कुमारी मातांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा विदर्भ हादरला आहे. दहा वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात गरीबी व निरक्षरतेमुळे अनेक तरुणींची फसवणूक झाली आणि त्यातून त्यांना गर्भधारण झाली. आजही त्याचे परिणाम यवतमाळातील कुमारी माता भोगत आहेत. पण आता कुमारी मातांच्या संख्येत वाढ होण्याची कारणं वेगळी आहेत आणि हे प्रमाण आता ग्रामीण भागाऐवजी शहरी भागात वाढलं असल्याने मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या एका अभ्यासातून नागपूरसह विदर्भात अविवाहित महिलांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी सादर केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आलाय.
जानेवारी 2022 जून 2024 या कालावधीत सरकारी रुग्णालयात आलेल्या कुमारी मातांच्या प्रकरणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. केवळ ग्रामीण भागातूनच नाही तर शहरी भागात अविवाहित महिलांमध्ये गर्भवती राहण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे ही अठरा वर्षाखालील मुलींबाबत घडली असल्याचं डॉक्टर अविनाश गावंडे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
विदर्भात कुमारी मातांचे प्रमाण वाढले
श्रीनगर येथे अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत डॉक्टर अविनाश गावंडे यांनी या अभ्यासाचे निष्कर्ष सादर केले असून नागपूरसह विदर्भात सामाजिक आरोग्य बिघडले आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित होतोय. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कुमारी मातांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक पातळीवर असताना आता केवळ अतिदुर्गम भागातच नाही तर गाव खेड्यातून तसेच शहरांमधूनही अविवाहित महिलांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
नागपूरच्या शासकीय रुग्णालयात जानेवारी 2022 ते जून 2024 दरम्यान आलेल्या 124 कुमारी मातांच्या प्रकरणांचे विश्लेषण केल्यानंतर यातील तब्बल 67 प्रकरणे ही 18 वर्षाखालील वयोगटातील होती. 18 ते 21 वयोगटात 30 कुमारी माता तर 22 ते 25 या वयोगटात 21 महिला होत्या. 25 वर्षांवरील अविवाहित 6 महिला गर्भवती होत्या. गर्भधारणा झाल्यानंतर 33% कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला असून 48% महिला प्रसुती पर्यंत पोहोचल्याचही डॉक्टरांनी सांगितलं. ज्यांची गर्भधारणा 24 आठवड्यांपेक्षा कमी होती अशा महिलांनी गर्भपाताचा पर्याय स्वीकारला तर 24 आठवड्यानंतरच्या प्रकरणांमध्ये अनेक महिलांना कुमारी मातृत्व स्वीकारावे लागले.
संबंधित लेख वाचा: 1) स्त्रीदेहाची शोकांतिका… कुमारी माता! |
54% बाळ कमी वजनांची
अल्पवयात गर्भधारणा आणि बाळंतपण हे मुलीच्या शारीरिक आणि मानसिक मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कुपोषण, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब आणि प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कमी वजनाची बाळ जन्माला येऊन जिवालाही धोका होऊ शकतो. प्रसूती झालेल्या ७५ प्रकरणांपैकी 54 टक्के बाळ कमी वजनाची होती. यातील 12 टक्के बाळांचा मृत्यू झाला.
(डॉ. अविनाश गावंडे)
48 टक्के कुमारी मातांनी दिला बाळाला जन्म
नोंद झालेल्या कुमारी मातांपैकी 48 टक्के कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला, तर 33 टक्के कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. 24 आठवड्यांखालील गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला, तर 24 आठवड्यांनंतरच्या प्रकरणांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक होते.
