टीम बाईमाणूस
- नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने काही दिवसांपूर्वी सक्षमच्या धाकट्या भावावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते.
- आंचलच्या आरोपांनंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असताना आता सक्षमच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. इतकेच नव्हे तर आंचल आणि सक्षमचा भाऊ शिवम यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केले.
- त्यामुळे आधी ऑनर किलिंगमुळे चर्चेत आलेले हे प्रकरण आता परस्परविरोधी दावे, भावनिक प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
सक्षम ताटेच्या ऑनर किलिंगनंतर अंत्यसंस्कारावेळी त्याच्या मृतदेहासमोर उभ्या असलेल्या आंचल मामीडवारला पाहून संपूर्ण देश हळहळला होता. प्रेमासाठी सर्वस्व गमावलेल्या या तरुणीची आणि मुलगा गमावलेल्या ताटे कुटुंबाची वेदना एकच असल्याचं तेव्हा अनेकांना वाटलं होतं. पण अवघ्या काही महिन्यांत हेच नातं आरोप-प्रत्यारोपांच्या वळणावर येऊन ठेपलं आहे.
काही दिवसांपूर्वी सक्षमची आई संगीता ताटे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना, सक्षमच्या मृत्यूनंतर आंचलने "आता मीच तुमचा मुलगा आहे, तुमची काळजी घेईन," असं सांगितलं होतं. ती काही महिने कुटुंबासोबत राहिली. मात्र, आजीची तब्येत बिघडल्याचं कारण सांगून ती गेली आणि त्यानंतर परत आली नाही, असं संगीता ताटे यांनी म्हटलं होतं.
या नंतर अनेकजणांनी आंचलच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. तोपर्यंत आंचलची कोणतीच बाजू समोर आली होती. मात्र जेव्हा आंचल तिची बाजू मांडण्यासाठी माध्यमांसमोर येऊन बोलली तेव्हा तिने सक्षम ताटेच्या धाकट्या भावावर गैरवर्तनाचे आरोप केले.

“माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही”
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, "माध्यमांशी बोलताना आंचल मामीडवारने सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप केला. ही बाब मी सक्षमच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवला गेला नाही", असं तिने सांगितलं.
"पुढे काही अनुचित घडलं तरी माझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी सर्वांना सांगून आणि पोलिसांना माहिती देऊन ते घर सोडलं. पोलिस कर्मचाऱ्यांनी मला माझ्या वडिलांच्या घरी पोहोचवलं," असा दावा आंचलने केला आहे. सध्या आपण वडिलांच्या घरी राहत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
आपण घर सोडल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या ट्रोलिंगबाबत नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्य जाणून न घेता एखाद्या व्यक्तीबाबत निष्कर्ष काढू नयेत, असं आवाहनही तिने केलं होतं.
दरम्यान, या नव्या खुलास्यामुळे सक्षम ताटे प्रकरणात चर्चेचं केंद्र बदललं. आतापर्यंत आंचलने घर का सोडलं, यावर चर्चा होत होती. मात्र, आता तिने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांमुळे नवीन प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर ताटे कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. सक्षमची आई संगीता ताटे आणि त्याची आत्या यांनी माध्यमांसमोर काही व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवले. या चॅटमध्ये आंचल आणि शिवम ताटे यांच्यात नियमित संवाद होत असल्याचा दावा त्यांनी केलाय.
"आंचलचे व्हॉट्सॲप चॅट आमच्याकडे आहे"
आंचलच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सक्षमच्या आत्याने सांगितले, शिवमवर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा करत त्यांनी माध्यमांसमोर काही चॅटचा उल्लेख केला.
"मला कोणी बॅड टच करतंय, तर मी त्याच्याशी चांगल्या पद्धतीने आणि बाळा म्हणून बोलणार नाही. १ एप्रिलपर्यंतचे तिचे मेसेज आमच्याकडे आहेत. आमचं सगळं गेलंय, माझा भाऊ गेला. सक्षम आमचं लेकरू गेलं. आता आमच्या १४ वर्षांच्या शिवमचं नाव खराब केलं जातंय. प्लीज आंचल, आमच्या शिवमला काही करू नको. आमचं एकच लेकरू आहे. आमच्या वंशाचा दिवा तोच आहे. त्याला बदनाम करू नकोस. एवढ्या लेकराने तुझं काहीही वाईट केलेलं नाही. तो कायम तुला 'वहिनी, वहिनी' म्हणायचा."
असं त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं

