1898 म्हणजे तब्बल 127 वर्षांपूर्वी विल्यम क्लॅक्सटन पेप्पे नावाच्या एका ब्रिटिश इंजिनियरने उत्तर भारताच्या लुंबिनी येथील पिप्रावा येथे बुद्ध विहारातील स्तूपाचे उत्खनन केले. लुंबिनी हे गौतम बुद्धांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या उत्खननामध्ये बौद्ध स्तुपातून त्याकाळी सापडलेल्या अवशेषांमध्ये गौतम बुद्धांच्या दहनानंतरचे शरीरधातू आणि काही रत्नं सापडली होती. पेप्पे यांनी ही रत्न, बुद्धधातू (अस्थी) आणि त्यांचे पात्र (अस्थी करंडक) ब्रिटिश भारतातील वसाहती सरकारकडे सुपूर्त केले. एक शतकाहून अधिक काळापासून हे अवशेष एका खासगी ब्रिटिश संग्रहात आहेत आणि ते बहुतांशपणे नजरेआड आहेत.
भगवान गौतम बुद्धांच्या रत्नांच्या लिलावामुळे वादंग
मात्र आता भगवान बुद्धांच्या अवशेषांशी संबंधित या चमकदार रत्नांची जागतिक स्तरावर अचानक चर्चा सुरू झालीये. याचे कारण म्हणजे हाँगकाँगमध्ये या रत्नांचा होणारा लिलाव… गौतम बुद्धांच्या शरीरधातूंशी (बुद्धधातू) संबंधित भारतीय रत्नांचा लिलाव आज होणार आहे. सदबीज ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी या मौल्यवान रत्नांचा लिलाव करणार आहे. मात्र, आता पिप्रावा रत्नांच्या विक्रीमुळे नवा वादंग निर्माण झाला असून भारत सरकारने यावर तीव्र आक्षेप घेतला आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हा लिलाव ताबडतोब थांबवावा, असे आवाहन केले आहे. या वस्तुंचा असा लिलाव करणे हे भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे.याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या लिलावाचा निषेध करत सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जागतिक स्तरावरील बौद्ध धर्माशी संबंधित नेत्यांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
सदबीज या जगप्रसिद्ध लिलाव कंपनीतर्फे बुधवारी हाँगकाँगमध्ये पिप्रावा रत्नांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या रत्नांचे वर्णन त्यांनी ‘अद्वितीय धार्मिक, पुरातत्वीय आणि ऐतिहासिक महत्त्वाची रत्नं’ असे केले आहे. ब्रिटिश इंजिनियर पेप्पे यांच्या तीन वारसदारांनी ही रत्नं विक्रीस ठेवली आहेत. यात अमेथिस्ट, प्रवाळ, रॉक क्रिस्टल, गार्नेट, मोती, शंख आणि सोने यांचा समावेश आहे. ही रत्नं पेंडंट, मण्यांच्या माळा आणि इतर दागिन्यांच्या स्वरूपात आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) 2000 वर्षांपूर्वी हरवलेली ‘विपश्यना साधना’ भारतात परत कशी आली? |
रत्नांची अंदाजे किंमत 108 कोटी रुपये
‘बीबीसी’ने या प्रकरणावर एक सविस्तर रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांचे पणतू क्रिस पेप्पे यांनी सांगितले की, ही रत्नं त्यांच्या आजोबांकडून चुलत भावाकडे गेली होती. 2013 साली त्यांनी आणि त्यांच्या दोन चुलत भावंडांनी ही रत्नं मिळवली. अलीकडच्या काळात ही मौल्यवान रत्नं अनेक प्रतिष्ठित प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.
यात 2023 साली भरवण्यात आलेल्या द मेट (मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क) मधील प्रदर्शनाचाही समावेश आहे. सदबीज आशियाचे अध्यक्ष आणि जागतिक आशियाई कला प्रमुख निकोलस चाऊ यांनी बीबीसीला सांगितले की, “ही रत्नं असामान्य पुरातत्वीय शोधांपैकी एक आहेत.” द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, या रत्नांची अंदाजे किंमत हॉंगकाँग डॉलर 100 दशलक्ष (भारतीय रुपयात सुमारे 108.77 कोटी रुपये) इतकी आहे.
काय आहेत हे अवशेष?
जवळपास 1,800 मोती, माणिक, पुष्कराज, नीलमणी आणि नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या पत्र्यांच्या चमकदार साठ्यात ही रत्नं सापडली आहेत. ती पहिल्यांदा उत्तर प्रदेशात एका विटांच्या खोलीत जमिनीखाली दिसली होती. हे ठिकाण भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाजवळच आहे. तसंच एक अस्थीकलश सापडला आणि त्यावर कोरलेल्या माहितीवरून तो खुद्द भगवान बुद्धांचाच असल्याचे स्पष्ट झाले.ही रत्नं आणि भगवान बुद्धाचे अवशेष यांच्या शोधामुळे पुरातत्वशास्त्राच्या जगात मोठी चर्चा झाली. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार या स्तूपात सापडलेल्या अवशेषांमध्ये गौतम बुद्धांच्या दहनानंतरचे शरीरधातू आणि काही रत्नं सापडली होती. पेप्पे यांनी ही रत्न, बुद्धधातू (अस्थी) आणि त्यांचे पात्र (अस्थी करंडक) ब्रिटिश भारतातील वसाहती सरकारकडे सुपूर्त केले.
