टीम बाईमाणूस
- दलितांमधील दलित, सामाजिकदृष्ट्या शोषित आणि दुर्लक्षीत अशा बिहारच्या मुसहर समाजात एक क्रांतीकारी घटना घडली आहे.
- बिहारची ‘पिंक बस’ चालवण्यासाठी ज्या तरुण मुलींची निवड झालीये, त्या सगळ्या मूसहर जातीच्या आहेत.
- प्रजासत्ताक दिनी पिंक बस चालवणाऱ्या पहिल्या सहा महिला ड्रायव्हरांनी या परेडमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या रथाला प्रथम क्रमांक मिळाला.
‘मुसहर’… त्यांच्या नावातच त्यांच जगणं समावलेलं आहे! ज्यांच्या आहारातच ‘मूस’ म्हणजे उंदीर आहे असा हा समाज म्हणजे मुसहर. बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या भागात संख्येने जास्त असलेल्या मुसहरांना महादलित म्हणून ओळखले जाते. महादलित का तर सवर्णांनी ज्या जातींना अस्प्रुष्य ठरवले त्या दलित जातीदेखील या मुसहरांपासून चार हात लांब राहतात. दलितांमधील दलित, सामाजिकदृष्ट्या शोषित आणि दुर्लक्षीत असा हा मुसहर समाज…मांझी समुदायाचे लोक याच जातीमधले आहेत.
मात्र अतिशय मागसलेल्या या जातीत एक विलक्षण आनंददायी घटना घडली आहे. बिहारमधील पिंक बस ही महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे, जी बिहार राज्य रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BSRTC) द्वारे 2025 मध्ये सुरू केली गेलीय. कालपरवा पर्यंत या बसेसचे ड्रायव्हर केवळ पुरुषच होते कारण बिहारमध्ये हेवी मोटर व्हेईकल (HMV) लायसन्स असलेल्या महिलांची संख्या कमी होती, पण आता एक क्रांतिकारी बदल झाला आहे. काही तरुण मुली ड्रायव्हर म्हणून नियुक्त झाल्या आहेत आणि या सर्व मुली मुसहर जातीमधल्या आहेत!

सामाजिक रूढी तोडून मुसहर जातीच्या मुलींचे यश
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बिहारची राजधानी पाटणामध्ये गांधी मैदानावर झालेल्या परेडमध्ये बिहारने इतिहास रचला. पिंक बस चालवणाऱ्या पहिल्या सहा महिला ड्रायव्हरांनी या परेडमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या रथाला प्रथम क्रमांक मिळाला. या तरुणी सर्व मुसहर या बिहारमधील सर्वात गरीब आणि वंचित दलित समुदायातील आहेत. या मुलींचे वय एकवीस बावीसच्या आसपास आहे. त्यांनी सामाजिक रूढी तोडून हे यश मिळवले आहे. त्यांच्यापैकीच काहींची नावे आणि काही खास गोष्टी अवश्य सांगण्याजोग्या आहेत.
बावीस वर्षांची अनिता कुमारी बसच्या ड्रायव्हर सीटवर बसून आरामात मिरर अॅडजस्ट करते आणि म्हणते, मी थोडे डावीकडे स्ट्रेच ठेवून स्टिअरिंग धरते! तिने LMV लायसन्स 2023 मध्ये आणि HMV लायसन्स 2024 मध्ये घेतले. अनिताची समवयीन असणाऱ्या बेबी कुमारीला लोकांची वेगळीच टीका झेलावी लागते, कारण ती उंचीने कमी आहे. मात्र आता तिची कीर्ती उंचीपेक्षा लाखो पटींनी अधिक आहे! ती हेवी ट्रक देखी आरामात चालवते हे विशेष! गायत्री कुमारी बावीस वर्षांची आहे आणि तिची मैत्रीण आरती ही एकवीस वर्षांची आहे. त्या दोघींना वेगात बस चालवायला आवडतं, मात्र अतिशय नियंत्रणपूर्वक त्या ड्रायव्हिंग करतात.
