- दासू भगत
1975 मध्ये स्टिव्हन स्पिलबर्ग यांचा जॉज (Jaws) हा चित्रपट प्रदर्शीत् झाला होता. चित्रपटाची कथा या शार्क माशाभोवती गुंफण्यात आली होती. या चित्रपटातला मूख्य नायक आणि खलनायक हा मासाच आहे. जवळपास 22 फूट आकाराचा एक हुबेहूब कृत्रीम शार्क मासा यासाठी तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने इतिहास निर्माण केला.
गमंत म्हणजे चित्रपटात सुरूवातीचा किमान एक तास तरी हा मासा पूर्ण दाखवलाच नाही. मात्र पहिल्या दहा मिनिटांतच अख्खे चित्रपटगृह या माशाच्या दहशतीखाली आणण्यात स्पिलबर्ग यशस्वी झाला. चित्रपटात धक्कातंत्र नावाचा जो प्रकार असतो तो हा चित्रपट बघतानां वारंवार जाणवतो.
असाच काहीसा प्रकार 1975 मध्ये प्रदर्शीत झालेल्या एका भारतीय चित्रपटात बघायला मिळाला. चित्रपटाची पटकथा लिहिताना सामान्यत: एक संकेत पाळला जातो तो म्हणजे चित्रपटातील मूख्य पात्रांची ओळख करून देणे. म्हणून सुरूवातीचे प्रसंग अत्यंत काळजीपूर्वक लिहले जातात. पहिल्या 15-20 मिनीटात चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणे गरजेचे असते. यशस्वी पटकथाकाराला हे उत्तमपणे जमते.
सलीम-जावेद हे पटकथाकार यात तरबेज होते. “शोले” या चित्रपटाचे ते पटकथाकार आहेत. भारतीय चित्रपटाची आदर्श पटकथा म्हणून हा चित्रपट आजही अभ्यासला जातो. यशस्वी चित्रपटाचा विशेष असा फॉर्मुला हा अमूक तमूक असतो असे आजही कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. 
शोलेच्या पहिल्या 40 मिनिटांत गब्बर दिसत नाही, मात्र तरीही…?
चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासूनच गब्बरसिंग या पात्राची ओळख सुरू होते. मात्र तो फ्रेममध्ये दिसत नाही. त्याचे साथीदार मालगाडीचा पिच्छा करताना लक्षात येते की हे डाकू असे तसे नाहीत. याचा म्होरक्या नक्कीच खतरनाक असला पाहिजे. मग ठाकूरच्या घरी जय वीरू पोहचतात, तेव्हा ठाकूरच्या तोंडून पहिल्यांदा गब्बरसिंग हे नाव येते.
म्हणजे चित्रपटाची पहिली 40 मिनीटे उलटून गेल्यावर प्रेक्षकांना फक्त या नावाचा परिचय होतो. येथून मग प्रेक्षकांची उत्कंठा सुरू होते की, हा गब्बरसिंग कोण? तरीही गब्बर पडद्यावर दिसत नाही. नंतर काही वेळाने गब्बरचे तीन साथीदार गावात पोहचतात. मात्र गब्बर त्यांच्या सोबत नसतोच.
जवळपास एक तासाचा चित्रपट उलटून गेल्यावर पडद्यावर गब्बरची एन्ट्री होते…मिलेट्रीच्या गणवेशात हातात बेल्ट घेतलेला व खडकांवर बूट आपटत विचारणारा, “कितने आदमी थे?” आणि नंतर ‘सुव्वर के बच्चो’ म्हणत साथीदारांवर आग ओकणारा व्हिमजीकल गब्बर…अर्थात अमजद खान.
भारतीय चित्रपटातील आजपर्यंतचा सर्वात कमी शब्द असलेला प्रभावशाली संवाद म्हणजे “कितने आदमी थे?” आणि “अरे वो सांबा”. अमजद खानच्या या पहिल्या प्रसंगाची चित्रपटातील लांबी फक्त 6 मिनीटांची आहे. मात्र या 6 मिनिटात तो सबंध प्रेक्षकवर्ग आपल्या ताब्यात घेतो.
