- अप्सरा आगा
'गोंदण' कला ही आदिवासी समाजाची अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि भावनिक परंपरा आहे. या कलेसह जुळलेली सांस्कृतिक ओळख, सौंदर्यशास्त्र आणि धार्मिक विचार हे सारेच आधुनिक काळात 'Tattoo' सारख्या नव्या रूपात उदयाला येत आहे. मात्र, यामुळे मूळ गोंदण कलाकार असलेला समाज मात्र उपेक्षित राहत आहे. यासाठी या कलेच्या अभ्यासाला आणि प्रसाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारने पारंपरिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला असून, या कलेवर सर्वंकष संशोधन करण्यासाठी एक विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.
विश्वास गुणवंतराव दोर्वेकर हे गोंदण कलाकार आहेत. गोंदण कलेला बळकटी मिळवून देण्यासाठी पारंपारिक गोंदण कलाकारांचे जे शिष्टमंडळ सांस्कृतिक मंत्र्यांच्या भेटीला गेले होते, त्यात विश्वास दोर्वेकर यांचाही समावेश होता. पुण्यातील मंगळवार पेठेत राहणारे विश्वास दोर्वेकर हे गोंधळी समाजाचे असून त्यांच्या कुटुंबाने गेल्या चार पिढ्यांपासून ही कला जोपासली आहे. गोंदण कलाकारांची होत असलेली परवड, गोंदण कलेचं आधुनिक टॅटू हे रुप आणि राज्य शासनाकडून नेमकं काय केलं जाणार आहे या विषयांवर ‘बाईमाणूस’ त्यांच्याशी बातचीत केली.
गोंदण कलेचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्व
गोंदण कला ही केवळ शरीरावर रंग आणि नक्षी काढण्याची कला नाही, तर ती भावना, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व यांचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून गोंदणांनी माणसाच्या जीवनात विशेष स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रात आदिवासी समुदायांपासून ते शहरी तरुणांपर्यंत, गोंदण कला विविध रूपांत बहरली आहे. गोंदण कलेचा प्रवास प्राचीन काळी गोंदणांना धार्मिक आणि सामाजिक महत्त्व होते.
आदिवासी समुदायात गोंदण हे ओळखीचे आणि परंपरांचे प्रतिक होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही पारंपरिक गोंदण काढणाऱ्या आजी-काकीं पाहायला मिळतात. आधुनिक काळात, गोंदण कला फॅशन आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचा भाग बनली आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि आंतरराष्ट्रीय टॅटू महोत्सवांमुळे ही कला जगभरात पोहोचली आहे.
चार पिढ्यांपासूनची गोंदण कला…
विश्वास दोर्वेकर यांनी गोंदण कलेच्या माध्यमातून गोंधळी समाजाच्या तुळजाभवानी भक्तीला आणि सांस्कृतिक वारशाला नवे आयाम दिले आहेत. विश्वास दोर्वेकर सांगतात की, माझे आजोबा पुण्यातील जुन्या बाजारात गोंदण्याचं काम करत होते. माझे वडील गुणवंत दोर्वेकर सैन्यात भरती झाले. मात्र त्यांनी नोकरी पूर्ण केली नाही. पुढे मग उदरनिर्वाहासाठी तेदेखील यात्रेत गोंदण्याचा व्यवसाय करू लागले.. पण व्यसनामुळे पैसे टिकत नव्हते, त्यामुळे कुटुंबाला सतत आर्थिक टंचाईचा सामना करावा लागायचा. माझी आई वडिलांना सोडून माहेरी निघून गेली.
संबंधित लेख वाचा: 1) झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी बाई.. पारंपारिक ‘गोंदण कला’ आता कला शाखेच्या अभ्यासक्रमात |
त्यावेळी मी बारा वर्षाचा होतो. वडिलांचं काम बघून मीदेखील गोंदण्याचं काम करू लागलो. वेगवेगळ्या गावांमधील यात्रेला जायतो, पण त्या ठिकाणी ना रहायला जागा आसायची, ना खायला पुरेसं अन्न… अशा परिस्थितीत रस्त्याच्या बाजूला जागा मिळाली की तिथेच तीन दगडांच्या चुलीवर कशीतरी खिचडी बनवून खायचो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही आम्हाला मिळत नव्हत्या.
याच काळात वडिलांनी दोन्ही भावना शिकण्यासाठी बोर्डिगला टाकले आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी यात्रांमध्ये गोंदण्याच काम करण्यासाठी जाऊ लागलो. वयाच्या सोळा वर्षापर्यंत मी संबंध महाराष्ट्र पालथा घातला, वाईट संगत मिळाली, त्यातून पुढे वाईटचं घडत गेलं. बाहेर कसं पडायचं हे सुचत नव्हतं आणि तशातच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत त्यांना त्यांचे मला माझाचा एक दूरचा भाऊ रमेश भेटला. रमेशमुळेच माझ्या पुढच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, असं विश्वास सांगतात.
