‘ब्राह्मण असूनही ‘त्यांच्या’सारखा नाच काय करतोस?’ असे हिणवत 1950 च्या दशकात एका समाजगटाने रामसहाय पांडे यांना अनेक वर्षे बहिष्कृत ठरवले होते. त्या अवहेलनेवर मात करून रामसहाय मृदुंग वाजवत, नाचत राहिले आणि बुंदेलखंडातल्या ‘राई’ या नृत्यप्रकाराला आंतरराष्ट्रीय मंचावर नेले.
तब्बल 60 वर्षे त्यांनी ‘राई’ या लोकनृत्याची अविरत सेवा केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या लोकनृत्याला नाव मिळवून दिले. अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकनृत्य कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते रामसहाय पांडे यांचे दोन दिवसांपूर्वी वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले.
‘ब्राह्मण असूनही ‘त्यांच्या’सारखा नाच काय करतोस?’
रामसहाय पांडे यांची सगळी कारकिर्द ही ‘ब्राह्मण असूनही ‘त्यांच्या’सारखा नाच काय करतोस?’ या वाक्याभोवती गुंफलेली होती. यात जो ‘त्यांच्यासारखा’ असा जो उल्लेख करण्यात येतो तो म्हणजे बुंदेलखंडचा बेडिया समाज… ‘राई नृत्य’ करणाऱ्या महिला बेडिया समाजाच्या आणि आजही तथाकथित खालच्या जातीच्या मानल्या जातात.
बेडिया समाज म्हणजे ब्रिटिशांनी ज्या समाजावर गुन्हेगारी जमात असा शिक्का मारून ठेवला त्या विमुक्त भटक्या समाजापैकी एक असलेला जातसमूह… आजही पूर्णपणे वेश्याव्यवसायाच्या गर्तेत अडकलेला हा बेडिया समाज आणि अशा समाजाचे पारंपरिक राई लोकनृत्य रामसहाय पांडेसारखा ब्राम्हण कलाकार शिकतो, त्याला सर्वदूर पोहचवतो म्हणून संस्कृतीरक्षकांना या कलाकाराचा प्रचंड राग आणि तिरस्कारही…
रामसहाय पांडे या कलाकाराला जेव्हा ‘पद्मश्री’ किताबाने गौरवण्यात आले तेव्हा ‘ऑल इंडिया रेडिओ’ने बातमी देताना बुंदेलखंडातल्या बेडिया समाजाच्या कलाकाराचा गौरव ‘पद्मश्री’ने आता होतो आहे’ अशी बातमी दिली होती. रामसहाय पांडे आणि बेडिया समाजाचे राई नृत्य इतके एकरुप झाले होते.
इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यापूर्वी बेडिया समाजाबद्दल अगोदर माहिती करून घेऊ…
संबंधित लेख वाचा: 1) ‘नाच्या’ पोरांच्या जमान्यात ‘पवळा’च्या रूपाने तमाशात लावणी नृत्यांगनाची ‘एन्ट्री’ झाली…! |
बेडिया समाज आणि वेश्या व्यवसाय
राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये भटकत भटकत स्थिरावलेला समाज म्हणजे ब्रिटिशांच्या गुन्हेगार जमातींमधील यादीतला एक भटका समाज बेडिया… महाराष्ट्रात जशी देवाच्या नावाने देवदासी परंपरा आहे तसाच काहीसा प्रकार या बेडिया समाजात असतो. आपल्या घराचं रक्षण व्हावं, कुटुंबावर येणारं संकट टाळावं यासाठी समाजातील मुलींना देवाला सोडलं जातं. याचाच दुसरा अर्थ बेडिया समाजातील मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं जातं.
या समाजातील महिलांचा वेश्या व्यवसाय यामागचे आणखी एक धक्कादायक कारण म्हणजे पिढ्यानपिढ्यांपासून सुरू असलेल्या समाजाच्या रुढी-परंपरा. घरात जन्माला आलेली पहिली मुलगी ही वेश्याव्यवसायच करणार असा अलिखित नियमच समाजाच्या जात पंचायतीने केला होता आणि हा नियम आजतायगत सुरू आहे.
बेडिया समाजाच्या वस्तीत आई-बाप आणि भाऊ घराच्या बाहेरच खाटा टाकून बसलेले असतात. भाऊ किंवा बाप गिऱ्हाईकाला घरात घेऊन जातो आणि स्वत:च्या बहिणीला किंवा मुलीला त्याच्यासमोर उभं करतो. पसंद पडल्यास सौदा होतो आणि घरातल्या सदस्यांच्या पहाऱ्यातच पुढचा कार्यक्रम पार पडतो. हे फक्त एकदाच घडत नाही तर दिवसातून कितीतरी वेळा हाच कार्यक्रम सतत पार पडत असतो. उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये बेडिया समाजाच्या घराघरातले हे चित्र...
