पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर परिसरातील बिबट्याचे वाढते हल्ले रोखण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या बिबट्यना पकडण्यासाठी 200 पिंजरे लावण्यात येणार असून, त्यांना 'वनतारा' किंवा अन्य ठिकाणी पाठवण्यात येईल. पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या 15 दिवसांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मुख्य वनरक्षक यांनी दिले आहेत.अवघ्या 15 दिवसांत दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी वनखात्याच्या वाहनाची मोडतोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण आहे.
बिबट्या आणि माणसामधल्या संघर्षाच्या एका पाठोपाठ एक घटना घडताहेत. त्या नेमकं काय सुचित करताहेत? बिबट्या हा रक्ताला चटावलेला हिंस्र प्राणी आहे, की बिबट्या स्वत:ला मानवी वस्तीत सामावून घेण्यासाठी धडपडतोय? सहजीवनाची हाक देतोय?
"ह्युमन-लेपर्ड को एक्झिस्टन्स ऑर कॉनफ्लिक्ट?' या विषयावर माझी पी.एचडी. आहे. त्यासाठी द.आफ्रिका, केनिया, टांझानिया, पेरू, कॅनडा आदी देशातल्या जंगलांमध्ये भटकंती केली. बिबट्याचं संवर्धन व्हावे, त्याच्यात आणि स्थानिकांमध्ये संघर्ष उद्भवू नये, त्याचे अस्तित्व टिकून राहावे, या उद्देशाने आम्ही त्या देशांतील जंगलात बिबट्यांचा माग काढणे, त्यांना रेडिओ कॉलर बसवणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती घडवून आणणे, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना भरपाई देणे आदी उपक्रम हाती घेतले.
गावकरी म्हणतात, बिबटे गावात येतात तर येऊ द्या की, काय फरक पडतो
भारतात परतल्यानंतर मी बिबट्यावर संशोधन करायचे हे निश्चित केले. त्याच दरम्यान कधी तरी फेसबूकवर जयपूरजवळच्या झालाना गावाजवळच्या जंगलात भटकणाऱ्याच नव्हे तर घरात, मंदिरात, रस्त्यात दिसणाऱ्या बिबट्यांचे फोटो बघितले. त्यावरची वर्णने वाचत गेलो. आम्ही झालानाला गेलो. आश्चर्याचे एकापाठोपाठ एक धक्के आम्हाला बसत गेले. पहिले आश्चर्य म्हणजे, झालाना हे 30 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जयपूरपासून अवघ्या तीन कि.मीवरचे गाव. दुसरे आश्चर्य म्हणजे, गेलो त्या ट्रिपमध्ये तीन ते चार दिवसांच्या कालावधीत आम्हाला चक्क 11 बिबटे नजरेस पडले. नंतर कधीही गेलो तेव्हा 2-3 बिबटे सहज नजरेस पडत गेले. बरे, हे केवळ जंगलात नव्हे, तर फोटोत जसे पाहिले होते, तसे ते गावातल्या वाटांवर, मंदिरात, घरातही दिसत होते. आमच्या हेही ध्यानात येत होते, इथे बिबटे लोकवस्तीत येताहेत म्हणून गावकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव दिसत नव्हता की त्यामुळे रक्तरंजित संघर्ष उफाळून येत होता. जणू झालाना आणि बिबट्यामध्ये अलौकिक असे सहजीवन आकारास आले आहे.
या तुलनेत अगदी सहज म्हणून विकिपीडियावर परिस्थिती तपासा. तुमच्या लक्षात येईल, की गावांमध्ये बिबट्या आणि माणसामधला संघर्ष इतका तीव्र झालेला आहे की, वर्षभरात साधारण 300-500 माणसे यात बळी जातात. मग व्यावसायिक शिकारी बोलवून एकतर बिबट्यांना जेरबंद केले जाते किंवा गोळ्या घालून ठार तरी मारले जाते. आपल्या महाराष्ट्रातही मुंबई, जुन्नर आदी भागात बिबटे जंगलात खाद्य मिळाले नाही की, मनुष्यवस्त्यांमध्ये शिरतात. तसे ते शिरले की, संघर्ष अटळ असतो. त्यात अनेकदा बिबटे जखमी होतात, बळीही जातात. पण झालानात नेमके उलटे चित्र दिसते. बिबटे ग्रामीण लोकजीवनात सहज मिसळून गेलेले दिसतात. इथे त्यांच्यावर कोणी हल्ला करत नाही, की बिबटे एकेकटा माणूस पाहून त्याचा बळी घेत नाहीत. म्हणूनच गेल्या 150 वर्षांत इथल्या बिबट्यांनी माणसावर हल्ला केल्याची एकही घटना घडलेली नाही. त्या अर्थाने ही "वन ऑफ ए क्लासिक केस ऑफ को एक्झिस्टन्स' आहे.
