वरळीत दोन दिवसांपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा विजय मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यातील सध्याचं सरकार हे मराठीद्रोही असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं.
मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना रुदालीची उपमा दिली. फडणवीस म्हणाले की, ‘’मला असं सांगण्यात आलं होतं, की आज मराठीचा विजयी मेळावा आहे. पण त्याठिकाणी रुदालींचं भाषणही झालं. त्यांनी मराठीबाबत एक शब्द न बोलताना आमचं सरकार पाडलं, आमचा पक्ष फोडला, हे रडगाणं सुरू केलं. त्यामुळे मराठीचा विजय नव्हता, तर रुदाली रडणं होतं. या रुदालीचं दर्शन या ठिकाणी झालं.’’ मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे रुदाली म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात, जिथं आयुष्यही कधी कधी जगण्याचा संघर्ष वाटतो, तिथं चक्क माणसाच्या दु:खाच्या विक्रीची किंमत ठरवली गेली. अश्रूंनाही बाजार मिळाला आणि वाळवंटातील इथल्या स्त्रियांना पुन्हा एकदा या दु:खाच्या सौद्यात सामील केलं गेलं, ‘रुदाली’ प्रथेच्या रूपानं…
"रुदाली' म्हणजे खोटं खोटं रडून दुःखाचा माहोल तयार करणाऱ्या महिला..
भावना आहे, प्रेम आहे पण मोठेपणाचा अवजड कोट घालायची सवय लागल्यामुळे डोळ्यातले अश्रू बाहेर पडायला मार्ग नाही... मग त्यावर तोडगा म्हणून पूर्वी राजस्थानमध्ये मोठ्या लोकांच्या घरातले कोणी मेले तर "रुदाली' बोलवून त्यांच्या मयतावर रडायला लावायचे. "रुदाली' म्हणजे थोडक्यात खोटं खोटं रडून दुःखाचा माहोल तयार करणाऱ्या महिला...
‘रुदाली’ म्हणजे ती स्त्री, जी दुसऱ्यांच्या दु:खासाठी पैसे घेऊन रडते. राजस्थानच्या थर, बीकानेर, जोधपूर आणि काही भागांतील राजपूत घरांमध्ये पुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातील उच्चवर्णीय स्त्रियांना सार्वजनिकरित्या दु:ख दाखवणं अपमानास्पद मानलं जायचं. म्हणून त्या घरातल्या पुरुषांच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी मागास जातींतील, गरीब स्त्रियांना बोलावलं जायचं… अशा कृत्रिम रडणाऱ्या महिला म्हणजे रुदाली!
संबंधित लेख वाचा: 1) कल्पना लाजमी : चाकोरीबाहेरचे सिनेमे देणारी आणि तसेच आयुष्यही जगणारी एक गुणी दिग्दर्शिका… |
राजस्थानमध्ये आजही आहे रुदाली प्रथा
राजे-राजवाडे गेले, संस्थानं खालसा झाली म्हणून रुदाली परंपरा संपली असे अजिबात नाहीये. राजस्थानच्या काही भागात आजही काही रुदाली स्त्रिया आढळतात, मात्र त्याचे प्रमाण आता अत्यंत कमी आहे. यामागचे कारण म्हणजे सध्या राजपूत-जमिनदारांचा पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नाही आणि उरलेले राजपूत जमिनदारदेखील त्यांच्या वैभवाचे, संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करत नाहीत. 
रुदालीची परंपरा पूर्णपणे संपलेली नाही. जोधपूरमधील शेरगढ, पटोदी आणि छितर का पार, कोटरा, चुली, बारमेरमधील फतेहगढ आणि जैसलमेरमधील रामदेवरा आणि पोकरण यासारख्या भागात अजूनही रुदाली आहेत. तथापि, त्यांचे वर्तुळ मोठ्या प्रमाणात आकुंचित होत चालले आहे. याचे कारण म्हणजे आता राजपूत जमीनदारांचा पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नाही. दुसरे म्हणजे, उरलेले काही राजपूत जमीनदार देखील पूर्वीसारखे वैभव आणि वैभवाकडे लक्ष देत नाहीत. यामुळे, प्रतिष्ठेसाठी रुदालींना बोलावण्याची गरज नाही.
‘’लग्नानंतर शेजारच्या गावातून इथे आले तेव्हा 14 वर्षांची होते. लग्नाच्या पोटलीत चुनरी आणि दागिन्यांसोबत काळ्या कपड्यांचा जोडाही होता. शोक म्हणजेच मातमचा जोडा. कोणाच्याही मृत्यूची बातमी कळली की लगेच काळी चुनरी ओढून बाहेर पडायचे. आपल्या उंबऱ्यापासून त्या घराच्या दरवाजापर्यंत रडत जायचे. लोक विणकाम-शिलाई, गाणे आणि वाजवण्याचा सराव करतात, आम्ही रडण्याचा सराव करतो.’’
राजस्थानच्या रेवदार तालुक्यात निंबोडा गावात राहणारी वयस्कर दापू देवी सांगते. दापू देवी एक रुदाली असून ती मेघवाल समाजाची आहे, या समाजाच्या रुदालींच्या रडण्यात गाण्यांपेक्षा जास्त जुंबिश(चढउतार) असतात.
