(मंजिमा भट्टाचार्ज्या)
सुमारे सत्तर अब्ज डॉलर्स इतकी देशांतर्गत बाजारपेठ असलेला फॅशन उद्योग सहा कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार देतो आणि भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (GDP) मोठी भर टाकतो. असे असूनही, या उद्योगातल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक असलेल्या मॉडेल्सची मात्र योग्य ती दखल घेतली जात नाही. या आवाज नसलेल्या, महत्त्वाच्या पण उपेक्षित घटकाला मंजिमा भट्टाचार्ज्या यांनी त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू बनविले आहे. या अभ्यासातून उपेक्षित अशा महिलांचे आवाज आणि त्यांचे दृष्टिकोन त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केले आहेत.
सुमारे सत्तर अब्ज डॉलर्स इतकी देशांतर्गत बाजारपेठ असलेला फॅशन उद्योग सहा कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार देतो आणि भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (GDP) मोठी भर टाकतो. असे असूनही, या उद्योगातल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक असलेल्या मॉडेल्सची मात्र योग्य ती दखल घेतली जात नाही. या मॉडेल्स जे ‘काम’ करतात त्याचं नेमकं स्वरूप काय आहे…? याबद्दल लोकांना काय वाटतं, त्याचं त्या काय करतात,...?. त्या म्हणजे एखादी वस्तू आहेत, अशी त्यांना जी वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांना काय वाटतं??? स्त्रीवाद्यांच्या काही गटांतून या मुद्द्यावर काही समज पसरवले गेले होते.
त्यांच्या स्वतःच्या दृष्टीतून मला त्यांच्याबद्दल लिहायचं होतं. त्यासाठी त्यांच्या त्या जगात मला मिसळून जायचं होतं. समाजशास्त्राच्या संशोधनामध्ये ही मानववंशशास्त्रातली एक पद्धत वापरली जाते. पण मी हे कसं करू शकणार होते? त्यांच्या त्या जगात मिसळून जाण्यासाठी, खोलवर बुडी मारून त्यांचं जग आतून निरखण्यासाठी मला त्यांच्या जगात प्रवेश तरी कसा मिळणार होता?
‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक 2004’मध्ये या जगाशी माझा पहिला संपर्क झाला. या अभ्यासात ‘कार्यक्षेत्र’ म्हणजे नेमकं काय असेल, याबद्दल मला जरा उत्सुकता होती आणि असं लक्षात आलं की, ‘फॅशन वीक’ हा या क्षेत्राशी संबंधित असा, जिथं ग्लॅमर इंडस्ट्रीतले अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लोक एकत्र येतात, असा सर्वांत जवळचा मार्ग आहे.
‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक’ 168 तास चालला आणि संपला. मी त्याच्याशी जुळवून घ्यायचा, त्याचा सराव करून घ्यायचा तोवर प्रयत्नच करत होते. मानववंशशास्त्राच्या अभ्यासात सांगतात, तसं तिथं कोणात मिसळायला, ओळखी करून घ्यायला आणि त्यांच्यातली एक होऊन ते बघायला मला वेळच मिळाला नाही. ते ‘कार्यक्षेत्र’ पुन्हा खुलं होण्यासाठी मला एक वर्ष वाट बघावी लागणार होती. आणि मला हेसुद्धा माहीत होतं की, एक वर्षानं ते कार्यक्षेत्र बदललेलं असणार होतं. त्यातले खेळाडू नवे असणार होते. मैत्रीचे नातेसंबंध पुन्हा जुळवावे लागणार होते. पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागणार होती.
‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक 2004’ मध्ये मी बाहेरची व्यक्ती होते. त्यामुळे मी फक्त सर्वांना खुली परवानगी आहे, तिथंच जाऊ शकत होते. मी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांशी, ‘फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया’शी संपर्क साधला होता. सकाळच्या सत्रात होणाऱ्या त्यांच्या ‘द बिझिनेस ऑफ फॅशन’ या चर्चासत्रात उपस्थित राहण्यासाठी मला पास हवा होता. त्यांच्या फारसं मनात नसतानाही त्यांनी ते मान्य केलं. अतिशय मर्यादित लोकांनाच तिथं प्रवेश होता. तरीही अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची तिथं संधी होती. कार्यक्रम हॉटेलच्या मोठ्या हॉलमध्ये होता. मी त्या हॉलमध्ये सगळीकडं वावरू शकत होते.
