- भागा वरखडे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेल्या भारतात कोणीही काहीही लिहू शकतो आणि बोलू शकतो. सध्या ‘सोशल मीडिया’वर अनेक जण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खुल्या मनाने व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता ‘सोशल मीडिया’वर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला जनतेचे सेवक समजतात; परंतु त्यांना आदर्श मानणारे भाजपचे आमदार मात्र जनतेची वारंवार अवहेलना करतात.
निवडून यायला आमदार जरी स्वतःचे आणि पक्षाचे पैसे खर्च करीत असले, तरी निवडून आल्यानंतर त्यांना मिळणारे भत्ते, पगार तसेच अन्य सुविधा या जनतेच्या पैशातून मिळत असतात. त्याचे भान राहिले नाही आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेली, की आमदारांच्या जिभा सैल होतात. सत्ताधारी आमदारांना तर सत्तेची नशा जास्तच चढते. त्यामुळे ते जनतेला गृहीत धरतात. जनतेविषयी नको ते बोलतात.
बबनराव लोणीकर, वाद आणि बरंच काही;
जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ वारंवार घसरत आहे. लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा अवमान फक्त एकदाच केला नाही, तर अनेकदा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्यानंतर बबनरावांना उपरती झाली असली, तरी माफी मागतानाही त्यांची मग्रुरी कायम दिसते.
सध्या ‘सोशल मीडिया’वर अनेक जण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खुल्या मनाने व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘सोशल मीडिया’वर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर त्यांनी आगपाखड केली आहे.
“कुचवट्यावर बसून ‘सोशल मीडिया’वर चर्चा करणाऱ्या कार्ट्याच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन लोणीकर यांनीच केला आहे, तर मोदी यांनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बुट, चप्पलसुद्धा सरकारमुळेच आली असल्याचा त्यांचा दावा आमच्यामुळेच सर्व आहे, अशा धाटणीतला आहे.
‘ज्यांनी चोच दिली, तो चारा देतो’, असे आपल्याकडे म्हटले जाते. याचा अर्थ जन्माला येणाऱ्याची व्यवस्था निसर्गच करीत असतो. त्यात सरकार नावाच्या यंत्रणेने फक्त या घटकाचे जगणे सुसह्य व्हावे, असा प्रयत्न करण्याची आवश्यकता असते; परंतु सरकारमधील एका पक्षाचा आमदारच जर तुमचे जगणे आमच्यामुळेच आहे, असे सांगत असेल, तर त्यांची ती मग्रुरी असते. शेतकऱ्याला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदी देत असतील, तर ते ही पैसे सरकारचे आहेत. कुणाच्या खिशातील नाहीत, याची जाणीव ठेवायला हवी.
शेतकऱ्यांना खरेतर काहीच मदत नको आहे. सरकारने शेतीमालाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नये आणि आयात-निर्यात धोरणात उठाठेव करू नये. सरकारने फक्त वीज, पाणी आणि भाव या तीन गोष्टींची व्यवस्था केली, तर शेतकऱ्यांना सरकारच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे राहण्याची वेळ येणार नाही.
बबनराव म्हणतात, त्याप्रमाणे शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे, त्याच्या बायकोला पगार, चप्पल आणि बूट जर सरकार देत असेल, तर मग ते ज्या भागातून येतात, त्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या जास्त का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. लोणीकर यांच्याच भाषणाचा आधार घेतला, तर शेतकऱ्याच्या मुलाच्या आईला पगार ते कुठून देतात, त्यांच्याकडे पगार देण्यासाठी पैसे कुठून येतात, त्या मुलाची आई बबनरावांकडे नोकरीला आहे का, या प्रश्नाची उत्तरेही त्यांना द्यावी लागतील.
बबनरावांची पहिल्यांदाच जीभ घसरली असे नाही, तर याआधीसुद्धा त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. सरकारवर टीका करणाऱ्याची आई-बाप, बहीण, बायको अशा सगळ्यांचा उद्धार करत बबनरावांनी उद्दाम भाषा वापरली. पस्तीस वर्ष राजकारणात आमदार, मंत्री राहिलेल्या बबबरावांमध्ये मीपणा आला कुठून असा प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत मोदी देतात, हे खरे आहे; परंतु अंगावर कपडे, चप्पल, बुटाची व्यवस्था सरकार करते, याचा साक्षात्कार बबनरावांना कसा झाला? कोणत्या योजनांतून प्रत्येक कुटुंबात ही मदत दिली जाते, हे त्यांनी एकदा सांगितले असते, तर बरे झाले असते.
|
|
‘तुला निलंबित करेन, ऊर्जामंत्री माझे नातेवाईक आहेत’
यापूवी त्यांनी आमदार, सरकारी अधिकाऱ्यांविरुद्धही असभ्य भाषा वापरल्याची उदाहरणे आहेत. तीन वर्षापूर्वी संभाजीनगरच्या सातारा परिसरातील त्यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपये बील न भरल्यामुळे वीजजोड कापल्याने बबनरावांचा संताप असाच अनावर झाला होता. वीज बील भरले नाही, तर सरकारच वीजजोड कापायला सांगते आणि त्याच सरकारचे प्रतिनिधी असलेले बबनराव स्वतःच बील भरीत नसतील आणि त्यांची वीजजोड कापली, तर सरकारला सामान्य ग्राहकाचे वीजबील थकले, म्हणून वीजजोड तोडण्याचा अधिकार मिळतो का, या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे.
