एकीकडे विकास साधला जात असतानाच आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे, स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. परंतू ज्या ज्या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन कोटी रुपये खर्च करून ‘महासंस्कृती महोत्सव’ संपन्न झाला त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंतांची खंत एकदा जरी ऐकून घेतली तरी मुख्यमंत्र्यांचा हा उद्देश सफल झाला का? याचे उत्तर आपसुकच मिळेल.
22 डिसेंबर 2023 रोजी शासनाचा एक जीआर निघाला. राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात एक शासन निर्णय कळविण्यात आला. या शासन निर्णयात असे म्हटले होते की, महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, त्याच प्रमाणे स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची माहिती सर्व भावी पिढीला समजावी म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात महोत्सवाचे आयोजन करतांना स्थानिक कला प्रकाराला प्राधान्य द्यावे, तेथील लोककलावंतांचा कार्यक्रमात मान सन्मान करावा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, विविध लोककलेचे सादरीकरणाचे नियोजन करावे, कविता, देशभक्ती गीतांचे कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात यावेत, या महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील इतर प्रांतातील संस्कृती बांचे आदान-प्रदान व्हावे तसेच यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा अनेक सूचना वजा मार्गदर्शन करणारे नियम आणि अटी सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजीच्या ‘शासन निर्णया’ नुसार सर्व जिल्हाधिकारी यांना घालून दिल्या होत्या.

…परंतू स्थानिक कलावंतांना वाऱ्यावर सोडले?
परंतु हा महोत्सव ज्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. तो उद्देश खरोखरच सफल झाला का? याचे आत्मपरीक्षण सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिका-यांनी करण्याची गरज वाटत आहे. याचे कारणही तसेच आहे. जळगांव, नाशिक, धुळे, अहमदनगर, पालघर, धाराशिव या महत्वाच्या जिल्ह्यांत जोरदार असा महासंस्कृती महोत्सव झाला, पण स्थानिक लोककलावंतांना जिल्ह्याधिका-यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्राधान्य दिले नाही. त्यामुळे तेथील लोककलावंतांची खूप निराशा झाली.
सांगलीत झालेल्या महासंस्कृती महोत्सवात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले. ‘आम्हा कलाकारांना राजाश्रय मिळतो आहे’ अशी प्रतिक्रिया सोनालीने महोत्सवात व्यक्त केली. सोनालीच्या कलेचा पूर्ण आदर आम्ही करतो, परंतू राजाश्रयाची खरी गरज ही सोनाली कुलकर्णीपेक्षा आम्हा स्थानिक लोककलावंतांना अधिक आहे आणि नेमकं आम्हालाच या महासंस्कृती महोत्सवात संधी दिली नसल्याची टीका स्थानिक कलाकारांनी केली आहे.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाचा हा पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव पार पडला खरा, परंतू या महोत्सवात सिंधुदुर्गाची संस्कृती कुठेच दिसली नाही. दशावतार, चित्रकथी, कळसुत्री, लेदर पपेट्स, समई नृत्य, चपय नृत्य, गोफ नृत्य, धालो-फुगडी-घोडेमोडणी आदी कोकणच्या कोणत्याच लोककलांचा महोत्सवात समावेश करण्यात आला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक संस्था दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम करतात. त्यांचा कुठेच समावेश नाही. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अत्यंत लाडके आणि नेहमीचे यशस्वी कलाकार यांनाच महोत्सवात संधी मिळाली, अशी भावना सिंधुदुर्गवासियांनी व्यक्त केली. या सर्व पाहुण्या कलाकारांचे जिल्ह्यात स्वागत झाले असले तरी स्थानिक लोककलावंतांना पाच दिवसांच्या महोत्सवात किमान एकदिवस तरी द्यायला हवा होता, अशी तक्रार अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे.
अनेक कलावंतांना आपल्या हक्काच्या लढाईसाठी यामुळे रस्त्यावर उतरावे लागले, तेथील स्थानिक प्रशासनाशी त्यांना वाद घालावा लागला. या स्थानिक कलाकारांचा आलेल्या ‘पाहुण्या’ कलाकारांबद्दल अजिबात आक्षेप नाही. पण शासनाचे अधिकारी जो कलेमध्ये भेदभाव करतात. त्या मानसिकतेला आमचा आक्षेप असल्याचे त्यांचे मत आहे. आम्हाला उपकार केल्यासारखे कार्यक्रम नको आहेत. सन्मानाने निमंत्रित करा, अशी माफक अपेक्षा या स्थानिक कलाकारांची होती आणि आहे.

