- दिलनवाज पाशा
अलीगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या सामान्य कक्षात झोपलेल्या कदीम कुरैशी याच्या शरीरावरील जखमा अजून ताज्या आहेत. त्याच्या शेजारच्या पलंगावर झोपलेल्या २० वर्षीय अरबाजला बाथरुमला जाण्यासाठी दोघांची मदत घ्यावी लागते. त्यांचे सोबती अकील (मुन्ना) आणि अकील कुरैशी हे गंभीर जखमी आहेत.
24 मे रोजी कदीम, नेहमीप्रमाणे मुन्ना, अरबाज आणि अकील यांच्यासोबत अलीगढच्या अल अम्मार मीट फॅक्टरी मधून म्हशीचं मांस घेऊन अतरोलीला जायला निघाले होते. त्यांच्याकडे म्हशीचं मांस विकत घेतल्याची अधिकृत पावतीही होती. त्यांचा दावा आहे की फॅक्टरीतून निघताच काही बाईकवाल्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. ते जेव्हा पनैठी गावात पोहोचले तेव्हा त्यांनी गाडीच्या समोर बाईक्स घालून तिला थांबवलं.
कदीम म्हणतो की असं पहिल्यांदाच घडलं नव्हतं. दोन आठवड्यापूर्वीच काही हिंदूत्त्ववादी तरुणांनी त्यांना अडवलं होतं. कदीम सांगतो, “त्याही वेळेस त्यांनी माझ्याकडे गोमांस असल्याचा आरोप केला होता व मी त्यांना पावती दाखवली होती. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी माझ्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मी ते दिले नाही. काही वेळानं पोलिस आले आणि आम्हाला ठाण्यात घेऊन गेले. तिथं त्यांनी मांसाची तपासणी केली व आम्हाला सोडून दिलं.” 
म्हशीच्या मांसाला परवानगी असतानाही लाथा-बुक्क्यांनी तुडवलं…
याही वेळेस असंच काहीसं घडेल असं त्याला वाटलं. पण असं घडणार नव्हतं. कदीम सांगतो, “आम्हाला अडवल्यानंतर आणखी एक टोळी आली. त्यांनी येताच नारेबाजी सुरू केली आणि आम्हाला मारायला सुरूवात केली. विजय बजरंगी त्यांचं नेतृत्त्व करत होता ज्याला आता अटक झाली आहे. सर्वांनी आम्हाला काही न विचारताच मारायला सुरूवात केली. आम्ही गाय कापल्याचा आरोप ते करत होते. कोणीच काही ऐकायला तयार नव्हते.”
कदीम व त्याच्या सोबत्यांवर हल्ला सुरू असतानाच पोलिसांची एक गाडी तिथून गेली. कदीम व त्याचे सोबती गाडीच्या मागे धावले पण गाडी थांबली नाही. “दुसरी गाडी 20 मिनिटांनी आली. आम्ही जीव वाचवण्यासाठी त्यात घुसलो. पण गर्दी आता वाढली होती. पोलिसांनीही आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. जमावाने आम्हाला गाडीतून ओढून मारलं जोवर आम्ही बेशुद्ध झालो नाहीत.”
संबंधित लेख वाचा: 1) हलाल मांस ऐकलयं, पण आता हलाल डेटिंग, हलाल टुरिझम, हलाल सर्टिफिकेट्स हा नेमका काय प्रकार आहे? |
पोलिसांच्या उपस्थितीत निरपराध मुस्लिम तरुणांना मारहाण
‘बीबीसी’वर या घटनेचा व्हिडीयो आहे ज्यात लोक पोलिसांच्या गाडीतून चार लोकांना बाहेर काढून मारत आहेत. तिथं उपस्थित असलेले तीन पोलिस, ज्यात एक स्त्री-पोलिस होती, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत नाहीत. दुसऱ्या एक व्हिडीयोत चौघेही जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले आहेत आणि पोलिस लोकांना थोपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. हे दोन्ही व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर अलीगढ पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले. एक जमावावर आणि दुसरा कदीम व त्याच्या सोबत्यांवर.
‘बीबीसी’शी बोलताना अलीगढचे पोलिस अधिक्षक संजीव सुमन सांगतात, “मांसाचे नमुने मथुराच्या एफएसएल प्रयोगशाळेत पाठवले होते. ते म्हशीच्या मांसाचे असल्याचे स्पष्ट झालं. एका वैध कत्तलखान्यातून वैध पद्धतीने मांसाची खरेदी झाली होती. त्यामुळे गोहत्येचं प्रकरण चौकशीनंतर बंद करण्यात येईल.” पोलिसांनी सध्या 22 वर्षीय विजय बजरंगी, जो जमावाचं नेतृत्त्व करत होता त्याला, तसंच 50 वर्षीय विजय गुप्ता, 25 वर्षीय लवकुश आणि 25 वर्षीय भानू प्रताप यांना अटक केली आहे. यांच्याशिवाय मारहाण करणाऱ्या सर्वांनाच अटक करण्यात येईल असं सुमन सांगतात. 
