाद्य उपलब्ध होत असल्यानेही शहरी भागात कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. “हे जवळजवळ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीविक्रेत्यांना हटवण्याइतकं अवघड आहे. या कबूतरांची शहरात एक इको-सिस्टिम तयार झाली आहे, त्यामुळे त्यांचा बिमोड करणं अशक्य आहे. आम्ही फक्त नागरिकांना आवाहन करू शकतो की त्यांनी कबूतरांना दाणे टाकणे पूर्णपणे बंद करावे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
कबूतरांना दाणे टाकल्यास 500 रुपयांचा दंड
कबूतरांना दाणे टाकल्यास पालिका सध्या ५०० रुपयांचा दंड आकारत आहे. 3 ते 13 जुलैदरम्यान 108 लोकांवर दंड आकारून 55,700 रुपये जमा करण्यात आले. काही ठिकाणी धान्याचे पोते जप्त करण्यात आले, तसेच ‘कबूतरांना खाऊ घालू नका’ अशी फलकं लावली गेली आहेत. पालिका अधिकारी म्हणतात, “ही मोहीम काही काळ चालणार आहे. लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही.”
मुंबईचे कबूतरखाने बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, यापूर्वीदेखील असे प्रयत्न केले गेले होते. पालिकेचे एकअधिकारी विनायक विसपुते सांगतात की, 2021-22 मध्ये त्यांनी खार आणि सांताक्रूझमधील दोन कबूतरखाने हटवण्यात यश मिळवलं. “लोकांनी त्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली, पण शेवटी आम्ही त्या जागा सौंदर्यीकरण प्रकल्पांत रूपांतरित केल्या. दादरचा कबूतरखाना सुमारे 100 वर्ष जुना असून वारसा स्थळ म्हणून घोषित आहे.
आम्ही या वास्तूला हात लावणार नाही, पण लोकांना कबूतरांना दाणे टाकण्यापासून जी जनजागृती करावी लागणार आहे ती आम्ही नक्कीच करू. पूर्वी कबूतर खान्याजवळ जी धान्याची दुकानं होती ती आता जवळच्याच गल्लीत सुरू झाली आहेत. कबूतरांना दाणे टाकमारी लोकं म्हणतात की, जर आमच्याकडून दंड वसूल केला दातो तर मग आम्हाला दाणे टाकण्याची रितसर परवानगी मिळायला हवी, परंतू त्यांना हे कळत नाहीये की इथे दंड हा बेकायदेशीर कृत्यासाठी आहे, असेही विसपुते म्हणतात.
विधान परिषदेत काय झालं?
3 जुलै रोजी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी दादरच्या कबूतर खान्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कसा विपरित परिणाम व्हायला सुरूवात झाली आहे हा मुद्दा विधान परिषदेत मांडला. ‘'दादर पश्चिम वाहतूक पेठ येथील तसेच शहरातील इतरत्रही असणाऱ्या बेकायदेशीर कबूतरखान्यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे आजार होत असून अशा कबूतरखान्यांच्या बाबतीत शासनाचे काही धोरण आहे किंवा नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या लक्षात घेता अशा कबूतरखान्यांवर शासन काय कारवाई करणार याविषयी मनीषा कायंदे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
याशिवाय त्यांनी यासंबंधीचे काही संशोधनाचे अहवालही सादर केले. कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. मनीषा कायंदे यांच्या या मागणीनंतर कबुतरखाने कायमस्वरूपी बंद होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. कबुतरांना दाणे घातल्यामुळे कसे आजार पसरतात याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाईल असे आश्वासन मंत्रीउदय सामंत यांनी दिले.
कायदेशीर लढाई
आता शासनाच्या कबूतरखाने बंद करण्याच्या आदेशाविरोधात प्राणी-मित्र संघटनेच्या कार्यकर्त्या पल्लवी सचिन पाटील आणि स्नेहा विसारिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु न्यायालयाने यावर तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला. “मानवाचे आरोग्य हे महत्त्वाचे आहे. या विषयाशी संबंधित सर्व वैद्यकीय पुरावे पालिकेने नोंदीवर आणावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पेटा’ संस्थेने काय उपाय सुचवला?
