कितीही सूर लावला तरीही सूर हा लागत नाही,
कितींदा ऐकले तरीही मनाची भूक भागत नाही.
गाणं गणपतीचं, सत्यनारायणाचं खोटं मी सांगत नाही,
त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय,
तो पंढरीचा विठोबाही जागत नाही....
महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि आषाढी एकादशी प्रल्हाद शिंदेंच्या गाण्यांशिवाय पूर्णत्वास जात नाही. असं म्हटलं जातं की, गीतरामायणामुळे गायक-संगीतकार सुधीर फडके महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचले.परंतू वस्तुस्थिती अशी आहे की गीतरामायण पांढरपेशा मध्यमवर्गीय समूहातच लोकप्रिय झालं. त्याउलट प्रल्हाद शिंदे यांची गणपती आणि विठ्ठल गीतं अठरापगड ग्रामीण-निमशहरी-शहरी बहुजन समाजाच्या घराघरात पोहचली, म्हणूनच प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्रातले सर्वाधिक लोकप्रिय झालेले महागायक होते यात शंका नाही.
‘बाप्पा मोरया रे’... या अजरामर गाण्याची जन्मकथा
सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आपल्याला बाप्पाची सुंदर आणि मधुर गाणी ऐकायला मिळत आहे. पण प्रत्येक वर्षी एक गाणं असं आहे ज्याशियाय गणेशोत्सव आला आहे असे वाटत नाही. ते गाणं म्हणजे ‘बाप्पा मोरया रे’...
लोककवी हरेंद्र जाधव यांचे अप्रतिम बोल आणि प्रल्हाद शिंदे यांच्या मधूर आवाजाने नटलेलं गाणं म्हणजे ‘बाप्पा मोरया रे.’ आज या गाण्याला कित्येक वर्ष झाली असली तरीही लोकांच्या मनात आजही या गाण्याबद्दल स्थान आहे. एवढेच काय, आजकालच्या तरुण पिढीलासुद्धा या लोकभक्तिगीताने भुरळ पाडली आहे. पण कधी तुम्ही या गाण्याचे बोल नीट ऐकले आहे का? या गाण्याचा इतिहास तुम्हाला माहितीये का? आपण अनेकदा गाणी ऐकतो पण त्यामागे घडलेल्या गोष्टीही तितक्याच रंजक असतात. आज या लेखातून अशीच एक रंजक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.
गाण्याच्या ‘बोलाची’ गोष्ट
तुम्ही जर हे गाणं नीट कान देऊन ऐकले असेल तर तुम्हाला जाणवेल यात गणपती बाप्पाची स्तुती नाही तर त्याच्याकडे आपली व्यथा मांडली आहे. तुम्ही कधी लाल गव्हाचे मोदक पहिले आहे का? जास्त लोकांचे उत्तर हे ‘नाही’ असे असेल. पण मग ‘केले मोदक लाल गव्हाचे’ असे का बोलले जाते. तर यामागे सुद्धा एक गोष्ट आहे.
हे गीत लिहिताना कवीने सत्तरीच्या दुष्काळातील काळातील वेदना आपल्या लेखनातून कोरली आहे. जेव्हा एखादे गीतातून समाजाची व्यथा, वेदना आणि संवेदना मांडली जाते तेव्हा ते फक्त गीत नाही तर लोकगीत होते. चला आपण या गाण्यातील एक ओळ आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून घेऊया. काय आहेत ओळी…?
संबंधित लेख वाचा: 1) गणरायाचा सांस्कृतिक मागोवा शोधल्यावर नेमकं काय सापडतं…? |
नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे?
