- स्वत: महात्मा गांधी तिला भेटले आणि त्यांनी तिला स्वातंत्र्य चळवळीसाठी निधी जमवण्यासाठी तिचा कार्यक्रम मागितला, तिने एका अटीवर हा कार्यक्रम दिला, स्वत: गांधीजींनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. तिच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी लोटली. तब्बल 24 हजारांचा निधी जमा झाला. अचानक उद्भवलेल्या एका तातडीच्या कामामुळे गांधीजी या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. ती चिडली, तिनं निम्मेच पैसे गांधीजींच्या दूताकडे दिले.
- ज्या काळात सरकारी नोकरांचा महिन्याचा पगार फक्त 5 रूपये होता तेव्हा तिला एका संस्थानिकाने गाण्याच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असताना दिलेली बिदागी होती एक लाख रूपये…
- एका राजाने तिला कार्यक्रमाला बोलावले, तिने एकटीसाठी अख्खी रेल्वेगाडी बूक करायला लावली. तिला एकटीला घेऊन अकरा डब्यांची ही स्वतंत्र रेल्वेगाडी कार्यक्रमाला गेली. तिचा ताफा 120 लोकांचा असायचा.
- तिला उंची राहणीमानाची आवड होती. तिचा हात सढळ होता. तिनं आपल्या लाडक्या मांजराच्या बारशाला त्याकाळी 22 हजार रूपयांची पार्टी दिली होती.
- गवर्नर जनरलची घोडागाडी कलकत्याच्या रस्त्यावरून जाताना इतरांना त्या रस्त्यावरून घोडागाडी न्यायला बंदी होती. फक्त उच्च ब्रिटीश अधिकारी आणि संस्थानिक यांनाच या शहरात घोडागाडीतून फिरण्याची परवानगी होती. ती मुद्दाम घोडागाडीतून फिरायची. त्यासाठी तिला एका वेळी एक हजार रूपये दंड केला जायचा. ती दररोज हा दंड भरायची.
"गौहर जान म्हणतात मला!"
कोण होती ती…आणि आज तिची आठवण काढण्याचे काय निमित्त आहे? तर तिचं नाव आहे गौहर जान… भारतातील पहिल्या ‘रेकॉर्डिंग सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी गौहर जान.. आणि आज तिची 152 वी जयंती. 26 जूनला जन्मलेल्या गौहर जान याचं खरं नाव एंजलिना योवर्ड असं होतं. आपल्या गाण्यांचं ध्वनीमुद्रण करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गायिका होत्या. त्यामुळेच त्यांना भारताच्या पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टार असा किताब मिळाला होता.
आयुष्यात त्यांच्या वाट्याला यश आलं खरं. पण, त्याआधी त्यांच्यावर एक आघात झाला होता. वयाच्या 13व्या वर्षी गौहर जान यांचं लैंगिक शोषण झालं होतं. त्यानंतर या आघातातून सावरत त्यांनी संगीत क्षेत्रात आपली कामगिरी सुरु ठेवली. गौहर जान यांच्या संघर्षगाथेविषयी ‘माय नेम इज गौहर जान’ या विक्रम संपत लिखित पुस्तकात बरीच माहिती देण्यात आली आहे.
भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी प्रथम गायिका हा सन्मान गौहर जानला लाभला. ती भारताची पहिली गानकोकीळा ठरली. तिच्या गाण्यांच्या ६०० ध्वनीमुद्रीका निघाल्या. प्रत्येक ध्वनीमुद्रीकेच्या शेवटी ती ठसक्यात म्हणायची, "गौहर जान म्हणतात मला!"
संबंधित लेख वाचा: 1) आफ्रिकेच्या ‘घाना’मध्ये महात्मा गांधींएवजी बाबासाहेबांच्या पुतळ्याची मागणी…! |
बालगंधर्वांसह अनेकांनी तिच्या चाली उचलल्या. तिचे सहीसही अनुकरण करणारे शेकडो कलावंत होते. तिच्या एका कृपादृष्ठीसाठी राजे, महाराजे, संस्थानिक, सावकार, व्यापारी आणि ब्रिटीश अधिकारी जिव टाकत होते. ती भारतातली सर्वाधिक लोकप्रिय गायिका होती. तिच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करीत असत. तिला जगभरच्या दहा भाषा येत होत्या. ती त्यातली तज्ज्ञ मानली जात असे. ती त्या सर्व भाषांमधली गाणी गात असे. तिचा व्यासंग अफाट होता. ती पहिली भारतीय मॉडेल होय. तिची छायाचित्रे आर्मेनियातल्या आगपेटीच्या वेष्ठनावर झळकली होती.
भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी प्रथम गायिका
गायन क्षेत्रात गौहर जानचं योगदान अतुलनीय आहे. तिने जवळपास 20 भाषांमध्ये ठुमरीपासून भजनांपर्यंत प्रत्येक प्रकारची गाणी गायली होती. दक्षिण आशियातील गौहर पहिली गायिका ठरली जिच्या गाण्यांचं ध्वनीमुद्रण ग्रामोफोन कंपनीकडून करण्यात आलं होतं. 1902 ते 1920 यादरम्यानच्या कालखंडात द ग्रामोयफोन कंपनी ऑफ इंडियाकडून गौहरच्या आवाजातील हिंदुस्तानी, बंगाली, गुजराती, मराठी, तामिळ, अरबी, फारसी, पश्तो, इंग्रजी आणि फ्रेंच गाण्यांच्या डिस्क सर्वांच्या भेटीला आणण्यात आल्या होत्या.
इलिन अँजेलीना इव्हॉर्ड ही गौहर जान कशी झाली?
गौहर जानचा जन्म आझमगढमध्ये झाला जे त्यावेळी युनायटेड प्रांतात होते. तिची आज्जी हिंदू होती आणि आजोबा ब्रिटीश, वडील एमेनियन ख्रिश्चन. तिचं खरं नाव इलिन अँजेलीना इव्हॉर्ड. नंतर घरच्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि आयुष्यभर इस्लामच्या पाइक बनून राहिल्या. तिला भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख होती. ती जरी मुस्लीम असली तरीही तिच्या बहुतेक रचना कृष्णभक्तीवर आधारित आहेत आणि त्यात इतरही भक्तीगीतांचा समावेश आहे. गौहर जान जेव्हा सहा वर्षांच्या होती तेव्हा आईवडील वेगळे झाले, त्यानंतर ती आपल्या आईबरोबर बनारसला राहायला गेली.
तेव्हा तिची आई, व्हिक्टोरिया येवॉर्डने इस्लाम धर्म स्वीकारला, धर्मांतरण केले आणि ‘बडी मालका जान’ असे नाव घेतले. अशाप्रकारे लहानगी इलिन बनली गौहर जान. तिची आई’ बडी मालका जान लोकप्रिय कथक नृत्यांगना होती. तिची आई ही तवायफ होती. ती ख्यातनाम कवयित्री होती. तिचा मलिका जान या नावाने एक कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. ती आयकर भरणारी श्रीमंत भारतीय नागरिक होती. आधी तिने अनेकदा गरिबीचे चटकेही सोसले होते. ती उत्तम गायिका आणि नर्तिकाही होती. तिने अनेक विवाह केले. ती प्रतिष्ठीत तवायफ होती.
बनारससारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या शहरामध्ये राहिल्यामुळे लहानग्या गौहर जानला नृत्य साहित्य आणि संगीत ह्या सगळ्यात निपुण होण्यास मदतच झाली. त्यानंतर ते कलकत्त्यात स्थायिक झाले, त्यांना नवाब वाजिद अली शाहच्या दरबारात आश्रय मिळाला. नवाब वाजिद अली शाह स्वत: उत्कृष्ट संगीतकार आणि गीतकार होते.
गौहर जान वयाच्या 14व्या वर्षी आपल्या पहिल्या संगीत मैफिलीत दरभंगा राज (बिहार) च्या शाही दरबारात गायल्या. तिची पहिलीच अदाकारी इतकी उत्तम होती की त्यानंतर तिला वारंवार अशा शाही मैफिलींसाठी आमंत्रित केले जाऊ लागले आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि तिला सगळे ‘गौहर जान कालकत्तावाली’ ह्या नावाने ओळखू लागले.
तिने तिच्या संगीत प्रवासात अनेक भाषेत गाणी गायली आणि रेकॉर्ड केली. त्यात इंग्रजी, फ्रेंच आणि पश्तोसह 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये तिने जवळपास 600 गाणी रेकॉर्ड केली. ह्याव्यतिरिक्त ठुमरी, दादरा, कजरी, होरी, तराना, रवींद्र संगीत आणि भजन ह्यातही ती निपुण होती. तिची राग भैरवी वर आधारित प्रसिद्ध ठुमरी - ‘ रसके भरे तोरे नैन’ ही प्राचीन रचना खूप गाजली इतकी ती मंत्रमुग्ध करणारी होती.
‘ग्रामोफोन गर्ल’ बनण्यामागची रंजक कथा
1902 साली, एका ब्रिटिश ग्रॅमोफोन कंपनीने सहा महिन्यांसाठी स्थानिक कलाकारांची गायकी रेकॉर्ड करण्याचा प्रयोग केला. तेव्हा अमेरिकन साउंड इंजिनियर फ्रेड गयसबर्ग यांनी गौहर जानला 78 आरपीएम डिस्क रेकॉर्ड करण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे ती उपमहाद्वीपातील पहिली रेकॉर्डिंग करणारी गायिका ठरली. त्यामुळे तिला ‘द ग्रॅमोफोन गर्ल’ ही उपाधी दिली गेली. तिला 78 आरपीएम डिस्कच्या रेकॉर्डिंगसाठी तासभराचा खयाल ३ मिनिटांत सादर करायचा होता. 
