काश्मीरच्या श्रीनगर शहरातील श्री महाराजा हरि सिंग (SMHS) रुग्णालयाच्या पुनर्वसन कक्षात एका खाटेच्या कडेला बसून अफिया आपल्या जुनाट गडद ब्राउन स्वेटरच्या सैल सुटलेल्या धाग्यांशी खेळत होती. तिचे कपडे विरलेले, थकल्यागत दिसणारे. नजर खाली झुकलेली. ती हळुवारपणे म्हणते, “माझं स्वप्न होतं, आकाशात उडण्याचं. एअर हॉस्टेसचं काम मिळवून पर्वतातून निळ्या आकाशात उंच भरारी घेण्याचं... पण आता मी एका दुःस्वप्नात अडकले आहे… ड्रग्जच्या नशेत, स्वतःचं जीवन वाचवण्यासाठी झुंजत.”
24 वर्षांची अफिया ही फक्त एक प्रतिनिधी आहे त्या हजारो तरुण-तरुणींमधली, ज्यांचं आयुष्य काश्मीरमध्ये वाढत्या प्रमाणात पसरणाऱ्या हेरॉईनच्या व्यसनानं पोखरून टाकलं आहे. काश्मीरमध्ये अंमली पदार्थांचं संकट किती भयावह आहे, हे 2022 मध्ये श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासानुसार, अंमली पदार्थांच्या वापरामध्ये काश्मीरने पंजाबलाही मागे टाकलं आहे. 2023 च्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संसदेने सादर केलेल्या अहवालात काश्मीरमध्ये सुमारे 13.5 लाख लोक व्यसनाच्या विळख्यात असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. 2022 मध्ये हेच प्रमाण केवळ 3.5 लाख इतकं होतं.
IMHANS च्या (Institute of Mental Health and Neurosciences) अहवालानुसार, 90% व्यसनी वय वर्षं 17 ते 33 दरम्यानचे आहेत. SMHS रुग्णालयात 2023 मध्ये 41,000 पेक्षा अधिक ड्रग्ज संबंधित रुग्णांना उपचारासाठी आणण्यात आलं, म्हणजे दर 12 मिनिटांनी एक नवीन रुग्ण. हे प्रमाण 2021 पेक्षा 75% अधिक आहे. डॉक्टर यासिर राठर, IMHANS मधील मानसोपचार प्रमुख, सांगतात, “व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या वाढवली असली तरी गंभीर रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये राहण्याची सोय केवळ थोड्याच ठिकाणी आहे. अफियासारख्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण आहे.”
हरवलेलं स्वप्न…
अफियाच्या आई राबिया तिचे ओले केस कोमलपणे मागे सारत म्हणते, “तू यातून बाहेर पडशील गं...” एका खुर्चीवर तिचे वडील तबिश शांतपणे बसले आहेत. अफिया मात्र या शब्दांकडे दुर्लक्ष करत, हॉस्पिटलच्या निळ्या ब्लँकेटखालून आपल्या हातांवरच्या खोल जखमांना हवा लागावी यासाठी वारंवार पांघरूण सरकवत राहते. या जखमा हेरॉईन घेताना सुईच्या टोचण्यांमुळे झालेल्या आहेत…
हात, पाय, पोट... या जखमांतून आता रक्त आणि पिवळसर पू वाहू लागलेला आहे. डॉक्टर सांगतात, या जखमा इतक्या गंभीर आहेत की तिच्या पालकांच्याही आरोग्याला धोका पोहचू शकतो. सहा वर्षांपूर्वी अफिया एक हुशार, 12 वीमध्ये 85% गुण मिळवलेली, हवाईसेविकेचं स्वप्न पाहणारी मुलगी होती. एका नामांकित विमानसेवेच्या जाहिरातीवर तिने अर्ज केला आणि प्रशिक्षणासाठी दिल्लीत पाठवण्यात आलं. “ते माझं नवं जीवन होतं... पण...” ती थांबते, डोळे भरून येतात.
2019 साली, भारतीय सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द करून विशेष राज्याचा दर्जा काढून टाकला. यानंतर वाढलेली सुरक्षा नाकेबंदी, बंद इंटरनेट, तुरुंगवास यामुळे संपूर्ण समाज ढवळून निघाला. “दिल्लीत असताना मला माझ्या घरच्यांशी संपर्कच करता येत नव्हता. एक आठवड्याची रजा घेऊन मी घरी गेले... आणि तिथून परतच जाऊ शकले नाही.”