यानंतर विश्वास दोर्वेकर यांचं आयुष्यच बदललं. आज विश्वास दोर्वेकर हे सेलिब्रेटी टॅटू आर्टिस्ट आहेत. त्यांनी अजय देवगण, सैफअली खान, सोनाक्षी सिन्हा, पूजा भट्ट, अंतरा माळी, क्रिकेटर हार्दिक पांड्या, संजय दत्त यांचे टॅटू काढले आहेत. या गोंदण कलेची सेवा करणारी आज त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे.
भारताच्या टॅटू कलेचे पितामह… गुणवंत दोर्वेकर
विश्वास यांचा मुलगा स्वप्नील दोर्वेकर हादेखील गेल्या 15 पंधरा वर्षांपासून गोंदण कला करून उपजीविका चालवत आहेत. स्वप्नील म्हणाला, 'या कलेची आवड मला वारसा हक्काने निर्माण झाली आहे. माझ्या घराण्यातील ही सेवा स्वातंत्र्य काळात पंजोबा किसनराव वाघजी दोर्वेकर करत होते. माझे आजोबा गुणवंत दोर्वेकर भारताचे पहिले सेलिब्रेटी टॅटू कलाकार होते.
त्यांनाच ‘भारतीय टॅटू कलेचे पितामह’ म्हंटलं जातं. आजोबांनी काढलेले लक्ष्मण, मेला, मर्द नरसिंहा सारख्या चित्रपटांमधील टॅटू प्रसिद्ध झाले. आजोबा भारतीय सेनेमध्ये सैनिक होते, त्यामुळे विदेशी कलाकार आणि त्यांच्या कलेचं आदान- प्रदान केले जात होते. म्हणूनच आजोबा आणि वडील यांच्या गोदण कलेच्या योगदानामुळे विदेशी टॅटू कला इकडे आली आणि आपली कला तिकडे गेली.
आज भारतात 2020 नंतर ज्यांनी टॅटू कला शिकली ते मोठमोठे दुकान, स्टुडिओ थाटून पैसे कमवत आहेत, पण खरा पारंपारिक कलाकार मात्र पैसा आणि गरिबी यामुळे मागे पडल्याची खंत विश्वास दोर्वेकर व्यक्त करतात. महाराष्ट्र शासनाने या गोंदण कलाकार आणि त्यांच्या कलेची कधीच दखल घेतली नाही. 
आमचे पणजोबा, आजोबा, वडील यांनी ज्ञानेश्वर माउली सोहळ्यात आळंदी ते पंढरपूरला सायकलवरून जाऊन गोंदण कलेचे काम केले होते. भारतीय गोंदण कलेची सेवा करणारी आमची चौथी पिढी काम करते. आज गोंदणकला ही टॅटू या नावाने करोडो रुपये कमवून देणारी कला असली तरी पारंपरिक गोंदण कलाकार अजून पडद्याआडच आहे, असेही विश्वास म्हणतात.
राज्य शासनाने लुप्त होत असलेल्या गोंदण कलेला नवसंजीवनी दिली
विश्वास दोर्वेकर सांगतात की, 'दोन वर्षांपासून आम्ही गोंदण कलेला हस्तकलेचा दर्जा आणि शासनमान्यता मिळण्याकरता प्रयत्न करत होतो त्याला आता यश आलं. त्या यशाची निर्मिती म्हणून मंत्री महोदयांनी गोंदणकला ही संस्कृती जपण्यासाठी अभ्यासगट करावा असे निर्देश दिले. संशोधनासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे आदेश देऊन खरंतर सरकारने लुप्त होत असलेल्या गोंदण कलेला नवसंजीवनी दिली आहे.
यासाठी माझा जो 46 वर्षाचा अनुभव आहे तो या कलेच्या कामी आला. माझ्या चौथ्या पिढीचं योगदान यामध्ये महत्वपूर्ण आहे. त्याचा कुठेतरी उपयोग होईल. लुप्त झालेली कला पुन्हा नव्या रूपाने एक नवीन कलाकार निर्माण होतील. या कलेचं आम्ही चार पिढ्या संगोपन केलं आहे. महाराष्ट्र सरकारने, जे. जे. स्कुल ऑफ आर्ट आणि तंत्रविभागाने आमचा उपयोग करून घ्यावा, असेही आव्हान विश्वास दोर्वेकर यांनी केले.