जिथं ही घटना घडली तिथून हरदुआगंज पोलिस स्टेशन 16 किमी लांब आहे व जायला अर्धा तास लागतो. तिथले एसएचओ धीरज कुमार हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी चौघांनाही लोकांच्या तावडीतून सोडून हॉस्पिटलला पोहोचवलं.
कदीम सांगतो, “सुरूवातीला 15-20 लोक होते पण नंतर शेकडो लोक जमा झाले. कोणीही आम्हाला वाचवायला समोर आला नाही. सारे ओरडत होते- यांना मारून टाका, जाळून टाका. पोलिस 10 मिनटंही उशीरा आली असती तर आम्ही जिवंत राहिलो नसतो.”
मांस म्हशीचे असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध तरीही…
या परिसरात मांसाचा व्यापार करणारे लोक सांगतात की हे पहिल्यांदाच घडलेलं नाही जेव्हा स्वतःला हिंदूत्त्ववादी समजणाऱ्या तरुणांनी त्यांच्या सारख्यांना असं अडवलं होतं. गोसेवेच्या नावावर अवैध वसूली केला जात असल्याचा आरोपही अनेकांनी केला. याविषयी संजीव सुमन सांगतात, “आम्ही या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी करत आहोत. ही अचानक घडलेली घटना आहे की कट-कारस्थान आहे हेही बघतोय. जर काही समाजकंटक गाईच्या नावावर गुंडागर्दी करत असतील तर पोलिस त्यांच्यावर कडक कारवाई करेल.”ते मान्य करतात की यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत ज्यात गोमांसाच्या संशयावरून लोकांना अडवण्यात आलं पण ते म्हशीचं मांस निघालं.
हिंदुत्ववादी संघटनेने हात झटकले
अटक झालेला विजय बजरंगी परिसरात हिंदुत्त्ववादी तरुण म्हणून ओळखला जातो. पण तो एखाद्या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. अलीगढच्या हिंदूत्त्ववादी संघटनांनी स्वतःला हल्लेखोरांपासून वेगळं केलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मुकेश राजपूतनं म्हटलं, “24 मे रोजी घडलेल्या घटनेत विहींप किंवा बजरंग दलाचा कोणताही कार्यकर्ता नव्हता. या परिसरात अनेकदा मांसाचा व्यापार करताना नियमांचं पालन होत नव्हतं. त्यामुळे अफवा पसरल्या की गाईचं मांस नेलं जात आहे. त्यामुळे परिसरात तणाव पसरला व त्यातून ही घटना घडली असावी. पण विहिंप किंवा बजरंग दल अशा हिंसाचाराचं समर्थन करत नाही. जे लोक हिंदूत्त्ववादी संघटनेच्या नावावर चुकीची कामं करत आहेत, अवैध वसूली करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कोणी आमच्या नावावर हे करत असेल तर आम्हीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.”
यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याचे पोलीस मान्य करतात
ही काही पहिलीच अशी घटना नाही. उत्तर भारतात तर अशा घटना वारंवार घडत आहेत. 2014 मध्ये भाजप सरकार राज्यात व केंद्रात सत्तेत आल्यापासून अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं मानवाधिकार समुहांचं म्हणणं आहे. मागील वर्षभरातच उत्तर भारतात अशा अर्धा डझन घटना घडल्या आहेत ज्यात स्वतःला हिंदूत्त्ववादी समजणाऱ्या तरुणांनी गोमांसाच्या आरोपाखाली हल्ले केले आहेत. पण यात पोलिस त्यांच्यापेक्षा गोमांस नेण्याचा आरोप असलेल्या लोकांवरच कारवाई करतात. पण अलीगढच्या प्रकरणात मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की व्यापारी वैध पद्धतीने मांस नेत होते आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांवरच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे माजी छात्रसंघ अध्यक्ष आणि इंटरनॅशनल डेमोक्रेटीक राईट्स फाऊंडेशनचे संचालक फैजुल हसन सांगतात, “मुसलमानांवर हल्ले केले जात आहेत कारण प्रशासन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करत नाही. 2014 नंतर मुस्लिमांवर हल्ले करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. गाईच्या नावावर, ओळखीच्या नावावर, दाढी-टोपी घातली आहे म्हणून मुस्लिमांवर हल्ले केले जात आहेत. या लहानसहान हिंदू संघटना, सेना कोणालाही अडवतात आणि हल्ले करतात. त्यांना थोपवण्याची जबाबदारी मुस्लिमांवर नाही तर सरकार व प्रशासनावर आहे. प्रशासनाला यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. जर त्यांनी वेळीच कठोर कारवाई केली असती तर इतरांची असं करण्याची हिम्मत वाढली नसती.”
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणांची भेट घेतली. समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनीही भेट घेतल्यानंतर आरोप लावला की सत्तेकडून मिळणाऱ्या संरक्षणामुळे अशा घटना वाढत आहेत. ते म्हणतात, “केंद्र व राज्य सरकार लोकांमध्ये धर्माच्या नावावर भेदभाव करत आहे त्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. सरकार हल्लेखोरांवर लगेच व कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढत आहे आणि हे हल्ले थांबत नाही आहेत.”