मस्तवाल क्रूर चेहरा, काहीसा पिचका आवाज, तंबाखू मळण्याची ढब, पिस्तुलातील तीन गोळ्याचे तत्वज्ञान, कुणीच मेलं नाही म्हणून होणारा विचित्र भाव, त्यानंतरचे त्याचे उपहासात्मक हसणे…अवघ्या 6 मिनिटात गब्बर हा किती विक्षिप्त आहे याची झलक अत्यंत समर्थपणे अमजद खानने दाखवली आहे. यानंतर तो लगेच पूढच्या प्रसंगात गावात येतो..तो आता काही तरी भयंकर करणार याची कल्पना प्रेक्षकांना येते.
होळीत सर्व गाव दंग असताना तो येतो. परत फक्त 7 मिनीटांचा प्रसंग आहे. यातील त्याने जय विरूला म्हटलेला संवाद- “वो सर ये पैर…” म्हणताना केलेल्या डोळ्याच्या आणि चेहऱ्याच्या हालचाली लाजवाब आहेत. एकदम खुनशी वाटतो. त्याने हा ही प्रसंग अजरामर केला.
शोलेमध्ये गब्बरच्या वाट्याला फक्त 7- 8 सिन्स, मात्र तरीही…
नतंर ठाकूरचा फ्लॅशबॅक… त्याने केलेला गब्बरचा पाठलाग- “हात नही फांसी का फंदा” हा संवाद आणि कोर्टातील त्याला झालेली शिक्षा. फक्त 5 मिनिटाचा हा प्रसंग. त्यानंतर त्याने केलेले ठाकूरच्या घरच्याचे शिरकाण आणि ठाकूरचे कापलेले हात हा 9 मिनिटांचा प्रसंग. नतंरच्या एका गाण्यातला एक मिनीटांचा प्रसंग, नतंर “अब आयेगा मजा खेल का…..”हा दोन मिनिटांचा प्रसंग आणि सरते शेवटचा क्लायमॅक्सचा प्रसंग 6-7 मिनिटांचा…..अख्या चित्रपटात अमजद खानच्या वाट्याला फक्त 7 ते 8 सीन्स आले आहेत. म्हणजे साडे तीन तासाच्या या चित्रपटात अमजद पडद्यावर फक्त 35 ते 38 मिनिटेच दिसला आहे. तरीही आज शोले म्हणताच आठवतो तो गब्बरसिंग…अमजद खान.
शोलेमध्ये अमजद 35 वर्षांचा होता. जसा एका रात्रीतून राजेश खन्ना सूपर स्टार झाला तसाच या चित्रपटानतंर अमजद सूपर व्हिलन झाला. पाकिस्तान मधील पेशावर येथे एका पश्तुन कुटूंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील झकारिया खान हे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते होते. जयंत हे त्यांचे पडद्यावरील नाव. विशेष म्हणजे त्यांनी “हिमालय की गोद मे” या चित्रपटात डाकूची भूमिका साकारली होती आणि तीही गाजली होती.
जयंत अत्यंत उंचेपूरे आणि चांगले अभिनेते होते. त्यांना जयंत हे नाव दिग्दर्शक विजय भट्ट यांनी दिले होते. अमजद आणि जयंतच्या आवाजाची जातकुळी एकच होती. दूर्देवाने जयंत शोले रिलीज होण्याच्या दोन महिने आगोदरच मृत्यू पावले. त्यांना आपल्या या मुलाचं यश प्रत्यक्ष बघता नाही आले.
विद्यार्थी संघटनेपासून सिनेमापर्यंत…
अमजद मुंबईत शिकला. मुबंईच्या आर.डी. नॅशनल कॉलेजात तो विद्यार्थी संघटनेचा जनरल सेक्रेटरी होता. चित्रपटात येण्याआगोदर अमजद रंगभूमिवर सक्रिय होता. शोले या चित्रपटात नामावळीत अमजद खानचे नाव Introducing असे जरी दाखविले गेले तरी हा अमजदचा पहिला चित्रपट नाही. 1951 मध्ये “नाझनिन” नावाच्या चित्रपटात अमजद खानने पहिली भूमिका केली तेव्हा तो 11 वर्षांचा होता. मधूबाला-नासिर खान( दिलीप कुमारचे बंधू) हे नायक नायिका होते.
