सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको… असे आर्जव एखादा कवी गीतातून करतो किंवा कुणी दूर देशी जाणाऱ्या पाखराला निरोप घेऊन पाठवतो. पक्ष्यांच्या कूजनात खरोखरच अशी ताकद असते का? त्यांच्या गाण्याचे, कूजनाचे ऋतूप्रमाणे वेगवेगळे अर्थ असतात का? सांगलीचे पक्षीतज्ज्ञ शरद आपटे यांनी याविषयी अपार संशोधन केले. तब्बल 359 प्रजातींच्या पक्ष्यांचे आवाज त्यांनी रेकॉर्ड करून तर ठेवलेच, पण त्याचे अभ्यासपूर्ण वर्गीकरण केले. पक्षीनिरीक्षण आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनात ते उपयुक्त ठरत आहे.
पक्षीअभ्यासक शरद आपटे यांना पक्ष्यांच्या आवाजाची भूरळ पडलेली. ते सारखे पक्ष्यांच्या आवाजाचा अर्थ शोधण्यात गढून गेलेले दिसून येतात. त्यांच्या अंगाखांद्यावर अनेक यंत्र जसे की, टेलरमेड कीट पाहायला मिळते. पक्ष्यांच्या भाषेचा अभ्यास करणारा अवलिया म्हणून त्यांची ओळख झालेली. सांगली शहरात त्यांचं वास्तव्य असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची भटकंती सुरूच असते. पक्ष्यांच्या आवाजाचा पाठलाग करत त्यांनी पक्षीशास्त्र समजून घेतलय. पक्षी शोधताना त्यांना काही कथाही सापडत गेल्या. त्या सापडलेल्या कथा ‘कोतवाल’ या पुस्तकातून वाचायला मिळतात. त्यातून त्यांच्या निरीक्षणातील बारकावे कळू लागतात.

कारुण्य कोकीळ
कारुण्य कोकीळ (ग्रे बेलीड ककू) या पक्ष्याविषयी शरद आपटे लिहितात, मी कारुण्य कोकीळ या पक्ष्याचे पिल्लू शिंजीर हा पक्षी वाढवत असल्याचे अनेक वेळा पाहिले आहे. शिंजीर हा पक्षी आपल्या हाताच्या अंगठ्याएवढा असतो. आणि त्याचे घरटे एखाद्या नाजूक फांदीवर लोंबणारा जळमटाचा पुंजका वाटावे असे. त्यात तो शिंजीर कसाबसा जाईल इतकेच भोक. शिंजीर पक्ष्यापेक्षा आकाराने जवळजवळ तिप्पट असणारी ही कुकू पक्ष्याची मादी त्यात जाते तरी कशी आणि अंडी देते तरी कशी हे पण एक कोडेच. ते एकदा असेच सुटले. मादी त्या घरट्यात जात नाही. तर ती बाहेरच लोंबकळते. आपले इंद्रिय घरट्याच्या भोकाला बरोबर भिडवते आणि अंडे चक्क आत फेकते.
अंडी उबवण्यासाठी पक्ष्यांची लबाडी…
कावळा, सातभाई, शिंजीर या पक्ष्यांची मादी दुसऱ्या पक्ष्यांची (कोकिळा, पावशा) अंडी उबवते. त्यांच्या पिलांचे संगोपनही करतात. पावशा पक्ष्याचा एक जातभाई आफ्रिका खंडात आढळतो. त्यांनी अनेक युक्त्या करून स्वतःची अंडी इतर पक्ष्यांकडून उबवून घेतली. त्या संदर्भात लेखक शरद आपटे लिहितात, “आफ्रिका खंडात आढळणारा आमचा एक जातभाई आहे. त्यांनी तर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. सर्वसाधारणपणे सर्व पक्षी अंडी अंतरा – अंतरांनी घालतात याचा फायदा घेत त्यातल्या विशिष्ट पक्ष्याने एक अंडे घातले की, आमच्या जातभाईची मादी त्याच घरट्यात तीन अंडी एकदम घालते. यजमान पक्षी परत येऊन पाहतो तेव्हा त्याला स्वतःच घातलेले अंडे वेगळे दिसते आणि ते वेगळे म्हणून स्वतःचेच अंडे काढून टाकतो आणि आमच्या पक्ष्याची अंडी उबवतो.”