या काळात तो उद्योग आतून निरखणं मला काही प्रमाणात शक्य झालं. मला नंतर त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत, असं सागण्यासाठी मी तिथल्या मॉडेलना आणि डिझायनरना भेटू शकले. मॉडेल, त्यांचे फोन नंबर, त्यांच्या एजन्सी आणि माझ्या या ‘कार्यक्षेत्रात’ मला सहकार्य करायची आणि मला मुलाखत देण्याची ज्यांनी तयारी दाखवली, अशा इतर अभिनेत्यांचा डाटाबेस तयार करायला मी सुरुवात केली.
‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक 2005’ मध्ये मला पूर्ण वेगळा अनुभव आला. मागच्या वेळी बाहेर तरंगावं लागणारी, फार तर समोर प्रेक्षकांत बसण्याची नाइलाजानं परवानगी मिळालेली मी, या वेळी स्टेजच्या मागच्या बाजूच्या ग्रीनरूममध्ये जाऊनसुद्धा बघू शकत होते. त्या आठवड्यात सादर झालेले तीस फॅशन शो मी तिथून, ग्रीनरूममधून बघितले.
या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्यावर स्पॉटलाइट असतो, ज्या प्रखर प्रकाशझोतात असतात, अशा स्त्रियांवर लक्ष केंद्रित करायचं, असं मी ठरवलं होतं. या स्त्रिया म्हणजे मॉडेलिंग करणाऱ्या स्त्रिया. दोन वर्षांच्या काळात मी मॉडेलिंग करणाऱ्या अशा तीस स्त्रियांच्या प्रदीर्घ आणि सखोल मुलाखती घेतल्या. त्यांच्या करिअरच्या वेगवेगळ्या टप्यांवर असलेल्या या स्त्रियांमध्ये काही स्त्रिया सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आणि काही तर अशा सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्यासुद्धा होत्या.
फॅशन आणि स्त्रियांसाठी मासिकं चालवणारे संपादक, फॅशन क्षेत्रात प्रचंड विक्री करणाऱ्या उद्योगांचे प्रतिनिधी, फॅशन शोमधले नृत्य-दिग्दर्शक, मॉडेल्सचे समन्वयक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मॉडेलिंग एजन्सीजचे लोक अशी या क्षेत्रातील महत्त्वाची माहिती देऊ शकणाऱ्या सगळ्या लोकांच्या मी मुलाखती घेतल्या.
कोण होत्या या स्त्रिया? त्यातल्या बहुतेक दिल्लीतल्या होत्या. काही थोड्या मुंबईतल्या होत्या. भारताच्या ग्लॅमर इंडस्ट्रीतली दोन महत्त्वाची केंद्रे. आग्रा, वाराणसी, भोपाळ अशा मध्यम शहरांतल्या किंवा दिल्लीच्या फरीदाबाद आणि गाझियाबादसारख्या उपनगरातल्या किंवा जयपूर, गौहती, लखनौ अशा राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणावरून आलेल्या या स्त्रिया. त्यातली एक खेड्यातून आलेली होती. दोघींनी सांगितलं की, त्या मूळ भारतीय वंशाच्या, भारताबाहेरून आलेल्या होत्या. बहुसंख्य मुली साध्या, मध्यमवर्गीय पार्श्वभूमीच्या होत्या. तीसपैकी फक्त सहा स्त्रियांना संपन्न पार्श्वभूमी होती. 
यात बहुसंख्येने हिंदू होत्या, पण काही स्त्रिया शीख, ख्रिश्चन आणि मुस्लीमसुद्धा होत्या. हिंदूंमध्ये केवळ एक तृतीयांश स्त्रिया वरच्या जातीतल्या होत्या. बाकीच्या मध्यम जातींतल्या किंवा त्यांच्या प्रदेशातल्या प्रभावशाली जातींच्या होत्या. पण विशेष बाब ही की, मी मुलाखत घेतलेल्या या स्त्रियांपैकी एकही स्त्री अनुसूचित जातींपैकी किंवा अनुसूचित जमातींपैकी नव्हती. एकाही स्त्रीने तिची ओळख, ‘दलित’, अशी करून दिली नाही.
