(नूतन)
सतरा वर्षांचा मोहम्मद अयान कारच्या मागच्या सीटवर बसला आहे. दोन्ही हात छातीशी घट्ट धरलेले, जणू काही स्वतःला सावरण्याचा तो प्रयत्न करतोय. डोळे रडून सुजलेले, लाल झालेले.. भारत-पाकिस्तानच्या वाघा-अटारी सीमेवरील क्रॉसिंगकडे तो एकटक बघतोय. त्याचा प्रवास अचानक संपला आहे जो त्याला एकट्यानं कधीच करायचा नव्हता. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानात आपल्या घरी एका अपघातात लकवा मारल्यामुळे अयान उपचारांसाठी 17 मार्चला दिल्लीत आला होता. इथं त्याचे उपचार सुरू असतानाच त्यात खंड पडला. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द करून त्यांना परत जायला सांगितलं.
त्यामुळे अयान आणि त्याचे भाऊ-बहिण यांना आईला सोडून पाकिस्तानात जावं लागलं. आई भारतीय नागरिक आहे आणि तिचं पाकिस्तानी माणसाशी लग्न झालंय. अयान सांगतो, “आमचा व्हिसा आणखी पंधरा दिवसांसाठी व्हॅलिड होता. मला आईची फार गरज आहे, डॉक्टरांपेक्षाही जास्त. तिच्याशिवाय मला परत जायचं नाही. मी इथं फक्त उपचारांसाठी आलो होतो.” सीमेवर गाड्यांच्या आणि लोकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. 30 एप्रिल हा सीमापार जाण्याचा शेवटचा दिवस होता. 
वाघा बॉर्डरवर संताप, अश्रू आणि शिव्या
वाघा बॉर्डर… जी कधीकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कुटुंब व मित्र यांना जोडणारी आशेची सीमा होती ती आता अचानक निरोप आणि खंडीत जीवन योजनांमुळे उसळलेल्या गोंधळाची साक्षीदार झाली आहे. लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. पुढे काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. 52 वर्षीय सलीम-उन-निसा, भारतात आपल्या बहिणींसोबत 9 दिवस घालवल्यानंतर पाकिस्तानात परतत आहेत.
त्या म्हणतात, “आम्ही कित्येक वर्ष वाट पाहिली. व्हिसासाठी दुआ केल्या आणि आपल्या कुटुंबियांना भेटण्याची स्वप्नं पाहिली. जेव्हा सीमा पार करून इकडे आलो तेव्हा वाटलं आयुष्यानं आम्हाला दुसरी संधी दिली आहे. पण आता कोणतीही वॉर्निंग न देताच आम्हाला परत जायला सांगण्यात येत आहे- जणू काही आमच्या आठवणी, स्वप्नं आणि आसवांना काहीच किंमत नाही. आम्ही पुन्हा कधी भेटू किंवा नाही याची आम्हाला कल्पना नाही काहीच. मी माझ्या आवडीचं जेवण करू शकले नाही. माझ्या इतर नातेवाईकांना भेटू शकले नाही. 10 वर्षांनी इथं येण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा या आयुष्यात इथं येता येईल असं वाटत नाही.”
संबंधित लेख वाचा: 1) 'धर्म पूछ के मारा था.. धर्म बोल के मारेंगे' काश्मिरी विद्यार्थ्यांना धमकीचे मॅसेज... |
पाकिस्तानात लग्न झालेल्या भारतीय हिंदू 55 वर्षीय सिंधू कंवर सीमेवर एका ठिकाणी बसल्या आहेत. त्यांचे डोळे रडून सुजले आहेत. शेजारी त्यांचा नवरा, त्यांची मुलगी, वहिनी शांतपणे उभे आहेत. त्यांचा मुलगा थोडा दूर उभा आहे. सिंधूच्या मुलीचं लग्न भारतात ठरलं होतं. 29 एप्रिलला लग्न होणार होतं. पण व्हिसा रद्द झाल्यानं त्यांना परत जावं लागत आहे. त्या म्हणत होत्या, “आम्हाला फक्त दोन दिवस हवे होते. लग्नाची सारी तयारी झाली होती. पण आता माझ्या मुलीचं लग्न माझ्याशिवायच होणार आहे.” 