यात अमजद खानचे वडील जयंत हे पण होते. नतंर 1957 मधील राज कपूरच्या “अब दिल्ली दूर नही” या चित्रपटात ही तो बाल कलाकार म्हणून चमकला. 1961 मधील देव आनंदच्या “माया” आणि 1973 च्या “हिंदूस्तान की कसम” या चित्रपटात ही तो होता. पण हे चित्रपट त्यांची ओळख नाही बनू शकले. त्यासाठी त्याला 1975 साल उजडावे लागले. मध्येच त्याने के.असिफ यांच्या ‘लव्ह अन्ड गॉड’ मध्ये दिग्दर्शनाचेही धडे घेतले. दोन भाऊ इनायत खान, इम्तियाज खान व त्याची पत्नी कृतिका देसाई हेही अभिनेते आहेत. फिरोजखानच्या बऱ्याच चित्रपटात इम्तियाज खानने खलनायकाची भूमिका साकार केलीय.
संबंधित लेख वाचा: 1) ‘शोले’ नावाची परिकथा ऐकायला-सांगायला आजही प्रत्येकजण उत्सूक का आहे? |
तुलनेने अमजद खानला बऱ्याच उशीरा यश मिळाले. पण नंतर भूमिकांची रांग लागली. अधिकतर भूमिका खल नायकाच्या होत्या आणि प्रत्येक चित्रपटात त्याच्यावर शोले टाईप हसण्याची सक्ती होती. मुळात अमजद खान शोलेतील गब्बरच्या भूमिकेसाठी पहिली पसंद नव्हताच. ही भूमिका डॅनीने करावी अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. पण डॅनी “धर्मात्मा”(हॉलिवूड गॉड फादरचा भारतीय अवतार) या चित्रपटात व्यस्त होता त्यामुळे त्याने नकार दिला.
विशेष म्हणजे संजीव कुमारला ही भूमिका करायची खूप इच्छा होती. पण सलीम-जावेदच्या आग्रहामुळे अमजदला ही भूमिका मिळू शकली. यातील गब्बरचे गेटअप हाही महत्वाचा फॅक्टर होताच. गब्बरच् क्रूरता त्यांच्या चेहऱ्यात होती. त्याचा काहीसा पिचका आवाज देखील दिग्दर्शकाला आवडला नव्हता पण पूढे तोच त्याची ओळखही झाला.
दिवसभरातून 30 कप चहा प्यायचे अमजद खान
अमजद चहाचे खूप शौकिन होते, दिवसभरातून 30 कप चहा ते रिचवत असत. चहा नाही मिळाला तर काम करणे कठीण होत असे. पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असतानाचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. नाटकाच्या तालीमीच्या दरम्यान एकदा त्यांना चहा मिळाला नाही. कारण दूध संपले असे सांगण्यात आले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी चक्क एक म्हैस आणून तिथे बांधली व सांगितले की पुन्हा हे कारण सांगायचे नाही.
सत्यजित रॉय यांनी त्यानां “शतरंज के खिलाडी” मधील वाजीद अली शाहची भूमिका देवू केली. त्यांनी अमजदला ही भूमिका त्यांचे एक नाटक बघून ऑफर केली होती. ही त्यांची सर्वस्वी भिन्न अशी भूमिका होती. अशीच एक वेगळी भूमिका त्यांनी 1979 मधील दिग्दर्शक जुगल किशोर यांच्या “दादा” मध्ये साकार केली होती. अशीच एक वेगळी भूमिका शशी कपूरच्या “उत्सव' या चित्रपटात होती. वात्सायनाच्या भूमिकेत त्यांना बघणे हे काही औरच होते.कल्पना लाजमीच्या रूदाली मध्येही त्यांची एक वेगळी भूमिका होती. 
मला “मुकद्दर का सिंकदर” मधील रेखावर जीवतोड प्रेम करणारा दिलावर खूप भावतो. दिलावरच्या हृदयात जोहरा बेगम पक्की रूतलेली. त्याला वाटते आपले हे प्रेम सिंकदर हिसकावून घेईल म्हणून तो त्याचा शत्रू होतो व त्याच्यावर जीवघेणा हल्ला करतो. पण अतंत: जेव्हा त्याला समजते की सिकंदरचे प्रेम जोहरावर नव्हते तेव्हा पश्चातापदग्ध दिलावर-“अल्ला भौत बडी भूल हो गयी” असा काही म्हणतो की बस्स !!!!
