अवघ्या 17 वर्षांची सना युसूफ पाकिस्तानी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध होती. तिचे टिकटॉकवर साधारण आठ लाख तर इन्स्टाग्रामवर साधारण 5 लाख फॉलोअर्स होते. 2 जून रोजी रात्री तिच्या घरी एक अज्ञात हल्लेखोर घुसला आणि त्याने या एन्फ्लुएन्सरचा निर्घृण पद्धतीने खून केला.
एफआयआरनुसार हल्लेखोर तरुण संध्याकाळी साधारण 5 वाजता तरुणीच्या घरात घुसला. त्याने हत्येचा उद्देश ठेवून सना युसूफवर थेट गोळीबार केला. यात दोन गोळ्या तिच्या पोटत घुसल्या. सना या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तातकडीने दाखल करण्यात आले. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सनाला ओळखत होता. पोलीस वैयक्तिक वाद, सामाजिक तणाव किंवा ऑनर किलिंगच्या दृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सना युसूफच्या घरी एक अज्ञात व्यक्ती पाहुणा म्हणून आला होता. त्याने सनासोबत थोडा वेळ बोलणी केली. त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या.
संशयित घरात शिरला, अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेला. परंतू मोबाईलच्या लोकेशनमुळे हा आरोपी लवकरच पकडला गेला. सनावर त्याचे एकतर्फी प्रेम होते. आरोपीने सनाला अनेकवेळा प्रपोज केले होते, परंतू सनाने प्रत्येकवेळी त्याला लांब ठेवले. त्याच रागातून आरोपीने सनाची हत्या केली. 
(सना युसूफ)
कंदील बलोचपासून सना युसूफपर्यंत…
सना युसूफच्या हत्येमुळे पाकिस्तानातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानात यापूर्वी देखील ऑनर किलिंगच्या नावाखाली अनेक एन्फ्लुएन्सर, मॉडेल आणि कलाकारांच्या हत्या झाल्या आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) ऐकत कुणीच नाही तरीही आपल्या गल्लीतील, घरातील तृप्ती, मुकेश, किशोरी या ‘ऑनर किलिंग’मध्ये बळी गेलेल्यांसाठी…! |
पाकिस्तानसारख्या पितृसत्ताक समाजांमध्ये महिलांच्या स्वातंत्र्याला ‘कुटुंबाची इज्जत’ अशी एक साखळी घातली जाते. स्त्री जर घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकेल, विशेषतः ऑनलाईन जगात, तर ती धोकादायक ठरवली जाते. ऑनर किलिंग हे केवळ गुन्हेगारीचे प्रकरण नसून समाजाच्या मानसिकतेचं द्योतक आहे. महिला जेव्हा टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर आपली ओळख तयार करू लागतात, तेव्हा त्या केवळ एक ‘कंटेंट क्रिएटर’ नसतात, त्या एक प्रतिबिंब असतात, की स्त्री बोलू शकते, दाखवू शकते, पैसे कमवू शकते आणि लोकांवर प्रभाव पाडू शकते. हाच प्रभाव असह्य ठरतो.
मग तिच्या कपड्यांवर चर्चा होते, हावभावावर, तिच्या पोस्टवर आणि अखेर, तिच्या अस्तित्वावर. यामागे केवळ धार्मिक कारणं नाहीत. धर्म केवळ एक पडदा आहे. मूळ आहे नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. स्त्री जर बिनधास्त झाली, तर समाजाला ती ‘भितीदायक’ वाटते.
(कंदील बलोच)
घराण्याची अब्रू गेल्याने मॉडेल कंदील बलोचची भावानेच केली हत्या
पाकिस्तानातील एका छोट्याशा गावातील कंदील बलोचने एकदा प्रसिद्ध होण्याचे स्वप्न पाहिले होते. ती अनेकदा तिच्या लहान बहिणींना म्हणायची - "बघा मी मोठी झाल्यावर नायिका बनेन आणि माझे सर्व छंद पूर्ण करेन, संपूर्ण जग मला ओळखेल." कंदीलने हे स्वप्न साकार केले, परंतु दुर्दैवाने तिचे स्वप्न पाहण्यासाठी ती या जगात राहिली नाही. पाकिस्तानची ‘किम कार्दशियन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंदीलने तरुण वयातच नाव, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली, पण त्यासोबतच अनेक वादही झाले.
