दारूच्या नशेत केलेली एक चूक, व्हिडिओद्वारे व्हायरल होते आणि काही सेकंदांत सोशल मीडियावर ट्रोलिंगची आग पसरते…हीच आग एका २५ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागचं कारण बनते. माफी मागूनही त्याला लोकं माफ करत नाहीत, उलट सोशल मीडियाद्वारे त्याला जीवे मारण्याच्या धमक्यांचे सतत कॉल यायला सुरूवात झाली. सार्वजनिक टीका केवळ चुका दाखवण्यासाठी असते, पण आज याच टीकेमुळे एका तरुणाने त्याचं जीवन संपवलं आहे. महेश आढेची आत्महत्या आपल्यासमोर काही प्रश्न उभी करतेय.. एका तरुणाची चूक एवढी मोठी होती का की त्याला आपला जीव द्यावा लागावा? ट्रोलिंग, धमक्या देणाऱ्यांना यासाठी जबाबदार ठरवण्यात येईल का?”
काय आहे नेमकी घटना?
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर महेश आढे आणि त्याचा एक मित्र नशेच्या अवस्थेत छ. संभाजीनगर नावाच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असल्याचा व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासांतच तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या घटनेवर नेटिझन्सनी जोरदार टीका केली, अनेकांनी शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्स केल्या. दुसऱ्याच दिवशी महेश आणि त्याच्या मित्राने स्वतःचा माफी मागतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. दोघांनी “आमच्याकडून चूक झाली, क्षमा करा” असं सांगून लोकांची माफी मागितली. मात्र सोशल मीडियावर टीका थांबली नाही. उलट दररोज फोन, मेसेज आणि धमक्या येऊ लागल्या.
महेशचे कुटुंबीय सांगतात, त्याला सतत “तू संभाजी नगरचं नाव खराब केलंस”, “तुला सोडणार नाही” अशा स्वरूपाचे फोन आणि मेसेज येत होते. तो मानसिकदृष्ट्या खचला होता. “तो वारंवार म्हणायचा ‘मला हे सहन होत नाही, मी जीव देईन.’ आम्ही त्याला समजावलं, पण धमक्यांचा आणि बदनामीचा ताण तो झेलू शकला नाही.”
रेल्वे पोलिसांनीही गावात येऊन या घटनेची चौकशी केली होती. महेशने त्यांच्यासमोर पुन्हा एकदा माफी मागितली. मात्र तरीही सोशल मीडियावरील टीका थांबल्या नाहीत. शेवटी बुधवारी सकाळी तो घरातून बाहेर पडला आणि काही तासांनी गावाजवळील विहिरीत त्याचा मृतदेह सापडला.
"व्हिडिओ व्हायरल झाला आणि धमक्या सुरू झाल्या..."
महेश आढेच्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतापाचा महापूर आला. काहींनी राग व्यक्त करताना मर्यादा सोडल्या. “उघड्यावर मुततोस, मग बदनामीची भीती कशाला?”, “लाज नाही वाटली तेव्हा, आता नाटक करतोय!”, “असं करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे!” अशा कठोर शब्दांत टीका होत होती. काहींनी तर “आता जिथं मूतलास तिथंच गाडून टाकू तुला!”, “जिवंत राहू देणार नाही समाजात!”, “जात दाखवून तोंड फोडू तुझं!” "तुला जिवंत सोडणार नाही!" असे थेट धमकीचे मेसेज त्याच्या मोबाईलवर आले होते. सलग अशा धमक्यांमुळे महेशवर मानसिक ताण वाढत गेला. “मला हे सहन होत नाही,” असं तो वारंवार सांगत होता, आणि अखेर तो मानसिक छळाचाच बळी ठरला.
महेशने आत्महत्या केल्याचे समजताच जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील ठोकमळ तांड्यात शोककळा पसरली. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत, “महेशची चूक त्याने मान्य करून माफी मागितली होती. तरी लोकांनी त्याला जगू दिलं नाही,” असं म्हटलं. त्याचे काका म्हणतात, “लोकांनी फोन करून धमक्या दिल्या, शिव्या दिल्या, त्याला खूप घाबरवून टाकलं. तो पूर्ण नैराश्यात गेला. आमची हात जोडून विनंती आहे ज्यांनी हे सगळं केलं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.” गावकऱ्यांनीही याप्रकरणी पोलिसांकडे ठोस तपास आणि दोषींवर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या मागणीनंतर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आष्टी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश सुरवसे म्हणाले, की "या तरुणास 'इन्स्टाग्राम'वरून अधिक धमक्या येत होत्या. आता ज्यांनी त्या दिल्या त्यांचा जबाब घेणे सुरू आहे. समाजमाध्यमातून मिळालेल्या वागणुकीमुळे वैतागला असल्यानेच या तरुणाने आत्महत्या केल्याचे तपासातून पुढे आले आहे." 
