- मनीष चंद्र मिश्रा
गंगा नदीत विलुप्तप्राय झालेल्या रेड-क्राऊन्ड रुफ्ड टर्टल (red-crowned roofed turtle) अर्थात बटागूर कासवांचं 30 वर्षांनी पुनरागमन झालं आहे. या वर्षी एप्रिल मध्ये राष्ट्रीय चंबळ अभयारण्य, उत्तर प्रदेश आणि त्यांच्या संरक्षणात असलेल्या गढैता कासव संरक्षण केंद्रातून 20 कासवांचं स्थानांतर करून त्यांना हैदरपूर वेटलँड मध्ये सोडण्यात आलं. नमामि गंगे, उत्तर प्रदेश वन विभाग आणि इंडिया टर्टल कॉन्झर्वेशन प्रोग्राम (आयटीसीपी) यांच्या सहयोगानं 20 कासवांना वरच्या गंगेत सोडण्यात आलं.
एकेकाळी गंगा व तिच्या सहाय्यक नद्यांमध्ये हे कासव मोठ्या प्रमाणात आढळायचे. पण मागील 30 वर्षांत अवैध शिकार, अवैध व्यापार, अधिवास नसणं व नदीच्या प्रवाहातील बदल यामुळे त्यांची संख्या रोडावली. भारत, बांग्लादेश व नेपाळचे हे स्थानिक कासव आहेत. ब्रह्मपूत्र नदीतही ते आढळतात.
भारतात मात्र आता ते फक्त चंबळ अभयारण्यातच आढळतात. पण तिथंही त्यांची संख्या कमी होत चालली आहे. तिथं आता 500 मादा कासव असल्याचा अंदाज आहे. मे 2021 मध्ये उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात गावकऱ्यांना एक मोठा कासव दिसला. तज्ञांनी चौकशी करून सांगितलं की तो बटागूर कासव आहे. गंगेत तो आधी 30 वर्षांत दिसला नव्हता. मग मार्च 2023 मध्ये दुसऱ्या एका गावात दोन घरटी मिळाली. त्यांतून 21 कासव पिल्लं तगली. त्यांना नदीत सोडण्यात आलं. गंगेत ही कासवं आहेत याची ती स्पष्ट खूण होती. 
कासवांवर लक्ष ठेवण्यासाठी सॉनिक टॅग
या कासवांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यावर सॉनिक टॅगही लावण्यात आला. त्यातून त्यांचा पुढील प्रवास व जगणं यावर लक्ष ठेवण्यात मदत होईल. या कासवांना दोन समुहांत सोडण्यात आलंय. एक समुह हैदरपूर वेटलँड मध्ये तर दुसरा गंगेच्या मुख्य प्रवाहात सोडण्यात आला आहे.
|
संबंधित लेख वाचा: |
त्यांच्यासाठी सुरक्षित व चांगलं ठिकाण कोणतं राहिल हे शोधणं यामागचं कारण आहे. मेरठचे वन विभाग प्रमुख राजेश कुमार यांनी सांगितलं, “हस्तिनापूर वाईल्डलाईफ सँक्चुरी मध्ये कासवांच्या 12 जाती मिळतात. त्यांपैकी चार जातींच्या संरक्षणावर काम सुरू आहे. आमचं लक्ष्य आहे की गंगेतील फ्लॅगशिप जलचर म्हणजे मगर, डॉल्फिन आणि कासवांचं संवर्धन व्हावं. विलुप्तीच्या मार्गावर असलेल्या बटागूर कासवांचे 5 नर व 5 मादी हैदरपूर मध्ये व तेवढेच कासव गंगेच्या मुख्य प्रवाहात सोडले आहेत.”
टर्टल सर्वायव्हल अलायंस फाऊंडेशन-इंडियाशी संबंधित संशोधक पवन पारीख सांगतात, बटागूर कासवांची सॉनिक टेलीमेट्री देखरेख करणं हा गंगेतला पहिलाच प्रकल्प आहे. प्रत्येक कासवावर एक ट्रान्समिटर लावण्यात आलाय जो संशोधकांना सांगतो की तो कासव कोणत्या दिशेनं जात आहे. कुठे राहतोय व कसा वागतोय. त्यातून हे समजेल की ही कासवं गंगेत राहण्यासाठी स्वतः काय प्रयत्न करत आहे व कोणत्या संकटांचा सामना करत आहे.” 
कासवांवर लावलेले ट्रान्समिटर नेमकं काय करणार?
कुमार सांगतात, “गंगेतील 3 कासव-जातींवर 2010 पासून डब्लूडब्लूएफ यांच्या सहयोगानं संवर्धनाचं काम सुरू होतं. आम्ही आधी कासवांना पाण्यात सोडतो. मेरठ व बुलंदशहर इथेही आम्ही कासवांच्या तीन जातींसाठी हॅचरी तयार केली आहे. पण सध्या फक्त बटागूर कासवांचंच आम्ही निरीक्षण करतोय.” बटागूर हा खोल गोड्या पाण्यात राहणारा कासव आहे. त्याच्या पाठीवर केराटीनच्या प्लेट्स असतात मानवी नखांप्रमाणे त्यांची रचना असते. त्यामुळे टॅग लावायला सोपं पडतं असं पारीख सांगतात.