कावळा, सातभाई, शिंजीर
पावसाळा सुरू होण्यापूर्वी राखी सातभाई पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू झालेला असतो. तेव्हा पावशा या पक्ष्यांची घरटी शोधत फिरताना दिसतो. तेव्हा तो पेरते व्हा! पेरते व्हा! असा आवाजही काढतो. त्यातून त्याचं स्थलांतरही कळू लागतं. पावशाचा पावसापेक्षा सातभाई पक्ष्यांचा आणि त्यांच्या घरट्याचा अनेक वर्षापासूनचा सहसंबंध आहे. स्थलांतर करून आलेला पावशा सातभाईच्या घरट्याचा शोध घेतो आणि आपला वंश वाढवित राहतो.
नकलाकार कोतवाल पक्षी
शरद आपटे यांना कोकीळ, पावशा या पक्ष्यांच्या आवाजाचाच वेड लागलय. टेलरमेड कीट घेतलं की, निघाले त्यांच्या मागावर. ते पक्ष्यांच्या आवाजाविषयी छान लिहितात,“पक्ष्यांनी आखलेल्या सीमा त्याला ना कुंपण, ना खंदक, ना प्राण्यासारखा मलमुत्राचा वापर. या सीमा आवाजांनी बांधल्या जातात. त्यांना आवाजाचे अदृश्य कुंपण असते”
खाटीक, कोतवाल, चंडोल पक्षी स्वतःच्या आवाजाने स्वतःचा परिसर सुरक्षित ठेवतात. या पक्ष्यांनी इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही केल्याची ‘कोतवाल’ पुस्तकात नोंद सापडते. लेखक लिहितात, “कोतवाल पक्ष्याने मांजराच्या फिसकारण्याच्या आवाजाची नक्कल केली. कोतवाल पक्ष्याने काढलेला ट्रिक असा आवाज टिटवीच्या ओरडण्याचा होता. कोतवाल पक्ष्याची स्मरणशक्ती उत्तमच आहे”
कोतवाल केवळ पक्ष्यांचीच नाही तर प्राण्याच्या आवाजाचीही नक्कल करतो हे नोंदीतून कळू लागते.

पक्षीगान… का ? केव्हा ? कोठे ?
“कोतवाल पक्षी नकला करण्यात तरबेज आहे. तो शिकारी पक्ष्याच्या आवाजाची नक्कल करतो तेव्हा इतर पक्षी धोका समजून निघून जातात आणि कोतवाल उपलब्ध अन्नावर ताव मारतो. लेखक आणखी पुढे जाऊन लिहितात की, “काही गटातील पक्षी एकाच वेळी अनेक आवाज करू शकतात. इतकेच नाही तर ते एकाच वेळी षड्ज आणि पंचमात गावू शकतात. यालाच टू व्हाईस थेरी म्हणतात” यासाठी लेखकाने पांढऱ्या भुवईचा धोबी या पक्ष्याच्या गाण्यातील एकाच वेळी एक स्वर लो – फ्रिक्वेन्सीचा तर दुसरा हाय – फ्रिक्वेन्सीचा यांविषयी संशोधन केले आहे.
पक्ष्यांच्या आवाजाच्या नकलेची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. ती फार मजेशीर सुद्धा आहेत. लेखक ‘लायर बर्ड’ चे उदाहरण देतात. “पक्ष्यातील नक्कलवीर म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘लायर बर्ड’ उर्फ ‘खोटारडा’ जगप्रसिद्ध आहे. तो इतर प्राण्या – पक्ष्यांच्या नकला तर करतोच, पण कॅमेऱ्याच्या शटरपासून रुग्णवाहिकेच्या सायनरपर्यंत सगळ्या मानवनिर्मित आवाजांची नक्कलसुद्धा हा पक्षी हुबेहूब करतो. या नकलांचा उपयोग मादीला घाबरवून तिला आपल्या अंकित करण्याचे त्याचे कसब नुकतेच उजेडात आले आहे.”
