अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातात केवळ विमानातील प्रवाशी, क्रू मेंबर्स, माजी मुख्यमंत्र्यांचा बळी गेला नाही, तर हे विमान जमिनीवर कोसळताना ज्या डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले, त्यांतील डॉक्टरांचाही बळी गेला आहे. या भीषण अपघातानंतर आता आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली आहे. मात्र या सगळ्या गदारोळात सर्वात महत्वाची आणि गंभीर चर्चा सुरू आहे ती 'बोइंग'च्या '787 ड्रीमलायनर’ या विमानाची आणि बोईंग कंपनीची. अहमदाबादमध्ये जे विमान कोसळले ते याच बनावटीचे होते. 'बोइंग'च्या '787 ड्रीमलायनर' विमानांबाबत अनेक 'व्हिसलब्लोअर'नी यापूर्वीही चिंता व्यक्त केल्याचे समोर आले आहे. याचाच आढावा या लेखातून आपण घेणार आहोत…
जॉन बर्नेट नावाचा एक इंजिनियर अमेरिकेत गेला तीस वर्षे बोईंगसारख्या अवाढव्य विमान निर्मात्या कंपनीत काम करत होता.त्याने त्यांच्या कामात अनेक गैरप्रकार पाहिले. आणि एके दिवशी, त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. पण त्याचा शेवट झाला, एका पार्किंग लॉटमधल्या गाडीमध्ये…मृतावस्थेत.
जॉन बर्नेटने 2017 मध्ये वैद्यकीय कारणांमुळे सेवानिवृत्ती घेतली होती. त्याआधी ते 2010 पासून साउथ कॅरोलिनामधील बोईंगच्या North Charleston या प्रकल्पात क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करत होते. हा प्लांट विशेषतः 787 Dreamliner हे लांब पल्ल्याचे विमाने बनवतो. बर्नेटने सांगितलं होतं की, डेडलाईन पाळण्यासाठी अनेकदा खराब पार्ट्स मुद्दाम विमानात बसवले जायचे. त्याच्या म्हणण्यानुसार, कामगार स्क्रॅप बिनमधून खराब पार्ट्स परत काढून त्यांचा वापर करत होते. एकदा जॉन बर्नेटने ऑक्सिजन मास्कची तपासणी केली, तर 4 पैकी 1 मास्क आपत्कालीन स्थितीत न चालण्याची शक्यता होती. "जर विमानात आग लागली, आणि मास्कने कामच केलं नाही, तर प्रवाशांचं काय होईल?" हा प्रश्न ते सातत्याने विचारत राहिले. पण प्रतिसाद मिळाला नाही.
(जॉन बर्नेट)
प्रश्न विचारला आणि करिअर संपवलं गेलं
2017 मध्ये जॉन बर्नेटने वैद्यकीय कारणांनी बोईंग कंपनी सोडली, पण संघर्ष संपला नाही. त्यांनी बोईंगविरोधात कायदेशीर लढाई सुरु केली. कंपनीने त्यांच्या चारित्र्यावर आरोप केले, त्रास दिला आणि त्याचं करिअर संपवलं.
संबंधित लेख वाचा: 1) डोनाल्ड ट्रम्प यांच्या नशिबी ना टेस्ला कार ना बोईंग विमान…! |
2019 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बर्नेटने सांगितलं होतं की कंपनीवर विमाननिर्मितीचा प्रचंड दबाव असल्यामुळे अनेक वेळा निकृष्ट दर्जाचे पार्ट्स मुद्दामून वापरण्यात आले. त्यांनी सांगितलं की, काही कर्मचारी "स्क्रॅप बिन"मधून खराब पार्ट्स परत काढून विमानांमध्ये बसवत होते. ऑक्सिजन मास्कच्या प्रणालीत त्रुटी होत्या. एकूण उपकरणांपैकी 25% काम करणार नाहीत असा धोका होता. काही पार्ट्स प्लांटमध्ये कुठे आहेत याचा तपशीलच नव्हता.
कायदेशीर सुरू असताना चार्ल्सटन येथील कोर्टात त्याला सुनावणीसाठी हजर राहायचं होतं. पण जॉन पोहचू शकला नाही. त्याचदिवशी गाडीमध्ये त्याचा मृतदेह सापडला. स्थानिक पोलीस व कोरोनर कार्यालयाने याला “स्वतः केलेली जखम” म्हटलं आहे. जॉनचा संशयास्पद मृत्यू अनेक प्रश्न मागे ठेवून गेला… हे खरंच फक्त इतकंच होतं का?