पाच महिने उलटून गेले. स्वप्न विरलं, नोकरी गेली. “प्रत्येक नकारासोबत माझ्यातली आशा संपत गेली. मग कोविड आलं... आणि आयुष्यच थांबलं.” सुरुवात गांजापासून... आणि नंतर हेरॉईनपर्यंत… “सुरुवातीला आम्ही फक्त एकमेकांच्या वेदना बोलून व्यक्त करत होतो... मग गांजाचे झुरके आले... आणि एका दिवशी मला एका मित्रानं छोटा फॉइल दिला ,त्यात हेरॉईन होतं... मी न विचारता घेतलं.”
हेरॉईन… एक अत्यंत धोकादायक व्यसन, जे शरीरात ‘शांतता’ देण्याच्या नावाखाली संपूर्ण अस्तित्व गिळंकृत करतं. अफिया सांगते, “एकदा मी श्रीनगरहून 40 किलोमीटर दूर शोपियांमध्ये एका डीलरला भेटण्यासाठी गेले. त्यानं मला 'टिचू' (इंजेक्शन) दिलं... आणि कारमध्येच माझ्या पोटात ते टोचलं.” त्या क्षणाचं सुख जरी स्वर्गीय वाटलं, तरी तेच तिच्या अधःपतनाची सुरुवात होती. “ही फक्त नशा नव्हती, माझं आयुष्यचं बदलून गेलं होतं. मी रात्रभर जागी राहून पुढच्या दिवसासाठी ड्रग्ज कुठून आणायचे याचा प्लॅन करत असे. ते थकवणारं होतं – पण व्यसनाचं आकर्षण त्यापेक्षा प्रबळ होतं.”
काश्मीरमध्ये महिलांमध्ये वाढतं व्यसन
IMHANSचे डॉ. राठर म्हणतात, “2016 पूर्वी आम्हाला फारसे हेरॉईनचे रुग्ण दिसत नव्हते. गांजा व तत्सम सौम्य ड्रग्ज वापरले जात. पण आता हेरॉईनचं प्रमाण महिलांमध्येही वाढलं आहे, अगदी गरोदर महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे.” प्रत्येक दिवसाला ३००-४०० रुग्ण उपचारासाठी येतात, त्यात बहुसंख्य हे हेरॉईनसंबंधित असतात. हेरॉईनची क्रूरता ही तिच्या “त्वरित आणि तीव्र नशेच्या परिणामांमध्ये” लपलेली आहे.
अस्पष्ट भविष्य
अफियाने आतापर्यंत 5 वेळा पुनर्वसनासाठी भरती होऊनही पुन्हा पुन्हा ड्रग्जकडे परत जाण्याचा मार्ग घेतला आहे. “माझं शरीरच मला रस्त्यावर खेचून नेतं. माझा मेंदू कायम ‘एक शेवटचा शॉट’ शोधतो.” तिच्या आईला एकदा महिलांच्या टॉयलेटमध्ये हेरॉईनचा साठा सापडला. तिने तो फ्लश केला, पण अफियानं पुन्हा त्याचा बंदोबस्त केला. एक नर्स सांगते, “रुग्ण हे सिक्युरिटी गार्डला पैसे देतात किंवा बाहेर जाण्याचं कारण सांगून हॉस्पिटलमधून ड्रग्ज शोधतात.”
अफिया एका रात्री निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी परत आली. काही पुरुष रुग्णांच्या मदतीने तिला ड्रग्ज मिळालं होतं.
शरीर, मन आणि प्रतिष्ठेचं विसर्जन
डॉ. मुक़्तार ठाकूर, SMHS मधील प्लास्टिक सर्जन, सांगतात, “तिच्या वैयक्तिक भागांवर खोल जखमा, मांडीवर मोठा व्रण, आणि शरीरात संसर्ग. तिचं यकृत, हृदय, मेंदू सगळं प्रभावित झालं आहे. तिची स्मरणशक्तीदेखील हळूहळू जातेय.”
तिचे आई-वडील रुग्णालयात आणताना खोटचं सांगतात, “तिला अपघातातून झालेल्या जखमा आहेत,”
कारण, “इथे कुणी ड्रग अॅडिक्ट मुलीशी लग्न करत नाही.”