‘’जे ताने मारायचे तेच आता कौतुक करतात’’
या सर्व मुलींचा आदर्श असणारी एकवीस वर्षांची सरस्वती कुमारी ही विवाहित आहे. तिच्या सासरच्यांना सुरुवातीला समाज काय म्हणेल अशी भीती वाटली, पण तिच्या पतीने तिला सक्रिय पाठिंबा दिलाय ती म्हणते, "बस चालवणे हे पुरुषांचे काम समजले जाते, पण महिलांनाही संधी मिळायला हवी."
रागिनी कुमारीची कथा सर्वात प्रेरणादायी आहे. झुग्गी-झोपडपट्टीतून आलेली रागिनी मुसहर समाजातील पहिली ग्रॅज्युएट ड्रायव्हर आहे. लोक तिला तुच्छतेने पाहत, "तू कशी बस चालवशील?" असे ताने मारत असत, पण आता तेच लोक तिची तारीफ करतात. तिने संघर्ष करून प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता स्वतंत्रपणे बस चालवते. तिची कहाणी भावुक करणारी आहे. ती सांगते की, "एके काळी टोमणे मारणारे आता कौतुक करतात, तेव्हा आपल्या शिक्षणाचा आणि स्त्री असण्याचा अभिमान वाटतो!
आज या मुली बिहारच्या पहिल्या महिला चालक बनल्या आहेत. पण एक वर्षापूर्वी त्या समाजाच्या टोमण्यांनी, त्या दुःखी आणि त्रस्त होत्या कारण बस चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतरही त्या बेकार बसून होत्या. सरस्वती वगळता पाच मुलींनी बालविवाह नाकारला आणि बस चालवण्याचा निर्णय घेतला. ज्या समाजासाठी जग फक्त शेतात काम करणे आणि घरकाम करणे एवढेच मर्यादित होते त्या समाजाच्या या मुलींनी इतिहास घडवलाय.

मुसहर समाजासाठी सबंध आयुष्य वेचणाऱ्या सुधा वर्गीस
सुधा वर्गीस यांनी या मुलींना पाठबळ दिले, धीर दिला! त्यांचे ऋण मानावे तितके कमीच आहेत! तत्कालीन समाज कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव हरजोत कौर यांच्या मदतीने सुधा वर्गीस यांनी हा अनोखा मार्ग या मुलींना दाखवला! आणि मुली सुसाट निघाल्यात!
मुसहर समाजासाठी आपलं सबंध आयुष्य वेचणारी महनीय व्यक्ती म्हणजे पद्मश्री सुधा वर्गीस… सुधा वर्गीस हे एक असं नाव आहे ज्या केरळमधील कोट्टायम येथून लहान वयातच बिहारमध्ये आल्या आणि राज्यातल्या मुसहर समाजासाठी विशेषत: समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रचंड मोठं समाजकार्य केलं. सुधा वर्गीस यांनी पाटणा येथे ‘नारी गुंजन’ नावाची संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून आजही दलित आणि मुसहर समाजातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्या महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
यंदाच्या व्हॅलेंटाईन डे पासून म्हणजे 14 फेब्रुवारीपासून या मुली बिहारच्या रस्त्यावर गुलाबी बस चालवण्यास सुरुवात करतील. जातीच्या दलदलीत रुतून बसलेल्या आणि मागास राज्य असा शिक्का असलेल्या बिहारसारख्या राज्यात ही घटना विलक्षण आनंददायी आणि काहीशी क्रांतीकारकच म्हटली पाहिजे!
उंदीर खाणारी एक ‘तथाकथित’ बदनाम जमात…
मुसहर जात ही जितकी उंदीर मारणारी जमात म्हणून परिचित आहे, तितकीच उंदीर खाणारी म्हणूनही बदनाम आहे. अलीकडच्या काळात शेतमजुरी हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मात्र अनेकदा मेहताना म्हणून पैसे देण्याऐवजी कांदे बटाटे वा मूठभर धान्य देवून त्यांची बोळवण केली जात आहे. शेतातल्या पीक कापणीनंतर उरलंसुरलं धान्य गोळा करणं आणि जे दाणे उंदीर त्यांच्या बिळात घेऊन जातात तेही बिळात हात घालून गोळा करणं ही मुसहर समाजाची अपरिहार्यता.