ब्रिटिश सरकारने 1878 च्या इंडियन ट्रेझर ट्रोव्ह कायद्याअंतर्गत या शोधावर अधिकार प्रस्थापित केला. नंतर अस्थी करंडकातील अवशेष (बुद्धधातू) थायलंड, श्रीलंका आणि म्यानमार यांसारख्या बौद्ध देशांना दिले. बुद्धधातूंचे काही अवशेष आणि राख सायमचे राजे चुलालोंगकोर्न यांना भेट म्हणून दिले. एकूण, सुमारे 1,800 रत्नं, पाच अवशेष पात्रे आणि एक दगडी पेटी कोलकात्याच्या इंडियन म्युझियम (पूर्वीचे इम्पीरियल म्युझियम ऑफ कलकत्ता) येथे पाठवण्यात आली. पेप्पे यांनी शोधलेल्या वस्तूंपैकी काही भाग त्यांना स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
बौद्धधातूंच्या लिलावावर वाद का?
गौतम बुद्धांशी संबंधित रत्नांच्या विक्रीवर बौद्ध विद्वानांनी आणि नेत्यांनी तीव्र टीका केली आहे. या अवशेषांना- बुद्धधातूंना व्यापाराच्या वस्तू म्हणून वागवू नये असे त्यांनी म्हटले आहे. द गार्डियनशी बोलताना कंबोडियातील महानिकाय बौद्ध परंपरेचे मुख्यालय वाट उन्नालोमचे प्रमुख डॉ. योन सेंग येथ म्हणाले, “हा लिलाव जागतिक आध्यात्मिक परंपरेचा अपमान आहे.” लंडनमधील SOAS विद्यापीठाच्या अॅश्ले थॉम्पसन आणि क्युरेटर कोनान चेओंग यांनी बीबीसीला सांगितले की, “ही विक्री अनेक नैतिक प्रश्न उभे करते. मानवी अवशेष विकले जाऊ शकतात का? आणि कोण ठरवणार की एखादी वस्तू मानवी अवशेष आहे की नाही?.. अनेक बौद्ध साधकांच्या दृष्टीने विक्रीस ठेवलेली रत्नं ही हाडं आणि राख (बुद्धधातू) यांचा अविभाज्य भाग आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले, “सदबीजचा हा लिलाव अत्यंत पवित्र वस्तूंना विक्रीयोग्य वस्तूंमध्ये परिवर्तीत करतो. स्तूपातून ही वस्तू काढण्यात आली आणि त्यांना ‘रत्नं’ किंवा ‘युरोपियनांच्या आस्वादासाठीच्या वस्तू’ असे संबोधण्यात आले, एकूणच हा वसाहतीकालीन अन्यायाचे सातत्य असलेला वारसा आहे.”
इंग्लंडच्या बाथ स्पा विद्यापीठातील बौद्ध भिक्षु आणि प्राध्यापक महिंदा डीगाल्ले यांनी द गार्डियनला सांगितले की, “ही विक्री एक भयंकर प्रकार आहे आणि जगातील सर्वात महान विचारवंतांपैकी एक असलेल्या गौतम बुद्धांचा अपमान आहे.” इतिहासकार सांगतात की, हे अवशेष बुद्धांच्या शाक्य वंशाचे वारस असून संपूर्ण जगभरातील बौद्ध समुदायाचा हा सांस्कृतिक वारसा आहे.
ब्रिटिश महाबोधी सोसायटीचे अमल अबेयवर्धने यांनी बीबीसीला सांगितले की, “बुद्धांनी शिकवले आहे की, इतरांची मालमत्ता परवानगीशिवाय घेऊ नये. ऐतिहासिक नोंदी सांगतात की, शाक्यमुनी वंशाला हे अवशेष जपण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनी या रत्नांसह या अवशेषांना जतन करण्याची इच्छा व्यक्त केली होती, जेणेकरून बुद्धांचे अनुयायी त्यांची कायम पूजा करू शकतील.”
सदबीज आणि पेप्पे यांचा बचाव
सदबीज आणि क्रिस पेप्पे यांनी या टीकेला फारसे महत्त्व दिलेले नाही. सदबीजच्या प्रवक्त्याने ब्रिटिश वृत्तपत्राला सांगितले की, “आम्ही प्रामाणिकपणे तपासणी केली असून वस्तूंची खरी ओळख, मूळ, कायदेशीर स्थिती आणि अन्य बाबी आमच्या धोरणांनुसार तसेच कला व ऐतिहासिक वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपासल्या आहेत.” लॉस एंजेलिसमध्ये राहणारे चित्रपट निर्माते क्रिस पेप्पे यांनी बीबीसीला सांगितले, “मी जितक्या बौद्ध मठांना भेटी दिल्या, तिथे कोणत्याही बौद्ध व्यक्तीने या रत्नांना शारीरिक अवशेष मानले नाही.”
पेप्पे म्हणाले की, “कुटुंबाने हे अवशेष मठांना किंवा संग्रहालयांना दान करण्याचा विचार केला, परंतु जवळून तपासल्यावर प्रत्येक पर्यायास वेगवेगळ्या अडचणी होत्या.” “लिलावाच्या माध्यमातून या वस्तू बौद्धांकडे हस्तांतरित करण्याची सर्वात न्याय्य आणि पारदर्शक पद्धत आहे आणि सदबीज हे यशस्वीपणे साध्य करेल, अशी आम्हाला खात्री आहे.”