स्त्री, व्यसन आणि समाज
डॉ. झोया मीर, श्रीनगरमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सांगतात, “बहुसंख्य महिलांची पुनर्वसन प्रक्रिया गुपचूप केली जाते. समाजात ‘तिच्या बदनामीचा’ भयंकर दबाव असतो. काश्मीरसारख्या ठिकाणी, जिथे प्रत्येकाला सगळ्यांबद्दल माहिती असते, तिथे ही झुंज दुहेरी होते – शरीरासोबत समाजाशीही.”
काश्मीरच्या मानसोपचारतज्ज्ञ लैला कुरेशी या श्रीनगरमध्ये 'द ग्रूमिंग काश्मीर' हे ड्रग्ज रिहॅबिलिटेशन सेंटर चालवतात. ड्रग्जच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावर त्या म्हणतात की, सध्या काश्मीरमध्ये ड्रग्जचा पुरवठा खूप जास्त आहे. लोक सर्वत्र सहजपणे ड्रग्ज खरेदी करत आहेत. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरात एक ड्रग्ज तस्कर आहे आणि येथे सर्व प्रकारचे ड्रग्ज उपलब्ध आहेत. हेरॉइन, कोकेन, गांजा किंवा ड्रग्ज, सर्व एकाच संदेशावर उपलब्ध आहेत.
लैला कुरेशी म्हणतात, मला आश्चर्य वाटतं की काश्मीरमध्ये इतकी सुरक्षा, पोलिस, सैन्य आहे, तरीही ड्रग्ज सहज उपलब्ध आहेत. श्रीनगरमध्ये तुम्हाला पाणी किंवा चांगली फळे मिळणार नाहीत, परंतु तुम्हाला शुद्ध सिंथेटिक ड्रग्ज मिळतील. सध्या सर्व वयोगटातील लोक ड्रग्ज सेवनात गुंतलेले आहेत आणि पुरुष आणि महिला दोघेही त्यात सामील आहेत. मुली ड्रग्ज वाहक आहेत, पुरवठादार आहेत आणि स्वतः ड्रग्ज व्यसनी आहेत. सध्या मुलींना उपचार घेण्यासाठी योग्य जागा नाही.
काश्मीरमधील सर्वांना माहिती आहे की सध्या ड्रग्जचे व्यसन शिगेला पोहोचलं आहे. आपली मुलं ड्रग्ज आणि दिखाव्यामध्ये हरवत चालली आहेत. येथे फक्त काही पुनर्वसन केंद्रे आहेत आणि या समस्येच्या तीव्रतेच्या बाबतीत ती खूपच कमी आहेत. येथून बरे झालेले मूल पुन्हा त्यात परत जाते. ही सर्वात धोकादायक परिस्थिती आहे कारण पुन्हा त्यात जाणे म्हणजे स्वतःचे जीवन संपवणे. आज 20 लाखांहून अधिक तरुण ड्रग्जचे व्यसनग्रस्त झाले आहेत.
डॉ. अब्दुल मजीद हे SKIMS मध्ये मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. ते म्हणतात की मी काश्मीरमध्ये सुमारे 22 वर्षांपासून ड्रग्ज व्यसनींवर उपचार करत आहे, परंतु गेल्या 7-8 वर्षांत हेरॉइनचा पूर आला आहे. गेल्या २ वर्षांत आमच्या रुग्णालयात 3000 हून अधिक रुग्ण आले आहेत. ते वाऱ्यासारखे पसरत आहे. हेरॉइन काश्मीरमध्ये अशा ठिकाणी पोहोचले आहे जिथे वीज आणि पाणी देखील पोहोचलेले नाही.
अफिया हे नाव बदललेलं असलं तरी तिची कहाणी खरी आहे – आणि ती केवळ तिची नाही. काश्मीरमधील हजारो तरुण मुली, ज्यांनी उड्डाणाची स्वप्नं पाहिली, त्या आता व्यसनाच्या दलदलीत अडकलेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही लढाई केवळ ड्रग्जविरोधातली नाही – तर स्वतःच्या अस्तित्वाची, प्रतिष्ठेची आणि माणूस म्हणून सन्मानाने जगण्याची आहे.
(सौजन्य - अल जझीरा)






