- शाहीर अमरशेखांची कन्या, नामदेव ढसाळांच्या पत्नी आणि मराठी साहित्यातील बंडखोर कवयित्री मल्लिका अमरशेख सध्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.
- ही बातमी कळताच त्यांच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच घेतली आहे.
- मात्र तरीही मलिल्का अमरशेखांनी ‘नामदेवच्या नावावर इतके लोक दुकान थाटून बसले आहेत आणि त्याचे फायदे घेतात. पण नामदेवचे कुटुंब कसे राहते, ते जगत आहेत की मरतायत, याचे कोणालाही देणे पडले नाही’ अशी खंत व्यक्त केली आहे.
काही महिन्यांपूर्वीची ही घटना… ‘चल हल्ला बोल’ हा दलित पँथर आणि नामदेव ढसाळांच्या जीवनपटावर आधारित मराठी सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे परिक्षणासाठी गेला आणि त्याच्या काही सदस्यांनी चित्रपटातील ढसाळांच्या एका कवितेवर आक्षेप घेत ‘’कोण नामदेव ढसाळ?’’ असा प्रश्न निर्माता-दिग्दर्शकांना विचारला. झालं… ‘रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो’ या नामदेव ढसाळांच्या कवितेप्रमाणे तमाम महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, कवी, सिने-नाट्य अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते या प्रश्नावर पेटून उठले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ‘’कोण नामदेव ढसाळ?’’ या शिर्षकाखाली नामदेव ढसाळ लोकांपुढे मांडायचं ठरवलं आणि ढसाळांच्या कविता, साहित्य, आठवणी यांचा जागर महाराष्ट्रभर सुरू केला. याशिवाय, राज्यात दरवर्षी नामदेव ढसाळांच्या नावाने ‘सारं काही समष्टी’ सारखं साहित्य संमेलन, कवी संमेलन वगैरे सुरूच असतात. नामदेव ढसाळांच्या आयुष्यावर किमान तीन चित्रपट येऊ घातले आहेत. थोडक्यात काय तर राज्यात नामदेव ढसाळ या फायरब्रँडचा आजही करिष्मा आहे.

हे सगळं सुरू असतानाच नामदेव ढसाळांच्या पत्नी आणि मराठी साहित्यातील बंडखोर कवयित्री मल्लिका अमरशेख यांनी अत्यंत उद्विग्न होऊन चार दिवसांपूर्वी आपली खंत व्यक्त केली आणि सबंध महाराष्ट्र हळहळला… एका व्हिडीयोमध्ये मल्लिका म्हणाल्या,
‘’दुःख एवढेच आहे की ज्यांनी नामदेव ढसाळसारखा झंजावात जन्माला घातला, त्याच्या नावावर इतके लोक दुकान थाटून बसले आहेत आणि त्याचे फायदे घेतात. पण नामदेव ढसाळांचे कुटुंब कसे राहते, ते जगत आहेत की मरतायत, याचे कोणालाही देणे पडले नाही, याची खंत वाटते. नामदेवने जे केले ते त्याचे कर्तव्य होते. आम्ही असे म्हणत नाही की त्याने जे केले त्याचे आम्हाला रिटर्न्स पाहिजेत, पण माणुसकी म्हणून तरी त्यांनी बघायला पाहिजे आम्हाला…’’
नोबेल पुरस्काराच्या तोडीचा मराठीतला धगधगता कवी आणि बंडखोर, लढाऊ लेखक नामदेव ढसाळच्या पत्नीचे म्हणजे मल्लिका अमरशेख यांची ही खदखद… मल्लिका अमरशेख जरी नामदेवच्या पत्नी असल्या तरी त्यांचे स्वत:चे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी शाहीर अमरशेखांची कन्या असलेल्या मल्लिका अमरशेखांना मराठी साहित्यातील एक बंडखोर कवयित्री म्हणून ओळखलं जातं. ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ या त्यांच्या आत्मचरित्रामुळे साहित्यविश्वास अक्षरश: बॉम्ब फुटला होता इतकं हे पुस्तक गाजलं.
आपल्या साहित्यातून समाजव्यवस्थेतल्या भ्रामक संकल्पना, पक्षपाती रूढी-परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढणाऱ्या मल्लिका अमरशेख या गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी आहेत आणि त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याच्या उद्वेगातून त्यांनी हे वरील विधान केले आहे.