रिवाजानुसार एकदा का घरातली पहिली मुलगी या व्यवसायामध्ये येण्याचे निश्चित झाले की त्या मुलीची जडणघडणच खास पद्धतीने केली जाते. खेळण्या-बागडण्याच्या वयात हातात पाटी पेन्सिल देण्याऐवजी लिपस्टिक कशी लावायची, बसायचे कसे, चालायचे कसे आणि लोकांशी बोलायचे कसे याचे यथोचित शिक्षण त्या मुलाला दिले जात असते.
बेडिया समाजाच्या राई नृत्याला वाईट नजरेने का बघितलं जातं…?
याच बेडिया समाजाचे एक पारंपरिक लोकनृत्य म्हणजे राई नृत्य… या नृत्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. डोक्यावर घुंगट घेऊनच राई नृत्य करावं लागतं. हे नृत्य करताना इतर समाजाच्या मुलाने नाच करणाऱ्या बेडिया समाजाच्या मुलीला जर पसंद केलं त्यांचे रितसर लग्न होते आणि त्या मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका होते. दुसऱ्या बाजूला असेही म्हटले जाते की याच राई नृत्यांतून मुली आणि ग्राहक यांच्यात सौदा होतो. एकंदरीतच पांढरपेशा समाज या राई नृत्याला बदनामीच्या चश्म्याने बघतो.
आता रामसहाय पांडे या कलाकाराकडे वळूया… रामसहाय पांडे यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्यानंतर सहा वर्षांत आईनेही अखेरचा श्वास घेतला. भावंडे बहिणीकडे राहू लागली. रामसहाय शाळा सांभाळून गुरे वळायला जाऊ लागले. पण हा दिनक्रम एका संक्रांतीच्या जत्रेपासून हळूहळू मोडत गेला. त्या जत्रेत राई नृत्य पाहून रामसहाय इतके प्रभावित झाले की, हेच आपण करायचे, असे त्यांनी ठरवले. शाळाही बुडवून, शेतात ते मृदुंग वाजवून पाहू लागले.
विरोध डावलून गळ्यात मृदुंग बांधून गिरक्या घेत राई नृत्य करणारे पांडे
राई नृत्य करणाऱ्या महिला बेडिया समाजाच्या आणि तथाकथित खालच्या जातीच्या मानल्या जात असल्यामुळे त्यांचे शीलही भ्रष्टच मानले जाई. त्या बायांबरोबर रामसहाय नाचणार, म्हणून भाऊदेखील चिडला. पण रामसहाय बधले नाहीत. त्यांनी आधी लपूनछपून, नंतर घरच सोडून मृदुंगवादन- आणि गळ्यात मृदुंग बांधून गिरक्या घेत नर्तन- सुरूच ठेवले. नर्तनाची ही आवर्तने वाढली… आधी बुंदेलखंडच्या पंचक्रोशीत – सागर ते छतरपूर आणि दतिया, झांशी ते ललितपूर- सर्व ठिकाणी त्यांनाच निमंत्रणे मिळू लागली. 
राई नृत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख
एव्हाना ‘समाजाचा’ रागही निमाल्यामुळे विवाह होऊ शकला. याच काळात देशभर लोकनृत्य, लोककलांना सरकारी आश्रयाचे प्रस्थ वाढत होते… पुपुल जयकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुल्कराज आनंद अशी भारतीयतेबद्दल खरोखरची आस्था असलेली अभ्यासू मंडळी तेव्हा होती आणि ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ला परदेशांत प्रतिष्ठा होती.
त्याहीमुळे असेल, पण रामसहाय यांच्या चमूचे कार्यक्रम आधी मध्य प्रदेशात ठिकठिकाणी, पुढे अन्य काही राज्यांत आणि 1978 ते 1989 या काळात तर परदेशांमध्येही होऊ लागले. मॉरिशसमध्ये तेथील भारतीयांकडून निमंत्रण, जपानमध्ये 1984 सालात महिनाभराचा दौरा हे रामसहाय आणि चमूसाठी संस्मरणीय ठरले. अखेरचा परदेशी कार्यक्रम त्यांनी 2006 मध्ये दुबईत केला.
पंच्याहत्तरीनंतर मात्र चमूची सूत्रे त्यांनी पुढल्या पिढीकडे दिली. ‘आदिवासी लोककला परिषदे’वर मध्य प्रदेश सरकारने त्यांची नियुक्ती केली होती, तसेच ‘बुंदेली लोकनृत्य व नाट्यकला परिषद’ ही संस्था स्थापून रामसहाय यांनी दिल्ली/ लखनऊच्या मुलामुलींनाही ‘राई’चे धडे दिले होते. लोककलेचा प्राण टिकवून ती पुढे नेण्याची कृतार्थता त्यांच्या आयुष्याला होती.






