Skip to main content

समोर मृत्यू दिसत असतानाही पोचिराम कांबळे बोलला,’’हो मी जयभीम बोलणारच अन् गावात जयंती साजरी करणारच…’’

Article in Marathi
Datta Kanwate
14 Jan 2026
7 min read
199 views
समोर मृत्यू दिसत असतानाही पोचिराम कांबळे बोलला,’’हो मी जयभीम बोलणारच अन् गावात जयंती साजरी करणारच…’’

दत्ता कानवटे

  • मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन ३२ वर्षं झाली परंतू आजही नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या पोचिराम कांबळेची हत्येची घटना ऐकली की अंगाचा थरकाप उडतो. 
  • मृत्यू समोर असताना सुद्धा पोचिराम ‘जय भीम’ म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोचिरामच्या गावाला भेट देऊन मांडलेला हा ग्राऊंड रिपोर्ट…



"त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब… 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं! गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता.


गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कसं बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं…"


User Image(पोचिराम कांबळे रेखाचित्र)

चार दशकांपूर्वी घडलेली ही घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला ठळक आठवत होती... नजर पैलतीरी लागलेल्या 83 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सुरकूतलेल्या चेहऱ्याने आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई त्यांच्या लहान मुलाकडं राहायच्या, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्चं घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेली पाहणारी ही बाई… काय काय सोसलं असेल या बाईनं!


२०० लोकांचा जमाव पोचिरामचा पाठलाग करत होता…


नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं, पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.



User Image(धोंड्याबाई कांबळे, पोचिराम कांबळे यांची बायको)

ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्रात:विधीसाठी आल्या.

आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुडबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...


जमावाने पोचिरामला लाकडावर ठेवून जिवंत जाळलं


सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता.


User Image(चंदर कांबळे, बापाचा बदला घेतला, नंतर यांचाही खून झाला)

वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं ‘जय भीम’ म्हणायचं नाही आणि ‘आमच्या पाया पड’ असं सांगत होते. पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता.


संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लाकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि रॉकेल ओतून जिवंत देह पेटवून दिला...

या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा खायला घातली होती असे म्हणतात, मात्र या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही.


घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कांबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली, तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या, पण त्यांना पोचिरामाचं साधं हाडुक सुद्धा भेटलं नाही…


User Image(हीच ती विहीर ज्या विहिरीच्या काठावर पोचिराम कांबळे यांना जाळलं गेलं)

मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उच्चवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.


टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला, त्याचं नाव गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कांबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलातं तुम्ही काय कारण होतं.?


User Image(पोचिराम कांबळे यांचं टेम्भुर्णी गावातील घर)

हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले, माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो…


‘’आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..!’’


गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचे, त्यांना फार काही कळत नव्हतं, पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलयं पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!


टेम्भुर्णी गावाचा रक्तरंजित इतिहास


पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पाहिल्या पाहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का, बसून बोलतो. त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो.


User Image(स्मारकावरील पोचिराम कांबळे यांची प्रतिमा)

बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली.


"वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब."


पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं.


User Image(चंदर कांबळे यांचा खून करणार बालू पाटील, सध्या केस मधून निर्दोष सुटला आहे.)

तुम्ही बाबासाहेबांना मानता का, असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब, असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.


ज्या घरात पोचिरामला संपवण्याचा कट रचला…


बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात.



User Image(शेषराव पाटील, पोचिराम कांबळे यांचा खून झाल्यानंतर दलितांची घरे पेटवल्याचा यांच्यावर आरोप आहे. पण यांच्यावर कुठलीही केस झालेली नाही)

शेषराव पाटील म्हणाले की, हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा.


भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही.


ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहीबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.


User Image(चंदर कांबळे यांनी बायको आणि मुलगी, मुलीला कुठेतरी नोकरी मिळावी अशी अपेक्षा अजूनही ही महिला बाळगून आहे)

आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.



(लेखात उल्लेख असलेल्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे या आज जगात नाहीत. २१ मे २०२४ मध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे निधन होण्याच्या काही महिने अगोदर पत्रकार दत्ता कानवटे यांनी त्यांची भेट घेतली होती. )








Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...