- संजना खंडारे
गांधीलपुरा भागात असलेल्या ‘त्या’ वस्तीत शिरल्यावर कुणाला संशयदेखील येणार नाही की इथे कुंटणखाना चालतो. दिवस असो वा रात्र इथं कुणी खिडकीतून किंवा दरवाजाबाहेर उभं राहून ‘एsss शुक शुक’ असे आचकट विचकट हावभाव नाही करत… तंग कपड्यात कोणी उभं राहत नाही, या वस्तीत असलेल्या वेश्यालयाला रोषणाई नाही किंवा रस्त्यावर ‘गिऱ्हाईक’ घेऊन येण्यासाठी कोणी दलालही दिसत नाही… इतर वस्त्या असतात तशीच जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यात मुस्लीमबहुल भागातील ही एक शांत वस्ती…
जवळपास दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळापासूनची. मात्र आज या वस्तीतल्या सुमारे 100 पेक्षा अधिक वेश्यांच्या कुटुंबावरचं डोक्यावरचं छप्पर हिरावून जातयं की काय अशी सतत टांगती तलवार… हे संकट गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्यावर घोघावतयं… पोलिसांकडून नाही, प्रशासनाकडून नाही, धार्मिक संघटनांकडून नाही… मग कोण आहेत ही लोकं जी या वेश्यांना घराबाहेर हुसकावून लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत…?
(ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेर शहरातील 'गांधिलपुरा वेश्यावस्ती.)
कविता (नाव बदललं आहे)… एक 34 वर्षांची वेश्या आणि दोन मुलींची आई
‘’त्या लोकांच म्हणणं आहे की या वस्तीमुळे त्यांच्या मुलींशी लग्न करायला कोणी तयार होत नाही. पण, खरी गोष्ट तर ही आहे की त्यांच्या मुलींना दोन-दोन लेकरं आहेत. मग असे खोटे नाटे आरोप आमच्यावर का करतात? आमच्याकडे कस्टमर येऊ नये म्हणून ते रस्त्यातच त्यांना अडवतात. त्यांची लूटमार करतात, त्यांना बेदम मारतात. त्यांच्या भीतीमुळे गेल्या काही काळापासून कस्टमर आमच्याकडे येण्याचं टाळत आहेत. आमच्याबद्दल नको त्या अफवा बाहेर पसरवल्या जात आहेत. आमचं इतकचं म्हणणं आहे की, तुम्ही जसं जगत आहात तसं आम्हाला शांततेत जगू द्या.. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहोत. त्यामुळे आम्ही आमचं काम बंद नाही करणार.’’ कविता आपली कैफियत मांडत असते.
संबंधित लेख वाचा: 1) वेश्यांकडे राज्यसंस्थेने नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मक हस्तक्षेप करून धोरण निर्मिती करायला हवी… |
अमीना (नाव बदललं आहे) म्हणते, "कित्येक वर्षांपासून याठिकाणी आम्ही हा वेश्याव्यवसाय करतोय. आतापर्यंत कोणालाही काहीच अडचण नव्हती. आता त्यांना काय अडचण आहे? त्यांचं म्हणणं आहे आमच्यामुळे त्यांच्या लेकरा-बाळांची लग्न होत नाहीत... मुली नांदायला जाऊ शकत नाही. पण, मग आमच्या लेकरांची लग्न कशी होतात? वेश्यांच्या मुलींची लग्न होतात, आमच्या मुली शिकतात, मग त्यांच्या मुली का घरात बसून आहे? माझ्या भावाच्या मुलीने याच वस्तीत शिक्षण घेतलं आणि आता ती अमरावतीला आयटीआय करतेय. दुसऱ्या भावाची मुलगी नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतेये, एका बहिणीचा मुलगा गोव्यात हॉटेल मॅनेजमेंट शिकतोय…’’
‘’आम्ही घसा ओरडून ओरडून सांगतोय की, वेश्याव्यवसायातील आमची ही शेवटची पिढी असेल. जोपर्यंत आमची मुलं त्यांच्या पायावर उभी होत नाहीत, तोपर्यंतच आम्ही हा व्यवसाय करणार आहोत. कारण, या व्यवसायाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध नाही’’ अमीना कळकळीने आपलं बोलणं पटवून देण्याचा प्रयत्न करत असते."
