विधवा महिला, घटस्फोटित,परित्यक्ता अशा एकल महिलांचे विवाह करण्याचा विषय आला की नेहमी त्या महिलेचे वय आणि तिला असणारी मुलं हा मुद्दा घेवून त्या लग्नाला विरोध केला जातो. वय वाढले, मुलं मोठी झाली.आता कशाला हवे लग्न ? मुलांचा विचार करायचा असे सांगून लग्नाचा विषय संपवला जातो. वास्तविक वय वाढणे,मुले असणे याचा विवाहाच्या गरजेची काहीच संबंध नसतो. ती एक शारीरिक,मानसिक,भावनिक व सहवासाची गरज असते. पण वरील मानसिकतेमुळे आज तरुण असूनही अनेक महिलांचे पुनर्विवाह होत नाहीत.
या पार्श्वभूमीवर समाजात अशीही काही उदाहरणे आहेत जिथे मुलांनीच त्यांच्या विधवा आईचे लग्न लावून दिले. अशा काही प्रेरणादायी उदाहरणे खास ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत…
आईचं दुसरं लग्न ही माझी आणि माझ्या आईची गरज होती - सिद्धार्थ चांदेकर
‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘आनलाईन बिनलाईन’, ‘गुलाबजाम’, ‘क्सालमेट’, ‘वजनदार’, ‘झेंडा’ असे अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मराठी चित्रपटसृष्टीत सिद्धार्थचा एक मोठी चाहता वर्ग पाहायला मिळत आहे.
(57 वर्षांच्या विधवा आईचे पुन्हा लग्न लावून देणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर.)
दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे सीमा चांदेकर यांचं लग्न लावण्यात पुढाकार घेतला. त्याची आई अनेक वर्षे एकटी होती. सिद्धार्थचा विवाह झाला तेव्हा त्याला आईचे एकटेपण अधिक लक्षात आले आणि त्याने आईला आग्रह करून विवाह करायला लावला. त्याने आईचे वय 57 पेक्षा जास्त आहे किंवा सून आली आहे आता कशाला लग्न? असा विचार केला नाही..आईच्या लग्नानंतर आईच्या अगोदरच्या जगण्याविषयी सिद्धार्थ लिहितो .."
त्याने एका मुलाखतीला त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ म्हणतो,’’ यावेळी आईने केलेले दुसरे लग्न हे माझी आणि माझ्या आईची गरज होती. एका जोडीदाराची गरज वाटणं हे मॉर्डनायझेशन नसून ती एक गरज आहे हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. लोकांच्या बोलण्याकडे मी फारसं लक्ष देत नाही, कारण माझी आई आणि मी आमचं जीवन जगत आहोत. तिने माझा केलेला सांभाळ आणि तिचा एकटेपणा मी खूप जवळून पाहिला आहे. जोडीदार सोबत असला की आपल्या जीवनात एक स्थैर्य येते मग ते माझ्या आईच्या आयुष्यात का नसावं. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका मुलाखतीमध्ये त्याने दिवाळीत मी जेव्हा आईला बोलवले तेव्हा तिने मला थेट सांगितले की मी फिरायला जातेय. ही गोष्ट मला फार आवडली ती तिचे आयुष्य पुन्हा नव्याने जगत आहे.’’
‘’मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यु आई! हॅप्पी मॅरीड लाईफ!’ "
संबंधित लेख वाचा: 1) ‘’आम्ही फक्त म्हणायला जगतोय, पण आमची अवस्था जिवंत प्रेतासारखी..’’ बनारसच्या विधवा मरणाच्या प्रतीक्षेत! |
सिद्धार्थच्या आईने म्हणजे सीमा चांदेकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्या सांगतात, ‘दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करण्यासाठी देखील अनेक वर्ष लागली. मुल त्यांच्या आयुष्यात पुढे गेली आहेत. त्यांचं सगळं काही झालं आहे म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला असं नाही. माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत होती. म्हणून एकटं वाटण्यासारखं देखील काहीही नव्हतं. तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता.
त्यामुळे माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. मला कुठे जाता देखील येत नव्हतं. सिद्धार्थ आणि सुमेधा मला येऊन भेटायचं. फोन, व्हिडीओ कॉलवर आमचं बोलणं देखील व्हायचं. त्यामुळे एकटेपणा जाणवत नव्हता.’
वयाच्या 57 व्या वर्षी लग्नाच्या निर्णयावर सीमा चांदेकर म्हणाल्या, ‘या वयात अन्य कोणत्या गरजांसाठी म्हणून कोणी लग्न करत नाही. या वयात लग्नाची काय गरज? असं देखील म्हटलं जातं. माझ्यासारखा अन्य महिलांनी देखील विचार करावा असं मला म्हणायचं नाही. प्रत्येकीचे विचार वेगळे असतात.