बिबट्या हा अनेकांसाठी दहशतीचा, भीतीचा आणि हाती सापडलाच, तर अद्दल घडवण्याचा विषय आहे. माझ्यासाठी मात्र हा आता शोध-संशोधनाचा आणि प्रबंध लेखनाचा विषय झालेला आहे. त्यासाठीच मी राजस्थानातल्या झालानाच्या जंगलात त्याचा माग काढतो आहे… त्याच झालानातल्या जंगलातली 17 मार्चची अशीच एक संध्याकाळ. काही तासांपूर्वीच एका बिबट्याने नीलगायीचा एक बछडा मारला होता. आम्ही त्या परिसराच्या निरीक्षणात गुंतलो होतो. तेवढ्यात, शेजारच्या गावातील एका घरात बिबट्या घुसल्याचे सांगणारा फोन आला. माहिती मिळताच आम्ही ताबडतोब फैयाजभाईंच्या घरी पोचलो.
तीन माजली घर होते आणि मागे अर्धा एकर शेत. त्यात गहू लावलेला. पण बिबट्या अजून तिथवर आलेला नव्हता. मधल्या वेळेत आजूबाजूच्या जागेचे निरीक्षण केल्यावर आम्हाला लक्षात आले, की बिबट्या त्यांच्या शेतात आरामात राहात आला आहे. शेजारच्या एका वापरात नसलेल्या घराचा त्याने जणू डाइनिंग हॉल केला आहे. कुत्रे, तितर, खार यांचे सांगाडे तिथे विखुरलेले आहेत. खाऊन झालं, की इकडच्या शेतात आराम, हा त्याचा बहुदा दिनक्रम गेले दोन महिने सुरु आहे. निरीक्षणानंतर आम्ही, वन विभागाला बिबट्याची माहिती कळविल्यावर तत्परतेने पिंजरा लावला गेला. बिबट्याला पकडले गेले आणि जंगलात नेऊन सोडले गेले. 
इथे महत्वाचा मुद्दा हा की, जीवाला धोका असूनसुद्धा, बिबट्याला मारणे, हुसकून लावणे, जायबंदी करणे, हा विचार मनात न आणता फैयाजभाईंच्या कुटुंबाने रीतसर वन विभागाची मदत घेतली. बिबट्याचा जीव वाचवला!
बिबट्याचा गावकऱ्यांनी केवळ स्वीकारच केला नाही, तर त्याला दैवताचा मान दिला…
माझ्या अभ्यासक्षेत्राच्या जवळच एक मंदिर आहे. पंडित रामकिशोरजी तिथले पुजारी आहेत. गेली 30वर्षे ते तिथे राहात आहेत. बिबटे नियमितपणे मंदिराच्या आवारात येत असतात. संध्याकाळी, रात्री, पहाटे केव्हाही दर्शन देऊन जातात. त्यामुळे आता रामकिशोरजी, येणारे भक्त यांना या बिबट्याची चांगलीच सवय झाली आहे. इतकेच नव्हे तर गावातल्या काही तरुण मुलांना हाताशी धरून, पंडितजींनी छोटी छोटी पाण्याची कुंडे तयार केली आहेत. मोर, नीलगाय, कोल्हे, तरस, लंगूर माकडे, इतर पक्षी आणि बिबटे या पाण्याचा लाभ घेत असतात. गंमत म्हणजे, या मंदिरात बिबट्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. गावातली भाविक मंडळी त्यांचीसुद्धा मनोभावे पूजा करत आहेत. याचा अर्थ बिबट्याचा गावकऱ्यांनी केवळ स्वीकारच केलेला नाही, तर त्याला दैवताचा मान दिलेला आहे. झालानातल्या गावकऱ्यांसाठी बिबट्या देवासमान बनला आहे.