(कविता मिश्रा - एक 34 वर्षांची वेश्या आणि दोन मुलींची आई)
एकेकाळी गावाबाहेर असलेलं वेश्यालय आता 'हार्ट ऑफ द सिटी'मध्ये…
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यात असलेल्या गांधीलपुरा भागातील वेश्यांची वस्ती हा आता ज्वलंत प्रश्न बनला आहे. अमळनेर तालुका अनेक कारणांमुळे ओळखला जातो. अनेक वर्ष साने गुरुजी या शहरात वास्तव्यास होते. स्वातंत्र्यवीर नाना पाटील, स्वातंत्र्यलढ्यातील रणरागिणी लीलाताई पाटील यांच्यासह अमळनेरमधील अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे योगदान दिले होते. ‘विप्रो’ या जागतिक कंपनीची सुरवात अमळनेरमधूनच झाली. अमळनेरमधील शैक्षणिक संस्था आणि नामांकित कॉलेजमुळे 1970 ते 2010 च्या दरम्यान आजूबाजूच्या तालुक्यातून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले.
संत सखाराम महाराज यात्रा उत्सव हा अमळनेरमधील सर्वात मोठा यात्रा उत्सव असतो. याच शहरात प्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर आहे. या मंदिरात देशभरातून भाविक येतात. अशी अनेक अंगांनी अमळनेरची ओळख आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये एक ओळख प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे अमळनेरमधील सर्वात मोठी, शहराच्या मधोमध असलेली 'वेश्यावस्ती'.. तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास असलेली ही वस्ती यापूर्वी लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपत नव्हती. याचे कारण म्हणजे ही वस्ती पूर्वी शहराच्या बाहेर होती. एकेकाळी शहराच्या बाहेर असलेली ही वस्ती आता अगदी शहराच्या मधोमध म्हणजेच 'हार्ट ऑफ द सिटी' झालीये. ही वस्ती तिच्याच जागी आहे पण शहर वाढलंय... 
(ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेर शहरात 'गांधिलपुरा वेश्यावस्ती' 'हार्ट ऑफ द सिटी')
काय आहे ‘हरदासी’ परंपरा, ज्यांच्या मुली वेश्या व्यवसायात अडकल्या?
समाज जरी या महिलांना वेश्या म्हणून ओळखत असला तरी त्यांची परंपरा मात्र त्यांना 'हरदासी' म्हणून संबोधते. या वस्तीतील महिला मुस्लिमधर्मीय ‘हरदासी’ समुदायातून येतात. अमळनेर तालुक्यातील पाचोरा येथे माहिजी देवी यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. माहिजी या दैवताची जत्रा साधारण १४०० च्या सुमारास माहेजी गावात सुरू झाली, असं म्हटलं जातं. एकेकाळी या गावात माहेजी जत्रा तब्बल 6 महिने चालत असे. जत्रेसाठी आलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी डफ वाजवणं, गायन, नृत्य अशा विविध प्रकारच्या कला सादर केल्या जायच्या. इ.स. सन 1700 ते 1800 दरम्यान ‘हरदासी’ समुदाय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आलेले आढळतात.
या समुदायातील मुली यात्रेमध्ये गाणी-नृत्य सादर करायच्या. राजेशाहीच्या काळापासून भारतात ही परंपरा चालत आलेली आहे. नाचगाणं करायचें,समाजाची करमणूक करायची आणि त्यांच्या दयेवर आयुष्य घालवायचे हिच त्यांची परंपरा. कालांतराने त्यात बदल होत जाऊन देहविक्रय सुरू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील माहिजी या गावात या समाजाची मोठी वस्ती होती. माहिजी हे गाव 'हरदासींचे गाव' म्हणूनही पूर्वी ओळखले जायचे.