मल्लिका अमरशेख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाषणाची लिंक :
https://x.com/sunainaholey/status/2011460455630610648?s=12&t=N5sZmTt2OrY7SmVqa8o6pA
मुख्यमंत्र्यांनी मल्लिका अमरशेखांना व्हीडिओ कॉल केला आणि म्हणाले…
मुंबईत राहणाऱ्या मल्लिका अमरशेख या काही महिन्यांपासून आजारी असून त्यांच्यावर अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्याचे लक्षात आल्यानंतर नानाजी देशमुख प्रतिष्ठानतर्फे त्यांना मदत केली जात होती. मात्र ही मदत अपुरी पडत असल्यामुळे प्रतिष्ठानतर्फे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच मल्लिका अमरशेख यांच्याशी व्हीडिओ कॉलवर संवाद साधला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असता मल्लिका ढसाळ म्हणाल्या, प्रकृती काही बरी नाही. नामदेवच्याच मार्गाने जाणार असे वाटते. त्यावर फडणवीस म्हणाले, नाही नाही तुम्हाला काही होऊ देणार नाही. आम्ही सगळे आहोत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि आम्ही सगळे तुमची नीट काळजी घेऊ. तुम्ही कशाचीही चिंता करू नका. नामदेवरावांचे अजून खूप काम बाकी आहे, ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे.
मल्लिका ढसाळ म्हणाल्या, दुःख एवढेच आहे की नामदेवच्या नावावर इतके लोक दुकान थाटून बसले आहेत आणि त्याचे फायदे घेतात. पण नामदेव ढसाळांचे कुटुंब कसे राहते, ते जगत आहेत की मरतायत, याचे कोणालाही देणे पडले नाही, याची खंत वाटते.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही याचे अजिबात दुःख वाटून घेऊ नका. मी स्वतः लक्ष देणार आहे. आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. मी स्वतः पर्सनली लक्ष घालत आहे. तुम्ही बिलकुल काळजी करण्याचे कारण नाही. नामदेव ढसाळ असो किंवा तुम्ही असाल, तुमच्या कुटुंबाचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे कोण काय करत आहे, हे विसरून जा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा, असा धीर फडणवीस यांनी दिला.
‘देवाभाऊं’नी शब्द पाळला! मल्लिका अमर शेख यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द काही तासांतच कृतीत उतरला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सूचनेनुसार डॉक्टर व सदस्यांची टीम थेट मल्लिका अमर शेख यांच्या घरी पोहोचली. टीमने त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली आणि रुग्णालयातील प्रलंबित बिल तसेच पुढील आवश्यक उपचारांची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमार्फत स्वीकारली जाईल, असे स्पष्ट केले. ‘बिलाबाबत कोणतीही चिंता करू नका,’ असा दिलासा देण्यात आला.
निवडणुकीचे वातावरण, प्रचंड कामाचा व्याप आणि राजकीय जबाबदाऱ्या असतानाही एका ज्येष्ठ साहित्यिकेच्या हाकेला तातडीने प्रतिसाद देत मदत पोहोचवणे, हे देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील प्रशासनाचे ठळक उदाहरण मानले जात आहे. नामदेव ढसाळ, लोकशाहीर अमर शेख आणि मल्लिका अमर शेख यांचे साहित्य व सामाजिक योगदान जपण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
व्हिडीओ संदेशातून मल्लिका अमरशेखांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुख्यमंत्र्यांची मदत मिळाल्यानंतर एका व्हिडीयोच्या माध्यमातून मल्लिका यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्या म्हणाल्या,’’आजच्या काळात शब्द देऊन तो प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व दुर्मिळ आहे. मात्र निवडणुकीच्या धावपळीतही दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे,’
(मल्लिका अमर शेख)
मल्लिका अमर शेख यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना काही दाहक वास्तवही मांडले. ‘नामदेवजींनी ज्या दलित पँथर सारख्या क्रांतिकारी चळवळीला जन्म दिला, त्या चळवळीतील अनेकांनी या संकटात साधी विचारपूसही केली नाही. मात्र लोकशाहीर अमर शेख यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाची जाणीव ठेवून मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष दिले,’ असे त्या म्हणाल्या.
‘’मी नामदेवच्याच मार्गाने जाणार’’ असं मल्लिका का म्हणाल्या?
मुख्यमंत्र्यांशी बोलताना मल्लिका यांनी ‘मी नामदेवच्याच मार्गाने जाणार’ असे सांगितले. नामदेव ढसाळ हे एक कवी म्हणून, राजकारणी म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि सामाजिक विश्लेषक म्हणून सगळ्या भारताला माहीत आहेत. त्यांच्या कवितेचा लहेजा आजही अनेक क्रांतिकारी विचारांच्या तरुणांवर अधिराज्य गाजवतो आहे.