ताटे कुटुंबीयांनी माध्यमांसमोर काही व्हॉट्सॲप स्क्रीनशॉटही दाखवले. या स्क्रीनशॉटमध्ये आंचल शिवमला "बाळा" म्हणून संबोधत असल्याचा दावा करण्यात आला आहे. "बोल ना बाळा" असे संदेश आंचलकडून पाठवले गेले होते. याच मुद्द्यावर भाष्य करत सक्षमच्या आत्याने प्रश्न उपस्थित केला. "जर तुला त्याच्यामुळे इतका त्रास होत होता, तर तू त्याला बाळा-बाळा म्हणून का बोलत होतीस? एप्रिलपर्यंतची चॅट आम्ही पाहिली आहे," असा दावा त्यांनी केला. या चॅट स्क्रिनशॉटमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा सुरू झालीये.
संगीता ताटे यांचीही प्रतिक्रिया
या वादात सक्षमची आई संगीता ताटे यांनीही भूमिका स्पष्ट केली. आंचलविषयी आपल्या मनात आजही चांगली भावना असल्याचे सांगितले. मात्र शिवमवर केलेल्या आरोपांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
"आंचलच्या मनात काय आहे, हे आम्ही सांगू शकत नाही. पण ती जे सांगायची त्यावर आम्ही विश्वास ठेवत होतो. ती आमच्यासाठी मुलीसारखीच होती. ती तिच्या आई-वडिलांकडे गेली, त्यात आम्हाला काहीच अडचण नाही. पण घर सोडून गेल्यानंतर आमच्यावर असे आरोप केले ते बरोबर नाही," असे त्या म्हणाल्या.
संगीता ताटे यांनी असेही सांगितले की, आंचल घर सोडून गेल्यानंतर अनेक पत्रकार त्यांच्या घरी आले होते. मात्र त्यांनी तिच्याबाबत कोणतीही नकारात्मक भूमिका घेतली नव्हती.
"आम्ही तिची बदनामी केली नाही. उलट अनेक गोष्टी आम्ही झाकून ठेवल्या. आम्ही फक्त सक्षमला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होतो. पण आज ज्या मुलाशी ती भावासारखी बोलत होती, त्याच्यावर आरोप केले जात आहेत, हे आम्हाला खूप वेदनादायक वाटतंय," असं त्या म्हणालया
सक्षम ताटे प्रकरणातील चर्चेचे केंद्र बदलले
सक्षम ताटे प्रकरण सुरुवातीला ऑनर किलिंगच्या आरोपांमुळे देशभर चर्चेत आले होते. प्रेमसंबंधांना विरोध म्हणून एका तरुणाची हत्या झाल्याचा आरोप, त्यानंतर आंचलने स्वतःच्या कुटुंबाविरोधात दिलेली साक्ष आणि सक्षमच्या मृतदेहासोबत केलेले विवाहविधी यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते.

मात्र गेल्या काही महिन्यांत चर्चेचे स्वरूप बदलताना दिसतंय. आधी आंचलने सक्षमचे घर का सोडले यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर तिने शिवमवर गैरवर्तनाचे आरोप केले. आता त्या आरोपांना उत्तर देताना ताटे कुटुंबीयांनी चॅट स्क्रिनशॉट समोर आणले आहेत.
या वादाचा ऑनर किलिंग खटल्यावर परिणाम होणार?
दरम्यान, या नव्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मूळ ऑनर किलिंग प्रकरणावर त्याचा काही परिणाम होणार का, याबाबतही चर्चा सुरू झालीये. आंचल मामीडवार ही या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार मानली जाते. त्यामुळे ताटे कुटुंब आणि आंचल यांच्यात निर्माण झालेला वाद भविष्यात खटल्याच्या सुनावणीवर किंवा साक्षीपुराव्यांवर परिणाम करेल का? असा प्रश्नही समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे.
आंचलने आपल्या कुटुंबाविरोधात दिलेली भूमिका कायम ठेवणार की पुढे तिची भूमिका बदलणार? याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, ऑनर किलिंगसारख्या संवेदनशील प्रकरणात आधीच न्यायप्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी होत असताना आता नव्या वादांमुळे मूळ मुद्दा बाजूला पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. सक्षम ताटेच्या हत्येप्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार का? पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? आणि या सगळ्या वादाच्या धुरळ्यात मूळ खटल्याचं काय होणार? हेच प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.






