- अप्सरा आगा
कुपोषण ही समाजाच्या आरोग्याला घातक ठरणारी मोठी समस्या असून, त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम किशोरवयीन मुलींवर होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. कुपोषणाचा परिणाम केवळ त्या मुलींवरच मर्यादित राहत नाही, तर त्याची छाया त्यांच्या येणाऱ्या पुढील पिढीवरही पडते. कुपोषित किशोरवयीन मुली जेव्हा मातृत्व धारण करतात, तेव्हा कमी वजनाची बाळे, मुदतपूर्व प्रसूती, तसेच हृदयरोग, फाटलेले टाळू–ओठ यांसारखे जन्मजात दोष असलेली बाळे जन्माला येण्याची शक्यता दाट असते. महाराष्ट्रात सध्या कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 18 टक्के, तर मुदतपूर्व बाळांचे प्रमाण 10 टक्के आहे.
पुण्यात संयुक्त राष्ट्र बाल निधीच्या (युनिसेफ) मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या वेळी कुपोषणाला सामाजिक समजुतींचीही जोड असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कुटुंबांत मुलांच्या तुलनेत मुलींना अनेकदा कमी आहार मिळतो, पुरेशी काळजी घेतली जात नाही. यामुळे त्यांच्या शरीराची वाढ खुंटते, वजन कमी राहते, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. दुसरीकडे जंक फूडचे वाढते सेवन आणि कॅलरीज–साखरेचे प्रमाण असंतुलित असल्याने मुला–मुलींमध्ये अतिपोषण व लठ्ठपणाही वाढत आहे.
राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणानुसार देशातील 24 टक्के किशोरवयीन मुलींची वाढ खुंटलेली, 24 टक्के मुली कमी वजनाच्या, तर तब्बल 42 टक्के मुली कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जंक फूडच्या अतिसेवनामुळे 12 टक्के मुले आणि 8 टक्के मुली मधुमेहाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
पोषक आहार गरजेचा
किशोरावस्था ही आयुष्यभराच्या आरोग्याची पायाभरणी करणारी सर्वात महत्त्वाची अवस्था असल्याचे युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “या वयात योग्य पोषण मिळाले, तर केवळ शारीरिक वाढच नव्हे तर शिकण्याची क्षमता, भावनिक स्थैर्य आणि भविष्यातील उत्पादकता वाढीस मदत होते.” त्यांच्या मते, सर्व किशोरवयीन मुलींची उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील हिमोग्लोबिन, कृमी, डायरिया आणि मासिक पाळीविषयक समस्या यांची नियमित तपासणी केली जाणे अत्यावश्यक आहे. आहारात फळे, दूध, अंडी, हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ आणि खनिजे–जीवनसत्त्वांनी भरलेले अन्न असणे अत्यंत आवश्यक आहे.
सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज
पोषणतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर यांनी सांगितले की, “मुलींना नैसर्गिकरीत्या मुलांपेक्षा अधिक भक्कम प्रतिकारशक्ती असते; मात्र सामाजिक दुर्लक्षामुळे त्यांचे आरोग्य खालावते. अनेक कुटुंबांत मुलांच्या तुलनेत मुलींना खाणे–पिणे, आरोग्याची काळजी किंवा पोषण यांबाबत कमी प्राधान्य दिले जाते.” त्या पुढे म्हणतात, “किशोरावस्था म्हणजे मुलींचे आरोग्य सुधारण्यासाठी शेवटची संधी. योग्य पोषण देणे म्हणजे त्यांच्या संपूर्ण भविष्याची, तसेच पुढील पिढीच्या आरोग्याची गुंतवणूक आहे.”
दरम्यान, किशोरवयीन मुलींचे कुपोषण ही केवळ आरोग्य समस्या नसून संपूर्ण समाजाच्या भविष्यासमोर उभी ठाकलेली गंभीर चेतावणी आहे. योग्य पोषण, नियमित तपासणी आणि मुलींविषयीचे सामाजिक भेद मिटवले, तरच पुढील पिढी अधिक सक्षम, निरोगी आणि सशक्त घडेल. अन्यथा कुपोषणाची ही साखळी पिढ्यान्पिढ्या तुटतच जाणार नाही.
महाराष्ट्रातील मातृ–शिशु आरोग्य
महाराष्ट्रातील मातृ शिशु आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे. इथे वजन कमी असतांना जन्माला येणाऱ्या बाळांचे प्रमाण 18% आहे तर मुदतीच्यापूर्वी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण 10% आहे.
किशोरवयीन मुलींची पोषणस्थिती (सीएनएनएस अहवाल)
सीएनएनएस अहवालानुसार किशोरवयीन मुलींमध्ये 24 टक्के मुली वाढ खुंटलेली आहे, 24 टक्के मुली कमी वजनाच्या असून एकूण 42 टक्के मुली कुपोषित आहेत.
जंक फूडचा थेट परिणाम
जंक फुडचा थेट आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचं चित्र आहे. जंकफूडमुळे 12% मुले मधुमेहाच्या वाटेवर असून मुलींमध्ये हे प्रमाण 8% आहे.
कुपोषणामुळे मुलींमध्ये परिणाम काय?
कुपोषणाचे मुलींमध्ये काही विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. जसे त्यांची वाढ खुंटली असून वजन कमी असणे आणि रक्ताल्पत्याच्या समस्या उद्भवत आहेत.






