- संजना खंडारे
गडगंज संपत्ती, राजकारणात दबदबा आणि गळ्यात जाडजूड सोन्याच्या माळा घालणारे गावकरी… मुलीने प्रेमविवाह केला. मराठा जातीत केला म्हणून समाजात तोंड दाखवायला थोडं सोपं झालं.जातीपातीचा अभिमान, समाजात मान राखण्यासाठी मुलीच्या वडिलांनी भरपूर हुंडा दिला.. 50 तोळे सोने, 50 लाखांची फॉर्च्युनर, आणि शाही थाटात लग्न लावून दिलं…
पण सासरी गेल्यानंतर तिचं आयुष्य नरक बनलं. शोषण, मानसिक छळ, आणि अंगावर चाललेली हात उठवण्याची प्रथा सुरू झाली. तिने घरी सांगितलं, पण “चारचौघात बदनामी होईल” या भीतीने तिला परत पाठवण्यात आलं. प्रसंगी तिच्या वडिलांनी जावयाचे, सासूसासऱ्यांचे, नणंदेचे पाय धरले. पण काहीच बदल झाला नाही. उलट छळ अधिकच वाढत गेला. "कधीतरी सगळं ठीक होईल" या आशेवर बापाने तिला पुन्हा पाठवलं.
आणि एक दिवस ती परत आली... पाठीवर काळे-निळे वळ, गळ्याभोवती निर्घृणपणे दाबलेली बोटांची खूण, आणि निपचित, जीव गेलेले शरीर... देहाने मोकळी झाली...बिचारी!
वैष्णवी हगवणेच्या या हुंडाबळीच्या प्रकरणानंतर मराठा, बहुजन समाज खडबडून जागा झाला आणि या सगळ्या लग्नांच्या प्रथा यावर आता बोललं पाहिजे आणि बदलले पाहिजे त्यासाठी बैठका सुरू झाल्या आणि अनेक ग्रामपंचायतींनी ‘नको महागडा थाटमाट, बांधू साधी सुंदर लग्नगाठ’ अशाप्रकारचे काही सकारात्मक निर्णय घेतले.
जसे की, 100-200 लोकांच्या उपस्थितीच लग्न, लग्नात डीजे नको, कोणत्याही परिस्थितीत कर्ज काढून लग्न करू नका, लग्नात हुंडा देऊ नका, ज्या कुटुंबात हुंड्यासाठी सुनेचा छळ झाल्याने कोणाचा हुंडाबळी म्हणून जीव गेला असेल अशा कुटुंबाशी नातेसंबंध ठेवू नका इत्यादी…मराठा, बहुजन समाजाने उचललेले हे स्तुत्य पाऊल असले तरी अशी आदर्श लग्न आचारसंहिता पाळली जाईल का हा खरा प्रश्न आहे?
पण आपल्या समाजात गेल्या कित्येक शतकांपासून आदर्श लग्न आचारसंहिता पाळणारे अनेक समाजघटक आहेत, जिथे आजवर एकही हुंडाबळीची घटना झालेली नाही की मुलीच्या लग्नाचा खर्च आता कसा उचलायचा यासाठी बापाने कर्ज घेतलेले नाही. या आदर्श लग्न आचारसंहितेत हुंडा नाही, खर्च नाही, पण नात्यात प्रेम, सहमती आणि समाजाचं पाठबळ आहे. ही आदर्श लग्न आचारसंहिता आहे. या देशातल्या आदिवासी समाजाची. महाराष्ट्रातील कोणतीही आदिवासी जात घ्या किंवा कोणताही आदिवासीबहुल जिल्हा सगळीकडे हीच आदर्श लग्न आचारसंहिता पाळली जाते. गोंड, माडिया, वारली, पावरा-भिल्ल, कोकणा या त्या आदिवासी जाती अन् सामूहिक आणि संस्कृतीशी नातं सांगणारी त्यांची आदर्श लग्न परंपरा…
संबंधित लेख वाचा: 1) ‘आदिवासीयत’ बघून नाही, तर जगून पहाण्याची गोष्ट आहे’... सरकारच्या ‘शबरी आदि पर्यटन’ योजनेवर आदिवासींची टीका! |
आदिवासी विवाहपद्धतीची वैशिष्ट्ये
- हुंडा नाही – नवरीकडून पैशांची, सोन्याची मागणी केली जात नाही.
- सहमती आणि प्रेमाला महत्त्व – अनेक ठिकाणी वधू-वराचे प्रेमविवाह समाज स्वीकारतो.
- साधेपणा आणि सामूहिकता – विवाहाचा खर्च दोन्ही बाजूंनी कमी, आणि समाज मदतीसाठी पुढं येतो.
- निसर्गाशी नातं – लग्न विधी जंगलात, नदीकाठी पारंपरिक फुलांनी सजवलेल्या जागेत होतात.
- स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा – विवाहानंतरही स्त्री कुटुंबातील निर्णयात सहभागी असते.