सेवा जाणून, गोड मानून द्यावा आशीर्वाद आता
बाप्पा मोरया रे ||
सत्तरीच्या काळात भयंकर दुष्काळ पडला होता. लोकांकडे खाण्यास धान्य उरले नव्हते. तेव्हा उपाय म्हणून सरकारने अमेरिकेतून लाल गहू आयात केला होता. तेव्हा त्याकाळची लोकं हा लाल गहू खाऊन आपले पोट भरायचे. हीच व्यथा कवीने या गाण्यात अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे. यामुळेच हे गाणं त्याकाळी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणं वाजलं नाही तर गणेशोत्सव साजरा केलाय असं अजिबात वाटत नाही.
जिथं इतर गायकांचा श्वास संपतो तिथून प्रल्हाद शिंदेंची तान सुरु होते…
वरच्या पट्टीत गाताना जिथं इतर गायकांचा श्वास संपतो तिथून प्रल्हाद शिंदेंची तान सुरु होते, असा आवाज जो लहानग्यांपासून ते घरातील सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तीलाही अगदीच जवळचा वाटतो तो म्हणजे स्वरसम्राट, मराठी लोकसंगीतातील कोहिनूर हिरा प्रल्हादजी शिंदे. ह्या आवाजाचं गारुड गेली कैक वर्ष अजूनही महाराष्ट्र अनुभवतोय. महाराष्ट्रातील असं एकही गावं नसेल जिथली सकाळ ही प्रल्हाद शिंदेंच्या भक्तिगीताने होत असेल. बाबासाहेब आंबेडकरांची भीम गीते बुद्ध गीते यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणारे सुद्धा प्रल्हाद शिंदेच होते.
मराठी लोकगीतांमध्ये असलेली विविधता थक्क करणारी आहे. लग्नगीतं, कोळीगीतं, अंगाई, भजन, भारुड, भेदीक, पोवाडा, लावणी, भक्तीगीतं, पाळणा, ओव्या, सवाल-जवाब, भीमगीतं-बुद्धगीतं, अभंग, गौळण, फटका, धनगरी गीतं, समाज-प्रबोधनपर गीतं अशा विपुल गीत प्रकारांनी मराठी लोकसंगीताची परंपरा समृद्ध नि संपन्न झाली आहे. ह्या ग्रामीण आणि बहुजन जीवनशैलीशी नातं सांगणार्या लोकसंगीताचा सर्वाधिक लोकप्रिय नि जनमानसात रुजलेला आवाज म्हणजे प्रल्हाद शिंदे!
अन् गायक प्रल्हाद शिंदे हे नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात पोहचलं.
सोलापूर जिल्ह्यातलं मंगळवेढा हे प्रल्हाद शिंदे यांचं मूळ गाव. घरी अठराविश्व दारिद्य्र. या दारिद्य्रानेच त्यांना गाव सोडायला भाग पाडलं. वडील भगवान शिंदे आणि आई रुक्मिणी मग पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आले. इथं मराठा मंदिर, मदनपुरा, दगडी चाळ परिसरात हे जोडपं हार्मोनियम व पखवाज वाजवत गल्लोगल्ली फिरायचं. रेल्वे स्टेशनवरही ते गाणी म्हणायचे. यातून होणार्या मिळकतीवरच त्यांचा संसार चालायचा.
दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असल्यानं सहाजिकच मग प्रल्हाद यांना फक्त लिहिता-वाचता येईल इतपतच शिकता आलं. वयाच्या अवघ्या चार-पाच वर्षांपासूनच ते आईसोबत गाऊ लागले. संगीताचं कोणतंही विधिवत शिक्षण न घेताही केवळ नैसर्गिक देणगी आणि आईवडिलांचा आशीर्वाद व संस्कार या बळावर शिंदेंनी आपला गळा फुलवला. ते मुंबईच्या लेबर कॅम्पमध्ये राहायचे. त्या काळात तिथं कव्वाली पार्ट्यांचं नित्यनेमानं आयोजन व्हायचं. ते ह्या गायन पार्ट्यांमध्ये कोरस गायनात साथ देऊन सहभागी होऊ लागले.