कुठे आई पाकिस्तानी तर कुठे वडील भारतीय…
वाघा सीमेवरही भेदभावाचं नाटक सुरू आहे. काही लोकांची कागदपत्रं तपासताना आळस केला जातो तर काही मिश्र कुटुंबातील लोकांना भारतीय नागरिकता मिळण्यासाठी वर्षानुवर्षं वाट बघावी लागते. काही लोक दोन्हीकडे दीर्घकालीन व्हिसावर राहतात आणि कौटुंबिक जीवन जगतात. सिंधू आणि त्यांची मोठी मुलगी, जिचं लग्न होणार आहे, दोघींकडे भारतीय पासपोर्ट आहे. दोघींचा जन्म भारतातच झाला आहे. पण सिंधूचं लग्न पाकिस्तानी नागरिक तख्त सिंह यांच्याशी झालं आणि त्यांची दोन्ही मुलं जन्मानं पाकिस्तानी नागरिक आहेत. लग्नासाठी हे कुटुंब 26 डिसेंबरला भारतात आलं होतं.
सारी तयारी सुरू झाली आणि पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानं त्यात खंड पडला. सिंधू कंवर यांना माहिती नाही की काश्मिरात नक्की काय घडलं. पण पाकिस्तानी लोकांना भारत सोडून जाण्यास सांगितलं हे त्यांना टीव्हीवर समजलं आणि त्यानंतर त्यांनी जाण्याची तयारी सुरू केली. त्या म्हणतात, “मला माहित नाही की तिकडे काय झालं ते. पण मला हे माहित आहे की माझं भारतावर प्रेम आहे, हा माझा देश आहे. आमच्याजवळ जे काही आहे ते इथंच आहे.”
सिंधू आणि त्यांची मुलगी जोधपूरहून, जिथं तिचं लग्न ठरलं आहे, हजार किलोमीटरचा प्रवास करून लगबगीनं वाघा सीमेवर आले. तिथं त्यांना वेगळं व्हावं लागलं. सिंधू कायद्यानं भारतात अजूनही राहू शकतात पण आपल्या कुटुंबासाठी त्यांनी परत जायचा निर्णय घेतला. फक्त त्यांची मुलगी, जी जन्मानं भारतीय नागरिक आहे, जोधपूरला आपल्या घरी परतणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढला आहे. भारत सरकारनं अनेक कठोर प्रतिबंध पाकिस्तानवर लावले आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराची स्थगिती, सीमा बंद करणं, व्यापारावर बंदी, पाकिस्तानी अधिकारी व लोकांना पाकिस्तानात परत पाठवणं इत्यादी गोष्टी यात आहेत. उपचार, कौटुंबिक भेटीगाठी, धार्मिक प्रवास, व्यापार इत्यादींसाठी आलेले हजारो पाकिस्तानी आता परत जाण्यासाठी वाघा सीमेवर एकवटले आहेत. पाकिस्तानी हिंदू जे दीर्घकालीन व्हिसा घेऊन आले होते त्यांच्यावरही कारवाईची तलवार लटकत आहे आणि आपल्या भविष्याची त्यांना काळजी आहे.
‘’दोन्ही देशांच्या आठवणी तुटत आहेत…’’
पोलिस प्रोटोकॉल अधिकारी अरुण महल यांनी सांगितलं की, तीन दिवसांतच 537 पाकिस्तानी परत गेले आहेत. पाकिस्तानातूनही 850 हून जास्त भारतीय भारतात परतले आहेत. भारतात पाकिस्तानी हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे सीमांत लोक संघटनचे अध्यक्ष हमीर सिंह सोढा सांगतात, “लोक वेगवेगळे व्हिसा घेऊन भारतात आले होते. काही तीर्थयात्रेसाठी, काही कुटुंबियांना भेटण्यासाठी. या लोकांना मुदतीआधीच परत जाणं कठीण होतं. पण अतिरेकी हमलाही भयंकर होता. त्यामुळे सरकारी आदेशाचं पालन करण्याशिवाय आम्हाला उपाय नाही. पुलवामा घटनेनंतर थार एक्सप्रेस ट्रेन सेवा रद्द करण्यात आली होती. त्याआधी भारतात येणं स्वस्त आणि सोपं होतं. पण त्यानंतर व्हिसा प्रक्रिया मोठी व क्लिष्ट झाली. पण पुन्हा गोष्टी सुरळीत होऊ लागल्या होत्या. आणि अचानक पुन्हा हे सारं घडलं. जे पाकिस्तानातच होते त्यांना आता भारतात येणं फारच कठीण दिसतंय मला.” सिंधूचे पति तख्त सिंह सांगतात, “सीमेमुळे देश दुरावले आहेत, वेगळे झाले आहेत. पण या आठवड्यात त्यामुळे कुटुंबही दुरावले आहेत, वेगळे झाले आहेत. लग्न तुटत आहेत, दोन्ही देशांच्या आठवणी तुटत आहेत. आम्हाला जी जवळीक आजवर जाणवत होती ती आता जाणवत नाहीये.”