अपघात झाल्यानंतर मला एकटं वाटू लागलं. अपघातानंतर मला त्रास झाला तर मला मुलांसांगता येत नव्हतं. सिद्धार्थला मी सगळं काही फोनवर सांगू शकत नव्हते. कोणतीही गोष्टी असेल म्हणजे आज आम्ही मैत्रिणी भेटलो, मज्जा आली… या सगळ्या गोष्टी मी मुलांना फोनवर सांगू शकत नव्हती. मुलं ऐकतात पण त्यांच्याकडे एवढा वेळ असायला हवा… या सर्व गोष्टी मला जाणवू लागल्या होत्या…’ असं देखील सीमा चांदेकर म्हणाल्या.
शाहूनगरीत विधवा आईला मुलानं केलं 'सौभाग्यवती'!
त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू होता, या संसाराला मुलाच्या रूपानं एक फुलही उमटलं होतं. सारं काही व्यवस्थित असतानाच एक दिवस पतीला अपघात झाला, ती विधवा झाली. सौभाग्य गेल्यानं तीचं मन दुखावलं, ती सतत निराश दिसू लागली, समाजात तिला विधवा म्हणून वेगळी वागणूक मिळू लागली, तेवीस वर्षाच्या एकुलत्या एका मुलाला आपल्या आईची ही अवस्था पाहवेना, त्यानेच पुढाकार घेतला आणि आईचं दुसरं लग्न लावून दिलं.. ही घटना आहे पुरोगामी शाहूनगरीतील आणि हा मुलगा आहे युवराज शेले...
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावाने विधवा प्रथा बंद करून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला पुरोगामी चळवळीची वेगळी दिशा दिली. या ग्रामपंचायतीचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक गावासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश अशा अनेक गावांनी केले. या चळवळीत पुढचे पाऊल टाकले ते युवराजने.
आईचं दुसरं लग्न लावून देण्यासंबंधी युवराज म्हणतो, ‘’माझ्या ओळखीच्या कितीतरी पुरुषांना मी बायकोचा मृत्यू झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांत दुसरं लग्न केलेलं पाहिलं होतं. मग माझ्या आईने लग्न केलं तर काय हरकत आहे, असा विचार मनात आला.
वडिलांच्या आठवणी कायम आहेतच, पण म्हणून तिनं जगणं सोडावं, हे मला मान्य नाही. बस्स! एवढाच काय तो विचार केला आणि माझ्या आईचा दुसरा विवाह लावून देण्याचं मी ठरवलं. आई रत्ना हिच्या सुखाचा विचार करून तिच्यासाठी योग्य वर मी निवडला. आज मी, माझी आई रत्ना आणि वडील मारुती आम्ही तिघेही सुखाने राहतो आहोत.’’ 
(वडिलांचे निधन झाल्यानंतर आईचे पुन्हा लग्न लावून देणारा कोल्हापूरचा युवराज शेले.)
मी, माझे वडील आणि आई असं आमचं छोटं आणि सुखी कुटुंब होतं. वडील सेंट्रिंंगचं काम करायचे. कमाई जेमतेम होती, पण तरीही आई-वडिलांनी मला काहीच कमी पडू दिलं नाही. मला नृत्याची आवड होती. मी लावणी कलावंत आहे. ही वाट निवडली त्यावेळी मला माझ्या घरच्यांनी मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे आज मी माझी आवड सांभाळून नोकरी करतोय. दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचा अपघात झाला.
अपघातात ते गेले, पण जाताना माझं आणि माझ्या आईचं जगणंच जणू ते आपल्यासोबत घेऊन गेले होते... वडिलांच्या निधनानंतर आई खूप उदास असायची. दु:खी असायची. वडील गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा तिचा श्रृंगार उतरवला म्हणजे मंगळसूत्र आणि बांगड्या काढल्या, कपाळावरचं कुंकू काढलं त्यादिवशी मला प्रचंड वेदना झाल्या. आईचे असे रुप बघायला मला अजिबात आवडत नव्हते. काही दिवसांनी मी तिला टिकली लावण्याचा आग्रह करू लागलो.
तिने तिच्या आवडीप्रमाणे जगावं, असं मला वाटतं होतं, पण ती मात्र समाजमनाचं ओझं घेऊन रोजचा दिवस ढकलताना मला दिसायची. अनेकदा मी तिला समजून सांगितले की बाबा गेले म्हणून तू जगणं, आनंद घेणं सोडलं पाहिजे असं नाही. तुझं आयुष्य तू आनंदी जग. तुला जसे आवडते तशी म्हणजे पहिल्यासारखी राहात जा. पण, तिच्या मनाची काही या गोष्टीसाठी तयारी नव्हती.