सेलिब्रिटींसाठी तगड्या मानधनासह रेड कार्पेट, परंतू…?
खरी गडबड तर पुढेच झाली. आतापर्यंत ज्या ज्या जिल्ह्याने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले, ते ‘सेलिब्रिटी’ आणण्याच्या नादात स्थानिक लोककलावंतांना पुरते विसरून गेले होते. सांगली जिल्ह्यात तर एका कला पथकाला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
पण मानधन केवळ दहा हजार रुपये मिळणार, असे सांगितले. आता यावर विचार करण्याची गोष्ट आहे की, प्रत्येक कला पथकात किमान दहा-बारा कलाकार असतात. त्यात जर शाहिरीचा कार्यक्रम असेल तर त्याची वेशभूषाही महागडी असते. मग असा कार्यक्रम घेणे कलापथकांना कसे परवडले असते? मात्र एखाद्या ‘सेलिब्रिटी’ला बोलवायचे असते तेंव्हा तो सांगेल ती रकम द्यायला प्रशासन तयार झाले होते. मात्र लोककलावंतांची दहा बारा हजार रुपयात बोळवण करणे योग्य वाटते का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
सेलिब्रिटी आणून कार्यक्रम खूप मोठा दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण अनेक ठिकाणी कला रसिकांनी पाठ फिरविली. केवळ ढिसाळ कारभारामुळे या कोट्यावधी रुपयांची केवळ उधळपट्टी झाली, अशी तक्रार स्थानिक कलावंतांची आहे, ग्रामीण भागात एखाद्या गावात यात्रेतील तमाशामध्ये केवळ ढोलकीवर थाप जरी पडली की, चार पाच हजार लोक सहज जमतात. इथं मात्र मोठ्या प्रमाणावर निधी आहे. सरकारी यंत्रणा संपूर्ण कामाला ला-गली होती, पण या महोत्सवामुळे कलाप्रेमींना समाधान मिळाले का? असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर नाही असे येईल.

महासंस्कृती महोत्सवात तमाशाला तंबूचा रस्ता दाखवला
तमाशाची महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. जवळपास दोनशे वर्षांपासून लोकशिक्षक, लोकजागृती, समाज प्रबोधनाचे कार्य तमाशा कलावंतांनी केले. दि. 22 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयात तमाशा या कलेचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे या महोत्सवात कुठेही तमाशाला स्थान देण्यात आलेले नाही. मग एवढा भव्य खर्च करूनही कला रसिकांना हा महोत्सव भावला का? याचा आढावा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेण्याची गरज आहे. या ढिसाळ नियोजनाबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या, लोकप्रतिनिधींनी जाहीर टिका सुद्धा केली, सोशल माध्यमातून या उधळपट्टीबद्दल जोरदार टीका झाली. अनेक कलावंतांनी तक्रारी केल्या, परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आणि त्यांचे अधिकारी हे या महोत्सवाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाला महोत्सव पार पडल्यावर आम्ही केवळ झालेल्या कार्यक्रमाचे ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ देण्यापुरते आहोत, असे सांगत आहे. तर मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी म्हणत आहेत की, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावरच महासंस्कृती महोत्सवाची जबाबदारी आहे. त्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एकाही कलेक्टर ऑफिसला बिल दिले जाणार नाही. एकमेकांच्या अंगावर जबाबदारी ढकलणाऱ्या या सांस्कृतिक कार्य खात्याच्या कारभारामुळे मात्र राज्यातील लोककलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. हे मात्र सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते.






