- संजना खंडारे
‘’गाडी चालवताना तीन प्राण्यांपासून जरा सांभाळून राहा’’असं ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या मास्तराने हसत हसत सांगितलं. ‘कोण कोण’, असं मी विचारताच तो म्हणाला,’’लहान मुलं, जनावरं आणि महिला… बाईक-कार चालवणाऱ्या महिला कधी कोणत्या दिशेला जातील काही भरोसा नाही’’ असं म्हणून तो स्वत:च्या विनोदावर जोरजोरात हसू लागला, जसं काय त्याने खुप भारी जोक मारला…
हा फक्त एक प्रसंग नसून ही भारतीयांची मानसिकता आहे. एक टिपिकल पितृसत्ताक मानसिकता… बाईनं बाईक चालवणं आजही अनेक पुरुषांच्या नजरेला खटकतं. तिचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल ते पाहिलं जातं. आजही लोक जेव्हा एखाद्या बाईला, बाइक चालवताना बघतात, तेव्हा बघतच राहतात. बाइक चालवणारी बाई बघताना लोकांच्या डोळ्यांत आश्चर्य आणि प्रश्न दोन्ही असतात.
सार्वजनिक ठिकाणांपासून जाणिवपूर्वक लांब ठेवलेल्या स्त्रिया भररस्त्यात बाईक चालवायला लागतात तेव्हा कसे टोमणे ऐकायला येतात हे कुठल्याही बाईक चालवणाऱ्या मुलीला विचारा… रस्त्यात पुरुषांच्या गाडीला जर का ओव्हरटेक केलं तर पुरुष हमखास ओव्हरटेक करतात. त्यांच्या गाडीच्या चष्म्यातून, आरशातून आपल्याकडे बघतात… कधी कुत्सितपणे तर कधी चिडून….
(गडचिरोलीची महिला सरपंच भाग्यश्री लेखामी आणि तिची बुलेट)
पण तुम्ही कधी बाईकच्या (स्कुटीच्या नव्हे) जाहिरातीत एखाद्या मुलीला पाहिलं आहे का? आपण असाही विचार करू शकतो की स्कुटी चालवणं अधिक सोपं आणि आरामदायकही आहे. ती वजनाला हलकीही असते. मग गियरवाली बाईक कशाला चालवा? पण बाईक मोठ्या प्रवासासाठी उपयुक्त असते. खराब रस्त्यांवर बाईक चालवता येते, स्कुटर चालवणं जरा अडचणीचं ठरतं. प्रत्येक गाडीचे काही फायदे असतात, तोटेही असतात. मग चालक कसा ठरवतो की, बाईक चालवायची की स्कुटर?
बाईक म्हणजे इथं गियरवाली गाडी असा अर्थ अभिप्रेत आहे, स्कुटर किंवा सायकल नाही. तुम्ही ती जाहिरात पाहिली असेलच की, ‘व्हाय शुड बॉयस हैव ऑल द फन’ ज्याचा अर्थ आहे मुलांनीच सारी मजा का करायची? एका स्कुटीची ही जाहिरात आहे जी एक मुलगी चालवते आणि सांगते की मुलीही मजा करू शकतात. फिरायला जाऊ शकतात. मग बाईक चालवणाऱ्या प्रत्यक्षातल्या बायकांना नक्की काय वाटतं?
संबंधित लेख वाचा: 1) असं काय घडलं की, मध्य प्रदेशच्या या आदिवासी मुली बाईक मॅकॅनिक बनताहेत…? |
नक्षलग्रस्त भागातील ‘बुलेटवाली’ सरपंच… भाग्यश्री लेखामी
नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीच्या भामरागड या अतिदुर्गम भागात भाग्यश्री लेखामी ही माडिया आदिवासी समाजाची तरुणी तिच्या लाल रंगाच्या बुलेटवरून निघते तेव्हा तिथल्या आदिवासींचा ऊर अभिमानाने भरून येतो. भाग्यश्री लेखामी ही सरपंच आहे. ती म्हणते, नक्षलग्रस्त अशा गडचिरोली जिल्ह्यातील नऊ गावांची जबाबदारी माझ्या सारख्या 23 वर्षीय महिलेने सांभाळणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे. कोठी ग्रामपंचायतीमध्ये वाढलेली मी खेळात प्रवीण होते आणि मुलांबरोबर क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि कबड्डी खेळायचे. बऱ्याचदा पुरुषांच्या मोठ्या गटात मी एकटीच महिला असायचे. मी मोटारसायकल चालवायचे, लहान केस ठेवायचे आणि मी पॅन्ट-शर्ट वापरत होते, परंतु प्रत्येकाने मला मोकळेपणाने स्वीकारले.