कोतवाल, खाटीक, चंडोल या पक्ष्यांच्या आवाजाविषयी नवल आणि कुतूहलही वाटायचे. पांढऱ्या भुवईच्या धोबीने एकाच वेळी दोन प्रकारचे आवाज काढून त्यातील संशोधनाला जागा मोकळी करून दिली. लायर बर्डने तर मानवनिर्मित आवाजांची हुबेहूब नकल करून एक आव्हानच पुढे उभे केले आहे. लेखकाला सांगायचे आहे की, “समजा, शामा पक्ष्याने हुबेहूब सुभग पक्ष्याच्या गाण्याची नक्कल केली तर सुभग पक्ष्याची मादी त्याच्याकडे आकर्षित होते का ? तसे होत नाही. मादीने तशी चूक केली तर तिला ती महागात पडते. पण याच नकलेला नर फसायची शक्यता असते.

कोतवाल
शरद आपटे यांनी अनेक पक्ष्यांच्या आवाजांचे ध्वनीमुद्रण केले आहे. त्यावर संशोधनाचे कामही सुरू आहे. ब्रदर अन्तोनिओ नवारो, डॉ. इरच भरूचा, पी. एस. सिवाप्रसाद यांच्याप्रमाणे ते काम करताहेत याचा आनंद तर आहेच. पण आजचे पक्षीनिरीक्षक, फोटोग्राफर या ध्वनीमुद्रित आवाजांचा दुरुपयोग करून पक्षीजीवनाला हानी पोहचवत आहेत हे विसरून चालणार नाही. डॉ. इरच भरूचा याविषयी सविस्तर लिहितात, आजचे पक्षीनिरीक्षक, पक्षी – फोटोग्राफर त्याच प्रजातीच्या पक्ष्यांचे आवाज त्यांना ऐकवून आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्यांचे फोटो काढणे सहज – साध्य करून घेतात. ही क्रूर थट्टा आहे. ‘एखादा पक्षी त्याचाच आवाज ऐकून त्याकडे का आकर्षित होतो?’ याचा साधा विचारही केला जात नाही. पक्षी जेव्हा त्याच्याच प्रजातीचा आवाज त्याच्याच परिसरात ऐकतो तेव्हा दुसरा प्रतिस्पर्धी आपल्या इलाख्यात आला आहे असे समजून त्याच्याशी दोन हात करायच्या हेतूने, ‘तो आवाजाचा करता कोण?’ हे शोधत आलेला असतो. त्यावेळी त्याला अन्न मिळवणे, पिल्लांचे संगोपन करणे हे सर्व सोडावे लागते आणि हा त्याच्यासाठी मोठा धोका असतो. असे जर वारंवार होऊ लागले तर आपला इलाखा आता दुसऱ्याने काबीज केला असे समजून नर तो परिसर सोडतो. आपोआपच तेथील वीण थांबते.
प्लेबॅक हे शास्त्रीय अभ्यासासाठी वापरायचे विशिष्ट तंत्र आहे. ते त्या पद्धतीनेच वापरले पाहिजे. आज पक्ष्याला बोलवायचे ; का? – तर सहज फोटो मिळावा!… हे सरासर चुकीचे आहे आणि निषिद्धपण आहे.
पक्षी – अभ्यासात पक्ष्यांचे आवाज हे फार महत्त्वाचे साधन आहे. त्याचा उपयोग हा केवळ त्यांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन यासाठीच झाला पाहिजे. प्लेबॅक करून पक्ष्यांना आकर्षित करून त्यांना पाहणे, त्यांचे फोटो काढणे हे घातक आहे.
कोणत्याही पक्ष्याचा आवाज ही त्याची ओळख असते. इत्या आवाजांची केलेली नक्कल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यातून इतर पक्ष्यांचाही अभ्यास करता येतो. पण माणसाने पक्षी जगतात केलेली लुडबुड त्यांच्या जीवावर बेतत आहे. अपघातात जेवढे पक्षी मरताहेत त्यांच्यापेक्षा जास्त माणसाच्या अशा अघोरी वागण्याने पक्षी मरताहेत. ही अदृश्यपणे घडणारी प्रक्रिया आहे. निसर्गातली लुडबुड आता माणसाने थांबविलीच पाहिजे !