पाकिस्तानसारख्या मागासलेल्या देशात, जिथे महिलांना स्वतःला झाकून ठेवण्याच्या कडक सूचना होत्या, तिथे कंदीलने तिच्या धाडसीपणाने मोठी चर्चा रंगवली होती. कंदीलला धमक्या मिळू लागल्या. मृत्यूच्या भीतीने 16 जुलै 2016 रोजी तिची तिच्याच घरात हत्या करण्यात आली, खूनी दुसरा कोणी नसून तिचा भाऊ होता. सोशल मीडियावर कंदीलनं स्वत:चे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्यामुळे घराण्याची अब्रू गेल्याचं आणि कुटुंबाच्या सन्मानाला ठेच लागल्याचं सांगत भाऊ वसीमनं तिची हत्या केली होती.
कंदील बलोच हिच्या हत्या प्रकरणात तिच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र दोन वर्षानंतर आरोपी भावाची इस्लामिक कायद्यांतर्गत निर्दोष मुक्तता करण्यात आली. पीडितेच्या आई-वडिलांनी इस्लामिक कायद्यानुसार माफ केल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा रद्द करून न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली.
(नूर मुकद्दम)
एकतर्फी प्रेमातून नूर मुकद्दमचे शीर धडापासून वेगळं केलं…
नूर मुकद्दमच्या मृत्यूची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. कारण हे काही सामान्य मृत्यू प्रकरण नाही. शवपेटीत कापडात गुंडाळलेल्या नूरचं शीर धडापासून वेगळं झालेलं होतं. ही काही अचानक घडलेली घटना नाही, तर निर्घृण हत्येचं धक्कादायक असं प्रकरण होतं. नूरच्या हत्येनंतर तिचं शीर कापण्यात आलं. तिच्या हत्येच्या संशयात तिचा बालपणीचा मित्र झाहीर जफीरला अटक करण्यात आली. दोघांच्या कुटुंबीयांची एकमेकांशी जुनी ओळख होती. पोलिसांच्या तपासानुसार 20 जुलै 2021 रोजी इस्लामाबादच्या राहणाऱ्या नूर मुकद्दम हिची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ज्या घरात नूरची हत्या झाली होती, त्याठिकाणी घटनेच्या वेळी अनेक लोक उपस्थित होते.
विशेष म्हणजे नूर मुकद्दमचे वडील शौकत मुकद्दम हे दक्षिण कोरियात पाकिस्तानचे राजदूत होते.तर आरोपी झाहीर जफीरचे वडील इस्लामाबादच्या एका मोठ्या रियल इस्टेट कंपनीचे सीईओ आहेत. याप्रकरणातही झाहीरचे नूरवर एकतर्फी प्रेम होते. त्याने आपल्याच आलिशान बंगल्यात नूरला दोन दिवस कैद करून ठेवले होते. नूरने त्या घरातून पळून जाण्याचा दोनवेळा प्रयत्न केला.
एकदा तर खिडकीतून उडी मारत ती बंगल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पळत गेली होती, मात्र नोकरांनी तिला पकडून ठेवलं होतं. या सगळ्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. झाहीरने गेटपासून तिच्या केसांना ओढत, फरफटत पुन्हा घरी बंदी केलं होतं. चिडलेल्या झाहीरने नूरवर बलात्कार केला, मारहाण केली आणि पुढे धारदार सुऱ्याने नूरचं शीर धडापासून वेगळं केलं.
या हत्येमुळे पाकिस्तान सुन्न झाला होता. लाखो लोकं रस्त्यावर उतरून नूरसाठी न्याय मागत होते. अखेर सात महिन्यांनी पाकिस्तानी न्यायालयाने झाहीरला फाशीची शिक्षा ठोठावली.