जसजसा काळ बदलत गेला तसतसे मनोरंजनाचे इतर अनेक पर्याय अस्तित्वात आले. हरदासी समाजाच्या मुलींची 'मुजरा' नृत्याची संस्कृती जुनी झाली. 'मुजरा संस्कृती' कालबाह्य झाल्यानंतर या गटातील सदस्यांना पुन्हा उदरनिर्वाहाच्या शाश्वत स्त्रोताचा प्रश्न भेडसावू लागला. तोपर्यंत त्यांच्या कुटुंबांची संख्या प्रचंड वाढली. यावेळेस त्यांना चांगल्या जीवनशैलीची सवय लागली होती. त्यांच्या दैनंदिन गरजा वाढल्या. पुढे या समाजाने रोजगाराच्या (देहविक्रय व्यवसाय) शोधार्थ स्थलांतर केले.
शिवाय गावकऱ्यांचाही विरोध होऊ लागल्याने त्यांना माहिजी सोडावे लागले. त्यापैकी काही खूप वर्षांपूर्वी रेल्वेचे गाव म्हणून अमळनेरला स्थायिक झाले. येथे व्यवसाय चांगला म्हणून मग त्यांची संख्या या शहरात वाढली आणि शहरातील गांधलीपुरा नावाच्या भागात या समाजाची मोठी वसाहत निर्माण झाली.
(कविताला तिच्या मुलींना शिकवून मोठं करायचं आहे.)
गांधीलपुऱ्यातील वेश्यालयाचा इतिहास
साधारण दोनशे वर्षापूर्वी गमीर शेख आणि समीर शेख हे दोन भाऊ त्यांच्या परिवारासह पाचोरा तालुक्यातून एका पारसी दारु विक्रेत्यासोबत अमळनेरला आले. त्यांना एकूण सात मुली होत्या. पारसी व्यापाऱ्याने त्यांना गावाच्या बाहेर स्मशानभूमी जवळ राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. सात मुलींपैकी दोन मुली मुजरा नृत्य करून पैसा कमवू लागल्या आणि इतर पाच मुलींनी वेश्याव्यवसाय सुरू केला. हे शेख कुटुंब हरदासी परंपरेतील होतं. समाजाच्या मूळ प्रवाहापासून शेकडो मैल दूर असलेल्या या वर्गाला ना शिक्षणाचा गंध, ना जगात होत असलेल्या बदलांचा.
घरात मुलगी जन्माला आली तर ती वेश्याव्यवसाय करणार आणि मुलगा जन्माला तर त्याचं लग्न करून देणार आणि त्याची बायको पडद्यामागे राहून घरातल्यांची सगळी कामं करणार. दोन कुटुंबापासून सुरू झालेल्या वस्तीत आता जवळपास 60 ते 70 कुटुंब आहेत आणि आज हरदासी समुदायातील पाचवी पिढी वेश्या व्यवसायात आहे. विशेष म्हणजे या वेश्यावस्तीतील 70 ते 80 मुलींची लग्न झाली आहेत. नवीन पिढी शिक्षणाकडे वळली आहे. याच वेश्यांच्या काही मुली वैद्यकीय शिक्षण घेत आहेत तर कोणी नोकरी करत आहेत.
'शकीला मंजिल' असं नाव असलेल्या वस्तीतल्या एका घरात गेल्यावर सत्तरीपार असलेली बाई आजारपणामुळे अंथरुणाला खिळून बसलेली होती. तिची मुलगी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. घराची रचना अशी की, खाली कुंटणखाना चालवला जातो आणि वरच्या मजल्यावर कुटुंबातील इतर सदस्य राहतात. ज्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. ती खोली दहा बाय दहाची होती, त्यात एक पलंग, फॅन आणि त्याच्या बाजूला एक पाण्याची भरलेली बादली… वस्तीतील प्रत्येक घरात अशा एक दोन खोल्या आहेत.
