विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी नेहमीच विविध उपाय केले जातात. परंतु कधी तुम्ही ऐकलं आहे का, की एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून ‘राम-राम’ लिहावे लागलयं? होय, हे घडले आहे उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे, जिथे राजर्षि दशरथ मेडिकल कॉलेजने विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्कार लावण्यासाठी एक वेगळाच उपक्रम सुरू केला आहे. या कॉलेजमध्ये आता जर एखादा विद्यार्थी अभ्यासात किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये काही चुकीचे वर्तन करत असेल, तर त्याला शिक्षा म्हणून वहीत “राम-राम” लिहावे लागेल.
ही गोष्ट ऐकायला थोडी वेगळी वाटली तरी, कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासासाठी सकारात्मक ठरू शकेल. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सत्यजीत वर्मा यांनी सांगितले की, “अनेक वेळा शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा दिली जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मानसिक ताण वाढतो. त्यामुळे आम्ही ठरवले की शिक्षा अशी असावी, जी विद्यार्थ्यांना आत्मशांती देईल आणि त्याचबरोबर संस्कारही रुजवेल.”
धर्माची सक्ती नव्हे, स्वेच्छेची शिकवण - प्राचार्य
डॉ. वर्मा पुढे म्हणाले, “आमचा उद्देश कोणत्याही धार्मिक परंपरेची सक्ती करणे नाही. आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत शांतीशी आणि आत्मसंयमाशी जोडायचे आहे. जेव्हा विद्यार्थी ‘राम-नाम’ लिहितो, तेव्हा त्याचे मन शांत होते, तो आपल्या विचारांना केंद्रित करू शकतो आणि स्वतःशी जोडला जातो. त्यामुळे ही शिक्षा नव्हे, तर एक ‘संस्कार प्रक्रिया’ आहे.”
त्यांनी हेही स्पष्ट केले की, कॉलेज प्रशासनाने कोणत्याही धर्माची जबरदस्ती केलेली नाही. “जो विद्यार्थी ज्या धर्मावर विश्वास ठेवतो, त्याने त्याच्या श्रद्धेनुसार नाव लिहावे. कोणी ‘राम-नाम’, कोणी ‘राधा-नाम’, कोणी ‘अल्लाह’, कोणी ‘वाहेगुरू’ लिहू शकतो. यात बंधन नाही, फक्त आत्मचिंतन आणि शिस्त हाच उद्देश आहे,” असे डॉ. वर्मा म्हणाले.
विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद…
या उपक्रमाची सुरुवातही मनोरंजक होती. प्राचार्यांनी सांगितले की, “सुरुवातीला मी काही विद्यार्थ्यांना विनोदाने सांगितले की, चूक झाली तर वहीत ‘राम-राम’ लिहा. पण विद्यार्थ्यांनी हे अतिशय सकारात्मकतेने घेतले. त्यांनी काही वेळा ‘राम-नाम’ लिहून वही सादर केली. आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटले की, त्यानंतर ते अधिक शांत, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण झाले.”
आजपर्यंत ४ ते ५ विद्यार्थ्यांनी अशी वही जमा केली आहे. कॉलेज प्रशासनाचा विश्वास आहे की, हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये केवळ शिस्त नव्हे, तर आत्मसंयम आणि संस्कारांचे महत्त्वही वाढवेल. शिक्षण केवळ ज्ञान देण्यासाठी नसते, तर व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असते आणि हाच विचार या उपक्रमामागे दडलेला आहे. डॉ. वर्मा यांनी सांगितले की, “आम्ही ही योजना कायमस्वरूपी लागू करण्याचा विचार नव्हता केला. पण विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया इतकी चांगली मिळाली की आता आम्ही ती पुढेही सुरू ठेवण्याचा विचार करत आहोत.” शिक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणत्याही विद्यार्थ्याला जबरदस्तीने काही लिहिण्यास सांगू नये. हा उपक्रम पूर्णपणे स्वेच्छेचा असेल.
अयोध्या शहर हे प्रभू श्रीरामाच्या नगरी म्हणून प्रसिद्ध आहे, आणि त्यामुळे या उपक्रमाला अधिक सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ प्राप्त झाला आहे. मात्र, प्रशासनाने यावर जोर दिला आहे की, ही ‘धर्माशी संबंधित शिक्षा’ नसून ‘संस्कारांशी संबंधित शिकवण’ आहे.
“‘राम-नाम’ लिहिण्याची जबरदस्ती संविधानविरोधी ठरू शकते”
या अनोख्या पद्धतीबद्दल समाजातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती निर्माण करणारे वाटते, तर काहीजण शिक्षण संस्थेत धार्मिक घटकांचा समावेश करण्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. तथापि, प्राचार्यांचे म्हणणे स्पष्ट आहे “हा उपक्रम कुणावरही थोपवला जात नाही, तर विद्यार्थी स्वतःहून तो स्वीकारतात.”
भारतीय संविधानानुसार भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि शिक्षणसंस्थांनीही ही तटस्थता राखणे बंधनकारक आहे. संविधानाच्या कलम 28(1) नुसार, सरकारी निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक अंगाने शिक्षण दिले जाऊ शकत नाही. तसेच कलम 28(3) मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या किंवा पालकांच्या इच्छेविरुद्ध धार्मिक उपासना किंवा शिकवणीत भाग घेण्यास भाग पाडले जाणार नाही. त्यामुळे अयोध्या मेडिकल कॉलेजसारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांना ‘राम-नाम’ लिहिण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. 
राम-नाम’ शिक्षेवर उठले प्रश्न..
अयोध्या मेडिकल कॉलेजच्या या उपक्रमावर काही प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. काही सामाजिक गट आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मते, शिस्त राखण्यासाठी धार्मिक नावांचा वापर केल्याने शिक्षणसंस्थांची धर्मनिरपेक्षता प्रश्नचिन्हाखाली येऊ शकते. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारी निधीत चालणाऱ्या संस्थांनी धार्मिक स्वरूपाच्या कृती टाळायला हव्यात. तर कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही कृती जबरदस्तीने नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वेच्छेने केली जाते आणि यामागे केवळ सकारात्मकता आणि संस्कारांची भावना आहे.