बुलेट चालवण्याचा काय फायदा होतो हे ‘बाईमाणूस’शी बोलताना भाग्यश्री सांगते की, इथल्या स्थानिकांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मला सरपंच या नात्याने सतत गावांना भेटी द्यावा लागतात. परंतू भामरागडमध्ये धड पक्के रस्ते नाहीत, की दळणवळण यंत्रणा. तहसील कार्यालय 25 किलोमीटर अंतरावर आहे. कित्येक तासांच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहचायचो. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून बुलेट माझी पक्की मैत्रीण झाली. बुलेटवर बसूनच मी रोज किमान एक किंवा दोन गावांना भेट देते. प्रत्येक गाव माझ्या गावापासून सुमारे पाच ते आठ किलोमीटर अंतरावर आहे.
(याच बुलेटवरून गावोगावी जात भाग्यश्री स्थानिकांचे प्रश्न सोडवते.)
‘’माझी बाईक चालवण्याची पद्धत, बसण्याची ऐट पाहून मीच सुखावते’’
चंद्रपूरची साची जिवने बाईक चालवण्यात एकदम एक्सपर्ट आहे, परंतू तिला आजही एक स्वप्नं पडतं. आपल्या या स्वप्नाविषयी साची सांगते,’’ झुंझुरत्या पहाटेची वेळ. मऊ दुलईत अर्धवट झोपेत, अर्धवट जागेपणी मी साखरझोप घेत गादीवर लोळते आहे. या साखरझोपेत समोर येतो तो काळा कुळकुळीत, डांबरी रस्ता. या टोकापासून त्या टोकापर्यंत हायवे. कडेला उभी ती काळी बाईक. अगदी हळुवार पावले टाकत मी बाईकजवळ जातेय. वर निळं आकाश, समोर काळाभोर लांबवर पसरलेला मऊसूत डांबरी रस्ता. त्या सरळ रस्त्यावर पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत मी बाईक चालवते आहे. सपसप तोंडाला लागणारा वारा, कानापाशी भिणभिणणारा वारा मला सुखावतो आहे. मी जात असताना माझी बाईक चालवण्याची पद्धत, बसण्याची ऐट पाहून मीच सुखावते आहे. बाईक पाहत पाहत मी जागी होते.’’
अश्विनी चौधरी छ. संभाजी नगरमध्ये शिकतेय. ती सांगते, “मी ते करू शकते जे आमच्या गावातील कोणतीही मुलगी करू शकत नाही.” अश्विनी एम.कॉम.ची विद्यार्थिनी आहे. बाइक चालवत ती बँकेची कामं करते, रेशन आणते, कधी आजोबांना बाहेर त्यांच्या कामासाठी घेऊन जाते. अश्विनीने कधी स्वतःसाठी बाईक मागितली नव्हती. पण घरी बाइक होती त्यामुळे घरच्यांनी तिलाही बाइक चालवायला परवानगी दिली, मनाई केली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही त्या गावातून दूर, शहरात बाइक घेऊन जात नाहीत. बाईक हीअश्विनीसाठी एक साधन आहे ज्यामुळे तिची कामं सोपी झाली आहेत.
एका जागेपासून दुसऱ्या जागी जाण्यासाठी लोकांना एखाद्या साधनाचा उपयोग करावाच लागतो. आपल्या लहानसहान कामांसाठीही बायकांना घरातील पुरुष सदस्यावर निर्भर राहावं लागतं. अनेक घरांमध्ये आता बाईक असतेच. पण बायका ती चालवतीलच असं मात्र नाही. मात्र स्वतःला आत्मनिर्भय करण्याचा एक भाग म्हणून बायका आता बाईक चालवू लागल्या आहेत. महिला बायकिंग स्कूल, क्लब, कोचिंग क्लासेसची वाढती संख्या हेच सांगते की बायका आता मोठ्या प्रमाणात प्रोफेशनल बाईक ट्रेनिंग घेऊ लागल्या आहेत. 
(छ. संभाजी नगरची अश्विनी चौधरी)
“बाईक चालवण्याच्या निर्णयाने माझं आयुष्यच बदलून गेलं’’
बाईक चालवत असताना असे कित्येक क्षण आले जेव्हा त्यांना हे जाणवलं की, बायकांनी काय करावं किंवा करू नये, हे सांगण्याची एकही संधी समाज कधी चुकवत नाही. काही कठीण प्रसंगांतून प्रियांकालाही हे समजलं की समाज कसा बायकांना पुन्हा स्वयंपाकघराकडे जाण्याचा रस्ता दाखवण्यात यशस्वी होतो.