इथल्या वेश्यांना वस्तीतून बाहेर हाकलून देण्याबद्दल नेमका काय वाद सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नाव न छापण्याच्या अटीवर अनेकजणी पुढे आल्या. सत्तरीच्या फातिमा आजीने बोलायला सगळ्यात अगोदर सुरुवात केली.
‘’आम्हाला वस्तीतून हाकलून देण्यासाठी पद्धतशीर राजकारण सुरू आहे… ’आता इतक्या दशकांपासून आम्ही इथे राहत असल्यामुळे आमच्या मालकीची घरं आम्ही बांधली आहेत. याच वस्तीत एक जुनं चित्रपटगृह होतं. कालांतराने ते बंद पडलं आणि एका व्यक्तीने ती जागा विकत घेऊन भंगारचा व्यवसाय सुरु केला. हळू-हळू तो व्यवसाय वाढायला लागला आणि जागा कमी पडायला लागली म्हणून त्याची नजर आमच्या मोहल्ल्यावर गेली. कुदरत अली खान असं त्या व्यापाऱ्याचं नाव…त्यानं आमची छळवणूक करण्याची एकही संधी सोडली नाही. आम्ही जो देहविक्रीचा व्यवसाय करतोय तो बंद करावा किंवा दुसरीकडे वस्ती हलवावी यासाठी त्याने पद्धतशीरपणे मोहीम सुरू केली. आजूबाजूच्या लोकांना भडकवू लागला. आमच्या विरुद्ध मॅसेजेस, पोस्टर बनवून व्हाट्सअप ग्रुप वर फॉरवर्ड करणं, आमच्या विरोधात मोर्चे काढणं, पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर खोटे-नाटे आरोप लावून गुन्हे दाखल करणं. या सगळ्या गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांपासून आम्ही खूप परेशान झालो आहोत’’
(खाली कुंटणखाना चालतो वरच्या मजल्यावर परिवार राहतो.)
‘’तुम्हाला कब्रस्तानमध्येही जागा मिळू देणार नाही’’
30 वर्षांची मुनीबा त्याच वस्तीत राहते. तिचा जन्मच गांधीलपुरामधील वेश्यावस्तीत झाला. वयाच्या कोणत्या वर्षी ती वेश्याव्यवसायात आली हे तिला आठवत नाही. मुनीबा एक भयानक आठवण सांगते. "वडील वारले आणि चाळीसाव्या दिवशी कार्यक्रम होता. आमच्या परंपरेत बारावा-तेरावा हा चाळीसाव्या दिवशी होत असतो. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या समाजातूनच भांडी आणून त्यात स्वयंपाक बनवावा लागतो. आम्ही जेव्हा भांडी मागायला गेलो तेव्हा इथल्या मशिदीचे रियाझ मौलाना आणि कूदरत अली खान यांनी मशिदीतून भांडे नेण्यास मनाई केली. आम्ही अमळनेरमध्ये कुठेही भांडे मागायला गेलो की, ते सांगायचे कुदरत अलीने मनाई केलीये. शेवटी आम्ही एका केटरर्सवाल्याकडून भांडी आणली त्यात स्वयंपाक केला. मात्र थोड्याचवेळात त्यांची माणसं आली आणि आम्ही केलेला सगळा स्वयंपाक रस्त्यावर फेकला. भाज्या सांडवल्या आणि भांडी घेऊन गेले..
कुदरत अली खान आम्हाला म्हणाले, ‘’आता तर फक्त भांडी घेऊन जातोय, हे असंच सुरू ठेवलं तर तुमच्या जनाज्यासाठी माणसंही येणार नाहीत. आम्ही तुम्हाला कब्रस्तान मध्येही जागा देणार नाही.."