कुमारी मातांच्या अनेक प्रकरणांमध्ये मुलींची किंवा महिलांची कौटुंबिक पार्श्वभूमी हालाकीची आहे. आर्थिक परिस्थिती खचलेली,कमालीचे दारिद्र्य शिक्षणाचा गंध नाही, कुटुंबाचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी कुमारी मातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. अनेकींना लैंगिक शोषणाच्या परिस्थितीतून जावे लागले असल्याने बदनामीच्या भीतीने अनेक महिला वेळेवर उपचार घेत नसल्याचेही डॉक्टर अविनाश गावंडे यांनी सांगितलं. वेळेत उपचार न घेतल्याने बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो असेही ते म्हणाले.
शेजारी आणि नातेवाईक अधिक जबाबदार
या संशोधनानुसार ज्या 124 कुमारी मातांची प्रकरणे समोर आली आहेत त्यातील 88 टक्के कुमारी मातांचे प्रमाण शेजारी किंवा नातेवाईंकाकडून लैंगिक शोषणामुळे झाली आहेत. जबरदस्तीने बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून केलेला बलात्कार, अल्पवयात झालेले शारीरिक संबंध यांतून अल्पवयीन मुली गर्भवती राहण्याचे प्रमाण चिंताजनक आहे… अवेळी लादल्या गेलेल्या मातृत्वातून त्यांचे आयुष्य मात्र उद्ध्वस्त होते. समाजही त्यांच्याकडे चुकीच्या नजरेतून पाहतो.
सध्या हा प्रश्न गंभीर होतो आहे. भारतातील वैद्यकीय गर्भपात कायदा (MTP Act) 2021 नुसार, अविवाहित महिलांना 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. तथापि, प्रत्यक्षात, अल्पवयीन मुलींना पालकांच्या संमतीशिवाय गर्भपात सेवा मिळवणे कठीण जाते. यामुळे अनेक मुली अनधिकृत आणि असुरक्षित गर्भपाताच्या मार्गाचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
कुमारी माता… लैंगिक शिक्षणाचा अभाव
यामागील कारणांचा शोध घेतला तर नकळत्या वयात जडलेले प्रेम, त्यातून निर्माण होणारे शारीरिक आकर्षण, यामुळे अल्पवयीन मुलांनी घर सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. या घटनांमुळे कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, होणाऱ्या बाळांना कुमारी माता सांभाळण्यास तयार नसल्याने बहुतांशी बाळांना अनाथाश्रमात दाखल केले जाते. काही बेवारस सोडली जातात. यामुळे वेगळाच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागात पालकांचा अशिक्षितपणा, तर शहरी भागात पालकांच्या उच्चविद्याविभूषितपणाचा फटका मुलांसह पालकांना बसतो. समाजमाध्यमांच्या साहाय्याने मुलांना हवी ती माहिती सहजपणे उपलब्ध होते. आपले कुतूहल शमविण्याचा ते प्रयत्न करतात. त्यातून गैरप्रकार घडतात. साधारणत: 12 ते 15 वयोगटातील अल्पवयीन मुली या भूलथापांना बळी पडत सर्रास घर सोडतात. अचानक कधी पालक किंवा पोलिसांच्या तावडीत ते सापडतात.
अशा वेळी पळवून नेणाऱ्या मुलावर मुलीचे कुटुंबीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करतात. पोलीस त्या मुलाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करतात. या सर्व प्रकारात काही मुली गरोदर असल्याचे जेव्हा समोर येते, तेव्हा पालक हबकून जातात.
अनेक तरुणींना लैंगिक आणि प्रजनन आरोग्याविषयी पुरेशी माहिती नसते. या अज्ञानामुळेही अनपेक्षित गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. लैंगिक शिक्षणाचा अभाव, गर्भनिरोधक उपायांची माहिती नसणे आणि सामाजिक व धार्मिक बंधने यामुळे तरुणी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यात अयशस्वी ठरतात. कुमारी मातांना मानसिक आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेनंतर आणि प्रसूतीनंतर त्यांना नैराश्य, चिंता, सामाजिक एकाकीपणा आणि आत्महत्येच्या विचारांचा सामना करावा लागतो.