प्रियांका प्रसाद बँगलोरमध्ये कामाला आहेत आणि 2016 पासून बाईक चालवत आहेत. त्यांची सर्वांत लांब बाइक यात्रा होती बँगलोर ते श्रीनगरची. त्या सांगतात की, महिला बाईक चालकांचं नाव ऐकताच त्यांच्या मनात एकच शब्द येतो तो म्हणजे, पंख. प्रियांकाचं मानणं आहे की, कोणत्याही महिला बाईक चालकाच्या मनात इतका उत्साह हवा की त्यांनी केवळ मुलेच बाइक चालवू शकतात या समजाला छेद देण्यासाठी कायम प्रयत्न करायला पाहिजे. बाईक चालवणं हे एक कौशल्य आहे.
एकदा बाईकचं वजन सांभाळणं आणि गियर टाकणं समजलं की बाइकही समजून येते. पण महिलांच्या बाबतीत ही केवळ कौशल्याची गोष्ट नाही तर, त्याच्यापुढे जाऊन ते एक स्वातंत्र्य आहे. ज्यासाठी त्या लढतात आणि त्यांना सिद्ध करावं लागतं की त्या हे काम करू शकतात. अडचणी असल्या तरीही बायकांना आपल्या हौसेसाठी आणि वेडासाठी इतका आत्मविश्वास तर दाखवावाच लागेल की त्या सर्व अडचणींवर मात करून आपल्या स्वप्नातील झेप घेऊ शकतील. प्रियांकाच्या घरच्यांनी त्यांच्या बाईक चालवण्याचा कधी विरोध केला नाही. त्यांच्या ऑफिसचे लोकही त्यांच्या बाईक ट्रिपच्या गोष्टी ऐकायला कायम उत्सुक असतात.
प्रियांकाप्रमाणेच नव्या जागी फिरण्याचा आणि बाईक चालवण्याचा शौक असलेली पुजा आंबे देखील बँगलोरमध्येच काम करते. मूळची ती छ. संभाजी नगरची. मागील तीन वर्षांपासून ती बाईक चालवत आहे. बाईक चालवताना त्यांना जेवढा आनंद होतो तेवढा इतर कोणत्याही वाहनाने होत नाही.
बाईक चालवण्याचा नक्की काय फायदा होता यावर पुजा सांगते की, “बाईक चालवण्याच्या निर्णयाने माझं आयुष्यच बदलून गेलं. बाइकवरून वेगवेगळ्या जागी जाण्याचा जो अनुभव आहे, तो एखाद्या थेरपीपेक्षा कमी नाही.” पुजा नव्यानं बाइक चालवणाऱ्या बायकांसाठी वर्कशॉप्स घेते, ट्रेनिंग देते, इवेंट्स आयोजित करते. जेव्हा एखादी महिला चालक बाइक चालवणं शिकताना तिच्यापासून प्रेरणा घेते, काही नवं शिकते तेव्हा पुजालाही त्याचा आनंद होतो आणि आपण स्वतः बाइक चालक असल्याचा गर्वही.
(पलक अंभोरे)
‘’बाईक नाही तर समाज भेदभाव करतो’’
२१ वर्षीय पलक अंभोरे मागील तीन वर्षांपासून बाईक चालवत आहे. अनेकदा गावातील लोक तिला मुलगाच म्हणतात कारण ती शर्ट, पँट, जीन्स असेच कपडे घालते. तिलाही बाइक चालवताना आत्मनिर्भर असल्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे कोणी काहीही म्हटलं तरी तिला फरक पडत नाही. पलकचे मामा छ. संभाजी नगरपासून ४२ किमी दूर अंतरावर असलेल्या एका गावात राहतात. तीन वर्षांपूर्वी पलकला जेव्हा बाइक चालवता येत नव्हती तेव्हा तिला बसने जावं लागायचं किंवा इतर कोणाच्या गाडीवरून. आता मात्र ती निर्भयपणे एकटीच मामाच्या गावाला जाते. त्यासाठी कोणाची वाट बघावी लागत नाही. पलक हेही सांगते की बाइक चालवण्यामुळे ती आता निसर्गाकडे जास्त लक्ष देऊ लागली आहे. रस्त्यातील प्रत्येक गोष्टी ती शांतपणे बघत जाते.
या महिला बाइक चालकांच्या कथा तुम्हाला गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘धकधक’ या चित्रपटाची आठवण करून देतील. यात चार बायका बाइकवरून एका लांबदूरच्या प्रवासाला जातात. त्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर उपाय शोधत, ते स्वतःसाठी वेळ काढून जगण्याचा आनंद लुटायला फिरत राहतात. बाइक चालवणं ही आनंदाची आणि सुविधेची गोष्ट असली तरी, यातही अनेक अडचणी सोबतीला येत असतात. ज्यामुळे यांचा प्रवास वाटतो तितका सोपा कधीच नसतो.