बिबट्या हा जगात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे. भारतामध्ये आढळणारी प्रजाती ही Panthera pardus fusca म्हणून ओळखली जाते. माणसाच्या जास्तीत जास्त संपर्कात येणारा आणि म्हणूनच माणसाशी जुळवून घेण्याची विलक्षण क्षमता असलेला असा हा प्राणी आहे. वाढत्या शहरीकरणाशी याने अत्यंत कमी वेळात नुसतेच जुळवून घेतलेले नाही, तर आपण इथे जगायला लायक आहोत, हे सिद्धही केले आहे. परंतु एकीकडे औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या यामुळे बिबटे आणि मनुष्य यांचा संपर्क आणि त्यातून संघर्ष हा वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातले जुन्नर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम या भागात संघर्षाचे प्रमाण मोठे आहे. गेल्या 30 वर्षात 1100 हून अधिक माणसे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनांमुळे मनुष्य हा बिबट्याला आपला शत्रू समजू लागला आहे.
जयपूरजवळचा झालाना वन परिक्षेत्र हा याला सणसणीत अपवाद ठरला आहे. जयपूर शहराच्या मध्यभागी 29 वर्ग की.मी.चे हे घोषित झालेले हे अभयारण्य आहे. साधारणत: 50 हजाराच्या वर लोकसंख्या इथल्या अभयारण्याच्या आजूबाजूला असलेल्या 18 खेड्यांमध्ये / वस्त्यांमध्ये राहते आहे. बिबट्याचे अस्तित्व ही यांच्या दैनंदिन जीवनातली एक अविभाज्य आणि नैसर्गिक घटना आहे. इथे घरात, देवळात, शेतात, वस्त्यांमध्ये, बिबटे मुक्तपणे संचार करतात. गावातली कुत्री, डुकरे हे इथल्या बिबट्यांचे मुख्य अन्न आहे. जंगलात चरायला जाणाऱ्या बकऱ्या, गाय / म्हशींची गोऱ्हे यांच्यावर पण अधून मधून हल्ला होत असतो. हा सर्व प्रदेश जेव्हा अभयारण्य म्हणून घोषित झाला, तेव्हा अपरिहार्यपणे लोकांच्या मुक्त संचारावर बंदी आली. काही नियम आले.
आपल्यासारखाच तो एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे.
माझ्या संशोधनाचा एक भाग म्हणून आम्ही या खेडेगावातल्या लोकांचा सर्व्हे केला. बिबट्याचे अस्तित्व, त्यामुळे निर्माण होणारी भीती, मनुष्यवस्तीवरचे हल्ले, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली माणसे, बिबट्याविषयीचा माणसांचा दृष्टिकोन, वन विभागाबद्दल असलेली / नसलेली कटुता, बिबट्या संवर्धनाचे महत्व, इत्यादी गोष्टींचा यात वेध घेतला. ज्यांना आम्ही भेटलो, त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले, कामगार, रंगारी, ड्रायव्हर, चहावाले, ठेलेवाले, गवळी असा हा कष्टकरी वर्ग आहे. बिबट्यांबद्दल त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक प्रेमाची भावना आहे.
आपल्यासारखाच तो एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा आपल्या इतकाच अधिकार आहे. जंगलामध्ये खाद्य उपलब्ध नसेल, तेव्हाच तो मनुष्य वस्ती मध्ये येतो, या वास्तवाची त्यांना पूर्ण जाणीव आहे. नुसतीच जाणीव नाही, तर त्यांनी ही एक नैसर्गिक साखळी आहे, हे ही मान्य केले आहे. त्यामुळे कोणीही बिबट्याला हुसकून लावण्यासाठी मांसामध्ये विष कालवत नाही, फटाके वाजवून त्यांना पळवून लावत नाही, काठ्या घेऊन झोडपत नाही की, दगडाने ठेचून मारत नाही.
मनुष्यवस्तीच्या नजीक येऊनही बिबट्याची इथे शिकार होत नाही. इथल्या 87% लोकांना बिबट्याचे अस्तित्व महत्वाचे वाटते, कारण त्यामुळे जंगलाचा ऱ्हास होत नाही, असे समजूतदार उत्तर ते देतात. याचाच, अर्थ बिबट्या हा जैवसाखळीचा महत्त्वाचा भाग आहे त्याचं अस्तित्व टिकून राहणे म्हणजे, निसर्ग अबाधित राहणे आणि पर्यायाने माणूस सुरक्षित असणे आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच राजस्थान वनविभाग ज्या काही उपाय योजना राबवते आहे. त्याला 95% लोकांचा पाठिंबा आहे. झालानाचे जंगल वाचवणे, महत्वाचे आहे, हा 100% लोकांचा आग्रह आहे.