वसंतराव कामरेकर, कासमसाब, जी. एम. जोशी, श्री. सोहनी यांच्यासारख्या रत्नपारखींनी शिंदेंच्या गळ्यातला जोश अचूक हेरला. त्यांनी एचएमव्ही कंपनीकडे शिफारस केली. एचएमव्हीला त्यांचा आवाज आवडल्याने त्यांच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका त्यांनी काढली. ‘गेला हरि कुण्या गावा’ हे त्या ध्वनिमुद्रिकेचं नाव. यातली गाणी तुफान लोकप्रिय झाली अन् गायक प्रल्हाद शिंदे हे नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात पोहचलं.
त्यांच्या चल ग सखे, चल ग सखे पंढरीला…, आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का…, ऐका सत्यनारायणाची कथा…, दारी जमली ही सारी मंडळी आणा नवरीला बांधा मुंडावळी… अशा गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. यानंतर शिंदेंनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे १० हजारांपेक्षाही जास्त गाणी त्यांनी गायली. विविध प्रकारच्या लोकगीतांशिवाय प्रल्हाद शिंदेंनी कव्वालीही गायल्या.
अभिजनांच्या मांदियाळीत प्रल्हाद शिंदे यांना कधीच प्रतिष्ठा लाभली नाही..
प्रल्हाद शिंदेंचा आवाज पात्यासारखा धारदार होता. वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांनी गायली. त्यांची गायनशैली प्रत्येक गाण्याकरिता सारखी वाटत असली तरी ती कानांना जराही विसंगत अथवा विचित्र भासत नाही. टिपेचा आवाज, त्यापेक्षाही वरच्या स्वरात सोबत करणारा कोरस, साधी सोपी शब्दरचना आणि सहजच ओठांवर रेंगाळतील अशा चाली ही प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाची वैशिष्ठ्ये. त्यांच्या बहुतांशी गाण्यांचे संगीतकार मधुकर पाठक, विठ्ठल शिंदे तर गीतकार दत्ता पाटील आहेत. ग्रामीण बहुजन महाराष्ट्राच्या रसिकतेवर अनेक दशकं अक्षरश: एकछत्री राज्य करणार्या प्रल्हाद शिंदेंची समाजाने आणि शासनानेही सदैव उपेक्षाच केली.
अभिजनांच्या मांदियाळीत शिंदे यांना कधीच प्रतिष्ठा लाभली नाही. पण त्यांचा फर्डा आवाज तळागाळातल्या रसिकांच्या काळजात कायमचा विराजमान झाला. बर्याचदा ते पंढरपूरच्या वारीत सहभागी व्हायचे. माईकशिवाय ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे गाणं गायचे. गाताना त्यांच्या चेहर्यावरील आनंदतरंग ओसंडून वाहायचा. तमाम वारकरी मंडळीदेखील यात सामील व्हायची. त्यांच्या गाण्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ठ्य होतं ते म्हणजे वरच्या पट्टीत गाताना जिथे इतर गायकाचा श्वास थांबतो तिथून त्यांचा ताण सुरू व्हायचा.
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पाहा विटेवरी…, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग…, दर्शन देरे-देरे भगवंता…, चल ग सखे चल ग सखे पंढरीला…, चल जोडीनं जेजुरीला जाऊ…, गेला हरि कुण्या गावा…, आता तरी देवा मला पावशील का…, तुझा खर्च लागला वाढू…, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर…, नाम तुझे घेता देवा…, असं बेकार भटकण्यापेक्षा पेक्षा…, देवा मला का दिली बायको अशी…, जसं पोळीवर पडलंय तूप…, बायको तुझी गोरी गोरी…, हिच्या नखर्याने कमाल केली…, माणुसकीला कलंक लावी रीत हुंड्याची…, पड रे पाण्या-पड रे पाण्या…. अशी हजारो लोकप्रिय गाणी देणार्या प्रल्हाद शिंदे यांनी 23 जून 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला.