बहुसंख्य स्त्रियांचे ओळख सांगण्याचे निकष वेगळेच होते : त्यांचा आर्थिक वर्ग, जन्म ठिकाण, काही वेळा त्यांचा ‘समाज’ (आगरवाल किंवा काश्मिरी. अर्थात, याबद्दल बोलताना त्या समाजात मुलगी म्हणून त्यांच्यावर असलेली बंधनं, याबद्दलच त्या जास्त बोलल्या), त्यांची प्रादेशिक ओळख (ईशान्य भारतातली राज्ये) आणि त्यांची सैन्यदलातली पार्श्वभूमी.
संबंधित लेख वाचा: 1) गुटेनबर्गच्या सावल्या… पुरुषांचे वर्चस्व असलेल्या प्रकाशन व्यवसायात महिला उतरतात तेव्हा! |
इंडस्ट्रीमध्ये असा एक समज आहे की, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सैन्यदलातल्या मुलींचं प्रमाण जास्त आहे. कारण सैन्यदलातल्या लोकांचं नीटनेटकेपणाकडे जास्त लक्ष असतं आणि थाटामाटाच्या, भपकेबाज राहणीमानाची त्यांना सवय असते. त्यांच्या मुलींनासुद्धा तशाच राहणीमानाची सवय व्हावी, यासाठी ते लोक प्रोत्साहन देतात. पण मी मुलाखत घेतलेल्या तीसमधल्या फक्त तीन मुलींना सैन्यदलाची पार्श्वभूमी होती.
मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या, त्या स्त्रिया सतरा ते पन्नास या वयोगटातल्या होत्या. त्यांपैकी चार (मीरा, शिरीन, निहारिका आणि रितू) पहिल्या पिढीतल्या मॉडेल होत्या. ‘पिढी’ म्हणताना मला असं म्हणायचं आहे की, या इंडस्ट्रीत ज्या साधारण एकाच वेळी आल्या आणि या इंडस्ट्रीच्या इतिहासात त्या वेळी काही घडत होतं, त्याच्या त्या साक्षीदार आहेत. एकाच प्रकारच्या परिस्थितीत राहून त्या सगळं अनुभवलेल्या आहेत.
ज्यांनी 1970 च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि 1980 चं संपूर्ण दशकभर व 1990 च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं.
मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या. कॉन्व्हेंट किंवा पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या. विवाहित. मुलं असलेल्या. 1990 च्या दरम्यान भारताची अर्थव्यवस्था परदेशी भांडवलाला खुली होईपर्यंत फॅशन इंडस्ट्रीतल्या या पहिल्या पिढीला दीर्घकाळ तसं फारसं काहीच काम नव्हतं.
त्यांच्यापैकी सहा जणी, (हनी, मेरी, जोसी, नोएल, विनिता आणि नैना) दुसऱ्या पिढीतल्या मॉडेल होत्या. मी त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा साधारण पंचवीस ते तीस या वयोगटातल्या. त्या सगळ्यांनी 1990 च्या दशकाच्या मध्यात मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्या वेळी भारतात उदारीकरणाचे वारे वाहायला सुरुवात झाली होती.
मी त्यांना भेटले, तेव्हा त्या सगळ्या जणी कामात होत्या. पण त्यांनी ‘प्लॅन बी’चा विचार करायला सुरुवात केली होती. किंवा येत्या काही वर्षांत त्यांचं ‘शेल्फ लाईफ’ संपेल, तेव्हा न थांबता पुढे काय करायचं, याचा विचार सुरू केला होता. इतर कोणता व्यवसाय त्या करू शकतील, याची हळूहळू चाचपणी करत होत्या.
या गटात संमिश्र प्रकार होते. पदवीधर, पदवी न घेतलेल्या, काही विवाहित, काही त्यांच्या पुरुष मित्राबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आणि काही एकट्याच होत्या. काही इंग्रजी बोलत होत्या. काहींना इंग्रजी बोलता येत नव्हतं. इतका काळ या इंडस्ट्रीत राहिल्यामुळे कामचलावू इंग्रजी बोलायला शिकलेल्या काही. या गटातल्या एकीलाही मूल नव्हतं.