खलनायकीचा शिक्का बसलेल्या अभिनेत्यांना विनोदी भूमिका साकारणे तसे अवघडच. मात्र चित्रपटातील त्यांची उडणारी भंबेरी लोकानां आवडत असे. अमजद खान मात्र हे मोडीत काढून आपणही उत्तम विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने करू शकतो हे सिद्ध केले.
1981 मध्ये आलेल्या “लव्ह स्टोरी” या राजेंद्र कुमारच्या चित्रपटातील हवालदार शेरसिंग त्यांनी फर्मास रंगवला. यातील त्यांची देहबोली आणि संवादफेक झक्कासच !!!!! यातील त्यांचे लउका-लडकी ऐवजी लुडका–लुडकी म्हणने व डोळा फडफडविणे लाजवाब. “हमसे बढकर कौन” मधला त्यांचा भोलारामही असाच फक्कड.
अपघातामध्ये 13 बरगड्या तुटल्या, स्टेअरिंग व्हील फुफ्फुसात घुसले.
अमजद खानने आपल्या आयुष्यात प्रत्येक प्रसंगाचा धीराने सामना केला. मात्र एक घटना अशी घडली की त्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा अमजद खान “ग्रेट गॅम्बलर” या चित्रपटाचे गोव्याला शुटींग करत होते. शुटींगहुन परत मुंबईला येत असतानां त्यांच्या कारला अपघात झाला.
या अपघातात त्यांच्या 13 बरगड्या तुटल्या आणि स्टेअरिंग व्हील त्यांच्या फुफ्फुसात घुसले. अनेक दिवस ते कोमातही होते. या अपघाताने त्यांना व्हिल चेअरवर आणून पटकले. अनेक ऑपरेशन्स करावी लागली. या आजारा नंतर त्यांचे वजन झपाट्याने वाढायला सुरूवात झाली.
1988 मध्ये आलेला इंग्रजी चित्रपट “द परफेक्ट मर्डर” मध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. गब्बर की असली पसंद ही पार्ले बिस्कीटाची जाहिरात बच्चे कंपनीत तुफान लोकप्रिय होती.
राजनिती पासून लांब असणारे अमजद आपल्या सोबतच्या सर्वच सह कलावंता सोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. 1978 ची मिस इंडिया रनर कल्पना अय्यर बरोबर अमजद खानचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कल्पना अय्यरने चित्रपटातुन अनेक कामे केली आहेत.
दोघांच्या प्रेम संबंधाच्या बातम्याही त्याकाळात चर्चेत होत्या. मात्र अमजद खाननी 1972 मध्येच शेहला खानशी लग्न केले होते. शेहला खन ही प्रसिद्ध उर्दू साहित्यीक अख्तर-उल-इमान यांची मुलगी. कदाचित दोघानां लग्नही करता आले असते पण त्यांनी तसे केले नाही. पण दोघेही चांगले मित्र बनून राहिले. अमजदचे निधन झाल्यावर ती त्यांच्या घरीही गेली. नंतर मात्र तिने हा देश सोडला व दुबईला स्थायिक झाली.
वाढत जाणारे वजन अमजद खानला हळूहळू मृत्यूच्या दारात नेत होते. औषधांच्या साईड इफेक्टने त्यांचे करीअर एक प्रकारे धोक्यातच आणले. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये त्यांचे शरीर मावेनासे झाले. ”रूदाली” या चित्रपटात अमजाद खान यांनी एका अशा ठाकूराची भूमिका केली होती जो मृत्यूपंथाला लागलेला आहे. पण त्याचा जीव जाता जात नाही. त्याला हे पुरेपूर माहित असते की आपल्या मृत्यू नंतर कुणीही रडणार नाही. म्हणून तो रूदालीनां पैसे देऊन मातम मनविण्यासाठी निमंत्रण देतो.
का कुणास ठावूक अमजदचा यातील हा असा ठाकूर बघताना घालमेल होते. योगायोग असा की हा अमजदनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट होता जो त्यांच्या मृत्यू नंतर प्रदर्शीत झाला. गब्बररूपी अमजाद खानला मृत्यूने 27 जुलै 1992 रोजी ओढून नेले खरे मात्र अमजदरूपी गब्बरला मृत्यू नेऊ शकला नाही.