त्याने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं,’’माझ्या घरच्यांनी विचारलं, जर तू त्या विमानात बसला असतास, तर काय झालं असतं?”
“मी म्हणालो — मला कल्पनाच नकोय.”
आज ते विमानांमध्ये नाहीत, पण त्यांच्या प्रश्नांची गूंज अजूनही आकाशात घुमते आहे.
(सॅम सालेहपूर)
787 ड्रीमलायनर आणि 'व्हिसलब्लोअर’
'बोइंग'च्या '787 ड्रीमलायनर' विमानांबाबत अनेक 'व्हिसलब्लोअर'नी यापूर्वीही चिंता व्यक्त केल्याचे समोर आले आहे. या विमानांबाबत सातत्याने होणाऱ्या तक्रारींमुळे अमेरिकेच्या 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन'ने (एफएए) या विमानांचे उत्पादन आणि जुळणी प्रक्रियेचा तपास हाती घेतला होता. त्यामुळे हे विमान संशयाच्या घेऱ्यात सापडले होते.
जॉन बर्नेट हा बोईंगविरोधात आवाज उठवणारे एकमेव नव्हता. सॅम सालेहपूर हा इंजिनिअर बोईंग कंपनीत 17 वर्ष काम करत होता. '787 ड्रीमलाइनर’च्या 'फ्युसेलाज'चे अर्थात मुख्य ढाचाचे भाग चुकीच्या पद्धतीने एकत्र जोडले गेले आहेत, असा आरोप 'बोइंग' मध्ये 17 वर्षे अभियंता म्हणून काम केलेल्या सॅम सालेहपोर यांनी केला होता. त्यामुळे विमानाची संरचनात्मक ताकद आणि आयुष्य दोन्ही धोक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. सन 2020 पासून त्यांनी सातत्याने ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. मात्र, गप्प बसा असे सांगून या त्रुटीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा दावाही सालेहपोर यांनी केला आहे.
'स्पिरिट एअरोसिस्टीम्स' या बोइंगच्या भागीदार कंपनीसाठी काम करणारे यांत्रिकी कर्मचारी रिचर्ड कुव्हास यांनी 2023 मध्ये कॅन्सासमधील प्रकल्पातील 'ड्रीमलायनर' विमानांच्या फॉरवर्ड प्रेशर बल्कहेडमध्ये चुकीच्या पद्धतीने छिद्रे केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तक्रारीची दखल न घेताच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
या सर्व घटनांमध्ये एक साम्य होतं ते म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांना संपवलं जातं.
ऑडिटममध्ये धक्कादायक निष्कर्ष
'एफएए'ने सहा आठवड्यांमध्ये केलेल्या तपासणीत 'बोइंग'च्या उत्पादन प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्या. कंपनीचे व्यवस्थापन आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नसणे, सुरक्षाविषयक तक्रारी केल्यास सूड घेण्याच्या कार्यपद्धतीमुळे कर्मचारी अस्वस्थ असल्याचेही आढळले आहे.
बोइंग कंपनीच्या ड्रीमलायनर 787-8 या विमानामध्ये मागील काही काळात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्याच्या घटना घडल्या आहेत. या बनावटीच्या एका विमानात हायड्रॉलिक गळती आणि विमानाचे फ्लॅप योग्य पद्धतीने कार्य करत नसल्याच्या तक्रारीमुळे या विमानाची 25 दिवसांत अनेक वेळा उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
बोइंग 797 विमानाने सन 2009 मध्ये पहिले उड्डाण केले. जगभरातील विविध विमान कंपन्यांना एक हजारांपेक्षा जास्त विमाने देण्यात आली आहेत. विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह मागील पाच वर्षांत बोइंग कंपनीने विमानांना झालेल्या अपघाताच्या घटनांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोइंग कंपनीच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचप्रमाणे या कंपनीकडून विमानखरेदी थांबविण्यात यावी अशी मागणीही काही जणांकडून होत आहे. चीनमध्ये 2022 मध्ये बोइंग 737-800 या विमानाचा अपघात झाला होता, यातील 132 प्रवासी मृत्युमुखी पडले होते, त्याचप्रमाणे जानेवारी आणि नोव्हेंबर 2024 मध्येही बोईग विमानात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना झाल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे. समाज माध्यमांतूनही बोइंग कंपनीवर जोरदार टीका होत आहे.