त्यासाठी तिने एक अनोखी शैली शोधली आणि आपल्या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी, राग जोगिया गाण्याचा निर्णय घेतला आणि सुंदर रीतीने फुलवला. ह्याचा परिणाम म्हणजे गायन अगदी भावस्पर्शी झाले आणि संपूर्ण रेकॉर्डिंग उत्साहात पार पडले. अशाप्रकारे पॉपचा जन्म झाला. त्याकाळी तिच्या प्रत्येक रेकॉर्डिंगच्या अंती वरच्या पट्टीच्या आवाजात “माझे नाव गौहर जान आहे!” अशी लकेर घेतलेली असे, त्यामुळे रेकॉर्डचा गायक कोण हे ओळखणे सोपे होई.
ख्यालसंगीतची खोली आणि विस्तार लक्षात घेता असा तीन मिनिटांचा शॉर्टकट वापरून रेकॉर्डिंग केले गेले म्हणून तेव्हाच्या प्रस्थापित गायकांनी ह्यावर सडकून टीका केली, परंतु गौहर जानने तिकडे मुळीच लक्ष दिले नाही. सदरीकरण उत्तम व्हावे ह्यासाठी आपली वेगळी शैली निर्माण केली. त्यानंतर प्रसिध्द सरोद वादक उस्ताद अमजद अली खान सहित इतर अनेक संगीतकारांनी ह्याचा स्वीकार केला. त्याकाळी भारतीय शास्त्रीय संगीतात ज्यांचे वर्चस्व होते अशा पुरुषांनी संगीत क्षेत्रात रेकॉर्डिंग करणे म्हणजे कलेच्या प्रांतात तांत्रिक हस्तक्षेप मानून रेकॉर्डिंगचा तिरस्कार केला, परंतु तवायफ आणि इतर दरबारी पुढे आले आणि त्यांनी ह्या तंत्राचा खुल्या दिलाने स्वीकार केला.
गौहर जान…देशातली सर्वात नामवंत तवायफ
तिचा पहिला प्रियकर अमृत नायक हा गुजराती होता. त्याने शेक्सपियरची सर्व नाटके उर्दूत आणली. तो त्या काळातला प्रचंड लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक होता. त्याच्यासाठी गौहर जान कलकत्ता सोडून मुंबईत आली. पण महिनाभरातच रंगमंचावर प्रयोग सादर करत असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गौहर जान बेघर झाली. तिच्यावर फिदा असलेले असंख्य संस्थानिक होते. ते तिला दरबारची गायिका बनवित. ती अनेकांकडे राहिली. ती देशातली सर्वात नामवंत तवायफ होती.
ती मुक्तपणे जगली. मस्तीत जगली. ती लहरी होती. विक्षिप्त होती. पण ती कलावंत म्हणून महान होती. संगीताशी ती एकनिष्ठ होती. ती एका संस्थानिकाकडे असताना तिचे गाणे ऎकायला दस्तुरखुद्द व्हाईसरॉय लार्ड आयुर्विन आले. ते तिच्या गाण्यावर बेहद्द खुष झाले. त्यांनी तिची पदके बघताना तिच्या छातीला हात लावला. ती बावरली. मात्र ते संस्थानिक तिच्यावरच खवळले. व्हाईसरॉय लार्ड आयुर्विनचं ते भर दरबारात काहीच करू शकत नव्हते. तिचा काहीच दोष नसताना तिलाच दोषी ठरवण्यात आले. तिची दरबारातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली.
इतकं असूनही तिची कबरसुद्धा बांधायला कोणी कोणी नव्हते
तिला अनेकांनी फसवले. अडकवले. तिला कोर्ट कचेर्यात गुंतवले. निर्धन केले. ती खूप रडली. हादरली. चंचल बनली. तिला नैराश्याने घेरले. तिला पुढे गरिबीचे खूप खूप चटकेही सोसावे लागले. खुद्द तिच्या जन्मदात्या बापाने कोर्टात साक्ष द्यायचे तिच्याकडे नऊ हजार रूपये मागितले. शेवटी ती म्हैसूर दरबारची राजगायिका होती. तिला 500 रूपये महिना वेतन होते. त्यात तिचे भागत नव्हते. ती खूपच खर्चिक बनलेली होती.
ती गेली तेव्हा एकटी होती. अश्रू गाळायला तिच्याजवळ कोणीही नव्हते. तिची कबरसुद्धा बांधायला कोणी कोणी नव्हते. तिने भारपूर इस्टेट मागे ठेवली असेल या समजुतीने ती गेल्यावर अनेकजण तिच्या इस्टेटीच्या मालकीसाठी तिच्यावर हक्क सांगायला पुढे आले.
जाताना तिच्या तोंडी गालिब होता,
"कसम जनाजे पे आनेकी मेरी खाते हैं गालिब
हमेशा खाते थे जो मेरी जान की कसम आगे!"
जे आता माझ्या अंत्ययात्रेला अग्रभागी आहेत, तेच पूर्वी माझ्या जिवावर ऊठले होते.