‘’जी मोठ्याने रडेल तिला चांगली रुदाली समजले जायचे’’
दापू म्हणते, ‘गावात कोणी वारले तर आम्ही 10-15 बायका जमायचो आणि रडत त्याच्या घरी जायचो. कुणी छाती बडवायचे, कुणी धुळीत लोळायचे. जी मोठ्याने रडेल तिला चांगले समजले जायचे. अनेकदा तर असे झाले की ज्याच्या घरी मृत्यू झाला, त्यांचे अश्रू थांबले. मग आमचे काम आणखी महत्त्वाचे होते. आम्ही रडत रडत तिच्या बांगड्या फोडायचो, चुनरी काढायचो आणि काळी चुनरी तिच्यावर टाकायचो. हे सगळं असं व्हायचं की तिलाही रडू यायचं. मग ती इतकी रडायची की बेशुद्ध व्हायची. रडण्या खंड पडू नये म्हणून घरातील बायका मध्ये-मध्ये पाणी शिंपडून तिला उठवायचे.
‘’रडताना आपण सगळे सारखे कपडे घालतो. काळी किंवा आकाशी चुनरी. सोबत फुल स्लीव्ह ब्लाउज, ज्याला कौशली म्हणतात. आणि फेटका म्हणजेच घागऱ्यासारखा दिसणारा कपडा, जो तिला एक चतुर्थांश घेरतो. हे सगळं घातल्यावर डोळ्यांतून आपोआप अश्रू यायला लागतात,’’ अशी माहिती दापू देते.
‘’ती पहिली वेळ होती जेव्हा मी स्वत:साठी मोकळेपणाने रडले.’’
याच गावामध्ये कन्या देवी नावाची आणखी एक रुदाली आहे. रुदाली प्रथेबद्दलची माहिती देताना कन्या देवी सांगते की, आम्ही फक्त रडतच नाही तर त्याप्रसंगी बोलतही असतो. उदाहरणार्थ, एखाद्या तरुण मुलाचे निधन झाले असेल तर आईचे दु:ख सांगून रडतात. पतीच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीच्या दुःखात रडतात. म्हाताऱ्यांच्या मृत्यूवर अश्रू कमी येतात. पण रडायचे तर असतेच! यासोबत आपले जुने अश्रूही मिसळतो.
तुम्ही स्वतःसाठी कधी रडलात, असा प्रश्न विचाकल्यानंतर कन्या देवी सांगते,’’ जेव्हा नवरा मेला तेव्हा. दिवसा रडायचे, रात्री रडायचे. झाडू मारताना रडायचे, स्वयंपाक करताना रडायचे. कोणी आले तर जोरजोरात रडायचे, नाहीतर हळूहळू हुंदके द्यायचे. ती पहिली वेळ होती जेव्हा मी स्वत:साठी मोकळेपणाने रडले.’’
रुदालींना आजही अशुभ मानलं जात…
राजस्थानमध्ये असलेल्या या रुदाली प्रथेमधील सर्व महिला या विधवा असतात आणि आजही या महिलांना ‘अशुभ’ मानलं जातं. ‘नवऱ्याला खाणारी’ म्हणून या महिलांना समाजात जराही स्थान नसल्यामुळे त्या ‘नाता प्रथा’ स्वीकारतात. जात पंचायतीने या रुदाली महिलांच्या बाबतीत काही कायदे प्रस्थापित केले आहेत आणि हे कायदे या महिलांना निमुटपणे सहन करावे लागतात. या नियमाप्रमाणे विधवा महिलेला दीराशी लग्न करावं लागतं. ज्या महिला असं करत नाहीत त्यांच्यावर अक्षरश: बहिष्कार टाकला जातो. या महिलांना सकाळी घराबाहेर पडण्याची परवानगी नाही, कारण त्यांचा चेहरा बघितला तर काहीतरी अशुभ घडले अशी या समाजाची मानसिकता…
वेगवेगळ्या रंगाच्या पोषाखांवरून रुदालींचं वय ठरतं. म्हणजे जर कमी वयात एखादी विधवा झाली तर ती हिरव्या रंगाचे कपडे घालते तर वयस्कर महिला विधवा झाली की तिला लाल भडक रंगाचे कपडे घालावे लागतात.
डिंपल कपाडियाचा ‘रुदाली’ चित्रपट…
जेव्हा रुदालीबद्दल चर्चा होते तेव्हा 1993 साली महाश्वेता देवी यांच्या कथेवर आधारित कल्पना लाजमी यांचा ‘रुदाली’ हा चित्रपट डोळ्यासमोर येतो. रुदाली म्हणजे अशा स्त्रिया ज्या श्रीमंत घरांमध्ये कुणाचा मृत्यू झाल्यावर त्या घरी जाऊन "पैशासाठी रडणे" हे काम करतात. समाजाने त्यांना "शोक विक्रेते" म्हणून ठरवलेले असते.
पण त्यांच्या स्वतःच्या जीवनात जेवढे दुःख आहे, तेवढं व्यक्त करण्याची परवानगी त्यांना नसते. या चित्रपटात डिंपल कपाडियाने 'शनिचरी' ही मुख्य भूमिका साकारली आहे. शनिचरी ही एक गरीब, दुःखांनी भरलेली स्त्री असते जिला स्वतःच्या आयुष्यात कधीही मोकळेपणाने रडता आलं नाही. तिच्या आयुष्यातील दु:ख, संघर्ष आणि अंतर्मनातील वेदना डिंपलने फारच प्रभावीपणे रंगवल्या आहेत.