तिसऱ्या पिढीतल्या सात मॉडेल होत्या. (नान्सी, स्वाती, कविता, लेहेर, कमल, गुरप्रीत आणि रुही) या बावीस ते अठ्ठावीस या वयोगटातल्या होत्या. त्यांनी या शतकाच्या सुरुवातीला, 2000 च्या दरम्यान इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. इंडस्ट्री अतिशय वेगानं बदलत असण्याचा हा काळ. यातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मुली होत्या.
एक ईशान्य भारतातल्या आदिवासी समाजातली, एक हरयाणवी जाट आणि एक काश्मिरी पंडित. या सगळ्या पदवीधर होत्या. त्यांच्यापैकी काहींनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा दूरस्थ पद्धतीनं किंवा मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्या सगळ्यांनी कोणता तरी व्यावसायिक अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केला होता; म्हणजे, शिलाई, किंवा ‘मीडिया आणि कम्युनिकेशन’.
तेरा मुली चौथ्या पिढीतल्या होत्या; 2002 नंतर इंडस्ट्रीत आलेल्या. तेव्हा आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग एजन्सीज आल्यामुळे सगळी परिस्थितीच बदलून गेली होती (या तेरामधल्या मयुरी, टीना, प्रगती, मिता, हीरिना, शिवानी, नताशा, अनुप्रिया, रुपाली आणि पलाश यांचा या पुस्तकात उल्लेख आहे). या गटातल्या सगळ्या मुली सतरा ते पंचवीस या वयोगटातल्या होत्या. त्यांच्यापैकी काही मुली अजून कॉलेजमध्ये शिकत होत्या. पाच मुलींनी कॉलेज मध्येच सोडून दिलं होतं. एकीनं शाळा मध्येच सोडून दिली होती.
वेगवेगळ्या ठिकाणी या मुलाखती झाल्या. या महिलांनी कधी मला त्यांच्या घरी बोलावलं, कोणी कॉफी शॉपमध्ये, क्वचित कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण बोलावलं आणि एक तासापासून ते चार तासांपर्यंत त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगितली. एका मॉडेलनं उपनगरातल्या तिच्या सुंदर अपार्टमेंटमध्ये मला बोलावलं. तिच्या त्या घराच्या भिंती तिनं स्वतः छान रंगवल्या होत्या. आणखी कोणी मला तिच्या खिडक्या नसलेल्या कळाहीन खोलीवर बोलावलं. तिथं फक्त एका गादीपुरती जागा होती, तिथं ती रात्री झोपायची.
एकीनं दिल्लीच्या ल्यूटन्स भागातल्या प्रासादतुल्य अपार्टमेंटमध्ये बोलावलं, तर कोणी लाजपत नगरमध्ये सर्वांत वरच्या मजल्यावरच्या व्हरांड्यात बोलावलं. किंवा मग तिने चालू केलेल्या ब्यूटी सलोनच्या, गोंधळ चालू असलेल्या रिसेप्शनवर बोलावलं. बोलताना काही एकाच वेळी अनेक कामं करत होत्या.
घरातल्या कामात मदत करणं, ग्राहकांचे किंवा सासरच्या लोकांचे फोन घेणं, हट्ट करणाऱ्या मुलांना सांभाळणं किंवा कधी एखादी त्यातल्या त्यात शांत जागा बघून तिथं थंड झालेला चहा घेत माझ्याबरोबर बोलणं आणि हे सगळं करत असताना डोक्यावरचं हेल्मेट काढून ठेवण्यासारख्या शांत अलिप्तपणानं इंडस्ट्रीतला ग्लॅमरचा मुखवटा उतरवून बाजूला ठेवून देणं. त्यांची खरी ओळख गुप्त राहावी म्हणून मी त्यांची नावं बदलली आहेत.
एकदा मी टीव्हीवर कार्यक्रम करणाऱ्या निर्मातीला मुलाखतीसाठी विचारलं, तेव्हा ती म्हणाली की, “जर तू पूर्वग्रहातून एकतर्फी प्रश्न विचारणार असलीस, तर मला त्यात अजिबात रस नाही.” मी मुंबईतल्या स्टार टीव्हीच्या बिल्डिंगवर निषेधाचे फलक घेऊन येणारी कार्यकर्ती नाही, अशी तिची खात्री पटेपर्यंत ती मला भेटलीच नाही.