ती एखादा आठवडा खुश असली की तोवर असे काही प्रसंग समोर यायचे की विधवा असल्याचं कटु सत्य समोर येऊन उभं राहायचे. कुणाच्या घरी हळदीकुंकू असो, सणवार असोत किंवा मग शुभकार्य... अशा प्रसंगी तिला डावललं जायचं. त्यामुळे विधवा असल्याचं वारंवार तिच्या मनावर कोरलं जातंय, हे मला जाणवतं होतं आणि त्याचं दुःख माझ्या मनात सलत होतं.
आईनं पुन्हा निखळ हसावं. जगण्याचा आनंद घ्यावा, यासाठी एक मुलगा म्हणून मला काय करता येईल, याचाच मी विचार करत असायचो. अशातच एकेदिवशी, तिचा पुन्हा विवाह करून द्यावा आणि तिचं स्वत:चं नवं आयुष्य सुरू करावं, असा विचार मनात आला. मी माझा विचार प्रथम माझ्या मित्राला बोलून दाखवला, त्यानं त्यावर सहमती दर्शवली.
मित्राच्या पाठिंब्यामुळे मला आईसमोर हा विषय बोलण्याचं बळ मिळालं. मी असाच एके दिवशी आईसमोर तिच्या लग्नाचा विषय काढला. आई रडायला लागली. म्हणाली, “तुला वेड लागलंय. लोक काय म्हणतील? आपल्याला समाजातून काढून टाकतील. इथं राहू देणार नाहीत.’ आईच्या या बोलण्यावर मी एवढंच म्हणालो, “बरं होईल. दुसऱ्या ठिकाणी जाऊन नव्यानं जगता येईल, कोण काही विचारणार नाही.’ समजावून सांगितलं तरी आईचा नकार पक्का होता. पण मीसुद्धा माझ्या विचारांवर ठाम होतो.
आईनं ही गोष्ट आपल्या शेजारच्या मैत्रिणींना सांगितली. यावर त्या तिला म्हणाल्या, “तुझा मुलगा इतका तुझ्या पाठीशी आहे तर मग काय हरकत आहे? एकटीनं आयुष्य काढायचं कठीण असतं. पण प्रत्येक वेळी बाईचा विचार होतोच, असं नाही. तुझ्या मुलानं चांगला विचार केलाय. त्याला होकार दे.’ मैत्रिणींनी अशी समजूत काढल्यावर आई तयार झाली. माझ्यासमोर माझ्याच नातलगांपैकी एका काकांचा चेहरा होता, ज्यांचा घटस्फोट झाला होता आणि ते देखील एकट्याने जगत होते. मी थेटच त्यांना विचारलं. त्यांनी आपल्या घरच्यांची संमती मिळवली आणि मग निर्णय पक्का झाला.
आईचं लग्न लावून देईपर्यंत मी मोठा असण्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. लग्नानंतर मात्र मी त्या दोघांचा मुलगा होऊन आता आम्ही तिघेही एका कुटुंबात सुखाने राहतो आहोत. आईच्या कपाळावर कुंकू, हातात बांगड्या आणि चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. यापेक्षा मोठं काय आहे? आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेतात. मग आपणही आई-वडिलांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असं मला वाटतं. आईसाठी मी हा निर्णय घेतला नसता तर ती पुढचं आयुष्य मन मारून जगली असती.
मला नेहमी वाटतं की पती निधनानंतरचं विधेवेचं जगणं हे बायकांनीच का सोसायचं? पुरुषांच्या वाट्याला वैधव्याची हेटाळणी येत नाही. त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला तरी त्याला समाजाची विशेष हरकत नसते. मग बाईनेच का सहन करायचं सगळं? अनेकदा पती निधनानंतर तरुण असलेल्या मुलीही एक मुलं असेल, तर संपूर्ण आयुष्य एकट्याने काढतात. त्यांनी लग्न केलं पाहिजे, असं अनेकदा त्यांच्या घरच्यांनाही वाटत नाही, हे दुर्दैव आहे. स्वतः एखाद्या विधवा स्त्रीने लग्नाचा निर्णय घेतला, तरी तिला टीका सहन करावी लागते.
स्रीलाही मन, भावना असतात, हे विसरून का जातो आपण? आणि नंतर मात्र एकटीने अपत्यांना वाढवलं म्हणून एखादीचं तोंडदेखलं कौतुक करतो इतकंच... ती या सगळ्या वर्षांत किती एकाकी जगली असेल? मनावर किती निर्बंध लादले असतील? हे लक्षात येताच नाही आपल्या. मला आईच्या लग्नानंतर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. अर्थात त्यामध्ये चांगल्या अधिक होत्या. समाज आजही चांगल्या गोष्टींना, चांगल्या विचारांना प्रतिसाद देतो. फक्त आपण धाडस करण्याची आणि समतेचे विचार जगण्याची गरज आहे.