मात्र, आणखी काही वर्षांनी म्हणजेच 2030 पर्यंतच कदाचित ही परिस्थिती बदलणार आहे. कारण, तोवर वाढलेल्या लोकसंख्येमुळे एकूणच वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण होणार, हे उघड आहे. बिबट्या हा वन्यजीव साखळीतला अग्रघटक आहे. तो टिकून राहाणे हे निसर्गाचा समतोल कायम राहण्यासाठी अनन्यासाधारण महत्वाचे आहे. अशा प्रसंगी त्यावेळच्या संभाव्य संघर्षाचा अदमास घेता आताच उपाययोजना आखणे त्यासाठी संशोधन करणे अतिव महत्वाचे आहे. ही तातडीची स्थिती राजस्थान सरकारच्या पुरेपूर ध्यानी आलेली आहे.
झालानामधला बिबट्या-माणसामधला सौहार्दबंध मजबूत आहेच, हा भाग आहेच, पण राजस्थानातल्या अरावली पर्वताच्या पूर्वेकडच्या जंगलांमध्येसुद्धा बिबट्याची संख्या लक्षणीय आहे. ती केवळ लक्षणीयच नाही, तर ती सुदृढ म्हणता येईल, अशीही आहे, हे हेरून राजस्थान सरकारने "प्रोजेक्ट टायगर'च्या धर्तीवर "प्रोजेक्ट लेपर्ड' ही महत्वाकांक्षी मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी सात जागा निश्चित केल्या आहेत. त्यातली एक जागा अर्थातच झालानाची आहे. झालानाचा प्रकल्प ज्याला ‘फ्लॅगशिप’ म्हणतात तसा प्राधान्य-प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. वन्यजीव संवर्धनात रस असलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी या मोहिमेत वैयक्तिक स्वरुपाचे लक्षही पुरवले आहे. 
बिबट्या नरभक्षक नाही तर तो एक लाजाळूचे झाड आहे!
माणूस हा नंबर एकचा कांगावेखोर प्राणी आहे. म्हणजे, काय तर आपला हिंस्रपणा अत्यंत चलाखीने लपवून त्याला इतर प्राण्यांतले वैगुण्य जगापुढे आणण्यात भलता रस आहे. बिबट्या मनुष्य वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने घडतात. ते वास्तवच आहे. पण वर्तमानपत्रात या घटनांचे वर्णन कसे येते? एक तर बिबट्याला सरसकट ‘नरभक्षक’ घोषित केले जाते आणि पिंजऱ्यात जेरबंद त्याच्या रक्ताळलेल्या, हिंस्र चेहऱ्याचे पुन्ह:पुन्हा दर्शन घडवले जाते. पण मी हे अनुभवाने सांगतो, की, बिबट्या हे एक लाजाळूचे झाड आहे! जसे एखादे अंतर्मुख स्वभावाचे माणूस अनोळखी माणसासमोर बुजून जाते, शक्यतो कुणाच्या नजरेस येणार नाही, अशा पद्धतीने वागते, जंगलात ही तऱ्हा बिबट्याची असते. तो कायम स्वत:ला लपवत भटकत असतो.
कुणी अनोळखी समोर आले की, झाडीत लपून बसतो. अर्थात, लाजाळू असला तरीही जैव साखळीत बिबट्याचे स्थान अगदी वरचे. वाघाच्या बरोबरीचे. पण जिथे वाघांचा अधिवास असतो, तिथे बिबटे जंगलाच्या सीमेकडे ढकलले जातात.वर्चस्वाच्या लढाईत वाघ त्यांना हाकलून लावतात. अशा परिस्थितीत मनुष्यवस्तीकडे जाण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो. म्हणजे, एका बाजूला जंगलातून बाहेर पडण्याची तयार होत गेलेली स्थिती आणि दुसऱ्या बाजूला मनुष्य वस्ती या कात्रीत बिबटे सापडले आहेत.