विशेषतः, किशोरवयीन मातांना पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका अधिक असतो. कुमारी मातांना समाजाकडून आणि कुटुंबाकडून अपमान, नाकारले जाणे आणि एकाकीपणाचा सामना करावा लागतो. काही वेळा, कुटुंबीय मुलींच्या गर्भधारणेची जबाबदारी स्वीकारत नाहीत, ज्यामुळे त्या मुलींना अनैतिक गर्भपात किंवा नवजात शिशूंच्या देखभालीसंबंधी समस्यांना सामोरे जावे लागते.
कुमारी माता हा प्रश्न गंभीर होतो आहे. ग्रामीण, शहरी भागांतही या प्रश्नाची दाहकता जाणवते आहे. सोशल मीडियाचा अतिवापर, इंटरनेट, व्हॉटसअपमुळे संवाद वाढले आहेत. मात्र, त्याचा गैरवापरच जास्त होतो आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव, परिणांमाची माहिती नसल्यामुळे, पालकांचे दुर्लक्ष, जवळच्याच लोकांकडून होणारा अत्याचार अशा अनेक कारणांमुळे बालकांवरील अत्याचार वाढत आहेत.
याला मुलेही अपवाद नाहीत. मुलांवरही अत्याचार होतात. मुला - मुलींचे शोषण होते. बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिले पाहिजे. त्याबरोबर पालकांनाही मुलांबरोबर कसे वागावे याचे शिक्षण दिले गेले पाहिजे. अनेक शाळा आता अशा प्रकारचे उपक्रम राबवित आहेत. कुमारी मातांचे प्रश्नही संवेदनशीलपणे हाताळले पाहिजेत.
उपाययोजना आणि शिफारसी
- शाळांमध्ये आणि समुदायांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्याविषयी सर्वसमावेशक शिक्षण देणे आवश्यक आहे.
- कुमारी मातांना मानसिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
- कुमारी मातांना समाजाकडून आणि कुटुंबाकडून समर्थन मिळणे आवश्यक आहे.
दहा वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्हा का हादरला होता?
यवतमाळ- तेलंगणच्या सीमेला लागून असलेल्या झरी गावातील कुमारी मातांचा प्रश्न दहा वर्षांपूर्वी साऱ्या जगासमोर आला होता. झरी जिल्ह्यातील अत्यंत मागासलेले व दुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. गरीबी व निरक्षरतेमुळे येथील अनेक तरुणींची फसवणूक झाली. त्यातून त्यांना गर्भधारण झाली.
आजही समाजाचा तिटकारा, उपेक्षा या कुमारी मातांच्या वाट्याला आल्या आहेत. कुमारी माता बनल्याने कुटुंब त्यांचा स्वीकार करेना आणि शासन त्यांच्या समस्यांकडे लक्ष देईना. त्यामुळे अशा अवस्थेत या महिला केवळ आपल्या पाल्यासाठी मरणाहूनही कठिण असलेले जीवन जगत आहेत. एक दशक कालावधी लोटल्यानंतरही झरीतील कुमारी मातांच्या समस्या कायमच आहेत.
झरी अत्यंत मागास भाग असल्याने येथील लोकांना कोणताही रोजगार नाही. बहुसंख्य शेतकरी अल्प-अत्यल्पभूधारक आहेत. परिस्थिती नसल्याने त्यांनी आपापल्या जमिनी तेलंगणमधील बड्या शेतकऱ्यांना भाड्याने दिल्या. हे शेतकरी मिरचीचे पीक घेतात. त्यामुळे येथे व्यापारी व इतरांची वर्दळ वाढली. परिसरातील मुली शेतीवर कामाला जायच्या. याच मुलींना हेरून काही धनदांडग्यानी त्यांना लग्नाचे आमिष दाखवित फसविले. पैशांच्या जोरावर या मुलींच्या तक्रारी दडपण्यात आल्या.






