अप्सरा आगा
पुण्याच्या रस्त्यांवर आज एक असामान्य शांतता आहे. जिथे हमालांच्या काठीचा आवाज ऐकू यायचा, तिथे आज शोक पसरलेला आहे. आयुष्यभर फुटपाथ, दुकानांच्या ओसऱ्या, बांधकामांची धूळ आणि झोपडपट्ट्यांतील अंधारात झगडणाऱ्या श्रमिकांच्या हातात आशेची ज्योत पेटवणारे डॉ. बाबा आढाव आता नाहीत. सोमवारी रात्री वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर डॉ. अभिजित वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. त्यांची किडनी निकामी झाली होती. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची सोमवारी रात्री साडे आठच्या दरम्यान प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव आज (मंगळवार) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पुणे मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून अंतिम विधी सायंकाळी 5:30 वाजता वैकुंठ येथे, राज्य सन्मानाने होणार आहेत.
“कामगाराच्या घामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे” हा होता त्यांचा अखेरचा ध्यास...
डॉ. बाबा आढाव हे सत्तेच्या दारात उभे राहण्यासाठी राजकारणात उतरले नव्हते, तर फुटपाथावर जगणाऱ्या, पोटाच्या भुकेसाठी श्रम विकणाऱ्या माणसाचा आवाज बनण्यासाठी ते आयुष्यभर लढले. देशातील 45 कोटी असंघटित कामगारांच्या न्याय, हक्क, सन्मान यासाठी त्यांनी सात दशके अखंड संघर्ष उभारला.
त्यांनी हमाल-माथाडी, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूर, कागद काच पत्रा गोळा करणाऱ्या महिला, मातेरी वेचणाऱ्या, प्रकल्पग्रस्त शेतकरी या सर्व घटकांतील लोकांसाठी काम केले. त्यांच्यासाठी त्यांनी फक्त वेतनवाढ मिळवून दिली नाही, तर मानवी प्रतिष्ठा हा अधिकार आहे, हे सांगितले.
कामगार चळवळीचा आधारवड...
शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक असतात. ते उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करत असतात. हमाली, घरकाम करणाऱ्या महिला,बांधकाम कामगार, कचरा वेचक म्हणून काम करतात. पण लोकांना रोज काम असतंच असं नाही. कामाचं योग्य वेतन ही ठरलेलं नसतं. कामाची वेळ ठरलेली नसते, काम रोज मिळेल कि नाही याची शाश्वती नसते, अशा कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कामावरून काढून टाकलं तरी दाद मागता येत नाही.कामगार वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्यामुळे संघटन नाही. संघटित नसल्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येत नाही. पण संघटितपणे प्रश्न सुटू शकतात.यावर बाबांचा अतूट विश्वास होता. संघटितपणे मालकावर दबाव आणू शकतात म्हणून वेगवेगळ्या स्थलांतरित कामगारांना न्याय,अधिकार, हक्क, मिळावा यासाठी असंघटित कामगारांना संघटित करण्याचं काम डॉ. बाबा आढाव यांनी केलं.आज ही बाबांनी असंघटितांना संघटित करून स्थापन केलेल्या हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, टेम्पो चालक , कागद काच पत्रा पंचायत इ. या सर्व संघटनेचा पाया भक्कम आहे.
शोषितांच्या लढ्याला दिला न्यायाचा आवाज...
बाबांची सुरुवातच 'हमाली करणाऱ्या लोकांपासून. समाजवादी चळवळीचे रेल्वे युनियन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस. एम जोशी यांची डिफेन्स कामगार युनियन होती. मुंबईमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट म्हणजेच गोदीमध्ये मालाची, अन्नधान्याची खूप मोठी आयात परदेशातून व्हायची. सर्व सामान बोटीतून यायचे . तिथून त्या सर्व वस्तू गोदी पर्यंत कामगारांना डोक्यावरून आणाव्या लागायच्या. डोक्यावरून वस्तूंची ने आन करावी लागत असल्याने माथाडी कामगार हा शब्द गोदी कामगारांपासून प्रचलित झाला. हा शब्द मुंबईत गोदी कामगारांसाठी वापरण्यात आला तर पुण्यातील पाठीवर ओझे वाहणाऱ्या कामगाराला हमाल असे म्हणण्यात आले. समाजवादी चळवळीमुळे साहजिकच हमालांच्या प्रश्नाकडे बाबांचे लक्ष गेले. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने हे कामगार पोटापाण्यासाठी शहरात येत होते. पण ते फॅक्टरी कामगार नव्हते.