तीन-चार महिने आमचा व्यवसाय बंद होता. नाइलाजाने आम्ही सर्वांनी धंदा परत सुरु केला. कारण, आम्हाला कोणीही एक रुपयाची मदत करायला तयार नाही. ऐन रमजानमध्ये आम्ही लहान लेकरांना पाणी पाजून झोपवलंय. ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ते दारात येतात, आम्ही जर धंदा नाही करणार तर कर्ज कसं फेडणार? लेकरांना काय खाऊ घालणार…’’ मुनीबा सांगताना अक्षरश: रडत होती.
अमीना म्हणते, "मी जेव्हा 19 वर्षाची होते तेव्हा वेश्याव्यवसायात आले. आज मी 43 वर्षाची आहे. मला एक 25 वर्षाचा मुलगा आणि एक 12 वर्षांची मुलगी आहे. मुलगी सातवीत शिकते तर मुलगा हॉटेलमध्ये काम करतो. अगोदर माझं घर व्यवस्थित चालायचं, पण गेल्या पाच वर्षांपासून राहण्यासाठी आणि जगण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतोय. आ्हाला इथून हाकलून लावण्यासाठी पद्धतशीरपणे राजकारण सुरू झालयं. या ठिकाणी 150 वर्षांपासून वेश्याव्यवसाय चालतो. कोणीही कधी त्रास दिला नाही. ना प्रशासनाकडून ना पोलिसांकडून, ना वस्तीतील इतर लोकांकडून. मात्र, 2016 पासून कुदरत अली खान यांनी आमचं जगणंच अशक्य केलयं. आमची चूक इतकीच झाली की वेळोवेळी आम्ही त्यांच्याविरुद्ध आवाज नाही उठवला. आज ते आम्हालाच चुकीचं ठरवत आहेत. आमच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये, प्रांतांकडे, कलेक्टरकडे तक्रार करतात की यांना इथून हटवा.. आमच्याविरुद्ध शहरात मोर्चे काढून लोकांना भडकवतात.. आम्ही तर आमच्या हक्काच्या जागेवर राहतो..आम्ही आमच्या घरातून का आणि कुठे जायचं? प्रत्येकजण पोटापाण्यासाठी काही ना काही काम करत असतो असतं. मग आमचं काम चुकीचं का? आम्हालाही कायदे माहीत आहेत. आमच्या वस्तीत 18 वर्षांखालील कोणतीच मुलगी हा व्यवसाय करत नाही." 
(30 वर्षांची मुनीबा…)
स्वतःची बाजू मांडण्यासाठी घेतली पत्रकार परिषद...
देहविक्री करणाऱ्या या महिला गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून येणाऱ्या अडचणींना सामोरं जात आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या महिलांच्या विरोधात स्थानिक दैनिकांमध्ये बातम्या देणं, मोर्चा काढण्याचं काम काही लोकं करत आहेत. त्यामुळे स्वतःची बाजू मांडण्यासाठी या महिलांनी दोन वेळा वस्तीत पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेबद्दल अमीना सांगते, "आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यावेळीस प्रांत अधिकाऱ्यांनाही बोलावलं होतं. कायदा मोडून कोणतेच अवैध काम आम्ही करत नाही हे त्या परिषदेत आम्ही मांडलं.
न्यायालयाकडून जर आम्हाला या कामासाठी विरोध नाही तर समाजातील काही लोकांकडून आम्हाला का विरोध होतो? आमच्या मुलांचं शिक्षण आमच्या व्यवसायावर अवलंबून आहे.. हे सगळे मुद्दे आम्ही परिषदेत मांडले. याचा किंचितसा फायदा आम्हाला असा झाला की आमच्याविरुद्ध उभे राहणारे कोणतंही पाऊल उचलण्याआधी विचार करू लागले आणि आमची बाजू लोकांसमोर आली.." 
(ही वस्ती वाचवण्यासाठी वेश्या जीवाचं रान करत आहेत..)
वेश्यालयाला विरोध करणारे काय म्हणतात?
