11 जुलैचा तो दिवस होता… कर्नाटकच्या बेलथांगडी न्यायालयात नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक न्यायालयाच्या परिसरात गर्दी वाढली. लोकांना काही समजण्यापूर्वीच कडक बंदोबस्तात एक व्यक्ती न्यायालयाच्या आवारात शिरला. ती व्यक्ती डोक्यापासून पायापर्यंत काळ्या कपड्यांनी झाकलेली होती. त्याच्या डोळ्यांवर देखील पातळ कापड होतं, ज्यामुळे तो फक्त रस्ता पाहू शकत होता. आणि त्या व्यक्तीच्या मागे वकिलांची फौज उभी होती.
न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीने जो काही दावा केला त्याने फक्त कर्नाटक राज्यच नव्हे तर सबंध देश हादरला… कोण होती ती चेहरा झाकलेली व्यक्ती आणि असा कोणता दावा त्याने केला…? ही व्यक्ती एक सफाई कर्मचारी आहे आणि मंगळुरू या किनारपट्टीवरील शहरातील धर्मस्थळ परिसरात तो काही वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत होता.
या सफाई कर्मचाऱ्याने दावा केला की, त्याने 1995 ते 2014 दरम्यान बलात्काराच्या पीडित मुली, महिला आणि पुरुषांचे जवळपास 100 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते. तक्रारदार धर्मस्थळस्थित एका संस्थेत काम करत होता. त्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 183 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला. त्याचे म्हणणे आहे की, तो इतकी वर्षे गप्प होता, कारण त्यावेळच्या त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
'100 जणांचे मृतदेह दफन केले,’ या दाव्याने देशभर खळबळ
1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ परिसरात तो सफाई कामगार म्हणून काम करत होता. या काळात त्याला अनेक क्रूर हत्या केल्यानंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले. सफाई कामगाराने त्याच्या जबाबात असेही म्हटले आहे की, पुरलेल्यांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्या अनेक मुली होत्या. मी नग्न अवस्थेतील अनेक महिलांचे मृतदेह पाहिले, असंही हा सफाई कर्मचारी म्हणाला.
सफाई कर्मचाऱ्यानं मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना फोटो आणि पुरावेदेखील दिले. ‘’1998 मध्ये जेव्हा मी मृतदेह दफन करण्यास नकार दिला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती देणार अशी धमकी दिली तेव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे या सफाई कामगाराने सांगितले. तक्रार करणाऱ्या सदर सफाई कर्मचाऱ्याने असेही जबाबात म्हटलं की, धर्मस्थळ गावाभोवती अनेक ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले होते.
प्रातिनिधिक छायाचित्र
याशिवाय काही मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापरही करण्यात आला होता. या सगळ्यामागे काही 'शक्तिशाली लोक' आहेत. जर त्याला पुरेशी सुरक्षा दिली तरच तो त्या लोकांची ओळख उघड करू शकेल. या सफाई कर्मचाऱ्यानं हा दावा केल्यानंतर एक महिलादेखील समोर आली. त्या महिलेची मुलगी दोन दशकांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्या महिलेनं पोलिसांना आवाहन केलं आहे की, जर मृतदेहांची ओळख पटवण्यात आली, तर ती डीएनए चाचणीसाठी तयार आहे.
22 वर्षांपूर्वीच्या या प्रकरमामुळे पोलिसांची पंचाईत
सफाई कर्मचाऱ्याच्या या दाव्यामुळे आता पोलिसांची पंचाईत झाली आहे कारण हे प्रकरण 22 वर्षांहून अधिक जुनं आहे. या प्रकरणात तपास पुढे कसा न्यायचा हे पोलिसांना अद्याप ठरवता आलेलं नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांच्या एक टीमनं तपासासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटक सरकारने 20 जुलै या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची (एसआयटी) स्थापना केली आहे.