(गोंड-माडिया विवाह पद्धत)
माडिया गोंड आदिवासींमध्ये हुंडा पद्धतच नसते…
गडचिरोली भागातील गोंड-माडिया आदिवासी जमातीत कशाप्रकारे लग्नसोहळा पार पडतो? त्यात हुंडापद्धत असते का? असते तर किती असते? आदिवासींमध्ये लग्नाचा खर्च किती होतो? मुलांच्या घरून काही अपेक्षा असतात का या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’ने राजश्री लेखामी यांच्याशी संपर्क साधला. राजश्री लेखामी यांनी नुकताच आपल्या मुलीचा विवाह केला होता.
राजश्री लेखामी म्हणाल्या, "आमच्याकडे हुंडा पद्धत नसते. लग्नाच्या बोलणीच्या वेळेस मुलाचा मामा हा मुलीच्या मामाला फक्त 11 रु देतो.., नवरी मुलाच्या मामला आणि तिच्या मामाला दारू देते...आणि लग्न ठरतं.. लग्नामध्ये नातेवाईक हे मुलीच्या घरी आवश्यक असणाऱ्या गोष्टी देतात. जसं की कोणी तांदूळ देतं, कोणी दारूच्या बाटल्या… तिखट-मीठ- मिरची पासून सगळं काही नातेवाईकांकडून दिलं जातं आणि त्यामुळे मुलीच्या घरच्यांना लग्नाचा जास्त खर्च येत नाही."
बघायला गेलं तर लग्नामध्ये नातेवाईकांचा सगळ्यात मोठा मान असतो.. मग ती वऱ्हाडी मंडळी असो की, मुलीच्या घरचे लोक..आहेर, मानपान या सगळ्याच गोष्टी असतात... मात्र आदिवासींमध्ये मानपानाला इतकं महत्व नसतं. याबद्दल राजश्री लेखामी सांगतात, "नवीन कपडे फक्त नवऱ्यामुलीला आणि नवरदेवाला घेतले जातात. पारंपरिक नृत्य हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असल्याकारणाने डीजेचा संबधंच येत नाही. निसर्गाला साक्षी ठेवून आदिवासींचा विवाह निसर्गाच्या सानिध्यातच पार पडतो."
हुंडाबळीच्या घटना आधुनिक समाजातील लोभी, प्रतिष्ठा-केंद्रित आणि पितृसत्ताक मानसिकतेचं फलित आहेत. दुसरीकडं, आदिवासी पद्धतींतून दिसते ती सहजीवनाची, समतेची आणि परस्पर आदराची भूमिका. आज जेव्हा शिक्षित समाजातही लग्न म्हणजे ‘इन्व्हेस्टमेंट’ झालं आहे, तेव्हा आदिवासी पद्धत विवाहाला अजूनही एक नैसर्गिक आणि माणुसकीचं बंधन मानते... 
(गोंड-माडिया विवाह पद्धत)
वारली आदिवासींमध्ये लग्नाच्या खर्चाची जबाबदारी सामूहिक असते
पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी समाजाची विवाहपद्धत अत्यंत साधी, समतावादी आणि सामाजिक बंध मजबूत करणारी आहे. या समाजात विवाह हा केवळ दोन व्यक्तींची नाही, तर दोन कुटुंबांची व समाजाची सांस्कृतिक एकता मानली जाते.
पालघरमध्ये राहणाऱ्या पूनम चौरे यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘वारली समाजात विवाहाच्या आधी वधू आणि वर यांची संमती घेतली जाते, आणि अनेक वेळा प्रेमविवाहालाही सामाजिक मान्यता दिली जाते. विवाह सोहळा गावात किंवा जंगलातील मोकळ्या जागेत पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. यामध्ये निसर्गाशी नातं जपणाऱ्या फुला-फांद्यांनी सजावट केली जाते. पारंपरिक नृत्य-गाण्यांच्या माध्यमातून आनंद साजरा होतो. संपूर्ण गावकरी विवाहात सहभागी होतात आणि खर्चाची जबाबदारी सामूहिक असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीत हुंड्याला कोणतंही स्थान नाही. वधूकडून कोणताही आर्थिक व्यवहार अपेक्षित नसतो. विवाहानंतर स्त्रीला सासरच्या घरात मान मिळतो, निर्णयात तिचा सहभाग असतो. या पद्धतीमधून समतेचं, सामाजिक एकतेचं आणि स्त्रीसन्मानाचं दर्शन घडतं. आधुनिक समाजासाठी ही पद्धत आदर्श ठरू शकते." 
(वारली विवाह पद्धत)
या समाजात तर मुलांना द्यावा लागतो हुंडा...
'सातपुडा प्रदेश' हा प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. भिल्ल ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाची व संख्येने एक प्रमुख आदिवासी जमात आहे. भारतातील प्राचीन शिलालेखांत आणि प्राचीन साहित्यात भिल्लांचे उल्लेख सापडतात. इतकी ही पुरातन जमात आहे. पावरा-भिल्ल आदिवासी समाजाची विवाहपद्धत ही पारंपरिक, अतिशय साधी आणि सामाजिक समन्वय जपणारी आहे. या समाजात विवाहासाठी वधू-वराची परस्पर संमती आवश्यक असते. बहुतेक वेळा नातेवाईकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह पार पडतो.