अश्विनी सांगते की, “लोकांना असं वाटतं की बायका जर सारी कामं स्वतःच करू लागल्या तर, गाडीही चालवू लागल्या तर, त्या लग्न करणारच नाहीत.” जेव्हा एखादी महिला बाइकर रस्त्यावरून जाताना दिसते तेव्हा लोक अशाच काही विचाराने त्यांच्याकडे बघत असतात. त्यांच्या बघण्यातून हे दिसून येतं की या बायका काहीतरी वेगळं करत आहे, कारण जेव्हा पुरुष बाइक चालवतात तेव्हा कोणी त्यांच्याकडे बघत नाहीत.
त्यांच्या गाडीचं मॉडेल चांगलं असेल तर नक्कीच बघतात. सुरक्षेचा मुद्दाही या महिला बाइक चालकांच्या बाबतीत असतो. लांबच्या ट्रिपमध्ये अपघातापेक्षा, महिला असल्यामुळे कोणी आपल्याला काही करणार तर नाही याची भीती जास्त वाटते. शिवाय लांबच्या प्रवासात बाथरुमची गरज भासतेच आणि साफ बाथरुम मिळणं ही एक मोठी जिकिरीची गोष्ट असते.
पुजा आपल्या बहिणीसोबत एकदा गावातील चहाच्या टपरी समोरून जात होती. तेव्हा त्यांची बाइक बंद पडली. पुजाला वाटलं की कदाचित पेट्रोल संपलं असेल. तेव्हा टपरीवरील एका माणसानं त्यांची मदत केली आणि सांगितलं की बाइकचा एक तार निसटला आहे.
त्यावेळी टपरीवर बसलेल्या काही मुलांनी कमेंट केली की, “बाइक चालवता येत नाही तर चालवायची कशाला आहे तुला बाइक?” पुजाने यावर धीटपणे उत्तर दिलं की, ती लवकरच बाइक चालवायला शिकेलच. ती जेव्हा आपल्या ड्रायव्हिंग लायसेंससाठी टेस्ट द्यायला गेली होती तेव्हा पाऊस पडत होता. हवामान खराब हसल्यामुळे सर्व बाइक चालकांना एका लहानशा मैदानावर टेस्ट देण्यासाठी सांगण्यात आलं. पण पुजाला मात्र एका खराब रस्त्यावरून बाइक चालवायला सांगण्यात आलं जिथं गाडी चालवणं कठीण होतं, कारण ती बाई होती. पण तिने पहिल्याच प्रयत्नात बाइक चालवत टेस्ट पास केली. पुजा याविषयी सांगते की, “बायकांना नेहमीच हे सिद्ध करून दाखवावं लागतं की त्यांना पुरुषांची कामेही करता येऊ शकतात.”
बायकांना बाइक चालवताना साडी घालता येऊ शकत नाही. प्रियांकाला साडी घालायला आवडतं. पण त्यामुळे त्यांचं बाइक चालवणं कमी झालं नाही. जेव्हा त्यांना साडी घालून बाइक चालवण्याचा प्रसंग पडला तेव्हा त्यांनी साडी धोतरासारखी घालून बाइक चालवली. धोतर घातल्यावर बाइकवर आरामात बसता येतं. महाराष्ट्रात तर अनेक बायका लुगडं घालून बाइक चालवतात. बघणाऱ्यांना थोडं विचित्र वाटतं की एखादी बाई साडी घालून बाइक चालवत आहे. पण त्यांना बायका बाइक चालवतात हेच विचित्र वाटत असतं. प्रियांका सांगते की, “जोवर तुम्ही दृढ निश्चय करत नाहीत की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं नाही, तोवर तुम्ही तुमच्या आनंदाचा नवीन रस्ता शोधू शकत नाहीत.”
असे तर कित्येक किस्से असतील जेव्हा बाइकर बायका बघून त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं गेलं असेल. बायकांनी स्कुटर किंवा कार चालवणं आता सामान्य समजलं जातं मग त्यांचं बाइक चालवणं लोकांना असामान्य का वाटत असावं? “बाइक कोणताही भेदभाव करत नाही, समाज मात्र भेदभाव करतो”, प्रियांका सांगते.
भाग्यश्री, साची, प्रियांका, पुजा, पलक, अश्विनी इत्यादी अनेक महिलांना बाइक चालवताना आनंद होतोय आणि त्यांना बाइक चालवताना बघून आपल्यालाही आनंद व्हायला पाहिजे. बाइक चालवणं हे केवळ मुलांचंच काम आहे, असं मुलींनी अजिबात समजू नये हीच आमची इच्छा आहे. आपण सर्वांनीच महिला बाइक रायडींगला एक सामान्य गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.