सर्वात सुरक्षित हवाई कंपनीत एकाही भारतीय विमान कंपनीचे नाव नाही
गेल्या दोन दशकांमधील 21-23 टक्के मोठ्या विमान अपघातांच्या तपासांचे संभाव्य कारण असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. 2020 मध्ये, ‘युरोपीयन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी’ ने मोठ्या विमानांसाठी ‘कर्तव्यांसाठी कल्याण आणि तंदुरुस्तीची स्थिती’ ही सर्वोच्च सुरक्षा समस्या म्हणून ओळखली. 2010 मध्ये घडलेली एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812 ची भयानक दुर्घटना ही वैमानिकांच्या थकव्याचा विमानांच्या सुरक्षित ऑपरेशनवर कसा मोठा परिणाम होतो, याचे एक उदाहरण आहे. 166 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान मंगळूरमध्ये लँडिंग करताना कोसळले तेव्हा 158 जणांचा मृत्यू झाला. खरे तर, कॅप्टनच्या घोरण्याच्या आवाजाची नोंद पहिल्यांदाच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरने केली. जगातील सर्वात सुरक्षित हवाई कंपनीत एकाही भारतीय विमान कंपनीचे नाव नसल्याचे उघड झाले आहे.
दरवर्षी एअरलाईन तज्ज्ञांचे पथक जगातील चारशे एअरलाईनच्या सुरक्षेची तपासणी करतात. गेल्या दोन वर्षात झालेले विमान अपघात, एकूण अपघाताची संख्या, सरकारी अहवाल, विमानांचे आयुष्य आणि संख्या, पायलट प्रशिक्षणाचा दर्जा आणि एअरलाईनची आर्थिक स्थिती असे अनेक मापदंड तपासून त्याआधारे मूल्यांकन करतात. त्यानंतर सुरक्षेच्या बाबतीत एअरलाईन कोणत्या क्रमांकावर आहे याची आकडेवारी जाहीर केली जाते. अशाच प्रकारे जगातील सर्वात सुरक्षित हवाई कंपन्याची यादी जाहीर केलेली आहे. यात एकाही भारतीय हवाई कंपनीचे नाव नाही. त्यामुळे विमानप्रवासात भारतीय प्रवासी किती सुरक्षित आहे असा सवाल केला जात आहे.
‘लो कॉस्ट एअरलाईन’च्या यादीत मात्र भारताच्या सर्वात मोठ्या ‘इंडिगो कंपनी’चे नाव 19व्या क्रमांकावर आले आहे. या वर्षी टॉप 24 सर्वात सुरक्षित एअरलाईन्समध्ये अमेरिकेतील पाच एअरलाईन्स कंपन्यांचा समावेश झाला आहे. यात फ्रंटिअर (5 वा क्रमांक), साऊथवेस्ट (9 वा क्रमांक), सन कंट्री (15 वा क्रमांक), जेटब्लू (17 वा क्रमांक) आणि एलीजेंट एअर (21 वा क्रमांक) यांचा समावेश आहे. दरवर्षी 400 एअरलाईन्सचे विश्लेषण करुन त्यांच्या सुरक्षेच्या विविध मानकांची तपासणी करते.
या तपासणीत गेल्या दोन वर्षात झालेल्या मोठे अपघात, एकूण घटनांची वारंवारीता, अलिकडचे अपघात, विमानांचे आयुर्मान, ऑडिट आणि विमानांची एकूण संख्या, पायलट प्रशिक्षणाचा दर्जात आणि वित्तीय स्थिती याचा विचार करून रेटींग देत असते. कोणत्याही कंपनीतील आर्थिक अस्थिरता एअरलाइनसाठी गंभीर ऑपरेशनल आव्हाने निर्माण करू शकते. त्यामुळे तिच्या सुरक्षा क्रमवारीवरदेखील परिणाम होऊ शकतो. यामुळेच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विमान कंपन्यांना या यादीत स्थान मिळत नाही.