प्राणी व पक्षी संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ संस्थेने कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचविले आहेत. कबुतरांचे खाद्य कमी करावे. खाद्य कमी झाल्यास कबुतरांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल. एक कबुतर वर्षात 4 ते 6 वेळा अंडी घालते. एका वेळेला किमान दोन पिले जन्माला येतात. खाद्याचा पुरवठा कमी झाल्यास कबुतर वर्षाला एकदा अथवा दोनदाच अंडी घालू शकतील. त्याचबरोबर खाद्याची टंचाई असेल, तर कबुतरे पिलांना जन्म देणे टाळतील. यातून त्यांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल, असे ‘पेटा’ने म्हटले आहे.
कबूतरखान्यांचा इतिहास
मुंबईतील कबूतरखान्यांचा इतिहास हा जवळपास 300 वर्षांचा आहे, जेव्हा सात बेटं मिळून ‘बॉम्बे’ आकार घेत होती… ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारासाठी गुजराती व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, ज्यात हिंदू, जैन, मुस्लिम आणि पारशी व्यापारी होते. त्याकाळी अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी कारंजे आणि पाणपोई बांधल्या होत्या, जेणेकरून कबूतरांना खायला-प्यायला मिळू शकेल. गुजरातमधील जैन आणि हिंदू समाजात ‘दयाळूपणाने प्राणी-भोजन’ करण्याची परंपरा आहे.
कबूतरांना दाणे घालणं पुण्य मानलं जातं. जिथे जिथे गुजराती समाज गेला, तिथे कबूतरखाने उभे राहिले. आज मुंबईत 51 अधिकृत कबूतरखाने आहेत, तसेच अनेक इमारतींच्या छतांवर किंवा चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या ठिकाणी अनौपचारिक कबूतरखाने आहेत. मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या काही वर्षांपूर्वी राजकीय मुद्दा बनला होता. राज ठाकरेंच्या मनसेने लोकांच्या आरोग्याला त्रास होत असल्याने दादर कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. कबुतरांच्या वाढत्या त्रासामुळे खार परिसरातील रहिवाशांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने खारचा कबुतरखाना बंद केला होता.

कबुतरांच्या विष्ठेतून बुरशी पसरते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी सापडते. याबाबत साई अलर्जी-अस्थमा रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. विजय वारद सांगतात, 'कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत.
कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते.' श्वसनविकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील ही बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. ग्लास्को हॉस्पिटलमध्ये झालेल्या मुलाचा मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करताना तज्ज्ञांना, कबुतरांच्या विष्ठेचे काही कण रूममध्ये आढळून आले. हे कण डोळ्यांना दिसू शकत नव्हते.
डॉक्टर सांगतात, 'अनेकांना याचा त्रास होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो. क्रायटोकॉकसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. डॉ. विजय वारद पुढे सांगतात, कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. कबुरतांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार वाढल्याचं दिसून आलं आहे.
या आजारांचं वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत तर श्वसनमार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वसननिलिकेला सूज येणं, फुफ्फुसांना सूज येणं, क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (श्वसनमार्गाचे गंभीर आजार) यांसारखे गंभीर आजार 'श्वसन नलिकेला सूज आल्याने अस्थमाग्रस्त रुग्णांना गंभीर स्वरूपाचा शॉक येण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील कण हवेत मिसळतात. ही प्रदूषित हवा श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास किंवा प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. सॅलमोनेला जीवाणूंमुळे डायरिया होण्याची शक्यता असते. हे पक्षांच्या विष्ठेमध्ये असतं.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने कबुतरांच्या विष्ठमुळे मुंबईत दोन महिलांची फुफ्फुसं निकामी झाल्याची बातमी जानेवारी 2020 मध्ये दिली होती. ज्यात मुंबईतील छातीविकारतज्ज्ञ डॉ. उन्मिल शहा यांनी, या दोन्ही महिलांना हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया किंवा पर्यावरणामुळे फुफ्फुसं निकामी झाल्याची माहिती दिली होती. मुंबईतील कबुतरांच्या समस्येमुळे होणाऱ्या आजारांबाबत बोलताना फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. कपिल राठी सांगतात, 'मुंबई हवेत आद्रता जास्त असल्याने आणि कबुतरांची संख्या खूप असल्याने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण आढळून येतात.
कबुतरांच्या विष्ठेमुळे लोकांना अस्थमाचा जास्त त्रास होतो. कफ, सर्दी, श्वास घेण्यास अडथळा ही श्वसनाच्या विकारांची लक्षणं आहे. रुग्ण आल्यानंतर आम्ही त्यांना कबुतरांना अन्न देता का? त्यांच्या विष्ठेशी संपर्क येतो का असे प्रश्न विचारतो. जेणेकरून याबाबतची माहिती मिळू शकते.