ते म्हणतात, “आमच्या टीमनं काळजीपूर्वक हे टॅग्स लावलेत ज्यामुळे कासवांना काही त्रास होणार नाही. उपकरण नीट जोडलेलं असेल व त्याला नुकसान पोहोचणार नाही याचीही काळजी घेतली आहे.” जे कासव सोडले गेले त्यांची निवड त्यांचं वय, लिंग, आरोग्य, शारिरीक रचना यावर करण्यात आली. सोडताना पाणी कमी असेल, तणाव नसेल, गरमी नसेल यासाठी रात्रीच त्यांना पाण्यात सोडण्यात आलं. कासवाच्या पाठीवरील हे ट्रान्समिटर विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर सिग्नल देत असतो. त्यामुळे प्रत्येक कासवाची वेगळी ओळख निश्चित केली जाते व त्यांचं ट्रॅकींग होतं. पारीख सांगतात, “या ट्रान्समिटरमुळे आम्हाला प्रत्येक कासवाचं वर्तन, त्याचा अधिवास, त्याचा प्रवास याची माहिती मिळते. पुनर्प्रवेशानंतर बटागूर कासव कशी प्रतिक्रिया देतात तेही यातून समजून येईल. या आकडेवारीतून भविष्यातील कासव संरक्षणाच्या योजना तयार करण्यात मदत मिळेल.”
वातावरण बदलामुळे कासवांच्या जगण्यावर संकट
एक खास टीम या कासवांचं निरिक्षण करत असते. किती कासव वाचले व ते नव्या वातावरणात कसे टिकून आहेत हे यातून समजून येईल. त्यांच्या संवर्धनाच्या योजना तयार करताना ही माहिती फार मोलाची ठरेल असं पारीख सांगतात. सध्या मानवी हालचाली तसेच हवामान बदलांमुळेही कासवांच्या जगण्यावर संकट ओढवलं आहे. पारीख सांगतात की, प्रत्येक कासवात लिंग निर्धारण हे अंड्याच्या तापमानावर अवलंबून असतं. तापमान जास्त असेल तर केवळ मादी कासवच जन्माला येतात जे कासवांच्या संख्येसाठी घातक ठरेल.
अवकाळी पाऊस, अचानक पाणी सोडलं जाणं इत्यादींमुळे कासवांची घरटी नष्ट होतात व त्यामुळे प्रजनन चक्रही धोक्यात येतं. गंगेच्या किनारी राहणाऱ्या साधू-संतांनाही या योजनेत सहभागी करण्यात आलं आहे. पारीख सांगतात, “लोक साधूसंतांचं म्हणणं जास्त ऐकतात. त्यांनी म्हटलं की कासव पवित्र आहेत तर लोक मासे पकडणं, शिकार करणं बंद करतात. सध्या २० साधू आम्हाला यात मदत करत आहेत. त्यांच्या आश्रमाजवळ अवैध शिकारी बंद पडत आहेत.”
कुमार सांगतात, “स्थानिक लोकांमध्ये जलचरांविषयी जागरुकता आहे. आम्ही शेतकऱ्यांना याची माहिती देऊन कासवांची अंडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरीही आता कासवांची घरटी आढळली की त्याचं रक्षण करतात. साधू, संत, शाळकरी मुलंही यात आम्हाला मदत करत आहेत. नजर ठेवण्यासाठी आम्ही एआय कॅमेरा व ड्रोनची मदत घेत आहोत. पण पाण्याच्या आत सोनार तंत्रज्ञान जास्त उपयोगी पडतं. डॉल्फिन सर्वेत याचा आधी उपयोग झाला आहे. पण स्थानिकांची मदत जास्त मिळते यात.”
‘नीर फाऊंडेशन’चे निर्देशक व नदींवर संशोधन करणारे रमनकांत त्यागी सांगतात, “तीस वर्षांनी गंगेत बटागूर कासवांचं येणं ही केवळ एक जैविक घटना नाही, तर नदी संरक्षणाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचा तो एक इशारा आहे. कोणत्याही नदीचं आरोग्य हे त्यात राहणाऱ्या जलचरांवरून समजून येतं. नमामि गंगे प्रकल्पा अंतर्गत मगर आणि कासव नदीत सोडले जात आहेत. एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया संयंत्र) तयार केले जात आहेत. जैव-विविधता पार्क आणि जागरूकता अभियान चालवले जात आहेत. जमिनीवर या प्रयत्नांचं यश मर्यादित आहे कारण ते अजून समाजाशी जोडले गेलेले नाहीत. साधू-संत आणि विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चितच चांगला आहे व त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतीय नदी परिषद व इतर संस्था समाज व सरकार यांच्यात सेतू होऊन काम करत आहे. भविष्यात नदी पुनर्जीवनाला यश द्यायचं असेल तर भ्रष्टाचार, नोकरशाही आणि लोकसहभागाची उणीव या अडचणी दूर कराव्या लागतील.”
गंगा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेविषयी कुमार सांगतात की मेरठमध्ये ग्रामीण भाग असल्यामुळे पाण्यातील प्रदूषणाचा स्तर कमी आहे. “वाराणशी सारख्या शहरांत सांडपाण्याची समस्या जास्त आहे. इथ मात्र काली नदीचं पाणी गंगेला येऊन मिळतं व हा संरक्षित भाग असल्यामुळे सांडपाणी थेट पाण्यात फेकलं जात नाही. शहरात 220 एमएलडी व 65 एमएलडी असे दोन सांडपाणी प्रक्रिया संयत्र प्रस्तावित आहेत, ज्यामुळे गंगेत नाल्यातील पाणी, सांडपाणी काही प्रमाणात स्वच्छ होऊन सोडलं जाईल.”
(सौजन्य - mongabay.com)