महावितरणचे अभियंते दादासाहेब काळे यांना फोन करून त्यांनी धमकावले होते. ‘तुला निलंबित करेन, ऊर्जामंत्री माझे नातेवाईक आहेत. तुझ्या मालमत्तेची चौकशी करायला लावील. तुम्ही माझे मीटर काढून घेतले का? अरे नालायकांनो आम्ही बील भरतो. मी दहा लाख रुपये बील भरले, ही त्यांची भाषा कोणत्या सुसंस्कृततेत बसते, हे साधनशूचितेचा डांगोरा पिटणाऱ्यांनी सांगायला हवे. त्यांची भाषा आमदाराची नाही, तर उडाणटप्पूची आहे.
गोरगरिबांची मते घ्यायची, झोपडपट्टीत जायचे आणि स्वतःची वीज कापली, की बबनराव अधिकाऱ्यांवर त्रागा करताना त्यांना ‘हिमंत आहे का तुमच्यात? झोपडपट्टीत जा, जिकडे आकडे टाकतात. आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे दहा लाख भरले या वर्षात. एका मिनिटात तुला घरी पाठवील, माज चढला का? नोटीस दिली का? तीस वर्ष आमदार आहे, मी मंत्री राहिलो, नोटीस न देता आमचे मीटर काढून नेता तुम्ही. ३५ वर्षे झाले मी राजकारणात आहे. झोपडपट्टीत जा तुम्हाला सत्तूरने तोडतील, अशी धमकी देतात. झोपडपट्टीधारकांवर वीज चोरीचा आरोप आपण करतो आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात
जालना जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राहुल लोणीकर यांना उपाध्यक्ष करण्याचा दिलेला शब्द न पाळल्यावरून राजेश टोपे यांना बबनरावांनी शिवीगाळ केली होती. चोर, हरामखोर अशी शेलकी विशेषणे त्यांनी वापरली होती. नंतर मात्र सवयीप्रमाणे ही क्लीप खोटी असल्याचा दावा केला होता. 2020 मध्ये फडणवीस सरकारमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असताना बबनराव हे मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले होते. ‘तुम्हाला वाटले, मोर्चासाठी एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू. आणि नाही जर कोणी भेटले, तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच'.त्या निवेदन घ्यायला येतील तुमचे, असे लोणीकर म्हणाले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांची कोंडी झाली होती.
जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भाषणात लोणीकरांनी गावकऱ्यांना इशारा देत म्हटले, की हे टॉपचे गाव आहे म्हणून तुम्हाला 8 कोटी रुपये देऊन ठेवले होते. मते कमी झाल्यामुळे आता कॅन्सलही करता येत नाही. चूकभूल होत राहते. मला तुम्ही असेच नाही दिले, तर 5 ते 10 कोटी रुपये देत राहीन. मी एकदा चव पाहीन, दोनदा आणि तीनदा पाहीन, नंतर म्हणेन, फुली हाणा. ही वेळ येऊ देऊ नका, असा इशारा बबनरावांनी दिला होता.
बबनरावांचे वक्तव्य पाहता ब्रह्मदेवासराखा विधाता आणि कर्णासारखी दानशूरता असे दोन्ही गुण त्यांच्या ठायी असूनसुद्धा महाराष्ट्राला त्यांची किंमत कळली नाही! बबनरावांच्या अन्वयार्थानुसार ते आणि भाजपच सरकार नसते, तर महाराष्ट्र आज अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेला असता. पोरे बिनकपड्याची अनवाणी पायांनी भटकत असती, पोराच्या बापाला पेन्शन नसते.
पेरणीसाठी पैसे नसते, घरातल्या आई-बहीण आणि बायकोच्या खात्यात पंधराशे रुपयेही आले नसते, हातात मोबाईलसुद्धा नसता; पण दरिद्री कल्पनेचे हे कटू स्वप्न म्हणून भाग्योदयाची पाहाट व्हावी तसेच महाराष्ट्रात भाजप सरकार येऊन लोणीकर सत्ताधारी झाले आणि त्यांनी महाराष्ट्राच चित्रच बदलून टाकले.
ब्रह्मदेवाने तर फक्त सृष्टीच बनवल्याची धारणा आहे. पण त्या सृष्टीतल्या लोकांकडे समृद्ध करण्याचे काम भाजप आणि बबनरावांनीच केल्याचे ते सूचवू पाहतात. म्हणजे भाजपचे सरकार आणि बबनराव सत्तेत येण्याआधी राज्यातली पोरे उघडी फिरत होती. त्यांना कपडे बबनरावांनीच दिले, आधी पोरे अनवाणी फिरायची त्यांना बूट आणि चप्पलसुद्धा भाजप सरकारने दिले.
पोराच्या हातात मोबाईल, ज्याला बबनरावांच्या भाषेत डबडे म्हणतात, ते सुद्धा भाजप सरकारने दिले. त्या पोराच्या आईला पगार बबनरावांनी दिला, पोराच्या बापाला पेन्शनही बबनरावांनी दिली. त्या बापाच्या पेरणीसाठी पैसे मोदींनी दिले आणि पोराची आई, बायको आणि बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे सरकारने दिले.
बबनरावांनी महाराष्ट्रावर एवढे उपकार करून स्वर्ग बनवला असताना नतद्रष्ट टीकाकारांना झापडे बांधलेले असल्याने ते दिसत नाही!