गांधीलपुराच्या या वस्तीतील महिलांना ज्यांच्याकडून त्रास होत आहे त्या कुदरत अली खान यांनीही त्यांची बाजू स्पष्ट केली. भंगाराचा व्यवसाय करणारे कुदरत अली म्हणतात की, "त्या बायकांना वस्ती बाहेर काढण्यासाठी आम्ही अनेक मोर्चे काढले, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या, हे सगळं खरचं आहे. मात्र, त्या वस्तीवर मला ताबा मिळवायचा आहे हा आरोप मी कधीच मान्य करणार नाही. त्या बायकांनी माझ्यावर हा खोटा आरोप केलाय. आमच्या या वस्तीत फक्त त्या बायका नाही राहत तर आम्ही देखील राहतो. आमच्या लेकी, आमच्या सुनांकडेही लोकं त्याच नजरेने बघतात. त्यांनी तसं बघायला नको म्हणून एकतर या बायकांनी वस्ती खाली करावी किंवा वेश्याव्यवसाय बंद करून दुसरीकडे हा धंदा चालू करावा एवढीच आमची मागणी आहे."
कुदरत अली पुढे म्हणतात, " तुम्हीच सांगा तुमच्या वस्तीत जर असा धंदा चालू असता तर तुम्ही काय केलं असतं? या बायकांनी त्यांचा हा धंदा बंद करावा. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते उगीचच गरीब असल्याचं नाटक करतात. आम्ही तर गरीब माणसं आहोत आज कमवू तर उद्या खाऊ. बायकांच वाईट व्हावं अशी आमची जराही इच्छा नाही, फक्त त्या जे घाण काम करत आहे ते त्यांनी बंद करावं."
वस्तीत असलेल्या मशिदीचे मौलाना रियाझ म्हणतात की, "त्या बायका खोटं बोलत आहेत. आम्हाला त्यांच्या राहण्यापासून, धंद्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आमच्या वस्तीतून त्यांनी निघून जावं किंवा हा धंदा बंद करावा. याचा आमच्या मुलाबाळांवर परिणाम होत आहे. आम्ही गरीब लोकं आहोत, आम्ही काय त्यांना विरोध करणार समाजाच्या चांगल्यासाठीच आम्ही हे सर्व करत आहोत.." 
(कुदरत अली खान आणि रियाझ मौलाना यांनी वेश्यालय हटवण्यासाठी काढलेला मोर्चा..)
वेश्यावस्तीतील नव्या पर्वाला सुरवात....
1995 ते 2000 या काळात शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या एचआयव्हीचा उद्रेक झाला होता. त्यावेळेस एचआयव्ही बाधितांची जळगाव जिल्ह्यातील संख्या लक्षणीय होती. शासकीय एचआयव्ही एड्स प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत ‘आधार संस्था’ मग वस्तीतल्या महिलांसाठी आरोग्य संवर्धनाच काम करू लागली. आधार संस्थेने आरोग्य कार्यक्रमांसोबत या महिलांना मानवी हक्क कायदेविषयक माहिती देण्यास सुरवात केली. 2005 साली स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील 63 मुलांना शाळेत दाखल केले. यामुळे वस्तीत नवीन शैक्षणिक वारे वाहू लागले. कधीही पुस्तकं न पाहिलेल्या मुलांनी शाळेचे अनुभव घेतले.
मुलांसाठी गाडीची व्यवस्थाही करण्यात आली. तसेच मुलांना अभ्यासाची सवय लागावी म्हणून वस्तीत ‘डे केअर सेंटर’ची सुरुवात झाली. धार्मिक शिक्षणासाठी 2006 मध्ये वस्तीत मदरसा सुरू करण्यात आला. त्याठिकाणी अनेक कार्यक्रम होऊ लागले. अधिकारी, पुढारी त्या निमित्ताने वस्तीत येऊ लागले आणि वस्तीतील महिलांना आपण समाजाचा एक भाग आहोत ही जाणीव होऊ लागली. अश्या सर्व सकारात्मक वातावरणामुळे नवीन पिढीतील मुलींचे वेश्या व्यवसायात येणे थांबले. 2010 ते 2025 या कालावधीत वस्तीतील 75 ते 80 मुलींची लग्न झाली.