एकोणीसावे शतक आणि विसाव्या शतकाचे प्रारंभाचे दशक या काळात लोकसंख्या मर्यादित होती. जंगलांवर अतिक्रमण व्हायचे होते. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या भटकंतीचे मार्गही मोकळेढाकळे होते. उदाहरणार्थ बांधवगडचा वन्य प्राणी काझिरंगापर्यंत मजल दलमजल करत, सहज जात असे. हे ओपन कॅरिडॉर कालांतराने आक्रसत गेले.अधिवास नष्ट झाल्यामुळे जंगलांतल्या प्राण्यांमध्ये खाद्यासाठी स्पर्धा वाढत गेली. त्यातला एक संघर्ष वाघ आणि बिबट्यांमध्ये झाला. ऐंशीच्या दशकात ‘प्रोजेक्ट टायगर’सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले. ते महत्वाचे होतेच, पण त्याचा एक परिणाम असा झाला की, जिथे वाघांची संख्या वाढली, तिथे तिथे बिबटे परिघाबाहेर फेकले गेले. अशा परिस्थितीत मनुष्यवस्तीकडे जाण्यावाचून त्यांना पर्याय राहिला नाही.
बिबटे हे उंदिर, घूस, मोर, तीतर, साळिंंदर, डुकरं, कोंबड्या, कुत्री अशा सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना मारून आपला निर्वाह करतात. अनेकदा बिबटे शिकार झालेल्या प्राण्यांचे मांस झाडांवर उंच जागी नेऊन ठेवतात. बघणाऱ्याला हा त्यांचा भलताच राजेशाही थाट वाटतो. मात्र, प्रत्यक्षात वाघाच्या किंवा अन्या प्राणांच्या (उदा.तरस) भीतीतून आलेली ती प्रतिक्रिया असते. मनुष्यवस्तीत शिरल्यानंतर त्यांचे लक्ष्य भटकी कुत्री असतात. त्याचे टिकून राहणे त्यावर अवलंबून असते. माणसांवर होणारे हल्ले हे अस्तित्वाच्या भीतीतून झालेले असतात. लाठ्या-काठ्या घेतलेली माणसे पाहिल्यावर बिबट्याने बचावासाठी हिंसक होणे निर्सगनियमनाला धरूनच असते. 
पण याही वास्तवाकडे आपण माणसे साफ दुर्लक्ष करतो. हेसुद्धा नाकारतो की, वन्यप्राण्यांमध्ये बिबट्याइतका उक्रांत होत गेलेला, परिस्थितीशी जुळवून घेतलेला दुसरा प्राणी नाही. त्याने परिस्थितीशी जुळवून घेतल्याचा ठसठशीत पुरावा आपल्याला जयपूरनजीकच्या झालाना गावात पाहायला मिळतो. इतर वस्तीमधल्या लोकांनी याच प्रकारचे शहाणपण जपले तर तिथेही बिबट्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनू शकतो, हा परस्पर संदेशही मिळतो.
बिबट्या जगायला हवा आहे. त्याचे अस्तित्व टिकायला हवे आहे. फोटोंसाठी थरारक पोज मिळते म्हणून नव्हे तर जंगलसंपदा अबाधित राहावी म्हणून त्याचे असणे खूप महत्वाचे आहे. बिबट्या अस्तित्वात असणे ही जंगल सुदृढ असल्याचे लक्षण आहे. एका बाजूला माणूस-बिबट्या यातला संघर्ष टिपेला पोहोचलेला असला, तरीही आजच्या घडीला बिबट्यांची संख्या वाढतीच राहिलेली आहे. नियोजनबद्ध ‘प्रोजेक्ट लेपर्ड’मुळे यात आणखीही सुधार होण्याची शक्यता आहे. पण म्हणजे बिबट्यांची संवर्धनाची गरज नाहीए का? तर तसेही नाही. कारण, बिबट्याची दहा पिल्ले जन्मली तर त्यातली सरासरी 9 पिल्ले मरतात. जगते एक. याचा अर्थ बिबट्यांचा मृत्यूदरही मोठा आहे.
अलीकडच्या काळात मनुष्यवस्तीत येण्याने, रात्री महामार्गावर ओलांडताना गाड्यांच्या धडकेने मरण पावणाऱ्या बिबट्यांचीही त्यात भर पडली आहे. अशा बिकट समयी त्याचे जंगलात नसणे जंगलांवरच्या अतिक्रमणाला मोकळे रान देणारे आहे. एकदा का जंगले माणसाच्या ताब्यात गेली, की त्यांचा ऱ्हास ठरलेला आहे. हा सरळसरळ आत्मघात आहे. तो टाळण्याचा एक मार्ग बिबट्याचे संवर्धन हा आहे. संवर्धनासाठी संशोधन अपरिहार्य आहे. हीच अपरिहार्यता संशोधन-संवर्धन या नात्याने माझे जगणे समृद्ध करीत चालली आहे...
(लेखक वन्यजीव संशोधक-संवर्धक आहेत.)
------------------------------