सायबर छळामुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
महेश आढेच्या मृत्यूनंतर सध्या सायबर छळाबद्दलची चर्चा सुरू झाली. जसंजसं इंटरनेटचा प्रसार वाढत आहे, तसंतसं भारतात ही समस्या वाढत आहे. मध्य प्रदेशमधील 16 वर्षांच्या प्रियांशू यादवने काही महिन्यांपूर्वी वेगवेगळे कपडे आणि मेकअप करून सोशल मीडियावर रिल्स पोस्ट केले. पण त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगमुळे त्याने आत्महत्या केली. केरळमधील पहिला ट्रान्सजेंडर बॉडी बिल्डर प्रवीण नाथ याने फेसबुकवर आपल्या जोडीदारापासून विभक्त होत असल्याची पोस्ट केली. ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या, त्यानंतर त्याने आत्महत्या केली.
आणखी एका घटनेत चेन्नईतील व्ही. रम्या ही महिला आपल्या सात महिन्यांच्या मुलीला गॅलरीत स्तनपान करीत होती. त्या वेळी मुलगी हातातून निसटून पहिल्या मजल्यावर पडली. सुमारे १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनी नागरिकांना मुलीला वाचवण्यात यश मिळाले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी बाळाच्या आईला ‘ट्रोल’ केले. स्थानिक चॅनेलनेही संबंधित आईला निष्काळजी म्हटले होते; त्याचप्रमाणे मुलाला वाचवणाऱ्या शेजाऱ्यांचे कौतुक करीत होते. हे ‘ट्रोलिंग’ सहन न झाल्याने रम्या यांनी आत्महत्या केली.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि अफवांचा फटका आता सेलिब्रिटींपर्यंतही पोहोचू लागला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठी फेम ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरवडे याने स्वतःच्या निधनाच्या अफवांमुळे संतप्त होऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोन यूट्यूब चॅनेल्सवरून त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवली गेल्याचा आरोप त्याने केला असून, “१० दिवसांत कारवाई झाली नाही तर मी आत्महत्या करीन,” असा थेट इशाराही त्याने दिला होता. सलग घडणाऱ्या या घटनांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि असंवेदनशीलतेकडे पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षांत सायबर छळाच्या एकूण 9,821 तक्रारी दाखल झाल्या होत्या. मायक्रोसॉफ्टने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार इंटरनेट वापरणाऱ्या दहापैकी चार जण हे सायबर छळाला बळी पडलेले असतात. इंटरनेट युजर्सपैकी 38 टक्के जणांनी सायबर छळाला बळी पडल्याची तक्रार केली आहे. त्यांपैकी बहुतांश जण तरुण आहेत.
कायदा काय सांगतो?
व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर त्यावर कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी किंवा ट्रोलिंग केल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जातो. एखादी व्यक्ती ट्रोलमुळे खूप अस्वस्थ होते. तणावामुळे त्याने आत्महत्या केल्यास कलम 306 अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास ट्रोलिंगचा आरोप असलेल्या व्यक्तीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याव्यतिरिक्त, दंड देखील आकारला जाऊ शकतो.
आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 500 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
बदनामी अंतर्गत त्याच्याकडून नुकसान भरपाईची मागणी करू शकतो. यामध्ये दोन वर्षे कारावास किंवा दंडाची तरतूद आहे.
याशिवाय भारतीय न्याय संहिता कायदा-2023 च्या कलम 356 अंतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली आहे, जी 1 जुलैपासून लागू होत आहे.
यामध्ये सामाजिक स्तरावरही शिक्षेची तरतूद आहे, जसे की फुले व रोपे लावलेली कुंडी घेणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, उद्यानांची स्वच्छता करणे याला सामाजिक स्तरावरही शिक्षा होऊ शकते.
जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा आत्महत्येचा विचार असेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
१) Tele MANAS - 14416, -800-891-4416
२) KIRAN - 1800-5990019
३) NIMHANS - 080-46110007
४) One Life- 78930-78930
५) Jeevan Aastha Helpline - 1800 233 3330
६) Aasra - 9820466728






