पाटसुन इलंस
गापकन धरलंस
येनयेत वळेसार
माळून गेलंस
उठता बसता
सुरंगी हसता
आये इचारता
मॅड काय गो झालंस?
माजो जीव गेलो
सुरंगेच्या खाली
घामघाम परिमळ
घटाघटा पीलंस
आता कदी भेटाया
सांग मरे बेगिन
करशीत ना मेल्या
माज्यावांगडाच लगीन?
प्रसिद्ध कवी महेश केळुसकर यांची ही ‘सुरंगी’ वरची कविता…सुरंगी एक असा सुगंध जो प्रत्येक माणसाला प्रेमात पाडतो. सुरंगीचा वळेसार सगळ्यांचाच आवडीचा विषय. वळेसार (गजरे) सुरंगीच्या नर फुलांचे केले जातात. सुरंगीची फुले सकाळी सुर्य उगवायला लागला की फुलायला लागतात. त्याचा गोड सुवास दरवळत सुरंगी फुलल्याची बातमी घेऊन वारा रानोमाळ भटकत राहतो आणि कवी, लेखकांच्या लेखणीतून सुगंधाची ही महाराणी वेगवेगळ्या अलंकारात कागदावर उमटू लागते…
सुरंगी हे खरं तर कोकण-गोव्याचे वैभव. पण अन्य अनेक वैभवांप्रमाणे अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही वर्षात अवैध वृक्षतोड आणि खाणकाम यांमुळे सुरंगीचे अस्तित्व धोक्यात आले. सुरंगी नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सातत्याने सलग दोन वर्षे सुरंगीच उत्पन्न घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.
सुरंगी पिकाच 30 ते 35 कोटींचे उत्पन्न होते मात्र यंदा उत्पन्नात सुमारे 60 ते 70 टक्के घट झाली आहे. त्यामुळे केवळ 30 टक्के उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, खारेपाटण आदी तालुक्यातील गावात सुरंगी या पिकांच उत्पादन होते. या उत्पादनावर येथील शेतकरी याच अर्थकारण सुरंगीच्या उत्पादनावर होत आहे.
मात्र आता दुर्मीळ होत जाणाऱ्या सुरंगी वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वन विभागाने पुढाकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगीची लागवड केली जाणार आहे. त्यात अडीच हजारांहून अधिक सुरंगी वृक्ष वाढवले जातील. सुरंगी नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे वन विभागाकडून सुरंगीच्या जतन आणि संवर्धनासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली. राज्यभरात सुरंगी वनांची उभारणी करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगीची लागवड केली जाईल. या पावसाळ्यात दोन हजार 600 सुरंगीची लागवड करण्याचा संकल्प आहे.
सुरंगी जगवणं का महत्वाचं आहे?
सुरंगी एक असा सुगंध जो प्रत्येक माणसाला प्रेमात पाडतो. सुरंगीचा वळेसार सगळ्यांचाच आवडीचा विषय. वळेसार (गजरे) सुरंगीच्या नर फुलांचे केले जातात. सुरंगीची फुले सकाळी सुर्य उगवायला लागला की फुलायला लागतात. वळेसार करायचा असेल तर पहाटे लवकर उठून, झाडावर चढून, न उमललेले कळे काढून आणावे लागतात. कळ्यांचे देठ खूप नाजूक असल्यामुळे त्यांचे देठ कोचून, भोवतीच्या दोन संदलांचा देठाभोवती पिळ घातला जातो.
याला "सुरंगीचे कळे पटकळायणे" असे म्हणतात. पटकळायलेल्या कळ्यांचे संदल सुईने दोर्यात ओवून वळेसार केला जातो. हे वळेसार बाजारात चांगल्या दराने विकले जातात. ही फुले देवाला वाहतात तसेच स्त्रीयांची पहिली पसंद असतात. आरवली गावात एक वेगळी पद्धत दिसून येते. ती म्हणजे येथील आराध्यदैवत श्री देव वेतोबाला सुरंगीच्या माळांच्या अंगरख्याने सजवले जाते.
याशिवाय सुकवलेल्या नर कळ्यांना बाजारात चांगली मागणी आहे. झाडावर चढून सगळे कळे काढले जातात. यावेळी झाडाखाली साफ करून सारवले जाते किंवा कागद, साड्या पसरवले जातात. त्यानंतर हे कळे गोळा करून त्यातील कचरा वेचून काढून सुकवून बाजारात विकले जातात. या कळ्यांचा वापर सुगंधी तेल व अत्तर उद्योगात होतो. फक्त सुकवलेल्या नर कळ्यांनाच चांगली किंमत मिळते, तरीपण फुले व मादी कळ्यांची यात भेसळ केली जाते. सुरंगी फुलांचा औषधी उपयोग असल्याचा उल्लेख आहे तसेच याचे लाकूड सुद्धा खूप टणक व टिकावू असते. त्यामुळे फर्निचर साठी व जळावू म्हणून वापरले जाते.
एका झाडावर फक्त नर फुले तर दुसर्या झाडावर मादी फुले
सुरंगी हे पश्चिम घाटातील एक प्रदेशनिष्ट झाड. पश्चिम घाटातील तळकोकण ते उत्तर मलबार व मध्य सह्याद्रीच्या काही भागात सुरंगीचा आढळ दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली, आसोली, सोन्सुरे, धाकोरे अश्या काही मोजक्या गावांत सुरंगीची घनदाट जंगले व देवरार्या आढळतात.