(खादिजा सिद्दीकी)
खादिजा सिद्दीकीवर माजी प्रियकराने 23 वेळा चाकूचे वार केले
पाकिस्तानमध्ये मे 2016 मध्ये खादिजा सिद्दीकी नावाच्या कायद्याच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाला. तिच्या माजी प्रियकराने तिच्यावर 23 वेळा चाकूने वार केले. ती तिच्या सहा वर्षांच्या बहिणीला शाळेतून घेण्यासाठी गेली होती. ती गाडीत बसत असताना तिच्या माजी प्रियकराने तिच्यावर हल्ला केला. तिच्या मानेवर, पोटावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात, उच्च न्यायालयाने सुरुवातीला आरोपीला निर्दोष सोडले, परंतु जेव्हा लोकांनी सोशल मीडियावर प्रचार केला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
टिकटॉकमुळे 15 वर्षांच्या मुलीवर बापाने गोळ्या घातल्या
जानेवारी 2025 मध्ये, पाकिस्तानातील क्वेटा येथे एका वडिलांनी स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलीवर गोळ्या झाडल्या. अन्वर उल-हक नावाच्या या वडिलांना त्यांच्या मुलीचे टिकटॉक व्हिडिओ आवडले नाहीत, म्हणून त्यांनी तिची हत्या केली. काही दिवसांपूर्वीच अन्वर आपल्या कुटुंबासह अमेरिकेहून पाकिस्तानला परतला होता. आपल्या मुलीची हत्या केल्यानंतर त्याने प्रथम पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
(सिद्रा खालिद)
फॅशन मॉडेल सिद्रा खालिदला भावानेच संपवले
भारतातील हैदराबाद शहरात ज्याप्रमाणे ऑनर किलिंगचा प्रकार घडला होता अगदी तसाच प्रकार पाकिस्तानची फॅशन मॉडेल सिद्रा खालिद या तरुणीबरोबर घडला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकरा या भागात राहणाऱ्या सिद्रा खालिदची हत्या तिचा धाकटा भाऊ हमजा खालिद याने केली आहे. ऑनर किलिंगच्या नावाखाली सिद्राला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप हमजावर आहे.
सिद्रा खालिदला मॉडेलिंगची आवड होती आणि ती फैसलाबादमध्ये मॉडेलिंग करायची. ती रमजानच्या महिन्यात ओकरा येथील तिच्या घरी आली होती. ईदनंतर ती जेव्हा पुन्हा तिच्या कामावर जायला निघाली तेव्हा तिच्या जाण्यावर कुटुंबातील सदस्यांनी आक्षेप घेतला. मॉडेलिंग सोडावं म्हणून कुटुंबीयांनी सिद्रावर खूप दबाव आणला होता आणि हेच हत्येचं कारण होतं. हत्येच्या वेळी सिद्रा आणि हमजाचे वडीलही घरात हजर होते. त्यांनीही सिद्राला थांबवण्याचा प्रयत्न केला. सिद्राने त्यांचं ही म्हणणं ऐकून घ्यायला नकार दिल्यावर मात्र तिच्या भावाने वडिलांच पिस्तुल घेऊन गोळी झाडली. ती गोळी बरोबर सिद्राच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात लागली आणि सिद्राचा जागीच मृत्यू झाला.
पाकिस्तान आणि ऑनर किलिंग
मानवाधिकार संस्था, ह्युमन राइट्स वॉचने आपल्या 2021 च्या अहवालात असा अंदाज वर्तवलाय की, पाकिस्तानमध्ये दरवर्षी एक हजार महिलांची ऑनरच्या नावाखाली हत्या होते. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात सांगितलंय की, गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचे 478 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र ऑनर किलिंगच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक असल्याचं महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे. कारण प्रत्येक गुन्हा पोलिसांत नोंदविला जातोच असं नाही.
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात इस्लामाबादच्या नूर मकादमच्या हत्येचा संदर्भ देताना लिहिलंय की, 2021 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या महिलांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर महिला हक्क कार्यकर्त्या नूर या आणीबाणी लागू करण्याची मागणी करत होत्या. पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर देशभरात चर्चाही होत आहे.
ऑनर किलिंगच्या या घटनांमध्ये मृतांचे कुटुंबीय म्हणजे पती, वडील, मुलगा, भाऊ, चुलत भाऊ आणि काका यांचा सहभाग असतो. या खुनांच्या मागे असलेली कारण म्हणजे त्यांच्या आवडीनुसार लग्न करण्यापासून ते मोबाईल फोन वापरणे, सोशल मीडियावर स्वतःचे फोटो अपलोड करणे अशा गोष्टी आहेत. मात्र इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आजही पाकिस्तानमध्ये चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करणे, मॉडेलिंग करणे हा पेशा मुलींसाठी योगय असल्याचं मानलं जात नाही.