या एसआयटीचं नेतृत्व डीजीपी दर्जाचे अधिकारी प्रणब मोहंती करत आहेत. याप्रकरणी सुरक्षेच्या कारणास्तव तक्रार नोंदवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही. तो एके ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करत होता.तक्रारदारानं सांगितलं की, 1995 ते 2014 दरम्यान त्यानं नेत्रावती नदीच्या काठावर नियमितपणे साफसफाईचं काम केलं. काही काळानंतर त्याच्या कामाचं स्वरूप बदललं. 'गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे पुरावे लपवण्याची' जबाबदारी त्याला देण्यात आली.
अनेक महिलांचे नग्न अवस्थेत मृतदेह पाहिले
त्यानं सांगितलं, "त्यानं नग्न अवस्थेतील अनेक महिला मृतदेह पाहिले. या मृतदेहांवर लैंगिक हिंसा आणि मारहाणीच्या स्पष्ट खुणा होत्या." त्यानं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यानं या गोष्टींची माहिती पोलिसांना द्यायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या सुपरव्हायझरनं त्याला तसं न करण्यास सांगितलं. त्याचा दावा आहे की, जेव्हा त्यानं सुपरव्हायझरचं ऐकण्यास नकार दिला, तेव्हा त्याला धमक्या देण्यात आल्या.
त्याला धमकावण्यात आलं की, "आम्ही तुझे तुकडे तुकडे करू. तुझा मृतदेह देखील इतरांप्रमाणेच दफन केला जाईल आणि आम्ही तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू." एफआयआरमध्ये म्हटलं आहे, "2010 ची एक घटना, आजदेखील मला पूर्णपणे हादरवून टाकते. तेव्हा गार्ड मला कलैरीमधील एका पेट्रोल पंपापासून जवळपास 500 मीटर अंतरावरील एका ठिकाणी घेऊन गेले होते.
ओळख उघड होऊ नये म्हणून सफाई कामगाराला डोक्यापासून पायापर्यंत काळ्या कपड्यांनी झाकून न्यायालयात आणण्यात आले.
तिथे मी एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह पाहिला होता. तिचं वय जवळपास 12 ते 15 वर्षांदरम्यान असेल. तिच्या शरीरावर नाममात्र कपडे होते. तिच्या शरीरावर लैंगिक हिंसाचाराच्या स्पष्ट खुणा होत्या. तिचा गळा दाबल्याच्या खुणा होत्या. मला सांगण्यात आलं की, मी एक खड्डा खोदून तिचा मृतदेह आणि तिची स्कूल बॅग दफन करावी. ते दृश्य आजदेखील माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं." "आणखी एक घटना मी कधीही विसरू शकणार नाही. एक 20 वर्षांची तरुणी होती, तिचा चेहरा अॅसिडनं जाळण्यात आला होता."
‘’ते खूपच प्रभावशाली आहेत, विरोध करणाऱ्यांना संपवू शकतात’’
एफआयआरनुसार, पुरुषांना मारण्याची पद्धत तर 'खूपच क्रूर' होती. त्यांना खोलीत खुर्चीला बांधलं जायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल लावून त्यांचा श्वास कोंडून त्यांना मारलं जायचं. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार या घटना त्याच्यासमोर घडल्या होत्या. तो म्हणाला, "माझ्या नोकरीच्या काळात मी धर्मस्थळ क्षेत्रात अनेक ठिकाणी मृतदेहांचं दफन केलं. "कधी-कधी मला सूचना दिल्या जायच्या की, मृतदेहांवर डिझेल टाक. मग आदेश यायचा की पुरावा शिल्लक राहता कामा नये. म्हणून मृतदेहांना जाळण्यात यावं. याप्रकारे शेकडो मृतदेह नष्ट करण्यात आले."