गेल्या रविवारी सकाळपासूनच लोक दिल्ली, बाडमेर, प्रयागराज, जोधपूर पासून वाघा-अटारी सीमेवर जमू लागले होते. गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. लोकही उभे आहेत. प्रत्येकाच्या हातात कागदपत्रं आहेत आणि आपली वेळ येईपर्यंत सारे बेचैन होऊन वाट बघत आहेत. लोक सकाळी सहा वाजताच आले होते पण सीमेवरचे फाटक १० वाजता उघडण्यात आलं आणि त्यानंतर लोकांना जाण्या-येण्याची परवानगी मिळाली. बीएसएफचा एक अधिकारी 85 वर्षीय मोहम्मदबी यांची कागदपत्रं तपासत आहे.
त्या आपल्या मुलाकडे वेळ घालवण्यासाठी आल्या होत्या. अधिकारी म्हणाला, “हा काही आमचा निर्णय नाही. आम्ही फक्त आदेशाचं पालन करतोय. लोक आपल्या कुटुंबाला सोडून रडत परत जात आहेत हे बघणं दुःखद आहे. पण हेच वास्तव आहे. आमचा निरूपाय आहे.” मोहम्मदबी यांच्याकडे आणखी महिन्याभराचा व्हिसा बाकी होता. पण त्यांना आता मुलासोबत परत जावं लागतंय. त्या म्हणतात, “माझी तब्येत ठीक असती तर मी या अतिरेक्यांना चांगला धडा शिकवला असता. त्यांनी निर्दोष लोकांचा जीव घेतला. ती माणसं नाहीत, राक्षस आहेत.”
‘’ते युद्ध लढत नाहीत, कुटुंबांना उध्वस्त करत आहेत.”
48 वर्षीय रबिका यांच्या शिव्या इथल्या गदारोळातही सगळ्यांच्या कानात शिरत आहेत. त्या भारत सरकार आणि अतिरेक्यांवर नाराज आहेत ज्यांच्यामुळे त्यांची कौटुंबिक भेट अर्धवट राहिली. त्यांच्या सोबतीलाच अन्य पाकिस्तानी नागरिकही आपला राग जाहिर करत आहेत. अतिरेक्यांना सामान्य लोकांचं आयुष्य उध्वस्त करण्यासाठी जबाबदार धरत आहेत. ते ‘माणूसकीचे शत्रू’ आणि ‘कुटुंबाच्या विभाजनाचं खरं कारण’ असल्याचं म्हणत आहेत. भारतात जन्मलेल्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या रबिका सांगतात, “भारत सरकारनं आम्हाला निदान आठवडा भराचा वेळ द्यायला पाहिजे होता. माझी त्यांच्याविषयी हीच तक्रार आहे. माझ्याकडे ग्रीन पासपोर्ट आहे. काश्मिरात जे झालं ते फार वाईट झालं आणि अपराध्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण मी भारताची मुलगी आहे, माझा यात काय अपराध आहे?” आपलं सामान उचलत तख्त सिंह ओरडले, “त्यांना लाज असती जराही तर त्यांनी पाहिलं असतं की त्यांनी आपल्या बहिणी-मुलींसोबत काय केलं आहे. ते युद्ध लढत नाहीत, कुटुंबांना उध्वस्त करत आहेत.”
अयान आपल्या कारमध्ये बसून फाटकाकडे बघत आहे. तो रडवेला होत म्हणतो, “हे फाटक उघडावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. मला एवढंच हवंय की मी हे फाटक पार करताना माझ्या आईचा हात माझ्या हातात असेल.” अटारी-वाघा सीमेवर फाटक बंद होण्याच्या किंवा पासपोर्टवर शिक्का उठण्याच्या आवाजापेक्षाही तुटलेल्या वचनांचा, रडत रडत मागितलेल्या दुआंचा, नकाशावर ओढलेल्या एका रेषेमुळे वेगळ्या झालेल्या कुटुंबांचा शांत आक्रोश आहे, ज्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची एक संधी गमावली आहे. रबिका पाणावलेल्या डोळ्यांनी सांगते, “आम्ही हसत ही सीमा पार करून इकडे आलो होतो आणि आता जखमा घेऊन रडत परत जात आहोत. काही जखमा अशा असतात ज्या कोणताही काळ आणि कोणतंही सरकार भरू शकत नाही.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