खरं तर मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यांच्याबद्दल मला एकतर्फी मत बनवायचं नव्हतंच. उलट, एका अर्थी त्यांची काळजीच वाटत होती. कारण इतिहासानं आजपर्यंत नेहमीच स्त्रीवाद आणि फॅशन यांना परस्परांच्या विरोधात उभं केलं आहे. सध्याची व्यवस्था स्त्रीसौंदर्याच्या अवास्तव व्याख्या बनवते आणि स्त्रियांच्या शरीराचा आकार आणि ठेवण, यांबद्दलच्या अनारोग्यकारक प्रतिमा पुढे करते, याची मला जाणीव होती.
कशातूनही, काहीही करून नफा, या एकाच गोष्टीवर त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. ते इष्टता आणि कामुकता यांच्याबद्दलची वेगवेगळी रूपकं वापरून त्यांची विक्री वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या स्त्रिया म्हणजे त्यांच्यासाठी जणू काही फक्त प्रदर्शन करण्याची शरीरं असतात. प्रदर्शनीय वस्तू. आणि एक माणूस म्हणूनही जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते. इथं खरं तर माझा वैचारिक गोंधळच झाला होता.
मी जेव्हा त्या स्त्रियांशी बोलायला जायचे, तेव्हा माझे विचार, माझी मतं त्यांच्या दाराच्या बाहेरच ठेवायला मानववंशशास्त्रातल्या पद्धतीनं मला शिकवलं. यामुळे मनातलं बोलून त्या त्यांचं मन मोकळं करू शकायच्या. त्यांच्या जगाच्या आणि मनाच्याही आत मला प्रवेश मिळायचा. तिथं त्या केवळ ‘मॉडेल’ नसायच्या. एक स्वतंत्र, परिपूर्ण व्यक्ती म्हणून त्या माझ्याशी बोलायच्या. शिवाय मला असं लक्षात आलं की, प्रत्येकजण सतत आजूबाजूच्या प्रत्येकाला जोखतंय. समोरची व्यक्ती कशी दिसते, कशी बोलते, कपडे कोणते घातलेत, या सगळ्यावरून.
मलाही अशा प्रकारे जोखलं गेलंच होतं. स्त्रियांविषयीच्या एका मासिकाच्या संपादिकेनं जेव्हा, निषेध करणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांना, ‘कुरूप मुलींच्या कुरूप आया’, असं तिच्या मुलाखतीत म्हणून उडवून लावलं, तेव्हा मला राग आला, पण मी शांत राहिले. स्त्रीवादी महिलांना कुरूप म्हणायचं, ही या मासिकांची खूप जुनी युक्ती होती.
अमेरिकेत स्त्रियांना मताधिकार मिळावा, यासाठी स्त्रियांची चळवळ चालू होती, तेव्हापासून त्यांची अशा प्रकारे हेटाळणी चालूच आहे. या स्त्रियांविषयी इतके वेगवेगळे पूर्वग्रह होते आणि त्यातून त्यांची प्रतिमा पुरुषद्वेष्टी, विनोदाचं वावडं असलेली अशी काहीही, त्या ज्या प्रदेशात राहत असतील, त्यानुसार ठरवली जात राहिली.
स्त्रीवादी महिलांबद्दल जसे पूर्वग्रह होते, तसेच ते फॅशनबद्दलही होतेच. संवाद, हाच या पूर्वग्रहांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा मार्ग होता. ग्रीनरूममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवून आणि फॅशनच्या जगातल्या या स्त्रियांशी बोलत राहून, आमच्यातली ही जणू काल्पनिक युद्धरेषा आम्ही धूसर करत गेलो. आणि मग मी त्यांना बघू शकले, ऐकू शकले, जाणून घेऊ शकले की, या सगळ्याच्या वर त्यांचं अस्तित्व होतं. त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुण स्त्रिया म्हणून. त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुण, कष्टकरी स्त्रिया.
मूळ इंग्रजी - Mannequin: Working Women in India's Glam’
लेखिका : मंजिमा भट्टाचार्ज्या
मराठी भाषांतर - मॅनेक्विन… भारताच्या ग्लॅमर इंडस्ट्रीचे एक रहस्यमयी जग!
भाषांतर - नितीन साळुंखे
मैत्री पब्लिकेशन, पुणे.
मूल्य – 450 रुपये.