मांस विक्रेत्या मुस्लिमांमध्ये घबराट
भारतातील अनेक राज्यांत गोमांस बंदी आहे व त्यासंबंधी कठोर कायदे आहेत. पण मुसलमानांची मोठी लोकसंख्या म्हशीचं मांस खात असते. उत्तर भारतात म्हशीच्या मांसावर बंदी नाही पण अधिकृत कत्तलखान्यातून मांस विकत घेऊनच ते बाजारात विकता येऊ शकतं. त्यामुळे मांसाची अशी वाहतूक करणंच जीवघेणं ठरत आहे असं व्यापारी म्हणतात.
कदीमचा भाऊ आसिफ कुरैशी सांगतो, “या व्यापारात आता जीवाची जोखिम वाढली आहे. मांस घेऊन जाणं असं झालंय जसं की अफीम किंवा गांज्याची तस्करी करणं. आमच्याकडे सारी कागदपत्रं असतात तरीही गाईच्या नावावर आम्हाला कोणीही अडवून मारतो.” 
चारही जखमी तरुण अतरोली गावात राहतात. कदीमचं घर पक्की गढी मोहल्ल्यात आहे. या मुस्लिम बहुल परिसरात या प्रकरणानंतर मांसाची दुकानं बंद आहेत. कदीमचा सारा परिवार याच व्यवसायात आहे. तो सध्या रुग्णालयात आहे आणि दुकान बंद आहे. त्याचे वडील मुन्ना कुरैशी दुकानाबाहेर उदासपणे बसलेले असतात. ते सांगतात, “आमचं सारं आयुष्यच मांसविक्रीत गेलं आहे पण कधी इतक्या अडचणी आल्या नव्हत्या. पण आता दर महिन्या-दोन महिन्यात कोणीतरी गाईच्या नावाखाली आमच्याकडचं मांस हिसकावून घेतं, मारहाण करतं. आमच्या कुटुंबावर मोठं कर्जही झालं आहे.”
जखमी अकील कुरैशी आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे. तो सांगतो, “आमचं लाखो रुपयांचं मांस फेकण्यात आलं. आम्ही उधारीवर काम करत असतो. घर आधीच गहाण पडलं आहे. आता हे नुकसान झालंय. हॉस्पिटला खर्च आहे. किती दिवस इथं राहावं लागेल माहित नाही. इथून बाहेर पडल्यावर कर्जदार पैशासाठी तगादा लावतील. धंदा पुन्हा कधी सुरू होईल माहिती नाही.”
या मुस्लिम बहुसंख्य भागातही लोकांमध्ये भितीचं वातावरण स्पष्टपणे दिसतं. एका तरुणानं सांगितलं, “मुस्लिमांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. आमच्या खाण्या-पिण्यावरून सरळ हल्ले करण्यात येतात. आमचं जगणं कठीण झालंय आणि आम्ही काहीही करू शकत नाही.”
अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मोहिबुल हक सांगतात, काऊ व्हिजीलँटीझम (गाईच्या नावावर हिंसाचार) हा एक संघटीत गुन्हेगारीत बदलत आहे. एका विशिष्ट समुदायाच्या खाण्याच्या सवयींचं गुन्हेगारीकरणं आहे हे. ज्या लोकांवर हल्ला झालाय ते गरीब आहेत. अशा व्यापारांवर हल्ले होतात तेव्हा फक्त त्यांच्या दोन-चार कुटुंबावरच परिणाम होत नाही, तर मुस्लिम परिसरातील मांसाची विक्रीही बराचकाळ थांबते. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. म्हशीचं मांस खाणं हे मुस्लिमांच्या खाण्याच्या सवयीचा भाग आहे. गरीब लोकांना हेच मांस परवडतं. पण आता लग्नासाठीही मांस मिळत नाही आहे. प्रशासनानं ठरवलं तर ते कडक कारवाई करून या घटना थांबवू शकतात. पण राजकीय इच्छाशक्ति कमी पडते. त्यामुळे देशभरातच द्वेषाचं वातावरण पसरत आहे. आणि हा द्वेष एकाच समुदायावर केंद्रीत आहे.”
या हल्ल्यामुळे आधीच संकटात असलेल्या कदीमच्या कुटुंबाला आणखी अडचणीत टाकलं आहे. चौघा भावांचं हे कुटुंब एका लहानशा घरात राहतं. त्यांची आई, अकीला बेगम सांगतात, “आमच्याकडे शाळेत जाणाऱ्या मुलांची फिस भरण्यासाठी पैसे नाहीत, पुस्तकं घेण्यासाठी पैसे नाहीत. माझी नातवंडं लहानसहान गोष्टींसाठी पैशांच्या अभावी रडत असतात. घरी जेवणाचेही हाल सुरू आहेत. वारंवार आमचं दुकान बंद राहतं. जगणं कठीण झालंय आणि काही बोलताही येत नाही, करताही येत नाही.”
(सौजन्य - बीबीसी हिंदी, अनुवाद- प्रतिक पुरी)