तक्रारदारानं सांगितलं की तो हा 'मानसिक दबाव' आणखी सहन करू शकला नाही आणि त्याच्या कुटुंबासह राज्याबाहेर निघून गेला. एफआयआरमध्ये लिहिलं आहे, "ज्या लोकांची नावं मी सांगू इच्छितो, ते धर्मस्थळ मंदिर प्रशासन आणि इतर स्टाफशी संबंधित आहेत. अजून मी त्यांची नावं सांगू शकत नाही, कारण काहीजण खूपच प्रभावशाली आहेत. ते विरोध करणाऱ्यांना संपवू शकतात. मला आणि माझ्या कुटुंबाला कायद्याअंतर्गत सुरक्षा मिळाली की, मी सर्व नावं आणि त्यांची यातील भूमिका उघड करण्यास तयार आहे."
तक्रार खरी असल्याचं दाखवण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यासाठी, सफाई कर्मचाऱ्यानं त्या कबरींपैकी एक कबर खोदली आणि मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना फोटो आणि पुरावेदेखील दिले. त्याचा हा जबाब भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 183 अंतर्गत नोंदवण्यात आला. असं सांगण्यात आलं आहे की, मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना तक्रारदार डोक्यापासून पायापर्यंत काळ्या कपड्यांनी झाकलेला होता. त्याच्या डोळ्यांवर देखील पातळ कापड होतं, ज्यामुळे तो फक्त रस्ता पाहू शकत होता.
अनन्या भट या त्याच दरम्यान बेपत्ता झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी निघालेला मोर्चा.
जुनी जखम पुन्हा ताजी झाली
सफाई कर्मचाऱ्याची तक्रार समोर आल्यानंतर सुजाता भट या महिलेनं त्यांच्या मुलीच्या आठवणी सांगितल्या. 22 वर्षांपूर्वी त्यांची मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली होती. सुजाता यांची मुलगी अनन्या भट मणिपालच्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. सुजाता यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी शेवटी धर्मस्थळाच्या इथं दिसली होती. त्यांचे वकील मंजुनाथ एन. यांनी सांगितलं, "त्या कोणावरही आरोप करत नाहीत.
त्यांना फक्त इतकं जाणून घ्यायचं आहे की, या सफाई कर्मचाऱ्याच्या तक्रारीवर जर मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर त्यांची डीएनए चाचणी करण्यात यावी. त्यांचा हेतू फक्त अनन्याचा मृत्यू झाल्याचं मान्य करणं आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आहेत."
वकिलांचा आरोप, तपास मुद्दाम धीम्यागतीने…
सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील के. व्ही. धनंजय यांना वाटतं की, तपास धीम्या गतीनं केला जातो आहे ही चिंतेची बाब आहे. ते म्हणाले, "ही तक्रार 4 जुलैला नोंदवण्यात आली होती. तक्रारदारानं बीएनएसएसच्या कलम 183 अंतर्गत मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याचा जबाब नोंदवताना त्यानं स्वत: दफन केलेल्या एका मृतदेहाचे अवशेषदेखील आणले. आता 8 दिवसांहून अधिक काळ झाला आहे, मात्र अजूनही पोलिसांकडून तक्रारदाराला घटनास्थळी नेऊन तिथली पाहणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही."
ते पुढे म्हणाले, "याप्रकारे दुर्लक्ष केलं जाणं आकलनापलीकडचं आहे. या गोष्टीतून एका स्पष्ट निष्कर्षाचे संकेत मिळतात की, असं होऊ शकतं की, पोलिसांचा तक्रारदाराच्या म्हणण्यावर विश्वास आहे. त्यांना या गोष्टीची शंका वाटते की, तो ज्या ठिकाणांची ओळख पटवतो आहे, तिथे खरोखरंच मानवी अवशेष मिळू शकतात. यातून आणखी एक गंभीर संकेत मिळतो की, पोलीस प्रभावशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा घटनास्थळांचा औपचारिक तपास होण्याआधी किंवा ते सील होण्याआधी, त्या लोकांना पुरावे हटवता यावे किंवा त्याच्याशी छेडछाड करता यावी, यासाठी त्यांना वेळ देते आहे."
(संदर्भ - बीबीसी)