शेतातली बिळं शोधायची, त्या बिळांच्या बाहेर जाळ करून आत धुर सोडायचा आणि अलगद हात बिळात घालून उंदीर धरायचा यात मुसहर समाज पटाईत. तोच उंदीर चुलीवर भाजून खायचा किंवा त्याचे बारीक तुकडे करून त्याची भाजी बनवायची... वास्तविक आज अनेकांनी उंदीर खाण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली असली तरी उंदीर खाणारा समाज अशी ख्याती पसरल्याने मुसहरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही.
85 टक्के मुसहर समाज संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त
आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न अशा तिन्ही पातळ्यांवर कमालीचा संघर्ष करत असलेल्या या समाजातील जवळपास 85 टक्के लोक कालाजार (जॅपनीज इनसिफिलायटिस), मलेरिया आदी अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त आहेत. बिहारच्या मुज्जफरनगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 59 बालके दगावली, परंतु आजपर्यंत डॉक्टरांना ही मुलं कोणत्या रोगामुळे दगावली, हे शोधता आलेले नाही. कदाचित मुसहरांचे गलिच्छ राहणीमान, आहारात उंदराचे आणि डुकराचे मांस आणि हातभट्टीची दारू यापैकी एखादे कारण असावे, असा अंदाज डॉक्टरांनी बांधला आहे.
आजही मुसहर समाजातील साक्षरतेचा दर फक्त 3 टक्के आहे. महिलांमध्ये हाच दर नाममात्र एक टक्का इतकाच आहे. बिहारचे मुख्यमंत्री असताना त्याकाळी लालूप्रसाद यादवांनी एक योजना आखली होती. मुसहर समाजापैकी जो कुणी मॅट्रिक उत्तीर्ण झाला असेल त्याला थेट कारकुनीची सरकारी नोकरी मिळेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सबंध बिहारमधून केवळ दोनशे मुसहर तरुणांचे अर्ज आले जे मॅट्रिक उत्तीर्ण झाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये कुपोषणाचे जास्त बळी कुणाचे जात असतील तर ते मुसहर समाजाचे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिली की मुसहर समाज कोणत्या अवस्थेत जगतोय, याची कल्पना येऊ शकेल... 1050 महिलांवर बलात्कार, 700 खून, 5000पेक्षा अधिक ऍट्रोसिटीचे गुन्हे आणि 1658 मारहाणीच्या घटना. काही वर्षांपूर्वी बिहारमधल्या जमीनदारांनी पाळलेल्या रणवीर सेनेने मुसहर समाजातील दहा लोकांचे हत्याकांड केले.
पोलिसांची दबंगगिरी तर मुसहर समाजाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अनेक खोट्या आरोपांमध्ये मुसहर लोकांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. शिवाय गलिच्छ कामं करवून घेण्यासाठी होणारा त्रास वेगळाच. रात्री-बेरात्री मुसहरांच्या वस्तीवर जायचे आणि त्यांच्याकडून बेवारशी, कुजलेल्या-सडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची, पोलिस ठाणे आणि जेलमधील शौचालये साफ करवून घ्यायची आणि मग मोबदला मागितला की पेकाटात लाथ हाणून आयमायचा उद्धार करत हाकलवून द्यायचे, हा पोलिसांचा ‘खेळ’ बनला आहे.
समाजासाठी अनेक योजना असल्या तरी त्या योजना मुसहरांपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासन आणि मुसहर यांच्यामध्ये जी सामाजिक व्यवस्था आहे, तीच मुसहरांचा सर्वनाश करत आहे. सामंतशाही-जमीनदारी, पोलिसांची दबंगशाही, सरकारी योजनेतील दलाल आणि उच्चवर्णीयांची हुकूमशही यांच्या कचाटय़ात सापडलेला मुसहर पार पिचून गेला आहे. त्यामुळे जातीच्या दलदलीत रुतून बसलेल्या आणि मागास राज्य असा शिक्का असलेल्या बिहारसारख्या राज्यात मूसहर समाजाच्या मुली बस ड्रायव्हर म्हणून नावलौकिक मिळवणारी घटना विलक्षण आनंददायी आणि काहीशी क्रांतीकारकच म्हटली पाहिजे!
(संदर्भ - समीर गायकवाड यांच्या फेसबुक पेजवरून)






