(संजना खंडारे)
मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात पश्चिमेकडून सुखद वाऱ्याची झुळूक यायला लागते आणि रणरणत्या उन्हाळ्याला काहीसे शीतल करते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा भाग हिरव्यागार जंगलांनी नटलेला आहे. संध्याकाळ सरून जशीजशी रात्र व्हायला लागते, हा भाग अक्षरशः रोषणाई केल्यासारखा झगमगून उठतो.
ही रोषणाई विजेची नसून, प्रत्यक्षात ते प्रकाशाचे किडे-अर्थात काजवे असतात. काजवे ह्या कीटकांसाठी सरता मे- आणि जून हा मीलनाचा काळ असतो. नजरबंदी करणारा हा प्रकाश काजवे आपल्या प्रजननादरम्यान निर्माण करतात. जसजसा मोसमी पाऊस स्थिरावेल, तशीतशी काजव्याची संख्या हळूहळू कमी होते.
मात्र गेल्या काही वर्षांत यात कमालीचा बदल झालेला आहे. पर्यावरण तज्ज्ञ तसेच भंडारदरा- घाटघर परिसरातील स्थानिकांच्या मते, हे असेच चालत राहिलं, तर काजव्याचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. त्यांच्या निरीक्षणानुसार पर्यटकांची प्रचंड वेगाने वाढणारी संख्या आणि वातावरणातील बदल यामुळे काजव्यावर विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे काजव्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
काजवे वाचवण्यासाठी वन्यजीवप्रेमींची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव
म्हणूनच कळसूबाई वन्यजीव अभयारण्यात आयोजित केल्या जाणाऱ्या काजवा महोत्सवादरम्यान पर्यटनाचा अतिरेक झाल्याने गेल्या काही वर्षात काजव्यांची संख्या वेगाने कमी झाली, असा आरोप करीत या अतिरेकी पर्यटनावर निर्बंध आणण्यासाठी वन्यजीवप्रेमी गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतली आहे.
न्या. दिनेशकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. काजवा महोत्सवादरम्यान कळसूबाई वन्यजीव अभयारण्यात काजव्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी संयुक्तपणे व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश प्रतिवादींना द्यावेत. येत्या 17 मे ते 22 जूनपर्यंत आयोजित काजवा महोत्सवासाठी कळसूबाई वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश, शिबीर आणि तीव्र प्रकाशाचा वापर करण्यावर कमाल मर्यादा लागू करण्याचे निर्देश राज्याच्या वनखात्याला द्यावेत, असे या याचिकेत नमूद आहे.
ही याचिका स्वीकारण्याआधी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने वनविभाग आणि पर्यटन विभागाला चार आठवड्यांच्या आत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने दिले. यावर पुढील सुनावणी 20 जूनला होणार आहे.
संबंधित लेख वाचा: 1) ‘हुस्न पहाड़ों का’ झाले आता विद्रुप… काश्मीरचे पर्यटक म्हणतात, “यहाँ अब नही मौसम जाड़ों का…” |
पर्यटन खात्याची योजनाच नाही
कळसूबाई वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात तंबू आणि इतर सुविधांसाठी वनविभागाने विविध खाजगी पर्यटन आयोजकांना परवानगी दिली आहे. हे पर्यटन निसर्ग पर्यटन बृहत आराखड्यानुसार व्हायला हवे होते. मात्र, राज्याच्या वन व पर्यावरण विभागासह पर्यटन खात्याने अजूनही अशी योजना तयार केलेली नाही. प्रत्यक्षात केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार ही योजना तयार करणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्रातील राधानगरी, राजमाची, पुरुषवाडी, प्रबळवाडी, भीमाशंकर आणि माळशेज घाट यासह विविध भागात काजवा महोत्सव साजरा केला जातो. मात्र, पर्यटकांकडून अडथळे येतात. उडू न शकणाऱ्या माद्या चिरडल्या जातात. परिणामी, त्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही या याचिकेत म्हटले आहे. याचिकार्त्याच्या वतीने ॲड. मैत्रेय घोरपडे व ॲड. मानसी ठाकरे यांनी बाजू मांडली.
दरवर्षी दोन लाख पर्यटकांची काजवा महोत्सवाला गर्दी
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे दोन लाख पर्यटक ह्या भागात दरवर्षी काजवे बघण्यासाठी येतात. दरवर्षी या महोत्सवाची लोकप्रियता वाढत चालली आहे आणि त्याचसोबत पर्यटकांची संख्या देखील. मात्र आता बऱ्याच पर्यावरण अभ्यासकांनी अशी मागणी केली आहे की हे महोत्सव भरवणं बंद केलं जावं.
गेल्या काही काळात मात्र काजव्यांच्या ह्या मीलनकाळाचं बऱ्यापैकी बाजारीकरण झालं आहे. काजवा महोत्सवाच्या नावाखाली अनेक व्यावसायिक पर्यटन संस्था भरमसाठ पर्यटक घेऊन ह्या भागात येताहेत. ह्या भेटींमध्ये पर्यटक स्थानिक अन्न, संगीत आणि आदिवासी जीवनाचा अनुभव घेतात. गेल्या काही काळात वाढलेली पर्यटकांची संख्या ही रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उपयुक्त असली, तरी त्याचा परिणाम म्ह्णून काजवे कमी होत आहेत.