डॉ. भारती पाटील ‘आधार’ संस्थेच्या अध्यक्ष आहेत. गेल्या 25 वर्षांपासून त्या आधार संस्थेमध्ये काम करत आहेत. त्या सांगतात, "आधार संस्थेमध्ये सुरुवातीपासून माता बालमृत्यू, कुपोषण यावर काम चालू होते. 2003 मध्ये आमच्या असं लक्षत आलं आम्ही ज्या भागात काम करत आहोत त्या भागात एचआयव्हीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा एचआयव्हीचा प्रश्न ऐरणीवर होता. एचआयव्हीग्रस्त जिल्हा म्हणून जळगाव हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर होता. बाहेर गावाहून येणाऱ्या पुरुषांमुळे एचआयव्ही हा वस्तीतील महिलांना व्हायचा. त्यानंतर वस्तीतल्या बायकांकडून अनेकांना एचआयव्हीची लागण व्हायची. म्हणून आम्ही वेश्यावस्तीत काम करायचं ठरवलं. त्या वस्तीत सुरवातीला निरोध वापरणं का गरजेचं आहे, हा विषय घेऊन बायकांपर्यंत पोहचायला सुरुवात केली. हळहळू वस्तीच्या परिस्थितीबद्दल कळू लागलं. शिक्षणाचा प्रभाव नव्हता, आरोग्याच्या समस्या होत्या. महिलांकडे स्वतःची ओळख दाखवण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नव्हतं. शासनाच्या कोणत्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. तेव्हा त्या वस्तीतील एकेका मुद्द्यावर काम करायला आम्ही सुरवात केली. आज 25 वर्ष झाली आम्ही त्यांच्यासोबत जोडलेलो आहोत." 
(आधार संस्थेचे कार्यकर्ते… यांच्यामुळेच वेश्यावस्तीत नव्या पर्वाला सुरवात झाली..)
प्रियाला ब्युटिशियन बनायचं आहे...
कविताची मुलगी प्रिया (नाव बदललं आहे) ही नववीत शिकते. तिला मोठं होऊन मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन बनायचयं. वयात आलेल्या प्रियाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नये म्हणून कवितानेही वेश्याव्यवसायातून काढता पाय घेतला आहे. त्यांनीही ब्युटीपार्लरचं प्रशिक्षण घेऊन वस्तीतच छोटंसं ब्युटीपार्लर सुरु केलं आहे. प्रिया शाळेत मिळालेले तिचे मेडल दाखवतांना म्हणते, "मला संस्कृत शिकायला फार आवडतं. मी फुटबॉल, कबड्डी पण छान खेळते. विज्ञानात पण माझा रस आहे. पण आमच्या शाळेत मुलींना स्टेजवर बोलू दिलं जात नाही. बोलू दिलं असतं तर मी गायनात सुद्धा बक्षिस मिळवलं असतं." 
(प्रियाचे प्रमाणपत्र आणि मेडल्स)
प्रियाची लहान बहीण चौथीत आहे. ती पण कपाटातून तिला शाळेत मिळालेले प्रमाणपत्र शोधून काढत होती. ती म्हणते, "मला शिक्षक बनायचं आहे." तिला शिक्षक का बनायचं हे विचारल्यावर ती म्हणते,"माझा जन्म जेल मध्ये झाला ना मम्मी म्हणते ती लोकं फार वाईट आहेत. म्हणून मला शिक्षक बनायचं आहे आणि चांगलं कसं वागायचं हे मी मुलांना शिकवेन."
(लेखातील सर्व छायाचित्रे: अभिजीत तांगडे)