त्यामुळे फॅक्टरीतल्या कामगाराला ज्या सामाजिक सुरक्षा दिल्या जातात त्या सर्व हमालांना नाकारण्यात आल्या होत्या. हमालांनी दुकानाच्या बाहेर झोपायचे, बाहेरच रस्त्यावर आंघोळ करायची त्यामुळे या कामगारांची अवस्था कुत्र्या मांजरासारखी होती. तिकडे मुंबईत गोदी कामगारांचे म्हणजेच माथाडी कामगारांचे संघटन सुरू झाले होते .त्यातून प्रेरणा घेऊन हमालांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी 'माथाडी कामगार कायदा' आणण्यासाठी बाबा आढावांनी लढा दिला. असंघटित कामगारांच्या आयुष्यातील संघटनात्मक क्रांती म्हणजे त्यांनी स्थापन केलेली हमाल पंचायत. एका हमालाच्या पाठीवरचं ओझं जसं उचलणं कठीण, तसंच समाजाच्या कामगारवर्गाचं ओझं आपल्या खांद्यावर उचलणंही सोपं नव्हतं. पण बाबा आढावांनी हे केवळ केलं नाही, तर त्या ओझ्याला न्यायाची भाषा दिली.(photo credit: pavan khengre)
हजारोंच्या पोटात रोजची भाकर...
हमाल पंचायत, रिक्षाचालक संघटना, कचरा वेचणाऱ्या महिलांसाठी उभ्या केलेल्या संघटना, बांधकाम मजुरांच्या हक्कांसाठी चालवलेले सत्याग्रह या सगळ्यांतून त्यांनी कष्टकऱ्यांना केवळ वेतन नव्हे, तर अस्तित्व दिलं. त्यांनी उभारलेली ‘कष्टाची भाकर’ ही योजना तर महाराष्ट्राच्या समाजकार्याच्या इतिहासातील एक उज्ज्वल पान ठरावी अशी. भूक ही माणसाची पहिली व्यथा आहे आणि त्या व्यथेवर मलमपट्टी करण्यासाठी त्यांनी हजारोंच्या पोटात रोजची भाकर टाकली. केवळ स्वस्त अन्न नव्हे; तर कामगाराला “तू एकटा नाहीस” असं सांगणारी नाती त्यांनी त्यात गुंफली.
बाबा आढावांच्या आवाजात राग असायचा, पण तो राग अन्यायाविरुद्ध होता. त्यांच्या भाषणात शब्द नव्हते, तर संघर्षाचे धगधगते कण होते. त्यांच्या डोळ्यात कठोरता असायची, पण त्या कठोरतेखाली जन्मभर जपलेली करुणा दडलेली असे. त्यांनी सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारले, वेतनाचे, सामाजिक सुरक्षेचे, मानवी प्रतिष्ठेचे. त्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधाऱ्यांकडे कमी, पण त्यांच्या धैर्याकडे नेहमीच अधिक होती. पण आज हा माणूस गेला. ज्याच्या उपस्थितीने पुण्याच्या फुटपाथालाही आधार असायचा, तो आधार ओसरला. आपल्याकडे आजही असंघटित मजुरांची गर्दी आहे, त्यांचे हात रिकामे, पोट उपाशी, आयुष्य अनिश्चित. अशा काळात बाबा आढावांचे जाणं म्हणजे घरातील ज्येष्ठ कर्ता हरवण्यासारखं आहे. ज्याने घर चालवण्यासाठी स्वतःची भूक दाबली, स्वतःची वेदना लपवली, पण कधीही हात सोडला नाही.
बाबा नाहीत पण त्यांनी उभा केलेला लढा अमर आहे...
डॉ. बाबा आढाव गेले तरी त्यांची चळवळ, संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई आजही जिवंत आहे. फुटपाथांवर, बाजाराच्या कोपऱ्यात, रस्त्यावर काम करणाऱ्या असंख्य मजुरांच्या आयुष्यात त्यांनी ज्योत पेटवली, ती आजही उजळते आहे. कामगारांच्या हक्कांसाठी उभा केलेला पाया, हमाल पंचायतची ताकद आणि संघर्षाचा आवाज हीच त्यांची खरी विरासत आहे. बाबा नाहीत, पण त्यांनी दिलेला संदेश प्रत्येक कामगाराला प्रेरणा देत राहील आणि न्यायाची मशाल पुढेही पेटवत राहील..