सगळं आयुष्य नामदेवांनी समष्टीसाठी वाहून दिलं. त्यामुळेच आयुष्याच्या शेवटी त्यांनी स्वत:जवळ काहीच तजवीज केली नव्हती. मायस्थेनिया ग्रेव्हिस या दुर्धर आजाराने ते ग्रस्त होते. अनेक दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. पुढे नामदेव ढसाळ हे कॅन्सरच्या विकाराने आजारी पडले. आयुष्यभर परिस्थितीशी लढणारा हा योद्धा शेवटच्या काळात दुर्धर अशा आजाराशी लढत होता सगळ्या गोष्टींची सोंगे आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही.
सामान्य माणसासारखा विचार कधी ढसाळांनी केलाच नव्हता. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पैसे साठवावे आणि मस्तपैकी आयुष्याची संध्याकाळ मौजमजेत घालवावी, असं त्यांना वाटण्याचं कारणही नव्हतं… कुणासमोर हात न पसरणारे ढसाळ परिवाराचे हात त्यावेळी आर्थिक मदतीच्या अपेक्षेत होते. महाराष्ट्र सरकारनेदेखील त्यावेळी या योद्ध्याची अगतिकता समजून घेऊन त्यांना 7 लाखांची मदत जाहीर केली होती, सिद्धीविनायक ट्रस्टनेदेखील 2 लाख रुपये दिले होते. अमिताभ बच्चन, सलीम खान यांनी आर्थिक मदत केली होती.
काट्यांवरून चालणाऱ्या मल्लिका…
संयुक्त महाष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख यांच्या घरी 16 फेब्रुवारी 1957 रोजी मल्लिका यांचा जन्म झाला. कोकणी मुसलमान असलेल्या शाहीर अमरशेखांनी कुसुम जयकर ह्या हिंदू कन्येशी विवाह करून क्रांतिकारी पाऊल उचलले.

कवितांमधून, नाट्यमेळाव्यांमधून नवनिर्मिती करताना स्वतःच्या मुलीवरही पुरोगामी संस्कार केले. सांस्कृतिक, वैचारिक चळवळीचं केंद्र असणार्या मुंबईतील त्यांच्या घरात सतत कवी, विचारवंत, गायक, कलाकारांचा राबता असे. घरात पुरोगामी विचारसरणीचे वातावरण, त्यामुळे सतत शब्दांची, विचारांची आणि माणसांची वर्दळ असे. या सगळ्या गोष्टी, मल्लिका त्यांच्या लहानपणी टिपून घेत असे. त्यामुळे मल्लिकाने शालेय जीवनापासूनच कविता करायला सुरुवात केली. नृत्य, अभिनय, संगीत ह्या कला जोपासण्याचा प्रयत्न केला.
‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’
दलित पँथरची स्थापना करणारे प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या प्रेमात पडल्यानंतर मल्लिका आणि नामदेव यांचा विवाह झाला. पण नामदेव ढसाळ म्हणजे सुधारणावादी नवविचाराने भारावलेला अस्थिर झंझावात. त्यामुळे या दोघांचा संसार म्हणजे केवळ विचारांवर आधारलेला विश्वासू प्रपंच. दोघेही आपापले विचारस्वातंत्र्य जपणारे. दोघेही प्रतिभावंत कवी. सडेतोड भूमिका घेताना तडजोड नाकारणारे.
त्यामुळे नुसत्या प्रेमानं पोट भरतं असं म्हणण्याचा समंजसपणा दाखवला तरी ते भरत नाही ही वस्तुस्थिती होती. आणि याचा प्रत्यय या दोघांच्या संसारातदेखील येत होता. त्यांच्यात शाब्दिक चकमकी झडू लागल्या आणि मग त्यातून येणार्या उद्विग्नतेतून हे व्याकूळ मन मला उद्ध्वस्त व्हायचंय म्हणू लागलं.
चळवळीतल्या नेत्यांचं कौटुंबिक सहजीवन सांसारिक आणि कलावंताच्या मनातील अनेक चढउतार, मानसिक ताणतणाव या सर्व भावना मल्लिका अमरशेख यांच्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ या आत्मकथनामधून मधून अतिशय पारदर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत. हे आत्मकथन खूप गाजलं; पण त्याअगोदर आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणारी निर्भीड कवयित्री म्हणून मल्लिका अमर शेख हे नाव साहित्यवर्तुळात प्रस्थापित झालं होतं.
शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटकं, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ मल्लिका लेखन करत आहेत. वाळूचा प्रियकर, देहऋतू, महानगर आणि माणूसपणाचं भिंग बदलल्यावर या संग्रहातील त्यांच्या कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्था, लिंगभेद न पाळता विचारांची बंडखोरी करणारी कवयित्री म्हणून त्यांची समीक्षकांनी नोंद घेतली आहे. आपल्या मतांची पायमल्ली होऊ न देता आपलं विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखकानं जपलं पाहिजे या मताचा आदर करणारी त्यांची कविता म्हणूनच आपल्या अंगभूत वेगळेपणाने उठून दिसते.