सुरंगीला कोकणीत "सुरंगन", कन्नड मध्ये "सुरीगी" म्हणून ओळखले जाते. सुरंगीचे शास्त्रीय नाव "मॅमिया सुरीगा" असून त्याचा समावेश "कॅलोफायलॅसी" कुळात होतो. "मॅम्मेय" या वेस्ट इंडिज नावावरून मॅमिया प्रजाती व "सुरीगी" कन्नड नावावरून सुरीगा जातीचे नामकरण करण्यात आले आहे. सुरंगी हा मध्यम आकाराचा 10-20 मी. सरळ उंच वाढत जाणारा सदाहरित वृक्ष. खोड बाहेरून खडबडीत, काळपट-करडे व आतून लालसर असून त्याचा घेर 1-2 मी. पर्यंत असू शकतो. खोडावर घाव झाल्यास चिकट डिंक येतो. फांद्या जमिनी समांतर पूर्ण खोडाभोवती वाढलेल्या दिसतात. पाने चकचकीत, रबरी व लंबगोलाकार असतात.
सुरंगी फुलांनाच बाजारात मागणी
फुलांचा बहर मार्च-एप्रिल महिन्यात फक्त काही आठवड्यांसाठीच असतो. फुलांचा दरवळ अर्ध्या किमी. वरूनच अनुभवता येतो. झाडाची पूर्ण वाढ होऊन फुलायला 10-20 वर्षांचा कालावधी लागतो. पण एकदा बहर सुरू झाला की 60-80 वर्षे बहरत राहतो. फुले फुलोर्यात न येता फांद्यांवरच पुंजक्यांनी आलेली दिसतात. फुलांना लांब देठ, 2 पांढरट संदल व 4 पांढर्या पाकळ्या असतात. सुरंगीची झाडे "ॲन्ड्रोडाओशिअस" म्हणजेच एका झाडावर फक्त नर फुले तर दुसर्या झाडावर मादी (द्विलिंगी) फुले येतात.
नर फुलांमध्ये असंख्य पिवळे पुंकेसर असतात. ही फुले सकाळी फुलून, दुसर्या दिवशी गळून पडतात. द्विलिंगी फुलांच्या मध्यभागी फुलदाणीच्या आकाराचा लाल जायांग (मादी अवयव) असून त्याभोवती काही पिवळे अपूर्ण पुंकेसर असतात. अपूर्ण पुंकेसरापासून फलन होत नाही, त्यामुळे द्विलिंगी फुले ही मादी फुले म्हणूनच कार्य करतात. त्यामुळे सुरंगीची नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर दिसून येतात. "सुरंगी" स्त्रीवचनी शब्द असला तरी नर झाडाला सुरंगी तर मादी झाडाला पुरुषवचनी "सुरंगो किंवा बुरंगो" म्हणून संबोधले जाते.
नर सुरंगी फुले खुप जास्त सुवासिक असतात. नर सुरंगी फुलांनाच बाजारात मागणी आहे. सुगंधामुळे ही फुले अनेक मधमाश्या व इतर माश्या व किटकांना आकर्षित करतात. मधमाश्यांद्वारे परागीभवन केले जाते. नर सुरंगी फुलांपासून फळे तयार होत नाहीत तर मादी बुरंगा फुलांपासून फळधारणा होते. पाकळ्या गळून गेल्यावर जायांगचे रुपांतर फळात होते.
फळधारणेला पूर्ण व्हायला 1-2 महिन्यांचा वेळ लागतो. पावसाळ्यापर्यंत फळे परिपक्व होतात. फळे लंबगोलाकार असून दोन्ही बाजूला टोकदार असतात. फळांमध्ये चिकट गर व एक बी असते. काही फळांमध्ये जुळ्या बीया आढळतात. ही फळे पक्षी खातात व पक्ष्यांच्या विष्टेमार्फत बिजप्रसार होतो. याच बियांपासून नवीन नर सुरंगी व मादी बुरंगा दोन्ही रोपांची उत्पत्ती होते.
सुरंगीपासून मिळणारे उत्पन्न व लागणारे कष्ट व वेळ यांचे प्रमाण विषम असल्यामुळे व या झाडाच्या उपयोगांबाबत तेवढी जागरुकता नसल्यामुळे सुरंगीच्या लागवडीच्या दृष्टीने विचार होत नाही. झाडाची वाढ खुप हळू असते. मुख्यतः वाढीसाठी विशिष्ट अनुकूल जमिन व वातावरण लागते. साधारणतः 10-20 वर्षांनी झाड प्रौढ होऊन फुलायला लागतात. वर्षातून फक्त एकदाच व काही आढवड्यांसाठी बहर येतो. नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात, तसेच फुलल्याशिवाय त्यांच्यात भेद करता येत नाही. या सर्व कारणांमुळे सुरंगीची लागवड करणे जोखीमीचे जाते.
सुरंगी वाचवण्यासाठी वन विभागाचा पुढाकार
सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ आणि कणकवली या चार तालुक्यांमधील सात गावांमध्ये ही सुरंगीची वने तयार केली जाणार आहेत. यासाठी वन विभागाने रोपवाटिका तयार केली असून निरवडे, मठ, साईगाव, भिरंवडे, भडगाव नांगरतास, घोटगेवाडी येथे सुरंगी लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी रोपेही वितरित करण्यात आली असून, यंदाच्या पावसाळ्यात या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
या संदर्भात सिंधुदुर्ग वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी माहिती दिली की, पश्चिम घाटात प्रामुख्याने कोकणातील सिंधुदुर्ग आणि गोव्यातील काही भागात या वृक्षांची नैसर्गिक लागवड आढळते. ही अत्यंत दुर्मीळ वनस्पती त्यामुळे सुरंगीच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात सात ठिकाणी सुंरगी वनं तयार करणार आहोत. दरवर्षी ही लागवड टप्प्याटप्प्याने वाढवण्याचे नियोजन आहे.