विशेषतः पर्यटकांच्या काही कृत्यांमुळे काजव्यांच्या मीलनावर तीव्र परिणाम होतो. कीटकतज्ज्ञ डॉ राहुल खोत यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितलं की, काजव्याचा माग काढत अनेक पर्यटक रात्री जंगलात टॉर्च घेऊन फिरतात, तर अनेक जण जंगलामध्ये वाहने नेऊन त्याचे प्रखर दिवे चालू ठेवून काजव्याचा शोध घेतात. " ह्यामुळे नर काजव्याच्या प्रकाश उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेत कमालीचे अडथळे निर्माण होतात. ह्या प्रकाशाच्या प्रदूषणामुळे काजव्यांच्या संदेशवहनात बाधा येते. आणि त्यामुळे त्यांचे मीलन होऊ शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे केवळ नर काजवे उडू शकतात. मादी काजवे जमिनीवरच असतात. आणि जंगलामध्ये संचार करणाऱ्या ह्या हजारो पर्यटकांच्या पायाखाली मादी काजवे तुडवले जातात.
काजव्यांच्या प्रजननावर गंभीर परिणाम
खोत असं सांगतात की काजवे ही अतिशय संवेदनशील प्रजाती आहे आणि त्यांच्या अधिवास क्षेत्रात किंवा वातावरणात अचानक बदल घडले तर त्यांच्यासाठी ते भयंकर घातक ठरतात. " हे कीटक सामान्यतः उडून दुसरीकडे जात नाहीत. ते साधारण 100 मीटरच्या परीघातच वास्तव्य करतात. हिरडा किंवा बेहडा अशा काही विशिष्ट झाडांवर काजवे वस्ती करतात. या झाडांची विशिष्ट ठेवण काजव्यांना उपयुक्त ठरते. ही झाडं एकतर तोडली जाताहेत किंवा हळूहळू वातावरण बदलामुळे नष्ट होत आहेत. ह्यांच्यामुळे काजव्याचे प्रजनन नीट होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम त्यांची संख्या कमी होण्यावर होतो. "
बाबदार पर्यटनासाठी सरकारने नियम घालून दिले आहेत. पण प्रत्यक्षात ते नियम कागदावर राहतात आणि त्याचं पालन कोणीच करत नाही, असं स्थानिकांचं आणि पर्यावरणतज्ञांचं म्हणणं आहे. पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी राज्य वन विभागाने अनेक नियम घालून दिले आहेत. वन विभागाचे अनेक अधिकारी तसेच पोलीस अधिकारी हे वेळोवेळी सांगत असतात की पर्यटकांची वाहने ही पार्किंगसाठी नेमून दिलेल्या जागेतच उभी केली जावीत.
काजवे असलेल्या झाडापासून किमान 50 मीटर अंतर ठेवावे. मोबाईलचा टॉर्च, विजेऱ्या किंवा LED दिव्याचे प्रखर झोत ह्या झाडांवर मारले जाऊ नयेत. तसेच मोठ्या आवाजात गाणी वाजवणे अथवा जोरात हॉर्न वाजवणे यावर बंदी, असे अनेक नियम केलेले आहेत. हे नियम धुडकावून लावणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 
काजवा, शेतकऱ्यांसाठी वरदान
कमी होणाऱ्या काजव्यांच्या संख्येचा शेतीवर अदृश्य, पण तीव्र परिणाम होतो. काजवे हे नैसर्गिक अन्नसाखळीत मोलाची भूमिका पार पाडतात, कारण पिकांना उपद्रव देणारे किडे हे त्यांचं खाद्य आहे. मऊ पृष्ठभाग असणारे किडे, उदा. गोगलगाय, अळी, गांडूळ -ज्यांना स्लग्स म्हणतात, ते काजव्यांच्या अळ्यांचे खाद्य आहे. यामुळे काजवे शेतकऱ्यांसाठी ‘मित्रकीटक’ ठरतात. पण काजव्यांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे उपद्रवी किड्यांची संख्या वाढते.
पूर्वी अनेक आदिवासी शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर करत नसत. काजवे भरपूर प्रमाणात होते. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. कीड आणि वातावरण बदलामुळे शेतीमधील उत्पन्न कमी होत चालल्याने, चांगले पीक येण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करताहेत. ह्यांच्यामुळे काजव्यांच्या संख्येवर परिणाम होतोय, आणि अंतिमतः पुन्हा शेतीवरच परिणाम होतो आहे. 'इथे सरकारने, वन्यजीव अभ्यासकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी ताबडतोब दखल द्यायची गरज आहे. आता तरी वन विभागाने पर्यावरणीय आणीबाणीची दखल घेऊन या प्रदेशातील जैवविविधता" जपण्याची आणि संवर्धित करण्याची गरज आहे. "