आदिवासींच्या चालीरीतीनुसार त्यांच्यात बहुपत्नीत्व व प्रौढ विवाहाची पद्धती रूढ आहे. त्यांना विधवा विवाह देखील संमत आहे. विवाहाच्या वेळी नृत्यगायनाचा आनंदोत्सव साजरा होतो. यात मद्याची रेलचेल असते. सातपुड्यातील भिल्लांची पारंपरिक लग्न पद्धती मनोरंजक आहे. नवरा मुलगा मुलीला यात्रेत किंवा बाजारात पाहतो व लग्नाची मागणी घालतो.
मागणीप्रमाणे लग्न जमले नाही तर मुलगा मुलीला तिच्या संमतीने पळवून नेतो. मुलीकडून हुंडा घेतला जात नाही. याउलट मुलाकडून मुलीला दहेज दिले जाते. ही रक्कम पाचशेपासून दोन हजारापर्यंत असू शकते. लग्नासाठी मुहूर्त पाहिला जात नाही. फक्त शनिवार व अमावास्येच्या दिवशी लग्ने लावली जात नाहीत. लग्न गावातला भगत लावतो. लग्नानंतर वधू-वर मांडवात नऊ फेरे मारतात. लग्नात सर्वांना जेवण व दारू दिली जाते.
(भिल्ल विवाह पद्धत)
उलटी गंगा… इथे उपवर मुलाच्या बापाला असते हुंड्याची घोर चिंता
मात्र अलीकडच्या काळात शहराचे लोण इथेही पसरले आहे, पण इथे चित्र उलटं आहे. या समाजात मुलींना महत्त्व असल्यामुळे त्यामुळे मुलीऐवजी मुलाच्या आई-वडिलांना हुंड्याची सोय करावी लागते. या आदिवासी कुटुंबांमध्येहीं मुला-मुलींच्या पसंतीला महत्त्व असते; मात्र या पसंतीनंतरही पंचायतने ठरवलेली रक्कम उपवर मुलाकडून मुलीच्या वडिलांना द्यावीच लागते. ही रक्कम साधारणतः 15 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असते.
सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या या आदिवासींची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात उपवर युवक आहेत, त्यांना हुंड्याविषयी कमालीची चिंता असते. उपवर मुलगे-मुलींचे पसंतीच्या जोडीदारासोबत पळून जाण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडतात. ही गोष्ट लपून राहत नाही. कुणाची मुलगी आणि कुणाचा मुलगा पळून गेले, हे काही दिवसांतच कळते. एकदा ही माहिती मिळाली की, दोन्ही कुटुंबांकडे मोजके नातेवाईक आणि गावातील प्रमुख पंच यांची बैठक भरते.
मुलीच्या वडिलांना किती रक्कम द्यावी, हे या वेळी मुलाच्या वडिलांना सांगितले जाते. ठरलेल्या रकमेचा काही वाटा त्याच वेळी मिळतो, तर उर्वरित रकमेसाठी ठरावीक मुदत दिली जाते. ही रक्कम एक लाखापेक्षा जास्त असल्यास मुलाच्या आई-वडिलांना साल, महिन्याने मजुरी करून रकमेची फेड ठरावीक मुदतीत करावी लागते. वेळप्रसंगी उपवर मुलगासुद्धा त्यांच्याकडे वर्षभर मजुरी करून ठरलेल्या रकमेची फेड करतो. दुसरे लग्न असल्यास खर्च जास्त एखाद्या तरुणाचे दुसऱ्यांदा लग्न असेल, तर त्याला इतरांपेक्षा जास्त रक्कम मुलीच्या वडिलांना द्यावी लागते. ही रक्कम कधीकधी 2 लाखांपर्यंतही असते.
आदिवासी समाजाकडून शिकण्यासारखं काय?
विवाह म्हणजे व्यवहार नव्हे, नातं आहे हे आदिवासींचं मूलभूत तत्व आहे. स्त्री ही समाजाचा सक्रिय भाग आहे. तिचं स्थान दडपलेलं नसतं. सहजीवनात खर्च, तणाव नव्हे तर आनंद हवा म्हणून आदिवासी विवाह सणासारखा साजरा करतात. हगवणे प्रकरणासारखी प्रकरणं समाजाचं विदारक, दु:खद आणि क्रूर वास्तव दाखवतात. दुसरीकडे, आदिवासी विवाहसंस्कृती स्त्रीसन्मान, प्रेम, सहमती आणि सामाजिक सामंजस्य दाखवते. म्हणून आजच्या काळात खरं 'सुसंस्कृत' कोण? हे ठरवायचं असेल, तर पदवी, पैसा आणि प्रतिष्ठेहून जास्त महत्त्व मूल्यांना द्यावं लागेल. आदिवासी समाजाच्या विवाहसंस्कृतीतून आपण सगळ्यांनी स्त्रीला माणूस म्हणून पाहणं, नात्याला समतेनं जगणं शिकायला हवं…






